भाऊबीज भाग २
अजय हॉलमध्ये बसुन ताईने केलेल्या उपम्याचा
समाचार घेत होता. बाजुलाच मदन देखिल आपली नाश्त्याची प्लेट घेऊन बसला होता समोर
टि.व्हीवर कार्टुनचा चॅनेल लावलेला होता. मदन कार्टुन बघत एकीकडे नाश्ता करीता
होता. मधुनच मामाबरोबर बोलत होता. समोरच्या कोचावर सुकन्या अजयबरोबर गप्पा मारीत
बसली होती. त्यांच्या गप्पा चालू असताना दारावरची बेल वाजली.
बेलचा आवाज ऐकताच दार उघडण्याकरीता मदन धावत
गेला. दार उघडल्यावर दारात आत्याला बघुन तो खुश झाला. वेलकम दिप्ती आत्या! एकटीच आलीस
दीदीला नाही आणलेस! असे म्हणून तो दारातुन बाजुला झाला. दारातुन मदनचे बाबा सुरेश
आणि त्याची बहिण दिप्ती आत आले. आतमध्ये आल्यावर समोर अजयला पाहून सुरेश खुश झाला.
कारण अजय बरेच दिवसांनी आला होता.
सुरेश भाऊबीजेच्या आदल्या दिवशी
भाऊबीजेकरीता त्याची बहिण दिप्तीकडे गेला होता. उद्या मदनचा वाढदिवस असल्याने
दिप्तीही त्याच्या बरोबर आपल्या माहेरी आली होती. दोघेही घरात शिरताच घरातले
वातावरण एकदम बदलुन गेले. सुरेश अजयच्या बाजुला गप्पा मारायला बसला, तर दिप्ती
आपल्या वहिनीबरोबर फ्रेश व्हायला आणि गप्पा मारायला आतमध्ये गेली.
*******
सुकन्याच्या खोलीत दिप्ती
आणि सुकन्या गप्पा मारीत बसल्या होत्या. दोघींचे उद्या मदनच्या वाढदिवसाचे
प्लॅनिंग करणे चालू होते.
वहिनी! अजयने भाऊबीज काय
दिली? दिप्तीने वहिनीला
विचारले.
अग यंदा त्याला पूर्ण बोनस मिळाला त्यामुळे तो एकदम खूष होता. यंदा त्याने मला
पाहिजे ती साडी खरेदी कर असे सांगितले. मला साडी तर घेतलीच शिवाय मदनला आणि
वृंदालाही त्याने ड्रेस घेतले. त्याला आई बाबांना देखिल कपडे घ्यायचे आहेत.
बघु कशी साडी आहे ती! मलाही दादाने मस्त काठापदराची साडी घेतली आहे. वहिनी एक
छान कल्पना मनात आली आहे. आपण उद्या मदनच्या वाढदिवसाला आपापल्या भाऊबीजेची साडी
नेसुयात काय? तुला आणि मला आपापल्या भावाने भाऊबीजेला
दिलेली साडी आपण उद्या नेसुया. त्या साडीला मॅचिंग होणारा ब्लाऊज आता माझ्याकडे आहे. दिप्तीने सांगितले.
दिप्ती कल्पना मस्तच आहे! मला खूप आवडली. माझ्याकडेही
मॅचिंग ब्लाऊज सापडेलच. ही बघ अजयने मला घेतलेली साडी, सुकन्याने हातातली साडी
दिप्तीच्या हातात देत म्हटले.
अय्या! छानच आहे. अशी साडी तुझ्याकडे नव्हतीच. मग ठरले तरं
उद्या आपण याच साड्या नेसुया! मी माझी भाऊबीजेची साडी बॅग मधुन काढते. आता आपण
त्या साड्यांना फॉल बिडींग करुया म्हणजे उद्या गडबड होणार नाही. बोलता बोलता
दिप्तीने गेस्ट रुम मधे असलेल्या आपल्या बॅगेतुन भाऊबीजेची साडी आणली.
वहिनी दोन्हीही साड्यांना मी बिडींग करते मग आपण
एकमेकींच्या साडीला फॉल लावुया. चालेल नां! दिप्तीने विचारले.
अगं न चालायला काय झाले! ती बघ बिडींगची मशिन पॅसेज मध्ये
आहे. तुझे बिडींगचे काम होईपर्यंत मी आपल्य सर्वांना चहा करते. नाहीतर आपल्या
दोघींचे भाऊ वैतागतिल म्हणतिल नणंदा भावजयीच्या गप्पा संपतच नाहित. सुकन्या बोलली
आणि किचनमध्ये चहा करायला गेली. दिप्ती देखिल दोन्ही साड्यांच्या घड्या घेऊन
पॅसेजमधिल बिडींग मशिनकडे गेली.
सुरवातीला तिने स्वत:च्या साडीला
बिडिंग केले. त्यानंतर तिने सुकन्याच्या साडीला बिडींग करण्या करीता साडी उलगडली.
साडीमध्ये ब्लाऊज पिस आहे का हे तपासायला तिने सुरवात केली. तेव्हा तिच्या लक्षांत
आले की, साडी पदरालाच थोडीशी विरलेली आहे. म्हणून ती हॉलमधिल मोठ्या प्रकाशांत
साडी तपासण्याकरीता घेऊन गेली. तिथे बसलेले अजय आणि सुरेश हा काय प्रकार आहे ते
बघतच राहिले.
दिप्ती हा काय प्रकार आहे? ही अशी उलगडलेली
साडी घेऊन काय फिरतेस? सुरेशने
विचारले.
अरे दादा! काल अजयने वहिनीला दिलेली भाऊबीजेची साडी आहे ही!
उद्या मदनच्या वाढदिवसाला आम्ही दोघी आमच्या भाऊबीजेचीच साडी नेसणार आहोत. म्हणून
मी माझ्या आणि वहिनीच्या साडिला बिडींग करीत आहे. माझ्या साडीला बिडींग करुन झाले
आणि मी वहिनीची साडी बिडिंग करीता घेतली तेव्हा मला ती थोडी विरलेली वाटली म्हणून
मी इथे उजेडात नीट पहायला साडी घेऊन आले आहे. दिप्तीने सविस्तर स्पष्टीकरण दिले.
तेवढ्यांत सुकन्या देखिल चहा घेऊन हॉल मध्ये आली.
दिप्ती काय झाले? साडीत काही
प्रॉब्लेम आहे कां? हातातल्या
ट्रेमधले चहाचे मग सुरेश आणि अजयला देत सुकन्याने विचारले.
हो नां! हे बघ नां वहिनी मला साडी थोडी विरलेली वाटतेय!
दिप्तीने वहिनीच्या हातात साडी देत सांगितले.
हे बघं दिप्ती! आधी तू चहा घे मग आपण बघुया! असे म्हणून
तिने दिप्तीच्या हातात चहाचा मग दिला आणि स्वत:ला देखिल चहाचा
मग उचलला. सर्वांचा चहा पिऊन झाल्यावर दिप्तीने आणि सुकन्याने साडीची व्यवस्थित
तपासणी केल्यावर त्यांना त्या साडीचा पदराचा मोठा भाग विरलेला आढळला. त्यामुळे ती
साडी आता उदया नेसणे शक्य नव्हते. त्यामुळे दोघींचाही विरस झाला.
पण वहिनी! तू साडी बघुन घेतली नव्हतीस कां? दिप्तीने विचारले.
अगं! त्या दिवशी दुकानांत खूप गर्दी होती. त्यातच तो
दुकानदार म्हणाला, साडीमध्ये काही
प्रॉब्लेम नाही निर्धास्त घेऊन जां! म्हणून त्याच्यावर विश्वास ठेऊन घेतली झाले.
त्यातच उशिर पण खूप झाला होता. पण आता काय करायचे? तो दुकानदार
साडी बदलुन देईल की नाही याचेच मला टेन्शन आहे. सुकन्या म्हणाली.
अगं! वां गं वा! कसा बदलुन देणार नाही? आपण काय चिंचोके मोजलेत कां? आपण त्याला
बदलुन द्यायला लावुच. दिप्तीने सुकन्याला धीर दिला.
या विषयावर सगळ्यांची चर्चा झाली. सगळ्यांनी मिळुन असे ठरवले
की, साडी घेऊन दुकानात जायचे आणि रितसर साडी बदलुन मागायची. तो जर नाही म्हणाला तर
काय करायचे ते तेव्हा बघुया.
********