गुरु दक्षिणा
भाग ३
आज २१ वर्षांनी परत एकदा सर्व
वर्गमित्र आपल्या त्याच वर्गात आले होते. वर्गामध्ये काळानुरुप बदल झाला होता.
परंतु खिडक्या, दरवाजे आणि ब्लॅक बोर्डची जागा तिच होती. वर्गशिक्षकांची टेबल
खुर्चीची जागाही तिच होती. फक्त बदलले होते ते आज वर्गात आलेले विद्यार्थी. ते देखिल
शरिराने बदलले होते परंतु मनाने मात्र ते आज २१ वर्षापूर्वीच्या काळात गेले होते.
आजच्या दिवसापुरता तिथे एकच बदल झालेला होता. तो म्हणजे वर्ग पताकांनी सजवलेला
होता. वर्गाच्या दाराला फुलांचे तोरण बांधलेले होते. वर्गाच्या बाहेरील पॅसेजमध्ये
१९९५ च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणारी रांगोळी काढलेली होती. वर्गाच्या फलकावर
देखिल १९९५ च्या जुन्या सर्व वर्गसदस्यांचे वर्गातर्फे स्वागत करत असल्याचा मजकुर
लिहिलेला होता.
प्रत्येकाने आपापली त्यावेळची जागा
पटकावली होती. सर्वांच्या आपापल्या बाकावरच्या जोडीदारा बरोबर गप्पा सुरु झाल्या
होत्या. तेवढ्यांत कोणितरी हळुच बोलले अरे, सर आले! सर आले!! त्या कुजबुजणा-या आवाजाने खरोखरच परत
२१ वर्षांनी सर्वजण एकदम गप्प झाले. आणि वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स झाली. इतके
सर्वजण मनाने त्या काळात गेले होते. अर्थात खरोखरच त्यांच्या त्यावेळच्या सरांनी
श्री विश्वास जोशी सरांनी वर्गात नाट्यमय रीतीने प्रवेश केला. आणि परंपरे प्रमाणे
सर्व विद्यार्थी उठुन उभे राहीले.
विश्वास जोशीसर अजुनही त्या
हायस्कूलमध्ये कार्यरत होते. अजुन दोन वर्षांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. जोशी
सर आपल्या नेहमीच्या जागेवर स्थानापन्न झाल्यावर त्यांनी प्रत्येकाची आस्थेने
चौकशी केली. प्रत्येकाच्या कौटुंबिक स्थितीविषयी जाणून घेतले. गेल्या २१ वर्षांत
हायस्कूलमध्ये कोणकोणते आणि कसे बदल झाले त्याची माहीती सर्वांना दिली.
त्यानंतर मधल्या सुटीची बेल झाली.
सर्वांना शाळेच्या माध्यान्ह भोजन गृहांत जमा होण्याच्या सूचना देण्यांत आल्या.
शाळेचे माध्यान्ह भोजनगृह ही संकल्पनाच सर्वांना नविन होती. परंतु परशुराम
हायस्कूलची ती एक खासियत होती. भोजनगृहात स्वतंत्र पाकगृह आणि कोठीघर
देखिल बांधलेले होते. भोजनगृहामध्ये अन्नाची भांडी ठेवण्यासाठी ओटे बांधले होते.
भोजनास बसण्यासाठी रांगा आखलेल्या होत्या.
आज माजी विद्यार्थी संमेलना निमित्ताने
भोजनगृहात थोडा बदल केला होता. भोजन गृहामध्ये कॅटरर् मार्फत जेवण मागवले होते.
त्याने आणलेली पदार्थांची भांडी ओट्यांवर मांडली होती. त्याने आपला स्वरुची
भोजनाचा संच तेथे लावला होता. हॉलमध्ये दहा टेबल खुर्च्यांचे सेट मांडले होते.
सर्वजण आपापल्या रुचीप्रमाणे जेवण वाढुन घेत होते आणि फिरत फिरत जेवण करत होते.
जेवता जेवता चर्चा करत होते. निरनिराळ्या विषयावर काही ठोस निर्णय घेण्याचा
प्रयत्न करत होते.
सहभोजनानंतर परत सर्वजण
साने गुरुजी सभागृहात एकत्र जमले. परत एकदा मानसीने कार्यक्रमाचे सूत्र आपल्या
हातात घेतले. परत एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करुन तिने आता आपल्या सहाध्यायांना
आपल्या आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या भावना थोडक्यांत व्यक्त कराव्यात असे सूचविले.
तिच्या सूचने नुसार त्यांचा वर्गबंधु श्री इस्माईल खेडेकर संमेलना बाबतच्या आपल्या
भावना व्यक्त करण्याकरीता स्टेजवर दाखल झाले. त्यांच्या बॅचमधले ते एक स्कॉलर
होते. त्यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांना संस्कृत मधले प्रतिष्टेचे जगन्नाथ शंकरशेट
पारितोषक मिळाले होते. सध्या ते दुबई येथे आपला स्वत;चा व्यवसाय सांभाळत होते. आजच्या संमेलनाकरीता ते
खास दुबईवरुन आले होते.
त्यांनी
आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, आज २१ वर्षांनी परत एकदा शाळेतील ते दिवस
आठवताना खूप छान वाटत होते. खरोखरच आज मी परत एकदा १०वीतला विद्यार्थी झालो होतो.
माझे असे मत आहे की, असा कार्यक्रम दरवर्षी करावा. मघाशी बोलता बोलता घनश्यामने जे
सुचवले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. एवढेच नाहीतर शाळेची कृतज्ञता व्यक्त
करण्यासाठी काय करता येईल या संबधी आम्ही मित्रांनी सखोल चर्चा केली आहे. त्याचा
तपशिल अतुल देईल. माध्यान्ह
भोजनगृहात आपण जेवत असताना
समोर भिंतीवर लिहिलेले
“आपण
येथेष्ट जेवणें| उरलें तें अन्न वाटणें |परंतु वाया दवडणें| हा धर्म नव्हे ।। तैसें ज्ञानें तृप्त व्हावें| तेंचि ज्ञान जनास सांगावें | तरतेन बुडों नेदावें| बुडतयासी ||” हे समर्थ
रामदास स्वामींचे वचन वाचले. आता मला येथे त्या वचनाचा उल्लेख करावासा वाटतो.
माझ्या मते आपण सर्वांनी आता पुरेसे कमावले आहे. आपल्या दैनंदिन गरजा, प्रापंचिक
जबाबदा-या सांभाळुन आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढा भाग आपण आपल्या या आपल्या
ज्ञानदात्री माऊलीला कृतज्ञता म्हणून अर्पण करुयात. आणि असेच परत परत भेटत राहुया.
इस्माईल
खेडेकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नंतर अनेकांनी आपल्या आजच्या संमेलना
बाबतच्या भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये प्रत्येकाचा सर्वसाधारण सूर तसाच होता.
प्रत्येकालाच आपण आपल्या या विद्यामंदीराकरीता काहीतरी करुया असे वाटत होते. आता
कोणी भावना व्यक्त करायला पुढे येत नाही असे पाहिल्यावर अतुल स्टेजवर दाखल झाला.
आणि त्याने सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बोलायला सुरवात केली.
माझ्या
आदरणिय गुरुजनांना, माझ्या ज्ञानमाऊली विद्यामंदिराला आदरपूर्वक वंदन करुन आता मी
आम्हा माजी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्हा सर्वांचे विचार मी येथे
मांडणार आहे. आम्ही सर्वजण आज खूप आनंदात आहोत. आम्हाला परत आमचे पूर्वीचे दिवस आज
अनुभवायला मिळाले. शाळेच्या सर्व स्टाफने आम्हाला खूपच सहकार्य केलेले आहे. आमच्या
विनंतीला मान देऊन प्रकृती साथ देत नसताही आमच्या प्रेमापोटी श्री पेंडसेसर व सौ पेंडसे मॅडम आवर्जुन उपस्थित राहीले. त्याचप्रमाणे आपले
सर्वांचे लाडके श्रीपती
पवारकाका देखिल खास या कार्यक्रमाकरीता हौसेने पठाणकोट येथुन येथे आले त्याबद्दल
त्यांचे आभार मानणे हा कृतघ्नपणा होईल. त्यांचे हे प्रेम आमच्यावर असेच कायम राहो
हीच त्या परशुरामाकडे प्रार्थना.
घनश्याम हा आपला वर्गबंधू पण तो येथेच रहात
असल्याने आपण या संमेलनाची सगळीचे कामे आपण त्याच्या गळ्यांत टाकली त्यानेही
कोणतिही कुरकुर न करता ती आनंदाने पार पाडली. मी हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम
करीत नाही. परंतु ओघानेच हे उल्लेख आले.
मगाशी जेवताना आमची अनेक गोष्टींबाबत
तपशिलवार चर्चा झाली. त्यात आपले वर्गबंधूतर होतेच. त्याचबरोबर आपल्या हायस्कूलचे
सध्याचे मुख्याध्यापक श्री आनंद लिमयेसर आणि हायस्कूलच्या संचालक मंडळाचे सदस्य
देखिल होते. आपल्या या विद्यामंदिराच्या प्रगति आणि उन्नती साठी आपल्याला काय करता
येईल या बाबत आमचे बोलणे झाले. आपल्या हायस्कूलला प्रामुख्याने
इमारतीच्या विस्तारीकरणाची आणि आधुनिकीकरणाची गरज आहे. त्याचबरोबर डिजीटल युगाशी
जुळवुन घेण्यासाठी तातडीने काही संगणक संच अथवा लॅपटॉपची गरज आहे. त्याचप्रमाणे
आधुनिक दळणवळणाची जोड येथे उपलब्ध करुन घेण्याची गरज आहे. या सर्व बाबींसाठी
मोठ्या निधीची गरज आहे.
या सर्व बाबींचा साकल्याने विचार करुन आम्ही
असे ठरविले आहे की एक “परशुराम हायस्कूल माजी विद्यार्थी कृतज्ञता निधी” असा एक ट्रस्ट स्थापन करायचा आणि त्या
ट्रस्टच्या माध्यमातुन ही सर्व विकास कामे करायची. या ट्रस्टचे अध्यक्ष आपले
घनश्यामदादा असतिल, आपल्या हायस्कूलचे मुख्याद्यापक या ट्रस्टचे सेक्रेटरी असतिल.
तसेच इस्माईल खेडेकर, मी, उज्वला,
मानसी आणि अजय या ट्रस्टचे सदस्य असतिल. हा ट्रस्ट रजिस्टर करुन घेण्याची जबाबदारी
घनश्यामने स्विकारली आहे. त्या ट्रस्टला दिलेली रक्कम आयकर मुक्त रहाण्यासाठी
आवश्यक असणारी कार्यवाही करण्याची जबाबदारी मी घेत आहे. तेव्हा मी माझ्या सर्व सहाध्यायींना विनंती करतो
की आपण स्वत: तर आपले योगदान द्याच, परंतु आपल्या
मित्रपरिवारामध्ये जे कोणी या पवित्र कार्याला मदत करु शकतिल त्यांनाही आवाहन करुन
आपला हा कृतज्ञता निधी जास्तित जास्त कसा वाढेल हे बघावे.
आताच
माझ्या हातात इस्माईल खेडेकर यांनी पांच लाखाचा, अजय, मानसी, घनश्याम आणि मी
प्रत्येकी तिन लाखांचे चेक असे एकुण सतरा लाखांचे चेक आलेले आहेत. त्याच प्रमाणे
माझ्या एका क्लायंट कंपनीने आपल्या हायस्कूलला १५ लॅपटॉप देण्याचे मान्य केले आहे.
या सर्व घोषणा ऐकताच संपूर्ण सभागृह
टाळ्यांनी दणाणुन गेले.
आता आपल्या हायस्कूलचे मुख्याद्यापक श्री आनंद
लिमयेसर आपले विचार व्यक्त करतिल. त्यानंतर आपले सहाध्यायी रमेश गांगल आभार व्यक्त
करतिल, नंतर राष्ट्रगीत होईल आणि आपला आजचा कार्यक्रम संपन्न होईल. परत कधी एकत्र
जमायचे ते आपल्या सर्वांना आपल्या व्हॉटस् अँप ग्रुपवरुन कळविण्यांत येईल. कारण
आपला हा ग्रुप चालुच रहाणार आहे. तेव्हा आता मी श्री लिमये सरांना विनंती करते की,
त्यांनी आपले मार्गदर्शन आम्हाला करावे. असे म्हणून मानसीने माईक श्री लिमये
सरांकडे दिला.
माननिय श्री पेंडसेसर आणि मॅडम, त्याचप्रमाणे
मंचावर बसलेल्या माझ्या आजी आणि माजी सहकरी, हायस्कूलचे संचालक मंडळातिल सर्व
सदस्य आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना अभिवादन करुन मी आपण सर्वजण येथे उपस्थित
राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. आपण सर्वजणच या विद्यामंदिराचे भक्त आहोत. या
विद्यामंदिराचा जिर्णोद्धार व्हावा म्हणून आपण जो प्रयत्न करता आहात त्या बद्दल मी या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून
आपले आभार व्यक्त करत आहे. आपले या संस्थेवरचे प्रेम असेच वाढत राहो. आपले या
विद्यामंदिरासोबतचे ऋणानुबंध असेत वृद्धींगत होवोत हीच त्या सरस्वती चरणी
प्रार्थना. आपण सर्वांनी असेच वारंवार येथे येऊन आपल्या संस्थेची प्रगती पहात
रहावी अशी मी आपणाला विनंती करुन मी आपली रजा घेतो. शेवटी एवढेच सांगतो “पुनरा गमनायच”
लिमयेसरांच्या भाषणानंतर श्री रमेश गांगल यांनी
सर्वांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपन्न झाल्याचे
जाहिर करण्यात आले.
जर ही कथा पुढे पाठवायची असेल तर
नावासह पाठवावी.
संपूर्ण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा