रविवार, २५ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग १५


१५) कुरुक्षेत्र आणि पानिपत दर्शन
आज दिनांक २९ मार्च, आज आमच्या सहलीचा अखेरचा दिवस. आजच्या दिवसात कुरुक्षेत्र आणि पानिपत ही दोन ठिकाणे पाहिली की पानिपत येथे मुक्काम करुन उद्या सकाळी पानिपत रेल्वे स्टेशन वरुन मुंबईला जाणारी रेल्वे गाठायची आहे. आज ज्या ठिकाणांना भेट द्यायची आहे ती दोन्हीही युद्ध क्षेत्र आहेत. योगायोगाने सहलीचा शेवट युद्धक्षेत्राने होत आहे, कारण उद्या पासुन परत प्रापंचिक जीवनात दाखल व्हायचे आहे. आणि प्रपंच म्हटला की, “दैनंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.
कुरुक्षेत्रात दहाच्या सुमारास दाखल झालो. प्रथमच दर्शन झाले कुरुक्षेत्राच्या प्रवेशद्वाराने. प्रवेशद्वाराची कल्पना खूपच छान आहे. भगवान श्रीकृष्ण सारथ्य करीत असलेल्या अर्जुनाच्या रथाचे शिल्प प्रवेशद्वारावर आहे. त्या शिल्पानेच आम्हाला सांगितले की तुम्ही आता एका पौराणिक महत्वाच्या स्थळाला भेट देत आहात.
कुरुक्षेत्र या स्थळाचे महत्व आपल्या पौराणिक साहित्यात वर्णन केले गेले आहे. कुरुक्षेत्र हे सध्या शहर असले तरी महाभारत काळात ही युद्धभूमी होती. या स्थळी कौरव आणि पांडवांचे प्रसिद्ध युद्ध झाले होते. या युद्धात कौरवांचा पूर्ण वंश नष्ट झाला होता. तर पांडवांचा नातु आईच्या पोटात असल्यामुळे वाचला होता. लहानपणापासुन आपण भगवद्गीता वाचतो आहोत. भगवद्गीतेची सुरवातच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेअशा शब्दाने केली आहे. याच ठिकाणीच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली होती.
वामन पुराणातिल उल्लेखानुसार कुरुराजाने वास्तव्यासाठी सरस्वती नदीच्या तिरावरील या स्थानाची निवड तप, सत्य, क्षमा, दया, शुद्धी, दान, यज्ञ आणि ब्रह्मचर्यया आठ पुरुषार्थाचा पुरस्कार करण्यासाठी केली. कुरुने केलेल्या या आठ तत्वांच्या पुरस्कारासाठीच्या कार्याने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी कुरुराजाला वर दिला की या क्षेत्राला तुझ्या नावाने म्हणजेच कुरुक्षेत्रया नावाने ओळखले जाईल आणि या क्षेत्रात ज्याचा मृत्यू होईल त्याला स्वर्ग प्राप्ती होईल.
कुरुक्षेत्राचे महत्व सांगणारा एक श्लोक कुरुक्षेत्र येथिल ब्रह्म सरोवराच्या बाहेर प्रदर्शित केलेला आहे. तो असा आहे,
गंङ्गायां तु जले मुक्ति: वाराणस्यां जले स्थले।
कुरुक्षेत्रे त्रिधा मुक्ति: अंतरिक्षे जले स्थले।।
या श्लोकाचा अर्थ आहे गंगेच्या जलाने स्नान केल्याने मुक्ति मिळते, वाराणसी क्षेत्राच्या पाण्यात स्नान केल्याने आणि तिर्थक्षेत्री वास्तव्याने मुक्ति मिळते, मात्र कुरुक्षेत्राच्या जल, स्थल आणि आकाश या तिन्ही ठिकाणी मुक्ति मिळते.
कुरुक्षेत्रामध्ये पहाण्यासाठी अनेक स्थाने आहेत. त्यातिल आम्ही मोजकीच पाहू शकलो तरीही त्या सर्व स्थळाचा आपण परिचय करुन घेऊया.
१)अर्जुन चौक:- अर्जुन चौकातिल पुरुषश्रेष्ठ महान योद्धा अर्जुनाचा पुतळा. हा जाता येता सहज दिसतो.
२)ब्रह्म सरोवर:- अतिशय पवित्र असलेल्या सरोवरात स्नान केल्याने सर्व पापांतुन मुक्ति मिळते आणि पुनरपि जननं पुनरपि मरणंया दुष्ट चक्रांतुनही सुटका होते. सोमवति अमावस्येला या सरोवरात स्नान केल्याने विशेष लाभ होतो असाही भाविकांचा विश्वास आहे. भगवान श्रीकृष्ण सारथ्य करित असलेल्या अर्जुनाच्या रथाचे जगांतिल सर्वात मोठे ब्रांझचे शिल्प येथे साकारलेले आहे पुराणातिल उल्लेखानुसार स्वत: ब्रह्मदेवाने या ठिकाणी प्रचंड यज्ञ करुन सृष्टीच्या निर्मितीला प्रारंभ केला. थोडक्यांत ब्रह्मसरोवर हा या सृष्टीचा पाळणा आहे.
३)ज्योतिसर:- ज्योती सर याचा अर्थ आहे, ज्योती म्हणजे प्रकाश आणि सर म्हणजे गाभा म्हणजेच सूक्ष्म ज्ञान. ज्योतीसर हे गांव कुरुक्षेत्र पेहोवा रोडवर आहे. अर्जुनाच्या मनाला पडलेला मोह अथवा राज्याच्या प्राप्ती करिता आपल्याच सुह्रदांबरोबर युद्ध करावे की नाही याचा झालेला संभ्रम दूर करण्याकरिता भगवान श्रीकृष्णाने पवित्र गीता सांगितली आणि शेवटी आपले विश्वव्यापी स्वरुप दाखवले ती जागा येथे आहे. ज्या वडाच्या झाडाखाली हा दिव्य संवाद झाला ते वडाचे झाड आजही येथे आहे असा लोकांचा दृढ विश्वास आहे.
४)भिष्म कुंड:- जेव्हा पितामह भिष्मांच्यावर शिखंडीने शरवर्षाव केला तेव्हा त्यांनी त्याला प्रतिकार केला नाही आणि ते धारातिर्थी पडले.
त्यानंतर त्याच जागेवर त्यांच्याच सांगण्यावरुन अर्जुनाने त्यांना शरशय्या करुन दिली. त्यांना ईच्छा मरणाचा वर होता, त्यामुळे त्यांनी उत्तरायण सुरु होईपर्यंत मरण स्विकारले नव्हते. त्यांची तहान भागविण्याकरिता अर्जुनाने बाण मारुन जमिनीतुन पाणी काढले होते. त्या बाणगंगेचेच हे कुंड. त्याला भिष्म कुंड असे नांव पडले. ते कुंड आजही लोकांची तहान भागवते आहे.
५) संन्निहित सरोवर:- हे सरोवर म्हणजे सात (सरस्वती)आसरांचे भेट होण्याचे स्थान आहे असा समज आहे. ह्या सरोवरातिल पाणी अतिशय पवित्र आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. येथे अमावस्येच्या दिवशी स्नान केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. या ठिकाणी पिशाश्च बाधा दूर होते. या शिवाय मृत झालेल्या व्यक्तिंचे पिंडदानही येथे केले जाते. सरोवराच्या कडेला विष्णू, लक्ष्मी नारायण, हनुमान, दुर्गा देवी, धृव नारायण, धृव भगत यांची मंदिरे आहेत. हे सरोवर भगवान विष्णूंचे आश्रयस्थान आहे अशी लोकांची श्रद्धा आहे.
६)श्रीकृष्ण संग्रहालय:- कुरुक्षेत्र येथे पाह्यलाच पाहिजे अशा स्थळांपैकी श्रीकृष्ण म्युझियम हे स्थळ आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जिवनातिल महत्वाचे प्रसंग निरनिराळ्या माध्यमातुन येथे साकार केलेले आहेत. यामध्ये मूर्ती, चित्रे, पडदे, शिल्प, हस्तकला यासारख्या अनेक माध्यमांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. महाभारतात्तिल अनेक प्रसंग मल्टी मिडियाच्या सहाय्याने अकृत्रिमपणाने सादर केले आहेत. चक्रव्युहाचे दृष्यतर चक्रव्युहातुन फिरायला लाऊन दाखवले आहे.
कुरुक्षेत्र हे सरस्वती नदिच्या किना-यावरच होते. किंबहूना प्राचिन भारतिय संस्कृती ही सरस्वतीच्या किना-यावरच बहरली होती. नैसर्गिक बदलामुळे सरस्वती नदी लुप्त झाली. तिच्याबरोबरच महाभारत कालिन संस्कृति दाखविणारी सर्व शहरही जमिनीच्या पदराखाली लुप्त झाली.
भारतिय पुरातत्ववेत्यांनी अथक परिश्रम करुन उत्खनन केले आणि त्या संस्कृतीचे नमुने आपल्याला अवलोकनार्थ या संग्रहालयात ठेवले आहेत. त्या सुप्त सरस्वती नदीचा शोधही पद्मश्री डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर यांनी लावला आहे. या आणि अशा अनेक पुरातत्वीय संशोधना करीता त्यांना अनेक परदेशी पुरस्कारही मिळाले आहेत. या संग्रहालयात हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात अशा अनेक ठिकाणी सापडलेल्या वस्तु येथे अवलोकनार्थ ठेवलेल्या आहेत. आमचे दोन अडिच तास हे संग्रहालय पहाण्यात गेले.
७)भद्रकाली मंदिर:- भद्रकाली माता मंदिर हे कुरुक्षेत्र येथिल प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर सतिच्या एकावन्न पिठांपैकी एक मंदिर आहे. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडल्यानंतर सतीच्या शरिराचा उजव्या पावलाचा भाग या ठिकाणी पडला. हे मंदिर स्थानेश्वर मंदिराच्या जवळच आहे.
या स्थानाला सिद्धपिठ मानले जाते. मंदिराच्या समोर एक कुप आहे. त्या कुपामध्ये एक कमळाचे शिल्प आहे. मनोकामना पुर्ण झाल्यावर भक्त मातिच्या घोड्यांच्या मूर्ती या कुपावर ठेवतात. महायुद्धा पूर्वी भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाने या ठिकाणी देवीसमोर दुर्गा स्तोत्राचा पाठ केला होता.
८) स्थानेश्वर महादेव मंदिर:- स्थानेश्वर महादेव मंदिर हे कुरुक्षेत्र येथिल पुरातन मंदिर आहे. या मंदिराचा उल्लेख महाभारतामध्ये केलेला आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त येथे विधिपूर्वक अभिषेक करतात. सकाम अथवा निष्काम अशा कोणत्याही भावाने स्थानेश्वराचे दर्शन घेतले तरी भक्त आपल्या सर्व पापांमधुन मुक्त होतो. या मंदिरात आल्याशिवाय कुरुक्षेत्राची यात्रा पूर्ण होत नाही असे म्हणतात. महायुद्धापूर्वी अर्जुनाने स्थानेश्वराची विधिपूर्वक पूजा केली होती.
स्थानेश्वर दर्शनाला शिखांचे नववे गुरु तेगबहादूर आले होते असा उल्लेख सापडतो. या मंदिराच्या बाजुलाच त्यांच्या या भेटीच्या स्मृती प्रित्यर्थ नवी पातशाही गुरुद्वाराबांधलेला आहे.
या मंदिराच्या बाहेर एक सरोवर आहे. त्याच्या पाण्याने स्थानेश्वराची पूजा केल्याने सर्व रोगांपासुन मुक्ती मिळते असा भक्तांची विश्वास आहे. त्या सरोवरावर महिलांनाही स्नान करण्याची स्वतंत्र सोय केलेली आहे.
आमच्याकडे वेळ फार कमी होता त्यामुळे वरीलपैकी ब्रह्म सरोवर, श्रीकृष्ण संग्रहालय आणि भद्रकाली माता मंदिर या ठिकाणीच आम्ही गेलो. कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र असल्याने येथे अनेक तिर्थक्षेत्र आहेत ज्याची माहिती मला मिळाली नाही. हरियाणा सरकारने पर्यटकांना दृष्टीसमोर ठेवुन या तिर्थक्षेत्राचा चांगला विकास केला आहे.
आजच्या दिवसात पानिपत मधिलही काही स्थळांना भेट द्यायची होती म्हणून कुरुक्षेत्राची भेट आवरती घेतली. तरीही आम्हाला पानिपतला पोचायला पाच वाजुन गेले. पानिपत मध्ये युद्ध क्षेत्र बघणे हे आमच्या दृष्टीने महत्वाचे होते. पानिपत शहरात शिरल्यापासुन युद्ध क्षेत्राची चौकशी करायला सुरवात केली. ब-याचलोकांना ते माहितच नव्हते. कालाआम या नावाने चौकशी केली तरी कोणी नक्की मार्ग दाखवेना. शेवटी गुगल मॅपच्या मदतिने काला आम या पानिपत युद्ध स्मारक बागेपर्यंत पोचलो.
मी श्रीवर्धनचा म्हणजे पेशव्यांच्याच गावचा, पेशव्यांचा वाडा आमच्या घरा जवळच आहे. त्यातच ऐतिहासिक कादंब-या मध्ये पानिपत युद्धा विषयी खूप वाचले होते. त्यामुळे ज्या युद्धक्षेत्रावर मराठ्यांचा दारुण पराभव झाला. जेथे हजारोंच्या संख्येने मराठी लोकांचे रक्त सांडले त्या जागेचे दर्शन घेणे आणि प्रणाम करणे हा पानिपतला भेट देण्याचा माझा प्रमुख उद्देश होता. कदाचित माझे पूर्वजही त्या धारातिर्थी पडलेल्यांपैकी एक असतिल. कारण मी वाकणकर कुलाची माहिती मिळवली तेव्हा माझे असे लक्षांत आले की, जेथे जेथे पेशवे स्वारी करिता गेले तेथे तेथे वाकणकरांचे वंशज रहात आहेत.
या ठिकाणी हरियाणा पर्यटन विकास विभागाने काला आम युद्ध स्मारक बागछान तयार केली आहे. त्याबद्दल हरियाणा सरकारचे आभार मानायलाच हवेत. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी पानिपत या विषयावर कादंबरी लिहिली आहे. त्यांनी हल्लीच पानिपत येथे भेट दिली होती त्या वेळचा त्यांनी लिहिलेला अनुभव येथे देत आहे.
ते म्हणतात, ”वडिलांच्या अस्थिविसर्जनाच्या निमित्ताने मी हरिद्वारला गेलो होतो. तेव्हा शेजारच्याच पानिपत परिसरातून नव्याने हिंडून आलो. युद्धाच्या वेळची शुक्रताल, बडौत, नजिबाबाद, कुंजपुरा ही ठाणी आणि जुन्या खाणाखुणा अजूनही तशाच आहेत. पानिपत जिल्ह्यातील एका गावाचेच नाव भाऊपूर असे आहे. मराठ्यांचा दारुण पराभव होऊन काही हजार कुटुंबे पळापळीनंतर उत्तरेतच स्थायिक झाली. कर्तृत्ववान बनली. त्यापैकी काही जणांनी उत्तर प्रदेशासारख्या बलाढ्य राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली.
पानिपताच्या युद्धाच्या वेळी आपले बापजादे यमुनाकाठी घिसाडघाईने कपाळमोक्ष करून घेण्यासाठी आले नव्हते, तर इकडे राष्ट्राच्या उत्थानासाठी आले होते, याच नवजाणिवेने आता तिकडे स्थलांतरित मराठ्यांमध्ये नवजागृतीची लाट आली आहे. युद्धाच्या वेळी मराठी लष्कराने पानिपताच्या किल्ल्यात रोजच्या पूजेसाठी भवानीचे छोटेसे मंदिर बांधले होते. त्याचा गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला आहे. अगदी शेवटच्या क्षणी केवळ अल्लातालाच्या कृपेने अब्दालीला तेव्हा तो विजय मिळालेला होता, त्याचे निशाण उराशी कवटाळताना त्याला धाप लागली होती. खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. आज अडीचशे वर्षांच्या दीर्घ पल्ल्यानंतरही या परिसरातले जोगी जमातीचे शाहीर आम्ही केव्हाच वेड्या ठरवलेल्या भाऊसाहेब पेशव्यांचेच पोवाडे आजही गातात; अब्दालीचे नव्हेत! पराजयाचा कलंक लागूनही कळीकाळानेच जणू भाऊसाहेबांना अमरत्वाच्या सिंहासनावर आरूढ केले आहे. आज "रोड मराठा' या नावाने आपले बांधव त्या दूरदेशी लाखालाखांच्या संख्येने एकत्र येऊ लागले आहेत. हरियानात मेळावे भरवू लागले आहेत.
पानिपत येथिल काला आम या युद्धभूमीला काला आम नांव का पडले त्याला एक ऐतिहासिक कथा आहे. या युद्ध भूमिवर तिन युद्ध झाली होती. त्या ठिकाणी एक आंब्याचे झाड होते ते तोडले असता त्यातुन रक्त येत असे अशी आख्यायिका आहे. म्हणून या जागेला काला आमअसे म्हणतात.
या बागेच्या बाजुलाच एक गव्हाचे शेत होते. त्याचे फोटो काढुन झाले. या युद्धभूमीवरील स्मारक बाग बघुन होईपर्यंत संध्याकाळ झाली. त्यानंतर मग कुठेच जाणे झाले नाही. तेथुन सरळ मुक्कामाच्या हॉटेलला गेलो.
पानिपतमध्ये ज्या ठिकाणाला आवर्जुन जायला हवे होते अशा एका जागेचा इथे फक्त उल्लेख करतो. कारण तिथे जाणे तर झाले नाही. ते ठिकाण होते देवीचे मंदिर. या देवळाचा जिर्णोद्धार पेशव्यांनी केला होता. पानिपत येथिल हे देवी मंदिर तसे पुरातन आहे. अठराव्या शतकात हा भाग मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. श्रीमंत सदाशिवराव भाऊ एकदा अफगाण स्वारी करिता या गावातुन जात होते. तेव्हा ते येथे दोन महिने राहिले होते. त्यांनी देवीचे मोडकळीस आलेले मंदिर पाहिले आणि त्यांनी त्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्याचवेळी बाजुचे तळे देखिल दुरुस्त केले.
त्यानंतर पानिपत युद्धातुन वाचलेल्या एका मंगल रघुनाथ नावाच्या सैनिकाने त्या देवी मंदिरा जवळ एक शंकराचे मंदिर बांधले. त्या शिव मंदिराला आजही मंगल रघुनाथ शिव मंदिर असे म्हटले जाते.
हॉटेलमध्ये दाखल झाल्यावर सर्व सामान चेक करुन रुम मधे ठेवले. आता इतके दिवस सोबत असलेली बस सोडायची होती. गब्बु आणि शिवा(क्लिनर) १७ तारखे पासुन आज २९ तारखेपर्यंत सतत आमच्या बरोबर होते. त्यांना शक्य होती तेवढी जास्तित जास्त सेवा त्यांनी दिली होती. त्यामुळे त्यांना सगळ्यांनी मिळुन बक्षिसी दिली. त्यांचा आणि गाडीचा निरोप घेतला.
आज सहलीतिल मुक्कामाची शेवटची रात्र होती. सकाळी आठची ट्रेन होती. आज दिवसभर गरमा होत होता. त्यामुळे रुम ताब्यात घेतल्यावर स्वच्छ आंघोळ केली. त्यानंतर सगळेजण जेवणासाठी आणि उद्या परवा गाडीमध्ये नाश्ता आणि जेवण याकरिता लागणारे सामान खरेदी करिता बाहेर पडलो. एका नेपाळी माणसाच्या हॉटेलात जेवलो. सकाळी स्टेशनवर जाण्याकरीता वाहन काय मिळेल याची चौकशी केली. कारण आता आम्हाला आमच्या सामानाच्या वाहतुकीची व्यवस्था स्वत:च करायची होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा