शुक्रवार, २३ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ३


३) माता वैष्णोदेवी दर्शन

दिनांक १५ मार्चला संध्याकाळी वैष्णोदेवी रेल्वे स्टेशनवर सर्व सामानासह उतरल्यावर समोर सामानाचा मोठा ढिग दिसत होता. हे सर्व बोजे घेऊन मुक्कामाचे हॉटेल गाठायचे होते. रत्नागिरीला ज्याप्रमाणे रेल्वे प्लॅटफॉर्म खाली तळात आणि स्टेशनमधुन बाहेर पडण्याचा मार्ग जवळपास तिन मजले वर अशी येथेही स्थिती होती. त्यामुळे आधी जिने चढण्याऐवजी बॅगा चाकांवर ओढत नेता येतिल असा मार्ग शोधुन काढला. वर चढुन आल्यावर लक्षात आले की रेल्वे स्टेशन खूपच छान आणि तेथिल निसर्ग सौदर्याला पुरक होईल अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे. स्टेशनच्या आवारातच रेल्वेचे गेस्ट हाऊस आणि मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी अतिशय आवश्यक असणारी यात्रा पर्ची मिळण्यासाठी काऊंटर होता.
     सर्व सामानासह स्टेशनच्या बाहेर पडल्यावर आधी सर्व सामाना समोर ठेवुन फोटो सेशन झाले. तिथे असणाऱ्या एका प्रवाशाला विनंती करुन त्याला आमच्या सर्वांचा ग्रुप फोटो काढायला सांगितला. दरम्यान रेल्वेने कटरा गाठण्यापूर्वीच मुक्कामाच्या हॉटेलशी संपर्क करुन झाला होता आणि त्या हॉटेलच्या मॅनेजरने हॉटेल स्टेशन पासुन जवळच आहे असे सांगितले होते. मग एवढ्या सामानासह दहा माणसे घेऊन जाणारे वाहन शोधणे सुरु झाले. तिथल्या रिक्षा आणि गाडीवाल्यांनी आम्हाला अक्षरश: गराडाच घातला. सगळेचजण अव्वाच्या सव्वा भाडे सांगु लागले. शेवटी आमच्या मुंबईकरांनी बारगेनिंग करुन दोनशे रुपयाला एक वाहन ठरवले. त्या गाडीत सर्व सामानासह आम्ही स्वत:ला कोंबुन घेतले.
आम्ही बुक केलेले हॉटेल होते “नॅशनल गेस्ट हाऊस.” आमच्या गाडीवाल्याने आम्हाला नॅशनल गेस्ट हाऊसच्या गेटमधुन आत नेले. परंतु त्या एकाच गेटच्या आत दुसरे एक गेस्ट हाऊस देखिल होते, याची कल्पना आम्हाला नव्हती. याचा फायदा घेत गाडीवाल्याने बदमाशीचा नमुना दाखवत, आम्हाला दुसऱ्याच गेस्ट हाऊसच्या ऑफीसात नेले. शेवटी गडबड घोटाळा लक्षांत आल्यावर आम्ही  आधी बुक केलेल्या हॉटेलात पोचलो. पहिल्याच फटक्यात काश्मिर मधिल कमिशन एजंटाच्या कारागिरीचा नमुना बघायला मिळाला, सुदैवाने या व्यवहारात कोणतेही नुकसान झाले नाही. पण यामुळे पुढील सर्व  प्रवासात सर्वजण सावध झालेले होते.
दोन दिवसांच्या सलग प्रवासाने सगळेचजण थकले होते. सर्वजण प्रथम गरम गरम चहा कॉफी घेऊन आणि नंतर गरम पाण्याच्या सहाय्याने फ्रेश झाले. मी तर पूर्ण आंघोळच केली. सुमारे तासभर आराम करुन सर्वजण पोटपूजेच्या साठी बाहेर पडलो. हॉटेलच्या काऊंटरवर चौकशी केली असता असे समजले की, पहाटे लवकर जर दर्शनाला जायचे असेल तर आत्ता तावडतोब यात्रापर्ची घ्यावी लागेल. कारण यात्रा पर्चीचा काऊंटर रात्री दहा वाजता बंद झाला की सकाळी आठ वाजल्या शिवाय उघडत नाही. आता तर सव्वा नऊ वाजुन गेले होते.
आमच्या पैकी काही जणांना असे समजले होते की, यात्रा पर्ची बनवण्याकरीता ओळख पत्राची झेरॉक्स लागते. परंतु मी नेटवर वाचले होते की फक्त ओळख पत्र जवळ ठेवावे लागते. त्यामुळे आमच्यापैकी काही जणांकडे  झेरॉक्स होती तर काही जणांकडे नव्हती. हॉटेलच्या काऊंटरवर सांगितले की झेरॉक्स लागत नाही. शेवटी ज्यांच्याकडे झेरॉक्स होती ते झेरॉक्ससह आणि नव्हती ते तसेच यात्रा पर्ची काऊंटर पोचलो. तेथे फक्त फोटो काढला आणि नाव विचारले ओळखपत्र विचारले देखिल नाही. अक्षरश: पाच मिनिटात आम्ही तेथुन बाहेर पडलो.
यात्रा पर्चीवर सुचना होत्या त्यात १२ किलोमिटर चढण चढण्याचा उल्लेख होतो ते वाचुन आपण काही एवढी चढण चढु शकणार नाही हे मनांत आले. मग हेलिकॉप्टरची तिकीटे आयत्या वेळी मिळु शकतात काय याची चौकशी केली असता, हेलीकॉप्टरचा काऊंटर सकाळी आठ नंतर उघडेल असे समजले. दुसरा पर्याय होता बॅटरी वर चालणा-या छोट्या गाड्या. त्या बॅटरी कार पर्यंत जायला सुद्धा ३-४ किलोमिटर चढण चढायची होती. आमच्यापैकी काहीजण चालत जायचे ठरवत होते, तर काही जण बॅटरी कारने जायचे या मताचे होते. काहीही झाले तरी ३-४ किलोमिटर चालायला लागणार हे नक्की होते. तेव्हा पहाटे साडेतिन वाजता चालायला सुरवात करायची हे नक्की करुन आम्ही पोटपूजे करीता योग्य ठिकाण शोधु लागलो. माझा पुतण्या मंदार दोन वेळा इकडे येऊन गेलेला होता. त्याने सांगुन ठेवले होते की जर शुद्ध शाकाहारी जेवायचे असेल तर वैष्णो धाबा किंवा हॉटेलातच जा. त्याप्रमाणे समोरच एक वैष्णो हॉटेल दिसले त्यामध्ये जाऊन जेवण केले.
माणसाचा स्वभाव चौकस असला की त्याचा फायदा होतो याचा प्रत्यय या ठिकाणी आला. आमच्या पैकी  विकास दांपत्य पी सी ओ मध्ये फोन करायला गेले असता तिथे चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की, टुरिस्ट लोकांकरीता येथे १५ दिवसाकरीता प्री अँक्टीव्हेटेड प्रीपेड सिम कार्ड मिळतात. त्यांनी लगेचच २०० रुपये भरुन एक सिम खरेदी केले. त्या दोनशे रुपयात त्यांना ५० रुपये टॉक टाईमही मिळाला.
पहाटे तिन वाजताचा गजर लाऊन सगळेजण अकरा वाजता झोपले. पहाटे बरोबर ३.४५ वाजता तयार होऊन सर्वजण हॉटेलच्या खाली आलो. चहा कॉफी घेऊन रीक्षाने बाणगंगा गेटपर्यंत आलो. माता वैष्णोदेवीच्या नामाचा गजर करीत पदयात्रेला सुरवात केली. गेटवरती सिमा सुरक्षा दलाचा सुरक्षा तपासणी कक्ष होता. तेथे पुरुष व स्त्रिया यांच्या वेगळ्या रांगा होत्या. तिथे प्रत्येकाचे ओळखपत्र तपासले जात होते. त्याचप्रमाणे शारिरीक झडतीही घेतली जात होती.
आता प्रत्यक्ष वाटचालीला सुरुवात झाली होती. आमच्या ग्रुप मधले सर्वजण आता विखुरले गेले होते. प्रत्येकजण आपल्या स्वत:च्या गतीने चालत होता. रस्ता मात्र चांगला होता. आपल्याकडे कोकणात पाखाडी बांधलेली असते तसा रस्ता शेवटपर्यंत होता. त्याच रस्त्याने घोडेही जात होते. खेचरे पाठीवर सामानाची ओझी घेऊन चढण चढत होती. चालताना आमचा चौघांचा एक ग्रुप तयार झाला होता, त्यात मी, सौ वर्षा, केतकी आणि संध्या होतो. आम्ही दर १० मिनिटांनी विश्रांती घेत होतो. एवढ्या पहाटे देखिल रहदारी खूपच होती.
रस्ता मात्र प्लेन होता कुठेही खाच खळगे नव्हते. आणि मुख्य म्हणजे घोड्यांच्या शेणाने अगदी सारवलेल्या सारखा दिसत होता. मजल दरमजल करीत अखेर आम्ही सात वाजता बॅटरी कारच्या स्टॉप पर्यंत आलो. आमच्या व्यतिरीक्त आमच्या ग्रुपमधिल कोणीही तिथे दिसत नव्हते. चौकशी केली असता असे समजले की, बॅटरी कार नऊ वाजल्या शिवाय चालु होणार नाही. आतापर्यंत चार किलोमिटर चालुन झाले होते. अजुन आठ किलोमिटरचा मोठा टप्पा बाकी होता.
दोन तास तिथे बसुन वाट बघत बसायचे की, पुढे चालायला सुरवात करायची याचा विचार चालु होता. दरम्यान घोडेवाले पाठिशी लागलेलेच होते. परंतु मला आणि वर्षाला घोडेस्वारीचा अजिबात अनुभव नव्हता. शेवटी वाट बघत बसण्यापेक्षा आणि आठ किलोमिटर चालण्यापेक्षा घोडेस्वारीचा अनुभव घ्यायचा असा निर्णय घेतला. मग सुरु झाले घोडेवाल्यांशी बारगेनिंग, आमच्या मुंबईवाल्या बारगेनिंग एक्सपर्ट होत्याच. शेवटी ३५० रुपयांमध्ये तोड होऊन घोडेस्वारी सुरु झाली.
खरोखरच घोडेस्वारी हा एक वेगळाच अनुभव होता. पहिल्यांदा भिती वाटली, पण नंतर मात्र त्यातही एक थ्रिल आहे असे जाणवायला लागले. वाटेत निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष दिसत होते. जास्त “चिड” या जातिचे वृक्ष होते. साधारण तिन चार किलोमिटर गेल्यावर घोड्यांना चारा पाणी दिले गेले. आम्ही आणि घोडेवाल्यांनीही चहापाणी घेतले. या परिक्रमा रस्त्याच्या जास्तित जास्त भागावर शेड केलेल्या दिसत होत्या. आणि जिथे नव्हत्या तेथे शेड बनविण्यचे काम चालु होते. वाटेत परत एकदा सिमा सुरक्षा दलाचे सुरक्षा तपासणी केंद्र लागले. तेथे घोडेवाल्यांची सुद्धा तपासणी केली गेली.
अखेर साडे नऊच्या दरम्यान आम्ही मातेच्या मंदिर परिसरात पोचलो.  घोडेवाल्याने दाखविलेल्या एका प्रसाद भांडारात आमचे सामान जमा केले. प्रसादाची खरेदी केली आणि काही क्षणातच आम्हाला आमच्या बाकी ग्रुप मेंबरची पण भेट झाली. मग सगळेजण दर्शनाच्या रांगेत उभे राहीलो. रांग खूप मोठी होती, तरी त्या रांगेला गती होती. देवीच्या गुंफेत पोहोचे पर्यंत अजुन दोन ठिकाणी सुरक्षा तपासणी झाली. दर्शन रांगेत असताना अचानक एक हनुमानाचा वंशज पुढे आला आणि त्याने वर्षाच्या हातामधिल प्रसादाची पुडी आपल्या ताब्यात घेतली. आम्ही नेलेला प्रसाद मातेने हनुमंताच्या मार्फत स्विकारला.
मातेच्या बोलावण्यानुसार आम्ही उभयतांनी गुंफेमधिल मातेच्या महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी स्वरुपातिल सगुण रुपाचे मस्तक टेकवुन दर्शन घेतले. दरम्यान रांगेत दाखल झाल्यापासुन कधी मनातल्या मनांत तर शक्य असेल तेथे मोठ्या आवाजात “ॐ ऐं –हीं क्लीं चामुंडाय विच्ये” या मंत्राचा जप चालुच होता. प्रत्यक्ष दर्शन घेताना डोळे बंद करुन देवीच्या तिनही रुपाचे पुढे दिलेले ध्यान मंत्र म्हटले.
“खड्गं चक्र गदेषु चाप परिघान् छूलं भुशुंडीं शिरः।
शंखं संदधतीं करैस्ञिनयनां सर्वांग भूषावृतिम्।।
नीलाश्म द्युतिमास्य पाददशकां सेवे “महाकालिकाम्”।
याम्स्तौत् स्वपिते हरौ कमलजो हंतुं मधुं कैटभम्।।१।।
अक्षस्रक् परशू गदेषु कुलिशं पद्मं धनुः कुंडिकां।
दण्डं शक्तिमसिं च चर्म जलजं घंटां सुराभाजनम्।।
शूलं पाश सुदर्शनेच दधतीं हस्तैः प्रवालप्रभाम्।
सेवे सैरिभ मर्दिनी मिह “महालक्ष्मीं” सरोजस्थितिम्।।२।।
घंटाशूल हलानि शंख मुसले चक्रं धनुः सायकम्।
हस्ताब्जैर्दधतीं धनांत विलसच्छीतांशु तुल्यप्रभाम्।
गौरीदेह समुद्भवां त्रिजगतां आधारभूतां महा
पूर्वामत्र “सरस्वती” मनुभजे शुंभादि दैत्यार्दिनीम्।।३।।“ 
अशा त-हेने मी नाही नाही म्हणत असताना माता वैष्णोदेवीने मला तिच्या चरणाजवळ आणले आणि आपले दर्शन दिले. दरम्यान मी मातेच्या या तिर्थक्षेत्राची शक्य तेवढी माहिती मिळवली ती अशी.
भारतामधिल जम्मु काश्मिर राज्यातिल वैष्णोदेवी डोंगरावरील वैष्णोदेवीचे मंदिर हे हिंदूंचे अतिशय पवित्र मंदिर आहे. हे मंदिर शक्तीच्या उपासकांचे अतिशय आवडते स्थान आहे. या देवीला माताराणी,  वैष्णवी या नावाने देखिल ओळखले जाते. हे देऊळ कटरा या शहरापासुन बारा किलोमिटर अंतरावर आहे. या मंदिराची समुद्रसपाटीपासुनची उंची २५०० फुट आहे. भारतातिल तिरुपती मंदिरा खालोखाल या मंदिरात मोठ्या संख्येने भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. या मंदिराची देखरेख आणि भक्तांची व्यवस्था “माता वैष्णोदेवी तिर्थक्षेत्र ट्रस्ट” द्वारे केली जाते.
माता वैष्णोदेवी सर्व भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते. मातेचे निमंत्रण आल्यावर तिचा भक्त कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्या दरबारात हजर होऊन तिचे दर्शन घेतोच. माता वैष्णोदेवी हे हिंदूंच्या प्रमुख देवस्थानांपैकी एक असल्यामुळे तिचे दर्शन घेण्याकरीता खूप लांबुन भक्त तिच्या दर्शनाकरीता येत असतात.
हिंदू महाकाव्यातिल संदर्भानुसार माता वैष्णोदेवीचा जन्म दक्षिण भारतातिल रत्नाकर सागर यांच्या घरी झाला. तिचे माता पिता अनेक वर्षे अपत्यहिन होते. या दैवी बालिकेने (माता वैष्णोदेवीने) जन्माला येण्याअगोदर रत्नाकर कडुन वचन घेतले होते की ते तिच्या इच्छेच्या आड कधिच येणार नाहीत. वैष्णोदेवीला बालपणी “त्रिकुटा” या नावाने ओळखले जात होते. काही काळाने तिला तिने भगवान विष्णूंच्या कुळात जन्म घेतला म्हणून वैष्णवी म्हणून संबोधले जात असे.
नऊ वर्षाची झाल्यावर त्रिकुटाने आपल्या वडिलांजवळ समुद्र किनारी तपश्चर्या करण्याची अनुमती मागितली. या तपश्चर्येमध्ये तिने भगवान विष्णूंचे अवतार “श्रीरामांची” उपासना केली. सीतेचा शोध घेत असताना प्रभु श्रीरामांची त्यांच्याच ध्यानात मग्न असणा-या त्रिकुटेची भेट झाली. तेव्हा तिने प्रभुंना तिने त्यांची पति म्हणून स्विकार केल्याचे सांगितले. त्यावेळी प्रभुंनी तिला या जन्मी एकपत्नीव्रती असल्याने तिच्याशी विवाह शक्य नसल्याचे सांगितले. मात्र कलियुगात ते जेव्हा कल्कीच्या रुपात अवतार घेतिल तेव्हा तिच्याशी विवाह करीन असे आश्वासन दिले.
दरम्यान प्रभु श्रीरामांनी त्रिकुटाला उत्तरभारतातिल माणिक पहाडीमधिल त्रिकुटा डोंगर रांगांमधिल गुंफेमध्ये ध्यानस्थ अवस्थेत रहायला सांगितले. रावणा विरुद्धच्या युद्धात प्रभु श्रीरामांना यश प्राप्त व्हावे म्हणून मातेने त्रिकुटापर्वतावर नवरात्र साजरे केले होते. म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये येथे रामायणाचे पारायण करण्याची परंपरा आहे. प्रभु श्रीरामांनी त्रिकुटाला वचन दिले होते की समस्त विश्वामध्ये ती वैष्णोदेवी या नावाने ओळखली जाईल.
माता वैष्णोदेवी संबंधात अनेक कथा प्रचलीत आहेत. त्यातिल एक कथा श्रीधरची आहे. श्रीधरचे आई वडील माता वैष्णोदेवीची परमभक्त होते. ते सध्याच्या कटरा गावापासून २ किलोमिटर अंतरावरील हंसली गावात रहात होते. एकदा मातेने त्यांना एका तरुण मुलीच्या स्वरुपात दर्शन दिले आणि त्यांना भंडा-याचे आयोजन करायला सांगितले. मातेच्या आदेशानुसार त्यांनी जवळपासच्या सर्व लोकांना बोलावणे केले, त्यातच तेथिल स्वार्थी व राक्षसीवृत्तीच्या भैरवनाथालाही आमंत्रण केले. तेव्हा भैरवनाथाने त्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना दिली आणि जर तो सर्व लोकांना प्रसाद पुरवु शकला नाही तर त्याचे काय परिणाम होतील याची जाणिव करुन दिली. परंतु मातेने त्यांचा भंडारा यथासांग संपन्न केला.
श्रीधर हा देखिल वैष्णोदेवी मातेचा परम भक्त होता. त्याच्या परम भक्तीने प्रसन्न होऊन मातेने त्याची लाज राखली आणि आपल्या अस्तित्वाचे प्रमाण दाखवले. एकदा श्रीधरने गावातील लोकांकरीता देवीचा महाप्रसाद म्हणून भंडा-याचे आयोजन केले होते. त्या भंडा-याला त्याने सर्व गावक-यांना आणि साधु संतांना आमंत्रण केले होते. दरीद्री श्रीधर सर्व गावाला भंडा-याला बोलावतोय यावर सुरवातिला गावक-यांचा विश्वासच बसला नाही. या भंडा-याला श्रीधरने भैरनाथ आणि त्याचे सर्व शिष्य यांनाही बोलावले होते. भैरवनाथाने जेव्हा प्रसाद म्हणून खिर पुरी ऐवजी मद्य आणि मांस पाहिजे असे सांगितले तेव्हा श्रीधरने  ते शक्य नाही असे सांगितले.
आपल्या परमभक्ताची लाज राखण्याकरीता स्वत: माता वैष्णोदेवी कुमारिकेचे रुप घेऊन भंडा-या मध्ये हजर होती. प्रसादाच्या बाबतित हट्ट करणा-या भैरवनाथाला समजावण्याचे तिने खूप प्रयत्न केले. परंतु तिचे त्याने काही ऐकले नाही उलट तिला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मातेने त्याला गुंगारा देऊन ती त्रिकुट पर्वतावरील गुंफेमध्ये नऊ महिने तपस्या करायला बसली. तप करायला जाताना तिने हनुमानाला बोलावले आणि त्याला भैरवनाथाला तिचे तप पूर्ण होईपर्यंत गुंगवुन ठेवायला सांगितले. त्याप्रमाणे हनुमंतांनी नऊ महिने मातेचे रक्षण केले आणि भैरवनाथाला तिथेच गुंतवुन ठेवले. त्याच गुंफेला सध्या अर्धक्वाँरी या नावाने ओळखले जाते. अर्धक्वाँरीच्या जवळच मातेच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी भैरवनाथाला चकवताना मातेने मागे वळुन पाहिले होते. त्यावेळी हनुमंत माते सोबतच होते, तेव्हा हनुमंताना तहान लागली होती म्हणून मातेने एक बाण मारुन जमिनीतुन पाण्याचा झरा उत्पन्न केला होता. त्या पाण्यामध्ये मातेने आपले केस धुतले होते. ती पवित्र जागा आज बाणगंगा म्हणून ओळखली जाते.
बाणगंगेच्या पवित्र जलामध्ये स्नान केल्याने भक्तांच्या सर्व व्याधी दूर होतात. त्रिकुट पर्वतावर मातेने भैरवनाथाचा संहार केला. त्यानंतर त्याने क्षमा याचना केल्यावर त्याला आपल्यापेक्षा उंच जागेवर स्थान दिले. त्याला असाही वर दिला की, माझे दर्शन घेतल्यानंतर तुझे दर्शन घेतल्याशिवाय माझ्या भक्ताची यात्रा पूर्ण होणार नाही.
ज्या जागेवर माता वैष्णोदेवीने हट्टी भैरवनाथाचा वध केला ती जागा 'भवन' म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी उजव्या बाजुला काली माता, डाव्या बाजुला सरस्वती आणि मध्ये माता लक्ष्मी स्वंयंभू पिंडीच्या स्वरुपात आहे. या तिन देवींच्या एकत्रित स्वरुपाला माता वैष्णोदेवी या नावांने ओळखले जाते. माता वैष्णोदेवीच्या एका कटाक्षाने भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात.
भैरवनाथाचा वध केल्यानंतर त्याचे शिर भवन पासुन तिन किलोमिटर दूर जाऊन पडले त्या ठिकाणाला सध्या भैरवनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते.
माता वैष्णोदेवीच्या यात्रेची सुरवात कटरा येथुन होते. बहुतांश यात्रेकरु कटरा येथे विश्रांती घेऊन नंतर आपल्या यात्रेची सुरवात करतात. कटरा येथे मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी आवश्यक असणारी यात्रा पर्ची मिळते. यात्रापर्ची घेतल्या नंतरच यात्रेकरु वैष्णोदेवीच्या चढाईला सुरवात करु शकतात. यात्रा पर्ची जारी केल्यापासुन सहा तासाच्या आत आपणाला बाणगंगा चेक पॉईंटला दाखल व्हायला लागते अन्यथा ती आपोआप रद्द होते. या पॉईंटला आपले सामानही चेक केले जाते. मातेच्या दर्शनाला जाणा-या यात्रेकरुंची रहदारी रात्रभर चालू असते.
मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी घोड्यांची सोय आहे. त्याचप्रमाणे वृद्ध, आजारी भक्तांसाठी पालखीचीही सोय आहे. कटरा येथुन मंदिरात जाण्यासाठी हेलिकॉप्टरचीही सोय आहे. हेलिकॉप्टरने गेल्यावर तिन किलोमिटर चालत जावे लागते.  हल्ली अर्धक्वारी पासुन बॅटरी कारचीही सोय झाली आहे. ज्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी पाय-या चढुन जाऊ नये, त्याऐवजी पाखाडीसारख्या असणा-या रस्त्याने जावे.
वैष्णोदेवीला दर्शनासाठी वर्षभर भक्तांची गर्दी असते. परंतु वैष्णोदेवीला भेट देण्याची योग्य वेळ ही उन्हाळ्यात आहे. थंडीमध्ये येथिल तापमान -३ ते -४ इतके होते. या मोसमात दरडी कोसळण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या काळात इकडे येण्याचे टाळावे.
मातेचे दर्शन घेऊन झाल्यावर परत सर्वजण एकत्र जमलो. सगळ्यांनी नाश्ता केला. आज नाश्त्याला छोले भटोरे आणि इकडच्या पद्धतीची कांदा भजी(प्याज पकोडे) घेतली होती. चहा पाणी घेऊन झाल्यावर चार किलोमिटर अंतरावर असलेल्या भैरोनाथ मंदिरात जाऊन त्यानंतर खाली कत्रा येथे जायचे होते. एकुण जवळपास १६ किलोमिटरचा तिव्र उताराचा रस्ता होता. त्यामुळे एवढे अंतर चालत जाणे शक्यच नव्हते. अखेर सर्वानुमते परत घोड्यावरुन जायचे असे ठरले. परत बारगेनिंग करुन प्रत्येकी ८०० रुपये ठरवले.
येतानाचा घोड्यावरुनचा प्रवास मात्र त्रासदायक वाटला. कधी एकदा तो संपतोय असे झाले होते. हॉटेलवर आल्यावर आंघोळ केली आणि बाकिच्यांच्या बरोबर जेवायलाही न जाता आराम करणे पसंत केले. आमचे बाकीचे मेंबर काही खरेदी वगैरे करायला गेले होते.  अशा त-हेने सहलीचा पहिला टप्पा पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा