१४
गोवेले येथिल स्टेट बँकेची शाखा
गावाच्या मध्यवर्ती भागात होती. बँकेच्या बाजुलाच पोस्ट ऑफीस आणि सिंधुदुर्ग जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा होती. स्टेट बँकेची ही शाखा व्हीलेज ब्रँच म्हणून
चालू केलेली होती. त्यामुळे तेथे स्टाफ मोजकाच होता. शाखा व्यवस्थापक म्हणून
आचार्य मॅडम काम करित होत्या. तर कॅशियर म्हणून गोवेल्यातलेच सुहास गोवेलेकर आणि
सावंतवाडी येथिल प्रमोद गायकवाड क्लार्क म्हणून काम करित होते. तर शिपाई म्हणून
हनुमानवाडी येथिल हेमंतचा चुलतभाऊ समीर धुमाळ काम करित होता.
दुपारचे १२ वाजले होते. चैत्र महिना
असल्याने हवेत खूपच उकाडा जाणवत होता. आचार्य मॅडम आपल्या केबीनमध्ये बसुन दैनंदिन
काम बघत होत्या. बँकेच्या काऊंटरला एक माणूस पैसे काढायला आला होता. समीर त्याला
पैसे काढायचा फॉर्म भरुन देत होता. तेवढ्यात त्याला महाराज बँकेत येताना दिसले.
त्याने त्यांचे स्वागत करीत विचारले, काय
महाराज इकडे कुठे? एवढ्या उन्हाचे काय काम काढलेत? मला सांगितले असते तर मी केले असते.
काही
विशेष नाही! जरा आचार्य मॅडमना भेटायचे होते. त्या आहेत कां? महाराजांनी विचारले.
हो
आहेत नां! तिकडे केबीनमध्ये आहेत, चला
मी आपली ओळख करुन देतो! असे म्हणून समीर त्यांना घेऊन आचार्य मॅडमच्या केबीनमध्ये
गेला आणि महाराजांची मॅडमना ओळख करुन देऊ लागला. तेव्हा त्या त्याला म्हणाल्या अरे
समीर मी ओळखते यांना! परवा तुमच्याच गावातल्या शाळेतिल कार्यक्रमाला आले होते
तेव्हा त्यांची ओळख झाली आहे.
मग
त्यांनी महाराजांचे स्वागत करुन त्या म्हणाल्या या महाराज! आमच्या बँकेत आपले
स्वागत आहे! प्लीज बसा नां! काय काम काढलेत?
समीर
केबीनमधुन बाहेर जाताच महाराज बोलले, मॅडम! हे महाराज वगैरे राहूदे आता मी माझी
ऑफिशिअल ओळख करुन देतो. माझे नांव मंगेश सोमनाथ आंबेकर असे आहे. हे माझे पासबुक
मला माझे खाते इथे ट्रान्स्फर करुन घ्यायचे आहे. असे म्हणून त्यांनी आपले पासबुक
झोळीतुन काढले आणि त्यांच्या ताब्यात दिले.
थांबा!
थांबा! हे नांव मी कुठेतरी ऐकले आहे, आणि ते माझ्या चांगले लक्षांत आहे! कुठे बरे? हां आत्ता आठवले म्हणजे आपण आपल्या खेड
ब्रँचचे मॅनेजर आंबेकर साहेब. अहो माझ्या नोकरीच्या अगदी सुरवातीला मी आपल्या
हाताखाली काम केलेले आहे. तुम्ही तेव्हा कदाचित अकाउंटंट असाल. आपल्यावर
कोसळलेल्या आपत्तीबद्द्लही मी खूप ऐकले आहे. बापSSरे! आपण मला अशाप्रकारे भेटाल हे माझ्या स्वप्नात देखिल आले नव्हते.
परवा हनुमानवाडीला मी आपणाला खरंच ओळखले नाही. बरं पणं आता आपण काय घेणार? चहा, कॉफी का काही थंड?
नाSही नाSही! खरंच काही नको! महाराज म्हणाले.
ते
काही नाही, आपल्याला काहीतरी घ्यावेच लागेल! शिवाय
माझ्या बरोबर आता जेवायलाही थांबायच आहे! हवेत उष्मा खूप आहे मी थंडच मागवते! मी
समिरला बोलावते.
मॅडम एक एक
मिनिट! थंड काही मागवु नका फारतर लिंबु सरबत मागवा! आणि आणखी एक, कृपा करुन माझी ही आंबेकर साहेब नावाची
ओळख शक्यतो गुप्त ठेवा. मला चिकटलेला महाराज हा बुरखा तसाच राहु दे! तुमच्या स्टाफ
मधल्या लोकांनाही सांगा प्लीज. महाराजांनी त्यांना विनवणी केली.
हो
ठिक आहे! पण तुम्हाला माझ्या बरोबर जेवायला थांबावे लागेल या अटीवर मी हे मान्य करीन.
मॅडमनी बजावले. मग त्यांनी समीरला लिंबू सरबत आणायला सांगितले. बरं आता, तुमचे बँकेचे काम काय आहे ते बघुया असे
म्हणून त्यांनी खाते ट्रान्स्फर करण्याची प्रोसेस सुरु केली.
मला
या खात्याला चेकबुक देखिल पाहिजे आहे. ते इथेच मिळेल की कुठुन बाहेरगावाहून येईल? महाराजांनी विचारले.
नाही
ती पद्धत अजुन इथे सुरु झाली नाही. त्यामुळे तुम्हाला चेकबुक येथेच मिळेल. मॅडमनी
माहिती दिली.
बरं
मॅडम! एक विनंति आहे! हनुमानवाडीत एक नविन प्रकल्प सुरु करायची प्रोसेस सुरु आहे.
त्याचा ट्रस्ट स्थापन झाल्यावर त्याचे खाते आपल्याकडे उघडायचे आहे. तेव्हा त्यांना
प्लीज मदत करा. कारण मी त्या ट्रस्टला फायनान्स करणार आहे. ही गोष्ट देखिल जेवढी
गुप्त राहिल तेवढे बरे. महाराजांनी विनंती केली.
अहो
आंबेकरसर! ते माझे कामच आहे. तुम्ही विनंती करण्याची काहीच गरज नाही. परंतु तुम्ही
सांगताय म्हणून ते काम जास्त आपुलकीने करीन हे माझे वचन आहे.
अशाप्रकारे
खाते ट्रान्स्फर करुन आणि चेकबुक घेऊन महाराज दुपारी तिन वाजता बँकेतुन बाहेर पडले
तेव्हा आचार्य मॅडम स्वत: त्यांना निरोप द्यायला बँकेच्या दारापर्यंत आल्या होत्या
ते पाहून स्टाफच्या लोकांना खूपच आश्चर्य वाटले. कारण त्या कडक शिस्तीच्या म्हणून
स्टाफ मधले सगळे त्यांना ओळखत होते.
************
सोमजाई
मंदिराच्या सभामंडपात हेमंत, गणेश
आणि हेरंब तिघे बसले होते. देवीचा डोंगर चढुन आल्यानंतर आलेला थकवा पोखरणीमध्ये
पाय धुतल्याबरोबर दूर झाला होता. देवीचे दर्शन झाल्यावर त्यांनी आजुबाजुला बघितले
तो त्यांना आठ दिवसात बराच बदल झालेला जाणवला. सर्व आवार स्वच्छ केलेले दिसत होते.
मंदिराच्या छपराच्या आडोशाने अबोली, मोगरा, तगर, जास्वंदीची रोपे लावलेली
दिसत होती. आता दुपारच्या वेळी देखिल ती रोपे टवटवीत दिसत होती. त्या प्रत्येक
रोपाच्या बुंधात एक एक मडके पाण्याने भरुन
ठेवलेले दिसत होते.
महाराजांना
सोमजाई मंदिरात रहायला आल्याला आता आठ दिवस होऊन गेले होते. पहिल्या दिवशी ते
सरपंचांबरोबर येथे आले होते. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या गड्याबरोबर
एक सतरंजी, चादर, दोन बालद्या,
पिण्याच्या पाण्याकरिता एक मातीचे मडके
एवढ्या वस्तु पाठवुन दिल्या होत्या. सध्या येथे महाराज एकटेच रहात होते. रोजचा
सकाळचा कार्यक्रम आटोपुन ते मंदिराच्या परिसराची स्वच्छता करित असत. त्याच बरोबर
त्यांनी गावातुन फुलांची तयार रोपे मागुन आणली होती. त्या रोपांच्या बुंधात
ठेवायला मातीची मडकीही त्यांनी कुठुनतरी पैदा केली होती. आता त्यांचा उद्योग
डोंगरावर येण्याच्या मार्गावर काही सावलीच्या दृष्टीने रोपे लावण्याचा होता. त्या
करिता त्यांनी खड्डे तयार करायला सुरवात केली होती.
हा
झालेला सगळा बदल हेमंत, गणेश आणि हेरंब हे तिघे बघत होते.
तेवढ्यात त्यांना खालुन महाराज डोंगर चढताना दिसले. म्हणजे येणा-या व्यक्तीचे
पांढरे कपडे दिसले. त्यावरुन ते महाराजच असावेत असे अनुमान त्यांनी काढले होते.
देवीच्या मंदिरात येण्याच्या वाटेवरच ते त्यांची वाट बघत उभे राहिले.
महाराज
डोंगर चढुन वर येताच त्यांना हे तिघे दिसले. त्यांना पहाताच महाराजांनी त्यांना
विचारले, आज तिघेच कसे काय? जितू कुठाय?
जितू
सरपंचकाकांबरोबर शेजारच्या वाडीवर गेलाय. सरपंच, शेळके गुरुजी आणि जितू असे तिघेजण आज तिकडे गेलेत. आज त्यांची शेवटची
बैठक आहे. आता परवाच अक्षय तृतिया आली आहे आणि त्या दिवशी या इथे आपण सर्व देवी
भक्तांची सभा आयोजित केली आहे नाही कां? हेमंतने
उत्तर दिले.
चला!
मी हातपाय धुवुन फ्रेश होतो, मग
आपण सविस्तर बोलुया! तिथपर्यंत तुम्ही तिघेजण देवीच्या सभा मंडपात बसा. महाराजांनी
सांगितले.
१५-२०
मिनिटांत महाराज हात पाय धुवुन आणि तोंडावर पाणी मारुन फ्रेश झाले. त्यानंतर
देवीला नमस्कार करुन त्या तिघांच्यात येऊन बसले. त्यांनी गणेशला विचारले तू गुजराथ
मधुन कधी आलास? आणि तुमच्या दोघांचे काय? कशा झाल्या वाड्या वाड्यांमधिल बैठका?
मी
कालच गुजराथ मधुन आलो. तिकडचे काम बघितले आणि तिकडे गेल्याचे सार्थक झाले असे
वाटले. खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे काम केलेले आहे. त्यांच्या या कामातिल एक समान
सूत्र स्वाध्याय हे आहे. त्यामुळे त्या कामात जसे रोजमजुरी करणारे आहेत तसेच
डॉक्टर, वकील, इंजिनीअर देखिल आहेत. वृक्ष मंदिराकरीता करायचे काम हे त्यांच्या
स्वत:च्या परस बागेतिल काम असल्याप्रमाणे प्रत्येकजण आपली सेवा तिथे देतो. गणेशने
सविस्तर उत्तर दिले.
काका, आम्ही देखिल वाड्या वाड्यांतुन फिरलो.
लोकांना ही कल्पनाच नविन आहे. परंतु देवीचे काम आहे म्हणून ते श्रद्धेने ऐकुन घेत
होते. वृक्ष मंदिर म्हणजे नेमके काय हे त्यांना उद्याच्या मिटींग मध्ये
समजल्यानंतर प्रत्यक्ष किती लोक सहभागी होतील ते समजेलच. परंतु सध्यातरी लोकांचा
उत्साह प्रचंड आहे. हेरंबने आपला रिपोर्ट दिला.
आज
संध्याकाळी शेळके गुरुजी,
सरपंचकाका, दिनकरदादा आणि गणेशचे बाबा आपल्याला
भेटायला देवीच्या मंदिरात येणार आहेत. हेमंतने सांगितले.
*************
सोमजाई
मंदिराच्या सभामंडपात घातलेल्या सतरंजीवर शेळके गुरुजी, सरपंचकाका, दिनकरदादा, गणेशचे बाबा आणि महाराज बसले होते.
वृक्ष मंदिर संकल्पनेच्या प्रारुपाला
अंतिम स्वरुप देण्यासाठी आज ही बैठक होती. बैठकीमध्ये हेमंत, गणेश, जितू आणि हेरंब हे देखिल सामिल होणार आहेत. ते मगाशी गावात गेले
होते. ते आता परत येणार होते. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वजण त्यांचीच वाट बघत बसले
होते.
शेळके
गुरुजी, सरपंच आपण वाड्या वाड्यांमधुन फिरलात त्या
लोकांचा प्रतिसाद कसा काय आहे? कोणी
या प्रकल्पात सामिल होण्यास उत्सुक आहेत कां? गोविंदराव
जोशींनी विचारले.
लोकांचा
प्रतिसाद खूपच चांगला आहे. उद्याच्या मिटींगला किती लोक उपस्थित होतात त्यावरुन नेमका
अंदाज येईल. शेळके गुरुजी म्हणाले.
बरं
या प्रकल्पाच्या खर्चाकरीता लागणा-या निधीची काय तरतुद झाली आहे? कारण या सगळ्या कल्पना पैशाशिवाय
व्यर्थ आहेत. दिनकर दादांनी विचारले.
त्या
सगळ्या बाबीच आता आपण फायनल करणार आहोत. आपल्याला एक रकमी निधी पुरवण्यासाठी एक
संस्था तयार आहे. फक्त ते कोणा व्यक्तीला पैसा देणार नाहीत. आपण जर सोमजाई
देवीच्या नांवे एक विश्वस्थ संस्था स्थापन केली तर ती संस्था काही अटींवर आपल्याला
आवश्यक असेल तेवढा निधी पुरवायला तयार आहे. फक्त त्यांना आपले नांव गुप्त ठेवायचे
आहे. सरपंचांनी सांगितले.
तेवढ्यात
आपल्या चौघा मित्रांचे आगमन झाले आणि तेही बैठकीत सामिल झाले. हेरंबने विचारले काय
विषय चालला आहे?
त्यावर
दिनकरदादांनी सांगितले की,
आपली आर्थिक विवंचना दूर झाली आहे.
हंबीररावांनी आपल्या प्रकल्पाला निधी देण्यासाठी एक धर्मादाय संस्था शोधुन काढली
आहे. परंतु त्या करिता आपल्याला सोमजाईच्या नावाने एक विश्वस्त संस्था स्थापन
करावी लागेल. त्यांच्या काही अटी देखिल आहेत.
पण
त्यांच्या अटी काय आहेत? हेरंबने विचारले.
हा
बघा त्यांच्या अटींचा तपशिल. असे म्हणून सरपंचांनी आपल्या हातातिल कागद वाचुन
दाखवला. त्या अटी अशा आहेत १) हा प्रकल्प सरकारी कायद्या प्रमाणे विश्वस्त संस्था
म्हणून रजीस्टर करुन घ्यावा. २) गोविंदराव जोशी यांच्याबरोबर रितसर करार करुन जागा
वृक्ष मंदिर म्हणून विकसित करायला त्या संस्थेच्या ताब्यात घ्यावी. ३) त्या
विश्वस्त संस्थेत गोविंदरावांचा किंवा त्यांच्या वारसाची अध्यक्ष म्हणून कायम
स्वरुपी निवड करावी. ४) विश्वस्त म्हणून हंबीररावांनी स्वत: त्यात सामिल होऊन
प्रकल्पाच्या कामावर देखरेख करावी. ५) या प्रकल्पाचा उद्देश देवीच्या भक्तांचे आणि
पर्यावरणाचे रक्षण करुन देवीचे वैभव वाढविणे हा असावा. ६) या प्रकल्पातुन स्थानिक
बेकारांना सन्मानाने रोजगार मिळावा हा देखिल त्यातिल मुख्य हेतू असावा.
मग
त्यांचे बरोबरच आहे. लाखो रुपये द्यायचे म्हणजे तो पैसा सत्कारणीच खर्च होतोय याची
कोणीही खात्री करुन घेणारच. तेव्हा त्यांच्या सर्व अटी मान्य करायला काहीच हरकत
नाही. शेळके गुरुजींनी आपले परखड मत व्यक्त केले. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले.
मग
आता घोडं अडलय कुठे?आपल्या या संस्थेला मी नांव सुचवु कां? “श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान” हे नांव कसे वाटते. गणेशने विचारले.
खूपच
छान! माझे या नावाला पूर्ण अनुमोदन आहे. सरपंचांनी आपला पाठींबा दिला.
आमचीही या
नांवाला संमती आहे. सगळ्यांनी कोरसमध्ये सांगितले.
चला
संस्थेचे नाव तर पक्के झाले. आता या श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानचे अध्यक्ष
कोणाला करायचे? दिनकररावांनी विचारले.
या
सर्व जागेचे वहिवाटदार आपले गोविंदराव जोशी आहेत. त्यांना वंशपरंपरागत ही
वहिवाटदारी मिळालेली आहे तेव्हा या संस्थानचे अध्यक्षही गोविंदराव जोशीच व्हायला
हवेत ते सुद्धा वंशपरंपरेने असे माझे स्पष्ट मत आहे. सरपंचानी सांगितले.
बरोबर
आहे आणि ते कायदेशिरही होईल. आपल्या अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थेची तीच इच्छा आहे. दिनकरारावांनी
आपले कायदेशिर मत दिले.
हे
बघा! माझा तसा काही आग्रह नाही! कोणत्याही निमित्ताने सोमजाईचे वैभव वाढावे. या
जमिनितुन तिच्या भक्तांचेही कल्याण व्हावे हीच माझी इच्छा आहे. त्या ताम्रपटातिल
अटीचे कोणत्याही कारणाने उल्लंघन होणार नाही हे बघितले की झाले. मग अध्यक्ष कोणिही
झाला तरी काही फरक पडत नाही. गोविंदरावांनी आपले स्पष्ट मत सांगितले.
नाही
नाही गोविंदराव आपणच या संस्थानचे अध्यक्ष व्हायला पाहिजे. तुम्ही होणार नसाल तर
मगं गणेशला करावे लागेल. शेळके गुरुजी म्हणाले. त्यापेक्षा तुमचे हातपाय चालतायत
तोवर तुम्ही अध्यक्ष व्हा असा माझा आग्रह आहे. तरुण मुलांना जरा अनुभव आला की आपल्याला
हे सर्व त्यांच्याकडेच सोपवायचे आहे.
तर
आता संस्थानचे अध्यक्ष गोविंदराव होतील आणि ते आपले विश्वस्त मंडळ निवडतिल असे मी
सूचवतो. शेळके गुरुजींनी सूचना मांडली आणि त्याला सरपंचांनी अनुमोदन दिले.
गोविंदरावांनी
अध्यक्षपद स्विकारताच सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवुन स्वागत केले. त्यानंतर
गोविंदरावांनी उपाध्यक्ष म्हणून हंबीरराव, कार्यवाह
म्हणून शेळके गुरुजी आणि विश्वस्त म्हणून दिनकरराव, हेरंब, खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे
यांची नियुक्ती केली.
गोविंदराव मी आपणाला एक दुरुस्ती सुचवु
कां? आपल्या चर्चेत आतापर्यंत एक शब्दही न
बोललेल्या महाराजांना या संस्थान मध्ये विश्वस्त म्हणून घ्यावे अशी माझी सूचना
आहे. शेळके गुरुजींनी एक प्रस्ताव मांडला.
छे!
छे! भलतेच काय? कृपा करुन मला या गोष्टीत अडकवु नका!
मी आपल्याला लागेल ती मदत करीन पण विश्वस्त वगैरे नकोच! महाराज म्हणाले.
माफ
करा! खरंच मी ही गोष्ट विसरुन गेलो! पण मी आता त्यांचे नाव जाहिर करतो.
गोविंदरावांनी जाहिर करुन टाकले.
नाही!
नाही! मला हे मान्य नाही! असे जर होणार असेल तर मी आपला माझा मुक्कामच हलवतो! मी
काय फकिर आहे! आज या गावात तर, उद्या
त्या गावात! महाराजांनी निर्वाणिचा इशारा दिला.
ठिक
आहे! पण तुम्ही गाव वगैरे सोडून जायची गोष्ट करु नका! आता कुठे हा प्रकल्पाची
नांदी झाली आहे. हा वृक्ष मंदिराचा प्रकल्प अर्धवट सोडून जाणार नाही असे
सोमजाईच्या साक्षीने वचन देत असाल तरच तुमचे म्हणणे आम्ही मान्य करु. सरपंचानी
यावर तोडगा काढला.
बरं
नाही जाणार! हा प्रकल्प अर्धवट सोडुन माझ्या या बोलण्याला सोमजाई साक्ष आहे.
महाराजांनी आपला शब्द दिला.
एक
मुद्दा राहिला, आपण आता निर्माण केलेली संस्था
सरकारदरबारी नोंद करायला हवी. त्याकरिता वकीलांना भेटुन कायदेशिर कागदपत्रे तयार
करायला हवित. ती कोण करणार? हंबीररावांनी विचारले.
ती
जबाबदारी मी घेतो! जितून ती जबाबदारी स्वत:हून अंगावर घेतली.
त्याच
बरोबर या संस्थेचे आर्थिक व्यवहार करण्याकरिता स्टेट बँकेत खाते देखिल उघडायला
हवे. त्याकरीता आजच्या बैठकीचा पद्धतशिर ठराव करुन तो बँकेत देऊन खाते उघडायला
हवे. महाराजांनी सुचवले. ही जबाबदारी हेमंत पार पाडु शकेल. काय हेमंत मान्य आहे
काय?
हो
चालेल, हे काम मी करीन! हेमतने ही कामगिरी
स्विकारली.
बरं
आता मला सांगा दिनकरदादा तुमचे फॉरेस्टवाले मित्र पहाणी करायला आले होते त्यांनी
काही अहवाल दिला आहे कां?
किती खर्च येईल असा त्यांचा अंदाज आहे? सरपंचांनी विचारले.
हो
दिला आहे त्यांनी अहवाल. त्यात त्यांनी अगदी तपशिलवार योजना दिली आहे. त्याच्या
म्हणण्यानुसार आपल्याला प्रथम ज्या ठिकाणी आजही ओलावा आहे त्या ठिकाणी विस्तिर्ण
पाझर तलाव खोदायला पाहिजे म्हणजे त्यातुन निघणा-या दगड मातितून लेव्हलिंग आणि
संपूर्ण डोंगराला गडगा किंवा कुंपण घालता येईल. या शिवाय त्यांनी सोलर प्लँट आणि
पवनचक्की बसवण्याचेही सूचविले आहे. म्हणजे सगळीकडे पाणी फिरवण्याकरिता वेगळी वीज
घ्यायला नको. पाझर तलावात साठलेले पाणी पवन चक्कीच्या सहाय्याने पाईपलाईन टाकून
डोंगराच्या माथ्यावर पाण्याची मोठ्ठी टाकी बांधुन त्यात साठवायचे नंतर सगळ्या
डोंगरावर फिरवायचे अशी त्यांची योजना आहे. त्यांनी ढोबळमानाने, साधारण आठ ते दहा लाख लागतिल असे
सांगितले आहे. याशिवाय कुठली झाडे कुठे लावावित हे देखिल त्यांनी तपशिलवार
सांगितले आहे.
माझ्या
मते दिनकरदादांच्या या मित्राला आपण सल्लागार म्हणून या योजनेत सामिल करुन घ्यायला
पाहिजे. त्यांना मान्य असेल तर एक विश्वस्त म्हणून देखिल घेता येईल. त्यांच्या
सल्याकरीता त्यांना योग्य मानधन देखिल द्यायला हवे. महाराजांनी सूचवले.
आपला
सल्ला बरोबरच आहे. त्याच बरोबर आपल्याकडे हेरंब, गणेश, जितू, हेमंत यांच्या सारखे या क्षेत्रातले शिक्षण घेतलेले तरुण आहेत
त्यांना देखिल आपण योग्य मानधन देऊन यात पूर्णवेळ सामिल करुन घ्यायला पाहिजे.
शिवाय सोमजाईच्या भक्तांनी जरी सेवा म्हणून काम केले तरी त्यांच्या श्रमाचा मोबदला
त्यांना प्रसादाच्या स्वरुपात काहीतरी द्यायला पाहिजे. त्या करिता मापदंडही
ठरवायला पाहिजे. सरपंचांनी चर्चेला जरा वास्तवात आणले.
त्याकरिता
मंदिराच्या बाजुला एक शेड बांधुन त्या मध्ये या संस्थानचे कार्यालय तयार केले
पाहिजे. त्याच बरोबर कुदळी,
फावडी, घमेली, या सारखी हत्यारे मोठ्या प्रमाणावर
खरेदी करायला पाहिजेत. या सर्व कामाकरीता पूर्णवेळ व्यवस्थापक नेमला पाहीजे. या
सगळ्या गोष्टींचा अधिकार आपण सरपंचांना देऊ. ते योग्य माणसे शोधुन त्यांच्या कडुन
कामे करुन घेतील. गोविंदरावांनी अध्यक्षांच्या भूमिकेतुन सांगितले. सरपंचांनी ते विनाअट
मान्यही केले.
आता
आपली सगळी तपशिलवार चर्चा झाली आहे. तेव्हा आता उद्याच्या सभेविषयी देखिल ठरवुयात.
शेळके गुरुजींनी तातडीच्या विषयाला हात घातला.
उद्याच्या
सभेमध्ये मुख्य वक्ता गणेश असेल. तो सर्व योजना तपशिलवार समजाऊन सांगेल. सभेची
सुरवात सरपंच करतील. त्यानंतर महाराज बोलतील. सभेचा शेवट शेळके गुरुजी करतील.
गोविंदरावांनी सांगितले.
एवढी
सगळी लोक भर उन्हाची डोंगरावर येणार त्यांना आपण काहितरी अल्पोपहार देणे आवश्यक
आहे असे मला वाटते. महाराज बोलले.
बरोबर
आहे! पण काय देता येईल? साधारण दोन अडिचशे माणसे येतिल!
त्यांना प्रसाद म्हणून शिरा देता येईल! देवीचा विश्वस्त म्हणून मी वस्तू पुरविन पण
बनवणार कोण? गोविंदरावांनी विचारले.
त्याची
चिंता नको! मी डोंगरावर भांडी आणून शिरा आणि कोकम सरबत बनवायची व्यवस्था गावातल्या
महिला मंडळामार्फत करतो! सरपंचांनी सांगितले.
मी
सर्व वस्तु पाठविण्याची व्यवस्था करतो. गोविंदराव म्हणाले.
आता
आपली आजची बैठक बरखास्त करण्यापूर्वी आज आपण काय काय ठरवले ते बघुया! दिनकररावांनी
आजच्या कामकाजाचा आढावा घ्यायला सूचवले.
बघा
मी तपशिलवार सांगतो. १) आपण श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान या संस्थेची स्थापना
केली. २) त्याचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ निवडले. ३) ही संस्था सरकारी दप्तरांत
नोंदवुन घ्यायचे ठरविले. ४) या संस्थेच्या नावांने स्टेट बँकेत खाते उघडण्याचे
ठरविले. ५) संस्थे मार्फत पहिले काम पाझर तलाव बांधणे आणि जमिनीची लेव्हल करणे हे
ठरवले. ६) संस्थे करिता सोमजाई मंदिराच्या बाजुला कार्यालय बांधण्याचे ठरविले. ७)
संस्थेकरिता एक मॅनेजर आणि दैनंदिन कामकाज चालविण्याकरिता योग्य व्यक्तींची योग्य
मानधनावर नेमणूक करण्याचा अधिकार हंबिररावांना दिला. ८) उद्याच्या बैठकीचा
कार्यक्रम ठरविला आणि बैठकीनंतर उपस्थित लोकांना प्रसाद देण्याचे ठरविले. ९) संस्थेचे
दैनंदिन कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी हंबीररावांनी स्विकारली आहे. जितूने
बरोबर आणलेल्या वहित हे सर्व लिहून घेतले होते ते वाचुन दाखवले.
शाबास
जितू योग्य काम केले आहेस! महाराजांनी त्याला प्रोत्साहन दिले.
अशा
त-हेने आजची बैठक संपन्न झाली आहे असे मी जाहिर करतो. गोविंदरावांनी अध्यक्ष
म्हणून जाहिर केले.
आता आरतिची वेळ झालीच आहे तर सगळेजण देवीची आरति
करुन आपापल्या घरी जाऊ. हंबीररावांनी सुचविले. त्यानंतर त्या सर्वांनी देवीची आरति
केली आणि मग ते सगळे आपापल्या घरी गेले. एकटे महाराज देवीजवळ राहिले. ते देखिल आपल्या
दैनंदिन सायंप्रार्थनेला लागले.
****************