रिलायन्स ग्रीन्स एक स्वप्ननगरी
अनिल अनंत वाकणकर, श्रीवर्धन-रायगड.
गेले जवळपास एक वर्षभर मी
रिलायन्स ग्रीन्स या जामनगर(गुजरात) येथिल टाऊनशिप मध्ये रहात आहे. ही जणू एक
स्पप्न नगरीच आहे असे वाटावे असे येथिल वातावरण आहे. जामनगर द्वारका महामार्गावर
जामनगर पासुन तिस किलोमिटर अंतरावर असणाऱ्या या स्वप्ननगरीच्या मुख्य प्रवेशद्वारातुन
आत प्रवेश केला की आपल्याला लगेचच फरक जाणवतो. गेटच्या बाहेर सर्वत्र हा एक
वाळवंटाचाच भाग असल्यामुळे उजाड वाटणारे वातावरण अनुभवल्यानंतर या नगरीतील
प्रसन्नता, हिरवळ मनाला भावते.
स्वच्छ, सुंदर, भरपुर
मोठ्ठे असणाऱ्या रस्त्यांवरुन आपण घरंगळतच सर्वत्र फिरत असतो. प्रवेशद्वारामधुन आत
आल्यावर समोरच सेंट्रल गार्डनमधिल कारंजी आपले लक्ष वेधुन घेतात. रस्त्याच्या
कडेला आणि दुभाजकामध्ये रंगिबेरंगी फुले असणारी झाडे आपले मन प्रसन्न करतात.
त्यानंतर आपल्याला एक सुबक आणि प्रशस्त आवार असणारे मंदिर दिसते. मंदिर परिसरात
असलेली हिरवळ, फुलांची झाडे तेथिल वातावरण अधिकच भक्तीमय करतात.
अनेक सेक्टरमध्ये
विभागलेल्या या नगरीतील टापटीप आणि शांतता नेहमीच आपले लक्ष वेधुन घेते. प्रत्येक
सेक्टरमध्ये लहान मुलांना आणि आजी आजोबांना विरंगुळा म्हणून गार्डन केली आहेत.
तेथे मुलांना खेळण्या साठी आवश्यक असणारे घसरगुंडी, सि सॉ, चक्र उपलब्ध केलेली
आहेत. प्रत्येक बागेत हिरवळ आणि फुलांनी बहरलेली झाडे ही कॉमन बाब आहे. आजी
आजोबांना गप्पा मारायला आरामदायी आसने ठेवलेल्या शेड केलेल्या आहेत.
येथे ओव्हल पार्क आणि
सेंट्रल पार्क ही मोठी मैदाने तयार केलेली आहेत. या दोन्ही ठिकाणी सकाळी आणि
संध्याकाळी मंद सुरात निरनिराळी जुनी नवी गाणी किंवा भजने लावलेली असतात. त्यांचा
आवाज देखिल आपण हेड फोनवरुन संगित ऐकतोय असा भास व्हावा इतकाच असतो. येथे स्पेशल
जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक बनवलेला आहे. जवळच मोठ्ठी लायब्ररी, जिम, फुटबॉल,
टेनीस, क्रिकेट यांची मैदाने उपलब्ध केलेली आहेत. लायब्ररीमध्ये अनेक भाषांमधिल
पुस्तके उपलब्ध असतात. याशिवाय दररोजचे निरनिराळ्या भाषांमधिल वर्तमानपत्रे सुध्दा
आपल्याला वाचायला मिळतात. ओव्हल
पार्कमध्ये जणू चौपाटीच उभी केली आहे. या नगरीत भारतातिल सर्व प्रांतातुन आलेले
लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रांतामधल्या चवीचे पदार्थ येथे आपल्याला खायला
मिळतात. येथे अनेक प्रकारचे उत्सव मोठ्या प्रमाणांत साजरे केले जातात. सार्वजनिक
गणपती, नवरात्रीमध्ये गरबा, इंग्रजी नवीन वर्षांचे स्वागत हे उत्सव मोठ्या
प्रमाणात साजरे केले जातात. या शिवाय वर्षातुन एकदा मोठा कार्निव्हल देखिल आयोजित
केला जातो. त्यावेळी येथे जत्रेचे वातावरण असते.
एक मोठे सुसज्ज हॉस्पिटल,
इंग्रजी माध्यमाची मोठी शाळा, दोन मॉल, तिन ते चार क्लब, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक,
अँक्सिस बँक, आय्. सी. आय् सी आय् बँक, तिन ए टी एम या सोयी येथे उपलब्ध आहेत. या
शिवाय त्रीस्टार हॉटेल, सिनेमा थिएटर, पाच सहा फुड कोर्ट खाद्य शौकिनांकरीता आहेत.
येथे कुठेही आपल्याला
पोलिस दिसत नाही. परंतु प्रत्येक टू व्हीलरस्वार हेल्मेट घातलेला आपल्याला दिसतो.
एवढेच नाही तर टू व्हिलरच्या मागे बसलेला व्यक्ती देखिल हेल्मेटधारीच दिसतो.
कोठेही चोरीमारी झाल्याचे दिसत नाही. चारचाकी गाडीवाला देखिल सिटबेल्टशिवाय गाडी
चालवताना दिसत नाही. कोणीही स्पीड लिमिट ओलांडलेला आढळत नाही. मी एकदा रस्ता क्रॉस
करीत होतो तेव्हा मला रस्ता क्रॉस करु देण्याकरीता चक्क चारचाकी गाडीवाला थांबला
होता. हा अनुभव मी आजपर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवला.
हल्लीच या नगरीत
पर्यावरणाला पुरक असणाऱ्या सायकलचे प्रमोशन सुरु केलेले आहे. मायबाईक या अहमदाबाद
येथिल संस्थेच्या मार्फत येथ सायकलिंग प्रमोशन उपक्रम राबविला जात आहे. संपूर्ण नगरीच्या
परिसरात एकुण आठ सायकल टर्मिनल उभारण्यात आलेली आहेत. येथे शंभर रुपये डिपॉझिट भरुन
जवळपास मोफत सायकल उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. पहिल्या तासाला मोफत आणि
पुढील प्रत्येक तासाला पांच रुपये इतक्या अल्प दराने सुसज्ज सायकल मिळतात.
एक टर्मिनल वरुन घेतलेली सायकल दुसऱ्या टर्मिनलवर
सोडली चालते. यामुळे व्यायाम तर होतोच, शिवाय जवळपासची छोटी मोठी कामे प्रदुषण
करणाऱ्या वाहनाशिवाय उरकता येतात. या करीता सायकलची मरम्मत करण्याचा व्याप देखिल
नाही. सायकलमधिल हवा चेक करणे, वंगण घालणे, सायकल स्वच्छ करणे ही कामे देखिल करावी
लागत नाहित. त्यामुळे येथिल नागरिक या सायकलचा मोठ्या प्रमाणांत फायदा घेताना
दिसतात.
देशामध्ये पाचशे आणि
हजारच्या नोटा बंद केल्यानंतर केंद्र शासनातर्फे कॅशलेस व्यवहार वाढावेत
याच्याकरीता खास प्रयत्न करण्यांत आले. त्याकरीता भिम, पे, पे टिम यासारखी अँप
उपलब्ध केली गेली. त्याचवेळी जिओ मनी हे देखिल अँप सुरु केले गेले. या शिवाय
डेबिट/क्रेडीट कार्ड यावर देखिल भर देण्यांत आला.
त्याकाळात स्वत: पंतप्रधान
नरेंद्र मोदी साहेबांनी काही वसाहती कॅशलेस वसाहती म्हणून जाहिर केल्या होत्या.
त्यातिलच एक वसाहत रिलायन्स ग्रीन्स ही देखिल होती. कॅशलेस व्यवहार किती सोयीचा असतो
हे मला येथे राहून समजले. या नगरीतील प्रत्येक आर्थिक व्यवहार कॅशलेस होतो आहे.
चहाची टपरीवाला, इस्त्रीवाला, धान्य दळणाची गिरणवाला, पाणीपुरीचे/फास्टफुडचे
स्टॉल, फळवाला, भाजीवाला, सायकल रिपेअरिंग करणारा, केस कापणारा सर्वजण सहजपणाने
भीम अथवा जिओ मनी अँपने पैसे स्विकारतात. मॉलमध्ये, हॉटेलमध्ये भीम, जिओ मनी
याशिवाय डेबिट/क्रेडीट
कार्डने पैसे स्विकारतात. खिशामध्ये पैशाचे पाकिट ठेवायची जरुरच पडत नाही.
या
नगरीतुन जामनगरला जायला अतिशय अल्प दरात दर तासाला बसेस उपलब्ध असतात. या शिवाय
नगरीच्या परिसरात हॉस्पिटल, मॉल वगैरे ठिकाणी जाण्याकरीता पांचरुपये इतक्या
अल्पदरात व्हॅनची शटल सर्वीस सुरु असते.
या नगरीचे एक विशेष सांगायचे राहूनच गेले.
येथिल दिवस उगवतो तो मोरांच्या केकांनी आणि पक्षांच्या मधुर गुंजारवांनी. आपण रस्त्यानी
जाताना आपल्या आजुबाजुला अनेक मोर वावरत असतात. कधी योग आला तर त्या मयुरांचे
नर्तनही पहायला मिळते. फक्त त्यावेळी आपल्याकडे स्वस्त उभे रहाण्याचे पेशन्स
पाहिजेत. आपण काय करतो मोर नृत्य करु लागला की लगेचच मोबाईलमध्ये व्हीडीओ करायला
बघतो. त्या आपल्या हालचालींनी त्या मोराची नर्तन समाधी भंग पावते.
असो
ही अशी स्वप्ननगरी मला अनुभवायली मिळाली. आपण सर्वांना देखिल अशाप्रकारचा अनुभव
मिळो ही सदिच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा