हैदराबाद सहल भाग ३
आजचा
दिवस खास रामोजी फिल्म सिटीला भेट देण्याकरीता राखुन ठेवला होता. सकाळचा भरपेट
नाश्ता झाल्यावर रामोजी फिल्म सिटीच्या गेटवर पोचलो. प्रवेशाचे पास घेतल्यावर आत
गेल्यावर फिल्म सिटीच्या बस वाटच बघत होत्या. त्यामध्ये बसुन सर्वजण प्रत्यक्ष
फिल्म सिटीच्या अंतरंगात प्रवेश केला.
रामोजी
फिल्म सिटी ही माया नगरी हैदराबाद पासुन २५ किलोमिटर दूर २०० एकर एवढ्या भव्य जागेत
साकार केली आहे. येथे एकाच वेळी १५ ते २५ सिनेमांचे किंवा सिरीयल्सचे शूटींग चालू असते.
या मायानगरीला दरवर्षी सुमारे दहा लाख पर्यटक भेट देतात असे म्हणतात. सन १९९६ मध्ये
या मायानगरीचे कार्य सुरु झाले.
मुख्य
प्रवेशद्वारातुन आलेल्या बसमधुन उतरुन परत दुसऱ्या खास बस मध्ये बसलो. या बसला एक गाईड
होता. तो बसमधुनच रामोजी
फिल्म सिटीच्या खासियत दाखवत होता त्याचे वर्णन करीत होता. त्याने निरनिराळ्या जगप्रसिद्ध
शहरांच्या रस्त्याच्या प्रतिकृती, निरनिराळ्या फिल्म करीता लागणाऱ्या इमारतींची सफर
घडवुन आणली. एकाच विल्डींग मध्ये हॉस्पीटल, रहाण्याचा बंगला, पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस
अशा अनेक प्रकारच्या करामती त्याने आम्हाला दाखवल्या. निरनिराळ्या जगप्रसिद्ध गार्डनच्या
प्रतिकृती येथे साकारलेल्या आहेत. चित्रपटांच्या किंवा दूरदर्शन मालिकांना आवश्यक असणाऱ्या
नेहमीची दृष्ये येथे कायमची तयार करुन ठेवलेली आढळली. खेडेगांवाची प्रतिकृतीही आपल्याला
येथे पहायला मिळते. अशाप्रकारे ही स्थिर दृष्ये आम्हाला बसमधुनच दाखवुन गाईड आणि ती
बस आम्हाला सोडून निघुन गेली.
आता
आमच्यासमोर रामायण आणि महाभारत या प्रसिद्ध दूरदर्शन मालिंकाची कायमची दृष्ये दाखवणारी
चित्रे आणि रामायण महाभारतातिल दरबारांचे कायमस्वरुपी साकार केलेली दालने होती. ती
दृष्ये पाहून परत त्या मालिकांची दृष्येच डोळ्यापुढे दिसु लागली. त्यानंतर कायमस्वरुपी
साकारलेले रेल्वे स्टेशन पहायला मिळाले. या डमी रेल्वे स्टेशनवरुन अनेक चित्रपटांची
आणि मालिकांची चित्रिकरणे झालेली असतील. विशेषत: कुली या अभिताभ बच्चन यांची मुख्य
भूमिका असलेल्या चित्रपटाचे चित्रिकरण येथे झाल्याचे सांगितले गेले.
या
रेल्वे स्टेशनवरुन परत दुसऱ्या बसने आम्ही बाहूबली या हल्लीच्या प्रसिद्ध चित्रपटाच्या
सेटवर गेलो. बाहूबली या चित्रपटाच्या चित्रिकरणाकरीता नवीन ग्राफिक्सचे तंत्रज्ञान
वापरले गेले होते. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपट आणि येथे दिसणारे सेट यात जमिन अस्मानाचे
अंतर होते. चित्रपटात भव्य दिसणारी दृष्ये येथे अगदी केविलवाणी दिसत होती. तरीही तेथिल
मांडलेल्या दृष्यांवरुन चित्रपटाची कल्पना येते. या सेटवर सगळेजण सेल्फी आणि फोटो काढीत
होते. त्यांच्याप्रमाणे आम्हीही आपापले फोटो काढुन हौस भागवुन घेतली.
तेथुन
परत एकदा तिसऱ्या बसमध्ये बसुन तिसऱ्या स्पॉटला आलो. तेथे दोन तिन गार्डन होती. एक
देवळाचा सेट होता. तेथेच एक माणूस हातचलाखीची जादू करुन दाखवत होता. संपूर्ण फिल्म सिटीमध्ये स्वच्छता आणि टापटीप वाखाणण्यासारखी
होती. सर्व झाडे आणि लॉन देखिल हिरवेगार आणि टवटवित दिसत होते. तेथुन चालत चालत गेल्यावर
परत एका बसमध्ये बसलो त्या बसने आम्हाला चार पाच बंदिस्त थिएटर असलेल्या भागात आणून
सोडले.
या बंदिस्त थिएटर मध्ये आम्हाला खरी कमाल बघायला
मिळाली. येथे फिल्म कशी तयार करतात. शूटिंग कसे करतात आणि त्या झालेल्या शूटींगची तयार
होणारी प्रत्यक्ष फिल्म कशी प्रोसेस केली जाते, हे प्रेक्षकांच्या सहभागाने
प्रत्यक्ष दाखविले गेले. आमच्याच
पैकी एका मुलीला जुजबी मेकअप करुन आणि ड्रेसमध्य अगदी जुजबी बदल करुन शूटींग केले गेले.
एक साधा सिन होता म्हणजे घोडे न जोडलेल्या बग्गीवर चालकाच्या जागेवर बसुन तिने फक्त
मागे बघायचे आणि घोड्यांना हाकण्याची अँक्शन करायची होती. एक दोघेजण ती बग्गी फक्त
हलवत होते. एवढ्या दृष्याचे चित्रण झाल्यावर तेच दृष्य एडीट करुन पडद्यावर दाखविण्यात
येत होते. त्या चित्रणाच्या जोडीला ग्राफिक्सच्या मदतिने घोडेस्वार तिचा पाठलाग करत
आहेत आणि ती जोरजोरात बग्गी हाकलत आहेत असे दृष्य आता पडद्यावर दिसत होते. त्यानंतर
आम्हाला दुसऱ्या दालनांत नेण्यांत आले तेथे या चित्रपटाला साऊंड इफेक्ट देण्यांत आला.
तोही प्रेक्षकांच्या मदतीने. दोन नारळाच्या करवंट्या जमिनीवर आपटल्यावर त्यातुन घोड्यांच्या
टापांचा आवाज येत होता. त्यानंतर तयार झालेला फायनल चित्रपट वेगळ्या दालनांत दाखविण्यांत
आला. तेव्हा तो एकदम वेगळाच भासत होता. केलेले शूटींग आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट
यांत फक्त प्रेक्षकांपैकी असलेली मुलगीच खरी होती, बाकी सगळी ग्राफिक्स आणि तंत्रज्ञानाची
कमाल होती.
चित्रपट
तयार होताना प्रत्यक्ष पाहिल्या नंतर आम्ही सर्वजण अवकाश भ्रमणाच्या शो मध्ये सामिल
झालो. प्रत्यक्ष जागेवरुन न हालता अवकाश भरारीचे थ्रिल तेव्हा अनुभवायला मिळाले. जबरदस्त
व्हायब्रेशन, प्रचंड वेग याचा थरार यातुन दिसणारी आकाशगंगा याचा अनुभव वेगळाच होता.
मधेच
एकदा आम्ही निरनिराळे पक्षी असलेल्या मोठ्या दालनाला भेट दिली. तेथे बटर फ्लाय गार्डन
होते. त्या ठिकाणी अनेक
प्रकारची फुलपाखरे होती. कृत्रिम धबधबा होता. या प्रत्येक ठिकाणी फोटोग्राफी झाली.
त्यानंतर कृत्रिमरित्या बनविलेल्या बौद्ध गुंफा पहायला मिळाल्या खरोखरीच प्रत्यक्षाहूनी
प्रतिमा उत्कट या उक्तीचा येथे प्रत्यय आला.
एकंदरीतच
या मायानगरीत पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक जगाची सफर करता आली. आजचा दिवस एक वेगळाच
अनुभव देऊन गेला हे निश्चितच. भरपुर सेल्फी आणि फोटो काढुन झाल्यावर आम्ही परत हॉटेलच्या
दिशेने प्रवासाला सुरवात केली.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा