बुधवार, १८ एप्रिल, २०१८

हैदराबाद सहल, भाग ६


हैदराबाद सहल, भाग सहावा.
     सकाळी साडेसातच्या सुमारास तिरुपती रेल्वे स्थानकावर दाखल झालो. परत एकदा बॅगांची मोजणी आणि वाहतूक करुन झाली. स्टेशनच्या बाहेर हॉटेलवर जाण्याकरीता दोन गाड्या आमची वाट पहात होत्या. आमचे बुकींग केलेले हॉटेल कल्याण इंटरनॅशनल हे रेल्वे स्थानकापासुन जवळच होते. हॉटेल धली व्यवस्था मात्र खूपच चांगली वाटली. आंघोळ वगैरे झाल्यावर सर्वजण फ्रेश झाले. हॉटेल मधुनच तिरुमाला डोंगरावर जाण्यासाठी मिनी बस ठरवुन त्या बसने तिरुमाला तिरुपती मंदिराच्या गेट जवळ गेलो. या इथे देखिल तात्काल दर्शनाची सोय आहे परंतु त्याला ऑनलाईन बुकींग करायला लागते. ते आम्ही केले नव्हते. परंतु जेष्ट नागरीकांकरीता वेगळ्या रांगेची सोय होती.
      आमच्यातल्या ज्यांचे वय पासष्ट पेक्षा जास्त होते ते त्या जेष्ट नागरीकांच्या दर्शन रांगेतुन गेले. आम्ही जनरल लाईन मध्ये गेलो. दर्शनाला जाणाऱ्यांचे पांच सहा हॉल होते. त्यातले पहिले दोन भरलेले होते. आमचा नंबर तिसऱ्या हॉल मध्ये लागला. प्रत्येक हॉल मध्ये कमीत कमी पाचशे भाविक बसलेले होते. आम्ही बाराच्या सुमारास त्या हॉल पर्यंत पोचलो. त्यानंतर जवळ जवळ नऊ तास त्या हॉल मध्येच होतो. समोर टीव्हीच्या पडद्यावर निरनिराळ्या उत्सवाचे व्हीडीओ दाखवले जात होते. तेथे टॉयलेटची देखिल सोय केलेली होती. आम्ही तेथे बसलो होतो त्याकाळात देवस्थान कडून प्रथम खिचडी, त्यानंतर चार वाजता चहा, रात्री आठच्या सुमारास उपमा असे पदार्थ प्रत्येक भाविकाला देण्यांत आले. सुमारे दहा तास एका जागी बसुन रहाण्याची सवय नसल्याने हे फारच त्रासदायक वाटत होते. तिथुन बाहेर पडायचे तर ती देखिल काही सोय दिसत नव्हती. प्रत्येक हॉलमध्ये मोफत फोनची सोय उपलब्ध होती. तिथुन भारतात कुठेही फोन लागत होता.
      रात्री साडेनऊच्या सुमारास सर्व हॉल मधिल भाविकांना एकदाच दर्शन रांगेत सोडले. त्यानंतर चालत चालत सुमारे अर्ध्यातासात आम्ही तिरुमाला तिरुपती देवाचे दर्शन घेतले. देवाची मूर्ती आमच्यापासुन खूप लांब होती. दर्शन घेऊन बाहेर पडलो तेव्हा साडे दहा वाजले होते. मी आणि माझे दुसरे साडु यांनी केस द्यायचे ठरविले होते. परंतु केस देण्याची जागा आम्ही बाहेर पडलो त्याच्या विरुद्ध दिशेला होती आणि उशिरही खूप झाला होता त्यामुळे आम्ही तो विचार रद्द केला आणि तिरुपतीला हॉटेलकडे प्रस्थान ठेवले.
     जवळपास अकरा वाजता आम्ही तिरुपती शहरात पोचलो. वाटेतच एका हॉटेलमध्ये पोटपूजा केली. रात्री झोपायला बारा वाजले. सकाळी लवकर आवरुन हॉटेल सोडायचे होते. कारण येथिल चेकआऊट टाईम २४ तासाचा होता.

*******
          नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता जाग आली. मुखमार्जन आटोपल्यावर आंघोळ केली. चहाची तल्लफ आल्याने चहाची सोय शोधण्याकरीता बाहेर पडलो. हॉटेलच्या बाहेर थोड्या अंतरावर चहाचे टपरीवजा दुकान दिसले. येथेही भाषेची अडचण होतीच परंतु खुणांनी काम भागले. त्या चहावाल्याला याची सवय असावी परंतु पठ्या तेलगु सोडायला तयार नव्हता. मी चहा घेतला आणि चहा कॉफीचे पार्सलही घेतले.
      सकाळी नऊ वाजता सर्वजण तयार होऊन आपापल्या बॅगा घेऊन हॉटेलच्या रिसेप्शन पाशी आले. इकडच्या पद्धती प्रमाणे हॉटेलच्या पॅकेजमध्ये नाश्ता होता. हैदराबादला होता त्याप्रमाणे नाश्त्याला विविध पदार्थ होते. सर्वांनी भरपेट नाश्ता केला. आमच्या सर्व बॅगा परत मिनीबस मध्ये चढविण्यांत आल्या. आता आमचा तिरुपती परिसर दर्शनाचा कार्यक्रम होता.
                सर्वप्रथम आम्ही गोविंदराज स्वामी मंदिरात गेलो. यालाच व्यंकटेश्वर मंदिर असेही म्हणतात. हे अतिशय जुने वैष्णव मंदिर आहे. हे मंदिर महान संत रामानुजाचार्य यांनी बांधले. अप्रतिम कलाकुसर असलेले हे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात अनेक मंदिरे आहेत. या देवस्थानातिल मुख्य मंदिर गोविंदराजस्वामी यांचे आहे. येथेही तात्काळ प्रवेशाकरीता वीस रुपये शुल्क आहे. या मंदिरातील मूर्तीचे वैशिष्ट हे आहे की, गोविंदराज स्वामी यांची पहूडलेल्या म्हणजेच योगनिद्रा अवस्थेतिल ही मूर्ती आहे. उजवा हात डोक्याखाली घेतलेला असुन पायापाशी श्रीदेवी आणि भूदेवी बसलेल्या अवस्थेत आहे. येथिल दुसरे महत्वाचे मंदिर आहे पार्थसारथी भगवान श्रीकृष्णाचे.
      मंदिराच्या परिसरात अनेक प्रकारची दुकाने आहेत. किंबहूना सारे तिरुपती शहरच या मंदिराच्या भोवती विस्तारले आहे. त्यानंतर आम्ही इस्कॉनच्या हरेकृष्ण हरे राम मंदिरात गेलो. तेथिल परिसर खूपच छान आहे. इस्कॉन मंदिरानंतर पद्मावती मंदिराकडे गेलो. परंतु तेथिल गर्दी पाहीली आणि कालचे दहा तास आठवले. एवढ्या मोठ्या रांगेतुन दर्शन व्हायला बराच वेळ गेला असता. आमचे संध्याकाळी सहा वाजता रेणूगुंटा स्थानकावरुन जाणाऱ्या चेन्नई कुर्ला टर्मिनन्स या गाडीचे रिझर्वेशन केलेले होते. त्यामुळे आम्ही देवी पद्मावतीच्या कळसाला नमस्कार करुन आणि टि. व्ही स्क्रीन वर दर्शन घेऊन प्रस्थान ठेवले.
     महिला मंडळाला काही खरेदी करायची होती म्हणून आम्ही परत तिरुपती शहरात आलो. तेथे मनासारखी खरेदी झाली नाही म्हणून रेणूगुंटा येथे प्रयत्न करायचे असे ठरले आणि आम्ही रेणूगुंटा येथे दाखल झालो.  रेणूगुंटा  येथे पोटपूजा करुन महिलांची खरेदी झाली. त्यानंतर आम्ही रेल्वेस्टेशनवर गेलो. गाडी वेळेत आली. येथेही गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागणार हा घोळ होताच. म्हणून आम्ही कुली ठरवला होता. मात्र फारशी धावपळ न करता गाडीत प्रवेश करता आला. जेवण उशीरा झाल्याने फारशी भूक नव्हतीच त्यामुळे मी लगेचच वरचा बर्थ गाठला आणि ताटकळलेल्या शरिराला ताणून दिले. आमच्यातले निम्मे मेंबर पुण्याला उतरले बाकी उरलेले आम्ही कुर्ल्याला उतरलो. तिथुन टॅक्सीने बोरीवली दुसऱ्या दिवशी दुसरी ट्रेन पकडून जामनगर गाठले. अशातऱ्हेने आमची एक आठवड्याची हैदराबाद-श्रीशैल्य-तिरुपती सहल समाप्त झाली.

*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा