सेवक भूषण
लेखक:- अनिल अनंत वाकणकर,
अलिबाग प्रधान डाकघरांतिल दैनंदिन कामकाज
सुरु झाले. काऊंटरवर काम करणारे लोक आपापल्या जागांवर स्थानापन्न झाले. काऊंटरवर
निरिनराळे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची वर्दळ सुरु झाली. बघता बघता सर्व काऊंटरवर
गर्दी दिसायला लागली.
काऊंटरवर जरी गर्दी गडबड दिसत असली तरी
आतमध्ये वितरण विभागात मात्र अजुन म्हणावे तसे चैतन्य आलेले दिसत नव्हते. सर्व
पोस्टमन आपापल्या जागेवर बसले होते. हेडपोस्टमन आपल्या जागेवर चुळबुळ करत टपाल
येण्याची वाट बघत होते. सॉर्टींग क्लार्क देखिल आतुरतेने टपाल गाडीची वाट बघत
होते.
वितरण विभागतल्या प्रत्येकाचे लक्ष आपली लाल परी कधी येते
याकडे लागले होते. सर्वाना वाट पहायला लावणारी ती महाराणीचे एकदाचे पोस्टाच्या
कंपांऊंड मध्ये आगमन झाले. तिने पोर्चमध्ये एक झोकदार वळण घेऊन आपली मागची बाजु
वितरण विभागाच्या रुंद दारा समोर केले. ती लाल परी मेलव्हॅन थांबताच तिच्यामधुन
मेलगार्डची स्वारी खाली उतरली. त्यांनी मेलव्हॅनच्या दरवाजाच्याचे लॉक उघडले.
ताबडतोब तिथे तिची वाटच बघत असलेले ग्रुप डी कर्मचारी पुढे झाले.
मेलगार्डने ताब्यात दिलेल्या मेलबॅगा ताब्यात घेऊन त्या
वितरण विभागात आणून त्या फोडून त्यात निघालेले सर्व प्रकारचे टपाल त्या त्या
विभागात देऊन ग्रुप डी कर्मचाऱ्यांनी रिकाम्या बॅगा व्यवस्थित रचुन ठेवल्या. आता मात्र वितरण
विभागात लगिन घाई सुरु झाली. हेडपोस्टमननी प्रत्येक पोस्टमनचे टपाल बीटवाईज
सॉर्टींग करुन प्रत्येकाच्या ताब्यात दिले. आता पोस्टमन मंडळी आपल्या बीटमधिल टपाल
आपल्या रुट प्रमाणे सॉर्टींग करुन ते योग्यप्रकारे अँरेंज करायच्या कामाला लागले.
मेल व्हॅन आल्यावर मनीऑर्डर क्लार्कने आज पेमेंट करायच्या ई
मनी ऑर्डरच्या प्रिंट काढायला सुरवात केली. या दरम्यानच्या काळात हेडपोस्टमननी
निरनिराळ्या विभागात जाऊन तिथल्या स्पीडपोस्ट, पार्सल, ई पोस्ट, ई मनी ऑर्डर यांचे
बीटवाईज सॉर्टींग करुन दिले. वितरण विभागतिल सुपरव्हायझर श्री देशपांडे यांनी
ट्रेझररला ई मनीऑर्डरच्या रक्कमांचे पेमेंट पोस्टमनला करण्याच्या ऑर्डर
सिस्टीममधुन दिल्या.
*******
देशपांडे साहेबांनी
हेडपोस्टमन मुकादम यांना बोलावुन बीट नंबर १२ च्या पोस्टमनला डिलिव्हरी
जाण्यापूर्वी भेटून जाण्याचा निरोप द्या असे सांगितले.
एक एक
करुन सगळ्या पोस्टमननी आपापले वितरण करायचे साधे आणि हिशेबी टपाल ताब्यात घेऊन
आपापल्या बीटच्या दिशेने प्रस्थान करायला सुरवात केली. प्रत्येकाकडे आज भरपुर टपाल
दिसत होते. नेहमीची पोस्टमन बॅग भरुन शिवाय अजुन एक एक गोणीसारखी पिशवी भरुन
प्रत्येकाने घेतली होती. हल्ली पोस्टकार्ड, अंतर्देशिय पत्र, पाकीटे अशा पारंपारीक
टपाला ऐवजी विम्याच्या नोटीसा, निरनिराळ्या कंपन्यांची ब्राऊचर्स, शेअर ब्रोकर
कडून येणारी नियमित स्टेटमेंट अशा प्रकारच्या टपालाची वाढ झालेली होती. त्यामुळे
टपालचे आकारमान आणि वजन देखिल वाढले होते.
बीट
क्रमांक १२ला वितरणाकरीता जाणारे श्री अजय वाघमारे पोस्टमन यांनी आपले सर्व टपाल
आवरुन बॅगेत भरले. उरलेल्या टपालाकरीता एक स्वतंत्र बॅग घेतली. त्यानंतर ते ई मनी
ऑर्डरची कॅश घेण्याकरीता ट्रेझरर कडे जायला निघाले होते. तेवढ्यांत हेडपोस्टमन
मुकादम यांनी त्यांना वितरणाला जाण्यापूर्वी देशपांडे साहेबांना भेटून जा त्यांना
तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.
ठिक आहे! लगेचच जातो! त्यांना भेटून मगच ट्रेझरीत कॅश घ्यायला जातो.
वाघमारेंनी मुकादम साहेबांना सांगितले आणि ते थेट देशपांडे साहेबांच्या टेबलकडे
निघाले.
नमस्कार
देशपांडे साहेब! आपण मला बोलावलतं? वाघमारे पोस्टमननी विचारले.
होय!
बसा मला तुमच्याशी थोडं बोलायच आहे. तुम्ही बारा नंबर बीटला आहात नां? तुमच्या बीटमध्ये सुशिला पोतनीस एकाच व्यक्तीच्या नांवाने बऱ्याच ई मनी ऑर्डर
दिसल्या! मुकादम म्हणत होते गेले पांच सहा दिवस रोजच अशा मोठ्या प्रमाणावर मनी ऑर्डर
येत आहेत, हे खरे आहे काय? देशपांडे साहेबांनी आपल्या सुपरवायझरच्या
भूमिकेमधुन विचारले.
होय
साहेब! माझ्या बीटमध्ये तेली आळी आहे. त्या तेली आळीत रहाणाऱ्या सुशिला पोतनिस
यांच्या नांवाने गेले आठ दहा दिवस मोठ्या प्रमाणावर मनी ऑर्डर येत आहेत हे माझ्या
लक्षांत आले आहे. परंतु मनी ऑर्डरची रक्कम फार मोठी नसते. त्यामुळे मी जास्त विचार
केला नाही. माझा समज असा आहे, काही चेनस्कीम असतात त्यापैकी या मनी ऑर्डर
असाव्यात. वाघमारेंनी आपले मत सांगितले.
चेन
स्किम म्हणजे काय? देशपांडे साहेबांनी विचारले.
सर! अहो
बरेच वर्षापूर्वी अशी स्कीम मी पाहिली आहे. एकाच वेळी दहा जणांना मनी ऑर्डर
पाठवायची त्यातली एक ती स्कीम चालवणाऱ्याला जाते बाकीच्या त्या चेनमधल्या व्यक्तींना एक एक करुन केल्या जातात. जसे जसे
चेन मधिल सहभागी वाढत जातिल तसे येणाऱ्या मनी ऑर्डरची संख्या वाढत जाते. मात्र चेन
ब्रेक झाली की, शेवटच्या सर्वांचे पैसे वसुल होत नाहीत. परंतु आता आलेल्या
मनीऑर्डरच्या रक्कमा सारख्या दिसत नाहित तेव्हा मी नीट चौकशी करतो आणि आपल्याला
सर्व काय प्रकार आहे ते सांगतो.
*******
पोस्टमनSS! सुशिलाताई! अहो सुशिलाताई पोतनिस! असे
म्हणून वाघमारेंनी सुशिलाताईंच्या दारावरची बेल दाबली.
आले!
आले! कोण आहे? असे म्हणत सुशिलाताईंनी दार उघडले आणि कोण पोस्टमन
या या असे आत यां असे म्हणून दारातुन बाजुला झाल्या.
वाघमारेंनी
दारातुन आत आले आणि तिथेच असलेल्या एका खुर्चीवर बसले. बसता बसता त्यांनी
सुशिलाताईंना विचारले, सुशिलाताई आजकाल तुमच्या नावावर बऱ्याच मनी ऑर्डर यायला
लागल्या आहेत. आजही दहा मनी ऑर्डर आल्या आहेत. बरं सर्वमिळुन रक्कम देखिल जवळपास
दहा हजार इतकी आहे. हा काय प्रकार आहे. यापूर्वी आपल्या नावावर भाऊबिजेपलिकडे मनी
ऑर्डर आल्याचे मला आठवत नाही.
सांगते
मी सगळे! परंतु आपल्याला वेळ आहे कां? सुशिलाताईंनी विचारले.
खरं
सांगायचे तर माझ्याकडे वेळ फार कमी आहे. उरलेल्या बीटमधले टपाल वाटायचे आहे. परंतु
या सर्व मनी ऑर्डरवर कोण तरी साक्षीदार पाहिजे. वास्तविक आपल्याला मी गेली अनेक
वर्षे ओळखतो परंतु आमच्या साहेबांनी
मला तशी सूचना केली आहे. तेव्हा कोणालातरी साक्षीदार म्हणून सह्या करायला बोलवां.
आपल्य सह्या होईपर्यंत मला आपली हकिगत सांगा. वाघमारे बोलले. बोलता बोलता त्यांनी
बॅगेमधुन ई मनी ऑर्डरचे फॉर्म काढले.
आमच्या
शेजारच्या ठाकुर वहिनिंना साक्षीकरीता बोलावु काय? सुशिलाताईंनी विचारले.
चालेल!
पण जरा घाई करा! वाघमारेंनी सांगितले. बोलता बोलता त्यांनी हातातल्या फॉर्मवर
पेनने खूणा करायला सुरवात केली. त्यांचे ते काम होईपर्यंत ठाकुरवहिनी तिथे आल्या.
नमस्कार पोस्टमन!
कसल्या साक्षीच्या सह्या करायच्या आहेत. ठाकुर वहिनींनी विचारले. त्यावर
सुशिलाताईंनीच अहो मनी ऑर्डर आल्या आहेत त्यावर तुमची साक्ष पाहिजे म्हणून
तुम्हाला बोलावले आहे.
सुशिलाताई! कोणत्या!
त्या मनी ऑर्डर तर नव्हेत? ठाकुर वहिनी बोलल्या.
त्या मनी ऑर्डर
म्हणजे कोणत्या? काय प्रकार आहे हां? मला सविस्तर सांगा पाहू.
सांगते! परंतु
त्याला जर वेळ लागेल. ठाकुर वहिनी बोलल्या.
ठिक आहे एकीकडे
सह्या करता करता मला सांगा. म्हणजे जास्ती वेळ जाणार नाही. असे म्हणून वाघमारेंनी
दोघींच्याकडे खूणा केलेले फॉर्म देऊन सह्या कुठे करायच्या ते सांगितले.
ठाकुरताईंनी सह्या
करता करता मनी ऑर्डर येण्या मागची हकीगत सांगायला सुरवात केली. पोस्टमन तुम्हाला
माहित आहेच की, या सुशिलाताईंचे यजमान त्यांची मुलगी लहान असतानाच वारले. त्यानंतर
त्यांच्या तुटपुंज्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्या देखिल अंगणवाडीवर
काम करतात. परंतु त्या पैशाने त्यांची निव्वळ दैनंदिन गरज भागते. परंतु
त्यांच्यावर आता जणू आकाशच कोसळले आहे.
कां असे काय झाले? वाघमारेंनी विचारले.
अहो सुशिलाताईंच्या
अलकाला हार्ट प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. तिच्या ह्रदयाची एक झडप निकामी झाली
आहे. नविन झडप बसवायला पाहिजे. त्याकरीता आपल्या गुप्ता डॉक्टरांनी पांच लाख खर्च
येईल असे सांगितले आहे. सुशिलाताईंना मदत मिळावी म्हणून मी आमच्या महिला मंडळाच्या
व्हॉटस् अँपच्या ग्रुपवर मदतीकरीता आवाहन केले होते. माझ्या मिस्टरांच्या
मित्रपरिवाराचा देखिल असाच एक व्हॉटस् अँप
ग्रुप आहे. त्यावर देखिल त्यांनी असेच आवाहन केले आहे. ज्याला ज्याला हे समजले ते
ते आपल्यापरीने मदत करायचा प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी कोणीतरी या मनी ऑर्डर
पाठवित असतील.
सुशिलाताई! हे घ्या
सर्व मनीऑर्डरचे मिळुन दहा हजार पाचशे रुपये होतात. ते मोजून घ्या. वाघमारेंनी
सर्व फॉर्म चेक केले आणि आपल्या बॅगमध्ये ठेवले. सुशिलाताई, तुम्ही काही काळजी करु
नका अलका यातुन नक्की बरी होईल! मी देखिल मला शक्य होईल ती सर्व मदत करीन. आपण
सर्वांनी मिळुन प्रयत्न केले तर अलका नक्की पूर्वीसारखी हसु खेळू लागेल.
वाघमारेंनी सुशिलाताईंना आश्वासन दिले.
*******
डॉक्टर गुप्तांच्या हॉस्पीटलमध्ये नेहमीप्रमाणे भरपुर गर्दी
होती. नेहमी प्रमाणे डॉक्टरांनी आपल्या इनडोअर पेशंटला तपासायला सुरवात केली होती.
इनडोअर पेशंट तपासुन झाल्यावर डॉक्टर ओ. पी. डी. पेशंट तपासायला सुरवात केली.
त्यांचे निम्मे पेशंट तपासुन झाल्यावर वाघमारे पोस्टमन त्यांच्या केबीनमध्ये
प्रवेश करता करता विचारले, नमस्कार डॉक्टरसाहेब! आत येऊ कां?
या! या पोस्टमन! या
काय आणलतं? हल्ली कोणी पत्र
काही पाठवत नाही. काही स्पीड पोस्ट वगैरे आहे काय? डॉक्टरांनी वाघमारे यांचे मनापासुन स्वागत करीत
म्हटले. वाघमारे बरीच वर्षे या भागात वितरणाला येतात त्यामुळे डॉक्टरांचा आणि
त्यांचा चांगला परिचय होता.
नाही डॉक्टर साहेब
आज मी काही तुमचे टपाल घेऊन आलो नाही. परंतु माझे तुमच्याकडे एक आहे. वाघमारे
बोलले.
बोला पोस्टमन! काय
अडचणं आहे? घरी कोणी आजारी आहे
कां? डॉक्टरांनी
आपुलकीने विचारले.
नाही डॉक्टर साहेब!
माझ्या घरचे कोणी आजारी नाही. परंतु माझ्या बीटमधल्या सुशिलाताईंच्या मुलीला
अलकाचा हार्टचा मोठा प्रॉब्लेम झालाय. तिच्या ह्दयाची एक झडप काम करीत नाही. परंतु
त्यांची आर्थिक परिस्थिती एकदम खराब आहे. त्यांना आपण काही मदत करावी अशी विनंती
करायला मी आलोय. तेव्हा आपण त्यांना शक्य होईल ती सर्व मदत करावी ही आपल्याकडे
प्रार्थना आहे. वाघमारेंनी डॉक्टरांना मनापासुन विनंती केली.
वाघमारेंच्या
बोलण्यातला भाव ओळखुन गुप्ता ड़ॉक्टर देखिल भारावुन गेले. पोस्टमन तुमची दुसऱ्याला
मदत करण्याची भावना पाहून मी खूपच प्रभावित झालो आहे. तुम्ही स्वत:करीता नाही तर तुमच्या कामाच्या विभागातल्या एका
व्यक्ती करीता ही विनंती करताय हे ऐकुन माझा तुमच्याबद्दलचा आदर कैकपटीने वाढला
आहे. अहो आजकाल रक्ताच्या नात्यातिल व्यक्ती करीता देखील अशी खटपट करीत नाही. मी
तुमच्या विनंतीला मान देऊन त्या पेशंटला नक्की मदत करीन. परंतु तुम्ही म्हणता ती
पेशंट माझ्याकडे एकदा येऊन गेली आहे. तिला जवळपास साडे चार ते पांच लाख खर्च येणार
आहे. त्यातिल मी माझी फी घेणार नाही. फारतर माझ्या हॉस्पिटल मधिल चार्जेस मध्ये
सवलत देईन तरीही हे ऑपरेशन करण्या करीता मला मुंबईहून स्पेशालिस्ट सर्जन बोलवावे
लागतिल. त्यांची फी शिवाय जी झडप बदलायची आहे ती परदेशातुन मागवावी लागते. या
सर्वांकरता होणारा जवळपास अडीच तीन लाखाचा खर्च तरी त्यांना उचलावा लागेल. गुप्ता
डॉक्टरांनी आपल्या मर्याद स्पष्ट केल्या त्याचबरोबर काही ठोस मदत करण्याचे देखिल
कबुल केले.
हरकत नाही डॉक्टरसाहेब!
सुशिलाताई तेवढी व्यवस्था करतिल. अलकाच्या या ऑपरेशन करीता अनेक जणांनी आर्थिक मदत
करायची कबुल केले आहे. शिवाय अलकाच्या
वडिलांची काहीतरी बचत असेलच ती वापरता येईल. तेव्हा तुम्ही हे ऑपरेशन करायचे मनावर
घ्याच. वाघमारेंनी डॉक्टरांना खात्री दिली.
ठिक आहे तर मग!
तुम्ही त्या पेशंटला उद्याच मला भेटायला सांगा. उद्या माझ्याकडे मुंबईचे हार्ट
सर्जन एका ऑपरेशनकरीता येणार आहेत. तेव्हा त्यांना आपण त्या पेशंटला दाखवु आणि
शक्य झाले तर या आठवड्यांत ऑपरेशनची तारीख ठरवुया. मात्र त्यांना ताबडतोब दोन लाख
रुपयांची व्यवस्था करायला सांगा. बाकीचे पन्नास साठ हजार नंतर सवडीने दिले चालतिल.
डॉक्टर साहेब मी
आपला खूप खूप आभारी आहे! माझ्या विनंतीला मान देऊन आपण आपले नुकसान करुन घेतलेत
त्याची भरपाई परमेश्वर नक्की करुन देईल. मी उद्या सुशिलाताईंना अलकासह घेऊन येतो.
परत एकदा धन्यवाद, आता मी आपला निरोप घेतो. बाहेर आपले पेशंट वाट बघत आहेत आणि
मलाही उरलेली डिलिव्हरी पूरी करायची आहे.
*******
रात्रीचे आठ वाजले होते.
ठाकुरवहीनी शेजारी सुशिलाताईंकडे गेल्या होत्या. अलकाची तब्येत अचानक बिघडली होती.
अचानक तिच्या छातीत दुखायला लागले होते म्हणून सुशिलाताईंनी ठाकुर वहिनींना
बोलावले होते. घरात ठाकुर साहेब आणि त्यांची मुलगी विनिता होती. ठाकुर साहेब
देवांजवळ दिवा लाऊन सायंप्रार्थना म्हणत होते. तेवढ्यांत त्यांच्या दारवरची बेल
वाजली.
अगं विनिता! दारावरची बेल वाजत्येय, कोण आहे ते बघ जरां. ठाकुर
साहेबांनी विनिताला सांगितले.
विनिताने दार उघडले तर दारात एक अनोळखी व्यक्ती उभी होती. विनिताने
त्यांना विचारले. नमस्कार! आपण कोणं? मी आपल्याला ओळखले नाही.
तू विनिता नां? अगं मी रोज तुमच्या या भागात येतो. कधी कधी
तुमच्या घरी देखिल येतो. हल्लीच्या मोबाईलच्या जमान्यात आमचे येणे जरा कमी झाले
असले तरी विसरण्या एवढे नाही. नीट बघ ओळता येते काय?
ओsहं! सॉरी! सॉरी काका! आत्ता ओळखले! तुम्ही आमचे पोस्टमन
काका! पण मी तुम्हाला कशी ओळखणारं? तुम्हाला कधी साध्या पोषाखात पाहिलेच नाही. या नां काका!
आत या! मी बाबांना बोलावते. असे म्हणून विनिता दारातुन बाजुला झाली.तेवढ्यात आतुन
तिच्या बाबांचा आवाज आला, अगं विनिता कोण आलयं आणि त्यांना दारातच काय उभे करुन
ठेवलेस.
आहो बाबा! आपले पोस्टमन काका आलेत. तुम्हीच बाहेर यां. असे म्हणून
विनिता घरात जाऊन पाणी घेऊन आली. तेवढ्यात तिचे बाबा बाहेर आले. त्यांनी
वाघमारेंना विचारले काय पोस्टमन या वेळेला इकडे कशी काय वाट चुकलात.
आज मी खास तुम्हालाच भेटायलाच आलोय. रोजच्या माझ्या ड्युटीच्या
वेळात आपण घरी नसता म्हणून आता रात्र करुन आलोय. म्हणजे निवांत बोलता येईल. पण
ठाकुर वहिनी कुठे दिसत नाहीत. त्यापण असत्यातर चांगले झाले असते. वाघमारे बोलले.
अहो! ती शेजारी सुशिलाताईंकडे गेल्येय. त्यांच्या अलकाची तब्येत
अचानक बिघडली आहे. ठाकुर साहेबांनी सांगितले.
अहो, मी त्या संदर्भातच काही सांगायला आलो आहे. वाघमारेंनी आपल्या
येण्याचा उद्देश सांगितला. तेवढ्यात दारातुन ठाकुर वहीनी आत आल्या.
कशी आहे अलकाची तब्येत आता? तिघांनीही एकदमच विचारले.
आता बरी आहे, परंतु लवकरात लवकर ऑपरेशन केले नाही तर मात्र
परिस्थिती कठीण आहे. ठाकुर वहिनी बोलल्या.
मी त्या संदर्भातच आपल्याशी चर्चा करायला आलोय. त्या सुशिलाताई पण
येऊ शकतिल काय? त्या असल्याशिवाय
काही निर्णय घेता येणार नाही. वाघमारेंनी बोलता बोलता सुशिलाताईंना बोलावण्याकरीता
सुचवले.
हो! हो! येतील नां! अग विनिता तू अलकाजवळे जाऊन बस आणि
सुशिलाताईंना इकडे पाठव. ठाकुर वहिनींनी विनिताला सुशिलाताईंकडे पाठवले. बरं
पोस्टमन! तुम्ही काय घेणार चहा कॉफी का जेऊनच जाताय?
नाही ताईं! जेवायला परत कधीतरी येईन आता अर्धाकप चहाच करा.
तिथपर्यंत सुशिलाताई येतील. वाघमारेंनी सांगितले.
वाघमारेंचा चहा पिऊन होईपर्यंत सुशिलाबाई आल्या. पोस्टमन आपण मला
बोलावलेत काही विशेष! सुशिलाताईंनी वाघमारेंना विचारले.
ताई! आपण बसा! एवढ्यांत विनिताची आईपण बाहेर येईल. हे पोस्टमन
अलकाच्या संदर्भात काही आपल्याला सांगणार आहेत. ठाकुर साहेबांनी सुशिलाताईंना
बसायला सांगितले तेवढ्यात ठाकुरवहिनी आतुन आल्या.
ठाकुर साहेब! परवा मी सुशिलाताईंना मनी ऑर्डर देण्यासाठी आलो होतो
तेव्हा मला अलकाच्या आजारा संबंधी समजले. त्यानंतर मी आजच गुप्ता डॉक्टरांना
भेटलो. त्यांनी अलकाचे ऑपरेशन करायचे कबुल केले आहे. त्याकरीता ते त्यांची स्वत:ची फी घेणार नाहित. शिवाय हॉस्पिटलच्या बिलात देखिल
सवलत देणार आहेत. तरीही ऑपरेशन करण्याकरीता मुंबईहून येणाऱ्या हार्ट सर्जन यांची
फी, ह्रदयाच्या झडपेची किंमत, शिवाय औषधे वगैर याचा खर्च जवळपास दोन अडिच लाख
रुपये आपल्याला करावा लागेल. वाघमारेंनी सविस्तर माहिती दिली.
आतापर्यंत माझ्याकडे मनी ऑर्डर आणि बॅंकेत जमा झालेली रक्कम मिळुन
जवळपास एक लाख रुपये मदत जमा झाली आहे. शिवाय अलकाच्या बाबांनी तिच्या लग्नाकरीता
ठेवलेली रक्कम आता ऐशी हजार झाली असेल. उरलेल्या रक्कमेकरीता काहीतरी सोय करता
येईल नाहीतर आमचे रहाते घर गहाण ठेवुन कर्ज काढता येईल. पण आता जास्ती वाट न बघता
ऑपरेशन लवकरांत लवकर करुन घ्यावे लागेल. सुशिलाताईंनी अश्रुभरल्या डोळ्यांनी
सांगितले.
सुशिलाताई! हे घ्या दहा हजार आहेत आमच्या ऑफिसमधल्या आणि आमच्या
साहेबांच्या ऑफिसमधल्या स्टाफने मी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जमा केलेत.
अजुनही आलिबाग शहरात पत्रके वाटुन मदत जमा करता येईल तेव्हा तुम्ही आता काळजी सोडा
आणि अलकाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची तयारी करुन उद्याच गुप्ता डॉक्टरांना
भेटा. त्यांच्याकडे उद्याच मुंबईचे हार्ट स्पेशालिस्ट एका ऑपरेशन करीता येणार आहेत
ते अलकाला तपासतील आणि ऑपरेशनची तारीख पक्की करतील. बोलता बोलता त्यांनी दहा हजार
रुपयांच्या नोटा असलेले पाकीट सुशिलाताईंच्या हातात दिले.
पोस्टमन! आपण फार मोठी मदत
केली आहे. आपली मी खूप खूप आभारी आहे. आपले हे उपकार कधीच फिटायचे नाहित. अहो आमची
परिस्थिती पाहून सर्व नातेवाईकांनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. आमच्या अडचणीच्या
कालात तुम्ही अगदी देवासारखे धाऊन आलात. परंतु अद्याप आम्हाला तुमचे नांव देखिल
माहित नाही. आम्ही आपले तुम्हाला पोस्टमन पोस्टमन असेच बोलतोय. सुशिलाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अहो सुशिलाताई, मी फार मोठे काही केले नाही.
माझी ड्युटी करीत असताना जी ओळख झाली त्याचा थोडाफार फायदा तुम्हाला करुन दिला
इतकेच. एवढ्या छोट्या कामाकरीता आपण मला देवाच्या पंगतीला नेऊन ठेवु नका. मी आपला
साधा माणूस आहे तसाच राहूदे. आणि हो माझे नांव अजय वाघमारे असे आहे. तुम्ही मला अजय
असे हाक मारली तरी चालेल. आपण मला मोठ्या बहिणी सारख्याच आहात.
अजितदादा आपण फार मोठ्ठ काम केले आहेत.
सुशिलाताईंची फार मोठ्ठी काळजी आपण दूर केली आहे. तुम्ही एवढे केले आहे तर मी
देखिल माझी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून पांच हजार रुपये सुशिलाताईंना अनिताच्या ट्रीटमेंटकरीता
देतो आहे. उदया सुशिलाताईंच्या बरोबर आम्ही दोघे हॉस्पीटलमध्ये जाउच. परंतु तुम्ही
देखिल याल कां? एकदा डॉक्टरांना भेटून झाल्यावर आपण गेलेत तरी
चालेल. ठाकुर साहेब बोलले.
हो! हो! मी बरोबर अकरा वाजता तेथे येतो. आपल्याला त्या
मुंबईहून येणाऱ्या डॉक्टरांना साडे अकरा वाजता भेटायचे आहे. तेव्हा आता उद्या
गुप्ता डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये भेटूया. असे म्हणून वाघमारे त्यांचा निरोप घेऊन
आपल्या घरी निघुन गेले.
*******
गुप्ता डॉक्टरांनी आश्वासन दिल्याप्रमाणे अलकाचे ऑपरेशन
त्यांच्या हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणाने करण्यांत आले. अलका आता पूर्णपणे बरी झाली
आहे. सुशिलाताईंना सगळा मिळुन दोन लाख पंचवीस हजार खर्च करावा लागला. त्यातली
लोकांनी केलेली मदत दोन लाखाच्या पेक्षा जास्त होती. या सगळ्यामध्ये वाघमारे
पोस्टमन यांनी त्यांना खूप मदत केली. ठाकुरताई आणि ठाकुर साहेब यांनी आपल्या
व्हाटस् अँपच्या ग्रुपवर ही सर्व माहिती वाघमारेंच्या फोटो सह पोस्ट केली. ती
माहिती शेअर होत होत पुऱ्या शहरभर पसरली. त्यामुळे वाघमारे यांचे नांव शहरातल्या
प्रत्येकाला माहित झाले.
वाघमारेंनी अशा अनेकांना यापूर्वी मदत केली होती. परंतु
तेव्हा फेसबुक व्हॉटस् अँपचे प्रस्थ नव्हते त्यामुळे ती फार थोड्या लोकांना माहिती
होती. परंतु ती सर्व माहितीही आता शेअर व्हायला लागली. त्यामुळे वाघमारे सर्व
शहराचे हिरोच झाले. त्यांच्या या कार्याची दखल महानगरपालिकेच्या जनरल सभेमध्ये
घेतली गेली. विरोधी पक्षाच्या एका सदस्याने वाघमारेंना या वर्षीचा सेवक भूषण हा
मानाचा पुरस्कार द्यावा असा ठराव मांडला. त्याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला.
त्यामुळे तो ठराव एकमताने मंजूर झाला. हा पुरस्कार येत्या स्वातंत्र्य दिनाच्या
दिवशी जाहिरपणाने द्यायचे असे ठरविण्यात आले.
*******
अलिबाग महानगर पालिकेच्या सरखेल कान्हाजी
आंग्रे सभागृह आज पूर्ण भरले होते. स्टेजवर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य
आधिकारी, टपाल विभागचे विभाग प्रमुख, महापौर, उपमहापौर, खासदार, आमदार असे मान्यवर
बसले होते. आज स्वातंत्र्य दिना निमित्ताने महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा येथे
आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा, विशेष कामगीरी
बजावणाऱ्या नागरीकांचा आणि विशेष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखिल सत्कार
करण्यांत येणार आहे. गेल्यावर्षी पासुन महापालिकेने सेवक भूषण हा विशेष सन्मान
पुरस्कार देणे सुरु केले आहे. आपली दैनंदिन सेवा बजावताना त्याबरोबरच नागरीकांची
मानवतेच्या भावनेतुन सातत्याने विशेष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याला हा पुरस्कार
देण्यांत येतो.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सभेचे कामकाज सुरु
झाल्यानंतर सर्वप्रथम दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर
अलिबाग महानगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यांत आला आणि त्यांना बक्षिसे
प्रदान करण्यांत आली. विद्यार्थ्यांचा गुण गौरव केल्यानंतर विशेष कामगिरी करणाऱ्या
नागरीकांचा सत्कार करण्यांत आला. आता वेळ होती “सेवक भूषण” पुरस्कार प्रदान करण्याची.
यंदा हा पुरस्कार कोणाला मिळतो याची सर्वांनाच उत्सुकता होती. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन करणाऱ्या श्री देशपांडे, या महानगरपालीकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी
माननिय महापौरांना या वर्षीच्या मानाच्या “सेवक भूषण” पुरस्काराची घोषणा करण्याची आणि तो प्रदान
करण्याची विनंती केली.
देशपांडे
यांनी केलेल्या विनंती नुसार महापौर श्री महेश रुद्रवार उभे राहीले. ते बोलले, व्यासपीठावर
उपस्थित सर्व नगरसेवक, जिल्हाधिकारी, टपाल विभागचे
विभाग प्रमुख, उपमहापौर, खासदार नाईक साहेब, आमदार पाटील
साहेब आणि कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अलिबागच्या नागरीकांनो, आपण गेल्या
वर्षीपासुन आपले दैनंदीन कर्तव्य चोखपणाने बजावतानाच अलिबाग मधल्या नागरींकांना आपल्या
चाकोरी बाहेर जाऊन निव्वळ मानवतेच्या भावनेने सातत्याने मदत करणाऱ्या सेवकाला आपण
सेवक भूषण हा किताब देऊन सन्मानित करतो. त्याकरीता तो कर्मचारी महानगरपालिकेचाच
असायला हवा हे बंधन आपण ठेवले नव्हते. त्या सेवकामध्ये असणारा सेवाभाव, लोकांना
मदत करण्याची तळमळ ही आपण महत्वाची मानतो. अशा प्रकारची सेवा देणारा कर्मचारी मग
तो राज्य शासनाचा असो, केंद्र शासनाचा असो किंवा कोणत्याही आस्थापनेचा असो तो
आपल्या अलिबाग महानगरीचे भूषणच आहे.
या वर्षीचा पुरस्कार कोणाला द्यायचा हा विचार जेव्हा सुरु झाला
तेव्हा आपल्या सर्व नगरसेवकांनी एकमुखाने आपल्या सर्वाच्या कुटूंबाचे जणू सदस्यच
आहेत अशी आपल्या प्रत्येक नागरीकाची भावना आहे अशा अजय वाघमारे पोस्टमन याचे नांव
सुचवीले. याशिवाय अलिबाग मध्ये असणाऱ्या अनेक मान्यवर नागरीकांनी देखिल पत्र
पाठवुन, फोन करुन त्यांचेच नांव सूचविले होते. अलिबाग मध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक
व्हॉट्स अँप ग्रुपवरुन श्री अजय वाघमारेंच्या परोपकाराच्या कथा फिरत आहेत.
त्यामुळे अलिबाग महानगरपालिकेने या वर्षीच्या “सेवक भूषण” पुरस्काराचा मान श्री अजय वाघमारे पोस्टमन यांना देण्याचे
एकमताने ठरवीले आहे.
आपल्या भागाचे लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे आपले खासदार माननिय
नाईकसाहेब यांना मी विनंती करतो की, त्यांनी यावर्षीचा म्हणजेच दुसरा “सेवक भूषण” पुरस्कार श्री अजय
वाघमारे यांना प्रदान करावा. कृपया वाघमारे पोस्टमन आणि त्यांच्या पत्नी या
उभयतांनी व्यासपीठावर येऊन माननिय नाईकसाहेबांच्या हस्ते पुरस्कार स्विकारावा ही
विनंती. आपण करीत असलेले सेवाकार्य अनमोल आहे. आपण आपली ही सेवाभावी वृत्ती अशीच
कायम ठेवावी. आपले खूप खूप अभिनंदन. आपण या अलिबाग
महानगरीचे नागरीक आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो.
नाईक साहेबांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना वाघमारे यांना भरुन
आले. त्यांचे डोळे पाणावले. अतिशय नम्रपणाने त्यांनी तो पुरस्कार स्विकारला.
पुरस्कार देताना नाईक साहेब बोलले, वाघमारे आपण अलिबाग शहराचे भूषण आहात. आपल्या
सारख्या सेवकांमुळे एखादा कर्मचारी मनात सेवाभाव असेल तर काय करु शकतो हे आम्हाला
समजले. आज मला महापौरांनी आपण गेल्या पंचवीस वर्षाच्या सेवेमध्ये कितीजणांना आणि
कशी मदत केलीत ते सांगितले. खरोखरच केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मला आपल्या
सारख्या कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटतो.
पुरस्कार स्विकारुन झाल्यावर चार शब्द बोलताना अजय वाघमारेंचा घसा
दाटुन आला. ते म्हणाले, मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सर्व अलिबागकरांचा आभारी
आहे. वास्तविक मी आतापर्यंत जे काही केले ते माझ्या मनाच्या समाधानाकरीता केले.
त्याकरीता मी माझ्या जवळचा एक रुपायाही खर्च केला नाही. फक्त माझ्या ओळखिचा उपयोग
केला. माझे दैनंदीन कर्तव्य बजावत असताना माझ्यातला माणूस जागा ठेवला त्यामुळे मी
वेगळे काहीच केले असे मला वाटत नाही.
वाघमारेंच्या मनोगता नंतर उस्फुर्तपणाने दहा बारा नागरीकांनी अजय वाघमारे
यांच्या बद्दलचा स्वत:चा अनुभव
सांगितला. त्यात विद्यार्थी होता त्याने वाघमारेंनी कॉलेजच्या अँडमिशला कशी मदत
केली ते सांगितले. तर एक आजोबा होते त्यांनी त्यांना वाघमारेमनी गेले अनेक महिने पेन्शन
बँकेतुन आणण्याच्या कामी कशी मदत केली ते सांगितले. एका आजींनी वाघमारे मला गेली
दहा बारा वर्षे दुकानातुन नियमितपणाने औषधे आणून देतात असे सांगितले. अशा प्रकारे
प्रत्येकजण आपला वेगळा अनुभव सांगत होता.
नागरीकांच्या
उस्फुर्त भाषणांनंतर डाक विभागचे अधिक्षक बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, मला
कल्पना नव्हती आमचे वाघमारे पोस्टमन एवढे लोकप्रीय आणि सेवाभावी आहेत. मी गेली दोन
वर्षे या डिव्हीजन मध्ये काम करीत आहे. मला फक्त वाघमारे हे आपले कर्तव्य चोखपणाने
बजावणाऱ्यांपैकी एक आहेत एवढेच माहिती होते. परंतु आता येथे उपस्थित असणाऱ्या
प्रत्येकाकडून त्यांचे कौतुक ऐकताना आणि त्यांच्या प्रती असणारा आदर पाहताना मला
ते डाक विभागचे कर्मचारी आहेत याचा अभिमान वाटतो. आजकाल टोपल्या टाकणारे कर्मचारीच
जास्त दिसतात. आपल्या कर्तव्यामध्ये जीव ओतणारे वाघमारे यांच्या सारख्या
कर्मचाऱ्यांमुळेच आज लोकांचा शासनावरचा विश्वास टिकून आहे.
मी आत्ता या
ठिकाणी घोषणा करतो की, या वर्षीच्या टपाल विभागा तर्फे देण्यांत येणाऱ्या मेघदूत
या पुरस्कारा करीता श्री वाघमारेंचे नांवाची शिफारस करणार आहे. त्याला आता येथे
उपस्तित असणारे मान्यवर सहकार्य करतिलच. त्यांना जेव्हा हा पुरस्कार जाहिर होईल
तेव्हाही आपण असेच बहूसंख्येने उपस्थित रहावे.
*******