बुधवार, १८ एप्रिल, २०१८

नवदुर्गा माहिती भाग ७


।।सप्तमं कालरात्री।।


मूलमंत्र
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरी‍रिणी।।
वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।
ध्यान
करालदनां घोरांमुक्तकेशींचतुर्भुजाम्।
कालरात्रिंकरालिंकादिव्यांविद्दुत्मालाविभूषिताम्।।
दिव्यलोहखङ्ग वामाघोर्ध्वकराम्बुजाम्।
अभयंवरदांचैव दक्षिणोद्व्राघ:पाणिकाम्।।
महामेघप्रभांश्यामांतथा चैपगर्दभारुढाम्।
घोरदंष्टाकारालास्यांपीनोन्नतपयोधराम्।।
सुखप्रसन्न वदनास्मेरानसरोरुहाम्।
एवंसंचियन्तयेत्कालरात्रिंसर्वकामसमृद्धिधदाम्।।
स्तोत्र
ह्रीं कालरात्रि श्रींकराली चक्लींकल्याणी कलावती।
कालमाताकलिदर्पध्नीकमदींशकृपन्विता।।
कामबीजजपान्दाकमबीजस्वरुपिणी।
कुमतिघनीकुलीनार्तिनशिनीकुल कामिनी।।
क्लीं ह्रीं श्रीं मंत्रवर्णेनकालकण्टकघातिनी।
कृपामयी कृपाधारा कृपापारा कृपागमा।।
कवच
ॐ क्लींमेंह्रदयंपातु पादौश्रींकालरात्रि।
ललाटेसततंपातुदुष्टग्रहनिवारिणी।।
रसनांपातुकौमारी भैरवी चक्षुणोर्मम।
हौपुष्ठेमहेशानीकर्णोशंकरभामिनी।।
वर्जितानितुस्थानाभीयानिचकवचेनहि।
तानिसर्वाणिमें देवीं सततंपातुस्तभ्भिनी।।
दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत आणि त्यांतुन अग्नीचा वर्षाव होत असतो. ते अतिशय चमकदार आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. 
गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे. काही ठिकाणी तिचे वर्णन असे आहे. माता कालरात्री सर्व वाईट शक्तींचा बिमोड करते. तिला चार हात असून उजवे हात अभय व वरद मुद्रेत आहेत तर डाव्या हातांमध्ये दिवा आणि कोयता आहे. 
रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवी पार्वती ने आपल्या सुंदर त्वचेचा त्याग करून अतिभयंकर व हिंस्त्र अश्या कालरात्रीचे स्वरूप परिधान केले. रक्तबीजाच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडताक्षणी त्या थेंबातून अजून एक रक्तबीज निर्माण होत असे. त्यामुळे त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाला जमिनीवर पडायच्या आधीच पिऊन माता कालरात्रीने त्याचा वध केला.
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.
मंत्र, ध्यान, कवचासहित विधीपूर्वक उपासना करणा-या भक्ताचे भानु चक्र जागृत होते. माता कालरात्रिच्या उपासनेने अग्निभय, आकाशभय दूर होते. भूत पिशाच्च इत्यादि शक्ति तिच्या नुसत्या स्मरणाने दूर पळुन जातात. माता कालरात्रिचे स्मरण पुढील मंत्राने करतात.

या देवी सर्वभू‍तेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।


नवदुर्गा माहिती भाग ६

।।षष्ठम् कात्यायनी।।


मूल मंत्र
चंद्रहासोज्ज्वलकरा शाइलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी।।
ध्यानमंत्र
वन्दे वांछित मनोरथार्थचन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारुढचतुर्भुजाकात्यायनीं यशस्वनीम्।।
स्वर्णवर्णाआज्ञाचक्रस्थितांषष्ठम्दुर्गा त्रिनेत्राम्।
वराभीतंकरांषगपदघरांकात्यायनसुतांभजामि।।
पटाम्बरपरिधानांस्मेरमुखींनानालंकारभूषिताम्।
मंजीर हार केयुरकिंकिणिरत्नकुण्डलमण्डिताम्।।
प्रसन्नवंदनापज्जवाधरांकातंकपोलातुगकुचाम्।
कमनीयांलावण्यांत्रिवलीविभूषितनिम्न नाभिम्।।
स्तोत्र
कंचनाभां कराभयंपदमधरामुकुटोज्वलां।
स्मेरमुखीशिवपत्नीकात्यायनसुतेनभोअस्तुते॥
पटाम्बरपरिधानांनानालंकारभूषितां।
सिंहास्थितांपद्महस्तांकात्यायनसुतेनमोअस्तुते।।
परमदंदमयीदेवि परब्रह्म परमात्मा।
परमशक्ति, परमभक्तिकात्यायनसुतेनोअम्तुते।।
कां बीजा, कां जपानंदकां बीज जप तोषिते।
कां कां बीज जपदासक्ताकां कां सन्तुता।।
कांकारहर्षिणीकां धनदाधनमासना।
कां बीज जपकारिणीकां बीज तप मानसा।।
कां कारिणी कां मूत्रपूजिताकां बीज धारिणी।
कां कीं कूंकै क:ठ:छ: स्वाहारुपणी।।
कवच
कात्यायनौमुख पातुकां कां स्वाहास्वरुपणी।
ललाटेविजया पातुपातुमालिनीनित्यसुंदरी।।
कल्याणी ह्रदयंपातुजयाभगमालिनी।।
दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. महिषासुराचा वध करण्यासाठी देवी पार्वतीने कात्यायन ऋषींच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे तिला कात्यायनी हे नाव पडले. देवी पार्वतीचे हे सर्वात रौद्र रूप आहे. त्यामुळे तिला युद्ध देवता असेही म्हणतात. देवी कात्यायनी एका विशाल सिंहावर आरूढ असून तिला चार हात आहेत. तिच्या डाव्या हातांमध्ये कमळ व तलवार असून उजवे हात अभय व वरद मुद्रेत आहेत.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनी ची पूजा करतात.
या देवी सर्वभू‍तेषु माँ कात्यायनी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे.
कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्‍णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.

नवदुर्गा माहिती भाग ५


।।पंचमं स्कंदमाता।


मूल मंत्र
सिंहासानगता निलयं पदमाश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।।
ध्यानमंत्र
वन्देवांछित कामर्थे चन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारुढा चतुर्भुजा स्कंदमाता यशस्विनीम्।।
धवलवर्णां विशुद्धचक्रस्थितां पंचमदुर्गात्रिनेत्राम्।
अभयपद्मयुग्मकरां दक्षिणउरुपुत्रधराम भजेम।।
पटाम्बरपरिधाना कृदुहज्ञसया नानालंकारभूषिताम्।
मंजीरहार केयूरकिकिणिं रत्नकुण्डल धारिणीम्।।
प्रफुल्लवदनापल्लवा धराकांतकपोलां पीनपयोधराम।
कमनीयांलावण्यां जारुत्रिवलीं नितम्बनीम्।।
स्तोत्र
नमामि स्कंदमाता स्कंदधारिणीम्। समग्रतत्वसागर मपारगहराम्।।
शिप्रभांसमुल्वलांस्फुरच्छशागशेखराम्। ललाटरत्नभास्कराजगतप्रदीप्तभास्कराम्।।
महेन्द्रकश्यपार्तितांसनत्कुमारसंस्तुताम्। सुरासेरेन्द्रवन्दितांयथार्थनिर्मलादभुताम्।।
मुमुक्षुभिर्विचिन्तितांविशेषतत्वमूचिताम्। नानालंकारभूषितांकृगेन्द्रवाहनाग्रताम्।।
सुशुद्धतत्वांतोषणांत्रिवेदमारभुषणाम्। सुधार्मिककौपकारिणीसुरेन्द्रवैरिघातिनीम्।।
शुभांपुष्पमालिनीसुवर्णकल्पशाखिनीम्। तमोअन्कारयामिनीशिवस्वभावकामिनीम्।।
सहस्त्रसूर्यराजिकांधनज्जयोग्रकारिकाम्। सुशुद्धकाल कन्दलांसुभृडकृन्दमज्जुलाम्।।
प्रजायिनीप्रजावती नमामिमातरंसतीम्। स्वकर्मधारणेगतिंहरिप्रियच्छपार्वतीम्।।
इनन्तशक्तिकान्तिदांयशोथमुक्तिदाम्। पुन:पुनर्जगद्धितांनमाम्यहंसुरार्चिताम्।।
जयेश्वरित्रिलोचनेप्रसीददेविपाहिमाम्।।
कवच
ऐंबीजालिंकादेवी पदयुग्मधरापरा। ह्रदयंपातुसा देवी कार्तिकेययुता।।
श्रीं ह्रीं हुं ऐं देवी पूर्वसायांपातुसर्वदा। सर्वांग से सदापातु स्कन्धमातापुत्रप्रदा।।
वाणवाणामृतेहुं फट् बीज समव्विता। उत्तरस्यातथाग्नेचवारुणनेत्रतेअवतु।।
इन्द्राणी भैरवीचैवासितांगीचसंहारिणी। सर्वदापातुमां देवी चान्यान्यासुहि दिक्षवै।।
दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. 
भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. 
डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.
नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी विशुद्धचक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्ल‍ीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.
स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही.
माता पार्वतीने जेव्हा स्कंद (कार्तिकेय) नावाच्या पुत्रास जन्म दिला तेव्हा तिला स्कंदमाता हे नाव पडले. एका भयंकर अश्या सिंहावर विराजमान झालेल्या ह्या मातेच्या पुढयात बाल कार्तिकेय बसलेला आहे. तिला चार भुजा असून वरच्या दोन भुजांमध्ये कमळ आहे. एका हाताने तिने बाल कार्तिकेयाला धरलेले असून दुसरी भुजा अभय मुद्रा मधे आहे. अशी हि माता कमळावरहि बसते त्यामुळे तिला पद्मासना देखील म्हणतात. अतिशुभ्र रंगाच्या ह्या देवीची पूजा केल्यास भगवान कार्तिकेयची देखील पूजा केल्याचे भाग्य लाभते. आई स्कंदमातेची प्रार्थना पुढील मंत्रानी करावी.
या देवी सर्वभू‍तेषु माँ स्कन्दमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

हैदराबाद सहल, भाग ६


हैदराबाद सहल, भाग सहावा.
     सकाळी साडेसातच्या सुमारास तिरुपती रेल्वे स्थानकावर दाखल झालो. परत एकदा बॅगांची मोजणी आणि वाहतूक करुन झाली. स्टेशनच्या बाहेर हॉटेलवर जाण्याकरीता दोन गाड्या आमची वाट पहात होत्या. आमचे बुकींग केलेले हॉटेल कल्याण इंटरनॅशनल हे रेल्वे स्थानकापासुन जवळच होते. हॉटेल धली व्यवस्था मात्र खूपच चांगली वाटली. आंघोळ वगैरे झाल्यावर सर्वजण फ्रेश झाले. हॉटेल मधुनच तिरुमाला डोंगरावर जाण्यासाठी मिनी बस ठरवुन त्या बसने तिरुमाला तिरुपती मंदिराच्या गेट जवळ गेलो. या इथे देखिल तात्काल दर्शनाची सोय आहे परंतु त्याला ऑनलाईन बुकींग करायला लागते. ते आम्ही केले नव्हते. परंतु जेष्ट नागरीकांकरीता वेगळ्या रांगेची सोय होती.
      आमच्यातल्या ज्यांचे वय पासष्ट पेक्षा जास्त होते ते त्या जेष्ट नागरीकांच्या दर्शन रांगेतुन गेले. आम्ही जनरल लाईन मध्ये गेलो. दर्शनाला जाणाऱ्यांचे पांच सहा हॉल होते. त्यातले पहिले दोन भरलेले होते. आमचा नंबर तिसऱ्या हॉल मध्ये लागला. प्रत्येक हॉल मध्ये कमीत कमी पाचशे भाविक बसलेले होते. आम्ही बाराच्या सुमारास त्या हॉल पर्यंत पोचलो. त्यानंतर जवळ जवळ नऊ तास त्या हॉल मध्येच होतो. समोर टीव्हीच्या पडद्यावर निरनिराळ्या उत्सवाचे व्हीडीओ दाखवले जात होते. तेथे टॉयलेटची देखिल सोय केलेली होती. आम्ही तेथे बसलो होतो त्याकाळात देवस्थान कडून प्रथम खिचडी, त्यानंतर चार वाजता चहा, रात्री आठच्या सुमारास उपमा असे पदार्थ प्रत्येक भाविकाला देण्यांत आले. सुमारे दहा तास एका जागी बसुन रहाण्याची सवय नसल्याने हे फारच त्रासदायक वाटत होते. तिथुन बाहेर पडायचे तर ती देखिल काही सोय दिसत नव्हती. प्रत्येक हॉलमध्ये मोफत फोनची सोय उपलब्ध होती. तिथुन भारतात कुठेही फोन लागत होता.
      रात्री साडेनऊच्या सुमारास सर्व हॉल मधिल भाविकांना एकदाच दर्शन रांगेत सोडले. त्यानंतर चालत चालत सुमारे अर्ध्यातासात आम्ही तिरुमाला तिरुपती देवाचे दर्शन घेतले. देवाची मूर्ती आमच्यापासुन खूप लांब होती. दर्शन घेऊन बाहेर पडलो तेव्हा साडे दहा वाजले होते. मी आणि माझे दुसरे साडु यांनी केस द्यायचे ठरविले होते. परंतु केस देण्याची जागा आम्ही बाहेर पडलो त्याच्या विरुद्ध दिशेला होती आणि उशिरही खूप झाला होता त्यामुळे आम्ही तो विचार रद्द केला आणि तिरुपतीला हॉटेलकडे प्रस्थान ठेवले.
     जवळपास अकरा वाजता आम्ही तिरुपती शहरात पोचलो. वाटेतच एका हॉटेलमध्ये पोटपूजा केली. रात्री झोपायला बारा वाजले. सकाळी लवकर आवरुन हॉटेल सोडायचे होते. कारण येथिल चेकआऊट टाईम २४ तासाचा होता.

*******
          नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता जाग आली. मुखमार्जन आटोपल्यावर आंघोळ केली. चहाची तल्लफ आल्याने चहाची सोय शोधण्याकरीता बाहेर पडलो. हॉटेलच्या बाहेर थोड्या अंतरावर चहाचे टपरीवजा दुकान दिसले. येथेही भाषेची अडचण होतीच परंतु खुणांनी काम भागले. त्या चहावाल्याला याची सवय असावी परंतु पठ्या तेलगु सोडायला तयार नव्हता. मी चहा घेतला आणि चहा कॉफीचे पार्सलही घेतले.
      सकाळी नऊ वाजता सर्वजण तयार होऊन आपापल्या बॅगा घेऊन हॉटेलच्या रिसेप्शन पाशी आले. इकडच्या पद्धती प्रमाणे हॉटेलच्या पॅकेजमध्ये नाश्ता होता. हैदराबादला होता त्याप्रमाणे नाश्त्याला विविध पदार्थ होते. सर्वांनी भरपेट नाश्ता केला. आमच्या सर्व बॅगा परत मिनीबस मध्ये चढविण्यांत आल्या. आता आमचा तिरुपती परिसर दर्शनाचा कार्यक्रम होता.
                सर्वप्रथम आम्ही गोविंदराज स्वामी मंदिरात गेलो. यालाच व्यंकटेश्वर मंदिर असेही म्हणतात. हे अतिशय जुने वैष्णव मंदिर आहे. हे मंदिर महान संत रामानुजाचार्य यांनी बांधले. अप्रतिम कलाकुसर असलेले हे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात अनेक मंदिरे आहेत. या देवस्थानातिल मुख्य मंदिर गोविंदराजस्वामी यांचे आहे. येथेही तात्काळ प्रवेशाकरीता वीस रुपये शुल्क आहे. या मंदिरातील मूर्तीचे वैशिष्ट हे आहे की, गोविंदराज स्वामी यांची पहूडलेल्या म्हणजेच योगनिद्रा अवस्थेतिल ही मूर्ती आहे. उजवा हात डोक्याखाली घेतलेला असुन पायापाशी श्रीदेवी आणि भूदेवी बसलेल्या अवस्थेत आहे. येथिल दुसरे महत्वाचे मंदिर आहे पार्थसारथी भगवान श्रीकृष्णाचे.
      मंदिराच्या परिसरात अनेक प्रकारची दुकाने आहेत. किंबहूना सारे तिरुपती शहरच या मंदिराच्या भोवती विस्तारले आहे. त्यानंतर आम्ही इस्कॉनच्या हरेकृष्ण हरे राम मंदिरात गेलो. तेथिल परिसर खूपच छान आहे. इस्कॉन मंदिरानंतर पद्मावती मंदिराकडे गेलो. परंतु तेथिल गर्दी पाहीली आणि कालचे दहा तास आठवले. एवढ्या मोठ्या रांगेतुन दर्शन व्हायला बराच वेळ गेला असता. आमचे संध्याकाळी सहा वाजता रेणूगुंटा स्थानकावरुन जाणाऱ्या चेन्नई कुर्ला टर्मिनन्स या गाडीचे रिझर्वेशन केलेले होते. त्यामुळे आम्ही देवी पद्मावतीच्या कळसाला नमस्कार करुन आणि टि. व्ही स्क्रीन वर दर्शन घेऊन प्रस्थान ठेवले.
     महिला मंडळाला काही खरेदी करायची होती म्हणून आम्ही परत तिरुपती शहरात आलो. तेथे मनासारखी खरेदी झाली नाही म्हणून रेणूगुंटा येथे प्रयत्न करायचे असे ठरले आणि आम्ही रेणूगुंटा येथे दाखल झालो.  रेणूगुंटा  येथे पोटपूजा करुन महिलांची खरेदी झाली. त्यानंतर आम्ही रेल्वेस्टेशनवर गेलो. गाडी वेळेत आली. येथेही गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागणार हा घोळ होताच. म्हणून आम्ही कुली ठरवला होता. मात्र फारशी धावपळ न करता गाडीत प्रवेश करता आला. जेवण उशीरा झाल्याने फारशी भूक नव्हतीच त्यामुळे मी लगेचच वरचा बर्थ गाठला आणि ताटकळलेल्या शरिराला ताणून दिले. आमच्यातले निम्मे मेंबर पुण्याला उतरले बाकी उरलेले आम्ही कुर्ल्याला उतरलो. तिथुन टॅक्सीने बोरीवली दुसऱ्या दिवशी दुसरी ट्रेन पकडून जामनगर गाठले. अशातऱ्हेने आमची एक आठवड्याची हैदराबाद-श्रीशैल्य-तिरुपती सहल समाप्त झाली.

*******

सोमवार, १६ एप्रिल, २०१८

हैदराबाद सहल भाग ५


हैदराबाद सहल भाग ५
            आधी ठरवल्याप्रमाणे सकाळी नाश्त्याला उतरतनाच सर्व बॅगा घेऊन खाली आलो. रोजच्या प्रमाणे भरपेट नाश्ता झाल्यावर आमच्या रोजच्या मिनी बसमध्ये श्रीशैलमला जाण्यासाठी बसलो. आज  आमचा ड्रायव्हर बदलला होता. गेले चार दिवस जो ड्रायव्हर होता तो तसा को ऑपरेशन करणारा होता. मात्र आज जो ड्रायव्हर होता तो थोडासा अँरोगंट होता. वास्तविक आमच्या आजच्या नियोजना प्रमाणे आम्ही सकाळी चारमिनारला भेट देऊन पुढे श्रीशैल्यला जाणार होतो. परंतु रस्ता बंद या सबबीखाली त्याने आम्हाला थेट हैदराबाद शहराच्या बाहेर जवळपास पन्नास किलोमिटर आणले. दरम्यान अनेक फोन करुन झाले. शेवटी त्याने परत शहरात जाण्याची तयारी दाखवली. परंतु तिथपर्यंत खूप उशिर झाला होता म्हणून आम्हीच परत जायला नको सांगितले.
     श्रीशैल्यला जाताना वाटेत घनदाट अरण्यातुन रस्ता आहे. या जंगलात संरक्षित व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे वाटेत फॉरेस्ट खात्याकडुन गाडीची तपासणी झाली. या जंगलात बरेच मोर असतात असे ऐकले होते. परंतु या प्रवासा दरम्यान आम्हाला माकडांच्या शिवाय कोणतेही प्राणी दिसले नाहीत. माकड बाकी खूपच होती. रस्ता सिंगल जरी असला तरी सुस्थितित होता. त्यामुळे प्रवास त्रासदायक वाटला नाही.
     वाटेत कृष्णा नदीवर बांधलेले मोठे धरण आहे. या ठिकाणी कृष्णा नदीला पाताळगंगा असे म्हणतात. या परिसरात कृष्णानदी खूप उंचावरुन खाली कोसळते म्हणून कदाचित तिचे नांव पाताळगंगा पडले असावे. या नदीचे पाणी त्वचारोगावर औषधी आहे असे म्हणतात. या ठिकाणी फोटो काढायला आणि पाण्याचा मोठा प्रवाह पहायला खूप गर्दी झालेली होती. ते ठिकाण जवळुन सुंदर दिसत होतेच परंतु अगदी दूरुन देखिल अतिशय मोहक दिसत होते. पाताळगंगेवरील या धरणाच्या पाण्यावर हैड्रो पॉवर प्रोजेक्ट कार्यरत आहे.
      पाताळगंगा धरणाच्या बाजुन गोल गोल फिरत जाणाऱ्या रस्त्याने गेल्या नंतर आम्ही श्रीशैल्य येथिल प्रसिद्ध असलेल्या साक्षी गणेश मंदिरापाशी पोचलो. मंदिराचा परिसर निसर्ग सौदर्य़ाने समृद्ध अशा परिसरात आहे. मंदिराच्या मागे मोठा हिरवागार डोंगर आहे. गजाननाची मूर्ती काळ्या रंगाची आहे. या परिसरात अतिशय प्रसिद्ध असणारे हे देऊळ आहे. आम्ही तिथे पोचलो त शनिवार होता आणि त्या दिवशी अमावस्याही होती. ही पर्वणी साधण्याकरीता अनेक स्थानिक भक्त तेथे आलेले होते. त्यातिल अनेक तरुणांच्या डोक्यावर एक बोचके होते. गळ्यांत माळा घातलेले हे तरुण आपापल्या मुला बाळांसह यात्रेला आले होते. त्यातिल अनेकांनी काळी वस्त्रे नेसली होती. वस्त्रे म्हणजे फक्त लुंगी आणि उत्तरीय म्हणून पंचा किंवा टॉवेल होता. हिच मंडळी पुढे मल्लिकार्जुन मंदिरात होती. मल्लिकार्जुन मंदिरात हे ग्रुप पुरोहितांना घेऊन आपल्या व्रतांचे उद्यापन करताना दिसत होते.
साक्षी गणपती मंदीर, हैदराबाद

      साक्षी गणपतीचे दर्शन झाल्या नंतर आम्ही सर्वांनी सभागृहात बसुन श्री गणपति अथर्वशिर्षाचे पठण केले. आजच्या शनि अमावस्येचे महत्व म्हणून असेल तिथे येणारा प्रत्येकजण आवळ्याचा दिवा लावत होता. असे आवळ्याचे तयार केलेले दिवे विकायला काही बायका तेथे बसलेल्या होत्या. गणपतीबाप्पाचे दर्शन घेऊन आम्हाला येथे प्रसिद्ध असणाऱ्या शिवस्मारकाचे दर्शन घ्यायचे होते.
आमच्या ड्रायव्हरने आम्हाला एका शंकराच्या मोठ्या पुतळ्यापाशी नेले आणि हेच शिवस्मारक आहे असे सांगितले. आम्हाला वास्तविक शिवाजी महाराजांचा पुतळा असलेले ठिकाण पहायचे होते. कारण त्याबद्दल खूप ऐकले होते. परंतु येथे मुख्य अडचण भाषेची होती. कोणालाही हिंदी समजत नव्हते त्यामुळे संवाद साधला जात नव्हता. शिवाजी महाराजांनी आपले शिरकमल मल्लिकार्जुनाला अर्पण करण्याकरीता हातात तलवार घेतली होती, परंतु त्यांना रघुनाथ पंतानी त्यापासुन रोखले असे श्रीमानयोगीमध्ये वाचले होते.
     श्रीशैलम येथिल आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्या गेस्टहाऊस मध्ये आमचे रहाण्याचे बुकींग होते. हैदराबादच्या तुलनेत रुम लहान होत्या. शिवाय सरकारी कारभार असल्याने अनेक प्रकारच्या त्रुटी होत्या तरीही एकच रात्र रहायचे असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दिवसभराच्या प्रवासाने आलेला थकवा थोडासा आराम करुन व हातपाय धुवुन झाल्यावर दूर झाला त्यानंतर आम्ही मुख्य मंदिराकडे गेलो. गेस्ट हाऊस पासुन मंदिर जवळच होते.
      मंदिराच्या जवळ गेल्यावर असे लक्षांत आले येथे दोन प्रकारच्या दर्शन रांगा होत्या. एक रांग कोणत्याही शुल्काशिवाय दर्शन घेण्याकरीता होती. तर दुसऱ्या रांगेतुन तात्काळ दर्शनाची सोय होती. त्याकरीता तिनशे रुपये शुल्क होते. आम्ही तात्काळ दर्शनाच्या रांगेत गेलो. येथे दोन तिन कंपार्टमेंट केलेली होती. त्यामध्ये बसण्याकरीता सोय केली होती. कमीत कमी एक तास आम्हाला तेथे बसावे लागले. त्या दरम्यान एका द्रोणात सर्वांना प्रसाद म्हणून सांबार भात म्हणजेच खिचडीचाच एक प्रकार दिला गेला. याला बिशी बेली बाथ असे म्हणतात हे नंतर समजले. या शिवाय चहा कॉफी विकणाराही तेथे हजर होता. सुमारे तासा दिडतासाने आम्हाला प्रथम सुवर्ण कळसाचे आणि त्यानंतर प्रत्यक्ष श्री मल्लिकार्जुनाच्या पिंडीचे दर्शन झाले. गाभाऱ्यापासुन काही अंतरावरुनच दर्शन घेता आले.
      दर्शन घेऊन आल्यावर श्री मल्लिकार्जुनावर रुद्राभिषेक करण्याकरीता असलेल्या बुकींग काऊंटरवर जाऊन उद्याकरीता बुकींग केले. रुद्राभिषेक करण्याकरीता एक दांपत्य आणि त्यांची दोन मुले यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते. त्याकरीता पंधराशे रुपये शुल्क आकारले जाते. आमच्यापैकी तिघा दांपत्यांनी हे बुकींग केले. त्याकरीता उद्या सकाळी साडेआठवाजता रुद्राभिषेकाच्या गेटवर हजर रहायचे होते.
      अभिषेक बुकींग झाल्यावर आम्ही थेट गेस्ट हाऊसच्या कँटीनमध्ये गेलो. कारण कँटीन बंद होण्याची वेळ होत आली होती. या कँटीनमध्ये आम्हाला घर सोडल्यापासुन प्रथमच गरमागरम घरगुती जेवणाची बरोबरी गाठणारे जेवण मिळाले होते.
*******

            आज देवदिवाळी आहे, योगायोगाने आम्ही आज या पवित्र दिवशी श्री मल्लिकार्जुनाला रुद्राभिषेक करणार आहोत. त्यासाठी आठ वाजताच पांढरी लुंगी आणि पंचा या पोषाखात तयार झालो. बरोबर साडेआठ वाजता रुद्राभिषेक करणाऱ्यांसाठी असलेल्या वेगळ्या गेट मधुन मंदिर परिसरात प्रवेश केला. आमच्या सारखी सुमारे दोनशे दांपत्ये रुद्राभिषेक विधी करीता तेथे हजर होती. एवढी लोक एकाच वेळी गाभाऱ्यात जाऊन अभिषेक कसा करणार हा प्रश्न पडला. परंतु लगेचच त्याचे उत्तर मिळाले.
     आम्हा सर्वांना एका हॉलमध्ये नेण्यांत आले तेथे मल्लिकार्जुनाची प्रतिकृती असलेले एक स्टेज तयार केलेले होते. त्यावर ओळीने पुरोहित मंडळी बसली होती. अभिषेक करणाऱ्या लोकांकरीता खास आसने मांडुन ठेवलेली होती. प्रत्येका समोर एक परात, त्या परातित एक मोठा कलश होता. याशिवाय नारळाची एक कवड आणि पूजा साहित्य ठेवलेले होते. सर्वजण आसनस्थ झाल्यावर प्रत्येकाला एक पिशवी देण्यांत आली. त्या पिशवीत प्रसादाचे लाडू असलेले बॉक्स, दोन माहिती पुस्तके, अंगारा आणि कुंकुम यांच्या डब्या, सुकामेवा असणारे एक पाकीट, एक विस्कीट पुडा पाण्याची बाटली एवढे सामान होते. माहिती पुस्तके मात्र तेलगुतच होती. त्यामुळे ती माहिती पुस्तके आमच्यासाठी निरुपयोगी होती.
      सर्वप्रथम त्या पुरोहितांपैकी मुख्य पुरोहिताने श्रीशैल्याचे स्थान महात्म्य तेलगुतुन सांगितले. त्यापैकी संस्कृत श्लोक परिचित असल्याने काही संदर्भ समजले. त्यांनीच आता करणार असणाऱ्या विधींची माहिती दिली. मुख्य पुरोहितांनी नंतर संकल्प सांगायला सुरवात केली. त्याबरोबर माहिती मात्र तेलगुतुन देत होते परंतु हे सर्व मंत्र माहित असल्याने काही अडचण भासली नाही. त्या पुरोहितांपैकी चार पाचजण सर्व पूजा करणाऱ्यां कडून प्रत्येकाचे गोत्र आणि नावांचा उच्चार करुन घेत होते. संकल्प पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष अभिषेकाच्या विधीला सुरवात झाली सर्व उपचार समोर दिलेल्या मोठ्या कलशांत करायचे होते. सर्व पुरोहितांनी रुद्राचे एक आवर्तन म्हटले. त्यांच्याबरोबर मीही म्हणत होतो. त्यामुळे मला स्वत:ने अभिषेक करत असल्याचे समाधान मिळाले. येथे फक्त नमकच म्हटले गेले. त्यानंतर आरती प्रार्थना इत्यादि उपचार झाल्यावर प्रत्येकाला श्री मल्लिकार्जुनाच्या गाभाऱ्यात जाऊन त्या कलशातील जलाने मुख्य पिंडीवर अभिषेक करायला सांगण्यात आले. त्याकरीता दर्शनाची रांग थांबविण्यात आली होती. अशा तऱ्हेने बार ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या मल्लिकार्जुनावर प्रत्यक्ष अभिषेक करण्याचा योग आला.
     यथासांग रुद्राभिषेक झाल्यावर सर्वजण रुमवर जायला निघालो. जाता जाता गेटवरच महाप्रसादाची कुपन मिळाली. महाप्रसादाची सुरवात बारा वाजता होणार होती. वाटेतच एका ठिकाणी इडली, वडा, डोसा यांचा स्टॉल होता तेथे प्रत्येकाने आपापल्या रुची प्रमाणे नाश्ता केला. त्यानंतर चहा घेतला. चहाचा स्टॉलची मालकीण पक्की तेलगु होती. तिला आमचे हिंदी समजेना आम्हाला तिचे तेलगु समजेना त्यामुळे हिशेबाचा घोळ व्हायला लागला शेवटी जवळच्या स्टॉलवाल्याने तिला आणि मला हिशेब पटवुन दिला. या प्रसंगावरुन दक्षिणेतील लोक आपल्या मातृभाषेविषयी किती आग्रही आहेत हे पटले. आपण सहजच मराठी सोडून हिंदी अथवा इंग्रजीत बोलायला सुरवात करतो. परंतु असा प्रसंग गुजरात मध्ये गेल्या तिन वर्षात कधीच आला नाही.
     रुमवर जाऊन कपडे चेंज केले सर्व सामान आमच्या मिनी बसमध्ये लोड केले, कारण बारा वाजता रुमचे चेकआऊट टाईम होते. त्यानंतर आम्ही महाप्रसादाकरीता लाईनमध्ये उभे राहीलो. जास्तित जास्त वीस मिनिटे रांगेत उभे रहायला लागले. शिर्डीला किंवा शेगावला ज्याप्रमाणे महाप्रसादाची आसन व्यवस्था आहे त्या प्रमाणेच येथे होती. लोकांना आत सोडण्यापूर्वी ताट आणि पाणी पिण्याचे ग्लास ठेवलेले होते त्याचप्रमाणे येथिल मुख्य प्रसादाचा भाग असणारा गोड पदार्थही वाढलेला होता. येथिल महाप्रसादाचा मेनु भाजी, भात आणि सांबार असा होता. भाताच्या मोठ्या दोन टाक्या असणाऱ्या ढकल गाड्या आणि सांबार आणि भाजी असणाऱ्या गाड्या पंक्तीमधुन फिरत होत्या त्या गाड्यांबरोबर असणारे स्वयंसेवक भाताचा ढीग, सांबार आणि भाजी वाढत होते. पहिल्या वाढपातच पोट तुडुंब भरले.
      महाप्रसाद घेऊन होताच आम्ही थेट बसमध्ये बसलो. ही बस आम्हाला कुर्नुल या रेल्वे स्थानकावर सोडणार होती. श्रीशैल्यहून जाताना वाटेत श्रीशिखरम् या एका ठिकाणाला भेट दिली. तिथुन श्रीशैल्य आणि पातळगंगेचे छान दृष्य दिसत होते. तेथे थोडेसे फोटो काढुन आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो. हा रस्ता देखिल त्याच व्याघ्र अभयारण्यामधुन जात होता. रात्री आठच्या सुमाराला कुर्नुल रेल्वे स्थानकावर पोचलो. आमची गाडी रात्री अकरा वाजता होती. दरम्यानच्या काळात आम्ही रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या एका डोसा सेंटरवरुन पोटपूजा करुन आलो.
      आम्ही एकुण दहाजण आहोत आणि आमच्या प्रत्येकाच्या कमीतकमी दोन बॅगा याप्रमाणे जवळपास पंचवीस बॅगा होत्या. गाडी पकडण्याकरीता जिना चढुन पलिकडील प्लॅटफॉर्म जायचे होते तेही दहा मिनिटाच्या अवधित. त्त्यातच आमच्यातले जवळपास सर्वचजण साठच्या आसपास किंवा त्यापुढचे होते. यावर सोल्युशन म्हणून आम्ही कुली ठरवला होता. त्याने आमचे सर्व सामान त्याच्या गाडीवर चढवले आणि ती गाडी घेऊन तो पलिकडल्या प्लॅटफॉर्मवर गेला त्याच्या सोबत मी आणि माझे साडू गेलो होतो. बाकी सगळे जिना चढुन गेले.
      यथावकाश आमची गाडी मार्गस्थ झाली आणि आम्ही तिरुपतीच्या  दिशेने प्रवासाला सुरवात केली. आता उद्याचा मुक्काम तिरुपती.

******

हैदराबाद सहल भाग ४


हैदराबाद सहल भाग ४
आज हैदराबाद मधिल मुक्कामाचा शेवटचा दिवस. सर्वप्रथम आम्ही बिर्ला मंदिरात दर्शनाकरीता गेलो. बिर्ला मंदीरात मुख्य मंदिर बालाजीचे आहे. उंच टेकडीवरील हे मंदिर अतिशय आकर्षक स्वरुपात बांधलेले आहे. सर्व परिसर संगमरवराने मढवलेला आहे. सुरवातीला साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुख्य बालाजी मंदिरात गेलो. मंदिर असलेल्या टेकडीवरुन हैदराबाद शहराचे सुरेख दर्शन झाले. हे मंदिर टेकडीवर असल्याने तेथे जाण्याकरीता वृद्ध आणि आजारी माणसांकरीता लिफ्टची सोय केलेली आहे.
     दर्शन झाल्यावर महिला मंडळाची खरेदी मोहिम सुरु झाली. येथे मोत्याच्या माळांचे सेट, मोत्यांच्या बांगड्यांची बरीच दुकाने होती. जवळपास दोन तास ही खरेदी चालू होती. ड्रायव्हर सह सर्वजण महिलामंडळाला व्यत्यय आणायला गेले तरीही त्यांनी माघार न घेता त्यांची मोहीम सुरुच ठेवली. कारण हैदराबाद मधिल या वस्तू खरेदी करणे ही त्यांची आवश्यकता होती.
     त्यानंतर आम्ही सर्वजण स्नो वर्ड या हैदराबादमधिल प्रसिद्ध ठिकाणी आलो. येथे बर्फात घालायचे कोट, बुट आणि हातमोजे घेतल्यावर कृत्रिम हिमालयात प्रवेश केला. बंदिस्त हॉलमध्ये सर्वत्र बर्फच बर्फ होते. आईस स्केटींग, डान्सिंग फ्लोअर, आणि फिरते चक्र असे गेम येथे बर्फाची मजा घेण्याकरीता हजर होते. त्यातिल आईस स्केटींग मध्ये आम्ही सर्वांनी भाग घेतला. त्यानंतर कृत्रिम का होईना स्नो फॉलचा वेगळाच अनुभव घेतला. तो घेत असताना सतत गुलमर्गची आठवण होत होती. अर्थात तेथिल वातावरण नैसर्गिक होते. ते येथे येणे शक्यच नव्हते. तरीही ज्यांना गुलमर्गची मजा अनुभवणे शक्य नाही त्यांना येथे दुधाची तहान ताकावर भागवता येते.
     स्नोवर्डचा अनुभव घेतल्यानंतर सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. आज पोटपूजे करीता स्पेशल हैदराबादी बिर्याणी खायची असे ठरवले होते. त्यामुळे खास व्हेज बिर्याणी मिळत असलेल्या ठिकाणाचा शोध घ्यायला सुरवात केली. एका हॉटेलात गेलो हॉटेलच्या स्टाफने अगदी शाही स्वागत वगैरे केले परंतु नंतर लक्षांत आले की, येथे व्हेज आणि नॉन व्हेज एकत्रच आहे. म्हणून शेवटी ड्रायव्हरच्या गाईडन्सने परत बालाजी हॉटेलच गाठले. तेथे स्पेशल हैदराबादी बिर्याणीची ऑर्डर दिली. हॉटेल मधिल वेटरच्या अंदाजाने दहा माणसांकरीता चार बिर्याणीची ऑर्डर दिली परंतु क्वांटिटी इतकी जास्त होती की, जवळपास एक पूर्ण डिश शिल्लक राहिली.
     त्यानंतरचा कार्यक्रम खास महिलांकरीता होता, तो म्हणजे खरेदीचा. तेव्हा त्यांना खरेदीकरीता सोडून बाकी पुरुष मंडळी रुमवर गेली. हैदराबादला सहलीला जायचे असे जेव्हा ठरले तेव्हा तेथिल एका ठिकाणी जायचेच असे ठरवुन मी आलो होतो त्या ठिकाणी जायचे राहीले होते. आमच्या बसचा ड्रायव्हर त्याच परिसरात रहाणारा होता म्हणून त्याच्या सोबत मी तिकडे जायला निघालो.
     शिवथर घळीत साधना सप्ताहाला गेलो होतो तेव्हा समर्थ संप्रदायाशी संबधित असलेल्या भारतातिल सर्व ठिकाणांना शक्य असेल त्याने भेट द्यावी असा विषय झाला होता. हैदराबाद मध्ये असेच एक ठिकाण आहे. समर्थ संप्रदायातिल सद्गुरु नारायण महाराजांचा मठ चारमिनार जवळ असणाऱ्या हूसैनी आलम या विभागात आहे. नारायण महाराज हे समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांच्या शिष्य परंपरेतिल आहेत.
सद्गुरु नारायण महाराज समाधी मंदीर, हैदराबाद.
सद्गुरु नारायणमहाराज समाधी, हैदराबाद

    
या मठामध्ये मुख्य मंदिर प्रभु श्रीरामांचे आहे. सज्जनगड येथे ज्याप्रमाणे समर्थांची समाधी श्रीरामांच्या मूर्तींच्या खाली तळघरात आहेत त्याचप्रमाणे येथेही श्री नारायण महाराजांची समाधी देखिल श्रीरामांच्या मूर्ती
च्या खाली तळघरात बांधलेली आहे. मंदिरासमोर प्रशस्त सभामंडप आहे. मंदिराच्या उजव्या बाजुला दत्त मंदीर आहे. मागिल बाजुला नारायण महाराजांच्या शिष्य परंपरेतिल अनंतराव रामदासी यांचे निवासस्थान आहे. मी गेलो त्याच्या आधी पंधरा दिवस श्री अनंतरावांचे निधन झाले होते. त्यांचे दोन मुलगे सध्या तेथे रहातात.
     अशातऱ्हेने हैदराबाद येथिल आमची सहल संपन्न झाली. उद्या आम्ही बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री शैल्य येथिल मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जाणार आहोत.
*******