शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

दुर्गा कवच भाग १

दुर्गा कवच

भाग १
तप्तस्वर्णो ज्वलांगी धृतमहिषशिखां धारयंतीं त्रिशुलम्।
खङंगचर्मो S पि दोर्भि: प्रबलरिपुगणां त्रासयंतीं कटाक्षै:।।
सिंहस्कंधादिरुढां त्रिनयन लसितां सेवितां सिद्धसंङगै:।
आर्यादुर्गाभजेहं भजनपरजन: नंददात्रीं प्रसन्नाम्।।
      अनिकेतने आर्यादुर्गेच्या समोर डोळे मिटुन नतमस्तक होऊन मनातल्या मनांत ध्यान मंत्र म्हणू लागला. अनिकेतच्या बाजुला त्याची पत्नी आर्या देखिल अतिशय भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक झाली होती.
नुकतेच त्यांचे देवी हंसोळ येथे आगमन झाले होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रथम देवीच्या मंदिरात जाउन देवीचे दर्शन घेण्यासाठी आता ते आले होते. त्यांच्याबरोबर अनिकेतचे आई-बाबा आणि आर्याचे आईबाबा देखिल आले होते. मंदिरामध्ये आता अजिबात गर्दी नव्हती. देवीचे पुजारी तिन्हीसांजा झाल्याने दिवाबत्ती करत होते. ही पांचजणे आणि पुजारी यांच्या व्यतिरिक्त मंदिरात आता कोणीही नव्हते. त्यांचा ड्रायव्हर दिनेश त्त्यांनी आणलेली स्कार्पिओ समोरच असलेल्या भक्तनिवास मध्ये लावित होता. कारण आज ते तेथेच मुक्काम करणार होते.
      अनिकेतने पुजारी काकांना विचारले काका! आपले उपाध्ये गुरुजी आज आले नाहित कां?
      त्यावर पुजारी म्हणाले, नाही ते आले होते पण थोड्यावेळापूर्वीच घरी गेलेत! सकाळी येतिल! काही काम होते कां?
      त्यावर अनिकेतने सांगितले, हो मला उद्या अभिषेक करावयाचा आहे!
      त्यानंतर सर्वजण मंदिरासमोर असलेल्या भक्त निवासमध्ये गेले. तेथिल व्यवस्थापक श्री जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. आज आषाढ महिन्याची चतुर्दशी होती. उद्याच अमावस्या असल्याने पावसाचा जोर भरपुर होता. आजुबाजुचे डोंगर देखिल दिसेनासे झाले होते. पावसाने पाण्याची जणू चादरच धरली होती. पडणा-या पाण्याचा आवाज इतका मोठ्ठा आवाज येत होता, की आपसातले बोलणे देखिल ऐकु येत नव्हते. व्यवस्थापक जोशी यांनी किचनमधुन गरमागरम वाफाळलेला चहा आणला. त्या चहाकडे पाहून सर्व मंडळी खूष झाली.
            सर्वप्रथम मी आपली सर्वांशी ओळख करुन देतो, अनिकेतचे बाबा श्री अशोक फणसळकर श्री जोशी यांना म्हणाले. मी, अशोक फणसळकर, हा माझा मुलगा अनिकेत आणि ही त्याची पत्नी आर्या. ही माझी पत्नी अनघा, हे आर्याचे बाबा मुकुंद पाटणकर आणि या त्यांच्या पत्नी सौ. मोहीनी पाटणकर. आपली तशी पूर्वीपासुनची ओळख आहेच. आम्ही सध्या सुरत येथे माझ्या मुलाकडे अनिकेत कडेच रहातो. आणि आमचे व्याही त्यांच्या मुलाकडे पुण्याला असतात.
      माझ्या मुलाने अनिकेतने आपल्या भक्तनिवासचे ऑनलाईन बुकींग केलेले आहे. या त्याच्या प्रिंटस. जोशींनी त्या प्रिंटस घेउन त्यांना आलेल्या ई मेल बरोबर पडताळुन पाहिल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या सर्वांकडे आपली ओळखपत्रे आहेत ना, असे विचारले. त्यावर सर्वांनी होकार देताच त्यांनी अनिकेतकडे त्याचे ओळखपत्र प्रिंट काढण्याकरिता मागितले. ते त्याने देताच त्यांनी लगेचच रिसेप्शन काऊंटरवर असलेल्या फॅक्स मशीन मधुन त्याची प्रिंट काढली. अँडमिशन प्रोसेस पूर्ण करुन झाल्यावर त्यांनी दुस-या मजल्यावरिल खोल्या उघडुन दिल्या. तिथे एकुण तिन रुम होत्या, त्यात तिनही जोडप्यांनी आपापले सामान नेले. त्यानंतर रुममध्येच असणा-या गरमपाण्याच्या सहाय्याने सगळेजण फ्रेश झाले. त्यांच्या ड्रायव्हरची सोय जोशी यांनी तळमजल्यावर लाऊन दिली.
      थोड्यावेळाने अनिकेतचे बाबा आपले आवरुन खाली येऊन श्री जोशी यांच्या बरोबर बोलत बसले. तशी त्यांची पूर्वीपासुनची ओळख होती. अनिकेतचे बाबा गेली अनेक वर्षे आपल्या कुलस्वामीनीला येत होते. देवी हंसोळ येथे आल्यावर ते नेहमी याच भक्त निवास मध्ये मुक्काम करित असत. सुरवातिला हा भक्त निवास अगदी छोटा होता. आता दोन मजली सुसज्ज इमारतिमध्ये त्याचा विस्तार झालेला होता. सोलर सिस्टीम, वाय् फाय्, पार्कींगची सोय, प्रत्येक रुम मध्ये दूरदर्शन संच अशा सर्व सुविधा सध्याच्या भक्त निवासात उपलब्ध होत्या. दुस-या मजल्यावरच्या खोल्या ए. सी केलेल्या होत्या. शुभ कार्याकरिता सुसज्ज हॉल देखिल बांधला होता. ऑनलाईन रुम बुकींगची सुविधाही उपलब्ध करुन दिलेली होती. त्यामुळे अनिकेतने रुमचे बुकींग ऑनलाईनच केलेले होते.
      भक्तनिवासचा एकदम कायापालट झालेला दिसत आहे! अशोकराव जोशींना बोलले.
त्यावर त्यांनी हो! सरकारच्या तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत निधी मिळाला. शिवाय आर्यादुर्गेच्या भक्तांनीही खूप मोठी मदत केली. आणि देवीने मनात आणल्यावर काय होणार नाही! नाही कां? असे जोशी म्हणाले.
      आजच्या जेवणाच्या मेनू संबधी आधीच फोनवर बोलणे झालेले होते. परंतु उद्याच्या बाबतित काय करायचे? असे जोशींनी विचारल्यावर अनिकेतचे बाबा अशोकरावांनी आपली योजना काय आहे ते सांगितले. ते म्हणाले, आम्हाला उद्या देवीला अभिषेक करायचा आहे. अनिकेतचे हल्लीच मे महीन्यात लग्न झाले आहे. तेव्हा त्याच्या हस्ते कुलस्वामिनीला अभिषेक करायचा आहे. तसा उपाध्ये गुरुजींना फोन झालेला आहेच.
      हो, दुपारी मला उपाध्ये गुरुजी तसे बोलले होते! जोशी म्हणाले.
      उद्या देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याची सोय आपल्याकडे होईल काय? अशोरावांनी विचारले. त्यावर अगदी पुरणपोळी शक्य होणार नाही. पण नैवद्या पुरत्या पांच पुरणपोळ्या करु. सगळ्यांना जेवायला मात्र पुरणपोळी शक्य होणार नाही. कारण माझ्याकडे माणूसबळ नाही. असे जोशी म्हणाले.
      ठिक आहे! पण उद्या जेवायला उपाध्ये गुरुजी, देवीचे भोपी गुरव आणि कुवारी सवाशिण, त्याचप्रमाणे दांपत्यही  सांगायचे आहे. असे अशोकराव बोलताच त्यावर जोशी म्हणाले अहो, उद्या रविवार आहे त्यामुळे शाळेला सुट्टी आहे. तेव्हा माझी मुलगी तुम्हाला कुवार सवाष्ण मिळु शकते आणि दांपत्य भोजनासाठी तुमच्या बरोबर आलेले तुमचे सोयरे आहेतच. नाहीतर आम्हीही आहोतच. त्यामुळे ते सर्व होऊन जाईल. अशाप्रकारे त्यांची बोलणी चालू होती तोच जोशी वहिनींनी जेवण तयार असल्याची वर्दी दिली. तेव्हा अशोकरावांनी मोबाईलवरुन अनिकेतला निरोप दिला व सगळ्यांना खाली भोजनगृहात येण्यास सांगितले.
      भक्त निवासाच्या आधुनिकीकरणा बरोबरच मोठ्ठे भोजनगृह आणि सर्व सोयींनी युक्त आधुनिक स्वयंपाकगृह देखिल बांधण्यात आले होते. सोलर सिस्टीमचा जास्तित जास्त वापर करण्यावर भर दिला होता. भक्त निवासच्या गच्चीवर सोलर पॅनेल बसवण्यांत आली होती. त्याच प्रमाणे भक्त निवासाच्या कंपाऊंड मध्येच मोठी पवन चक्कीही बसवण्यात आली होती. त्यामुळे पवन उर्जा अधिक सौर उर्जा असा हायब्रीड उर्जास्त्रोत येथे निर्माण केला होता.
      भोजनगृहामध्ये जेवायला बसण्यासाठी टेबल खुर्च्यांची सोय केलेली होती. जेवण वाढण्याऐवजी ओट्यावर तयार झालेल्या स्वयंपाकाची भांडी मांडुन ठेवली होती. प्रत्येकाने आपल्या रुची प्रमाणे आणि आवश्यक तेवढे स्वत:च्या हाताने वाढुन घ्यायचे आणि टेबल खुर्चीवर बसुन जेवायचे अशी व्यवस्था तेथे केलेली होती. जोशी स्वत: तिथे हजर राहुन सर्व व्यवस्थेवर नजर ठेवत होते. अशाप्रकारे सर्वजण साधेच पण स्वादीष्ट जेवण जेऊन आणि त्याबद्दल जोशींना धन्यवाद देऊन सगळेजण विश्रांती करीता आपापल्या रुममध्ये गेले.
क्रमश: ..............




*************

गुरु दक्षिणा भाग ३

गुरु दक्षिणा

भाग ३
आज २१ वर्षांनी परत एकदा सर्व वर्गमित्र आपल्या त्याच वर्गात आले होते. वर्गामध्ये काळानुरुप बदल झाला होता. परंतु खिडक्या, दरवाजे आणि ब्लॅक बोर्डची जागा तिच होती. वर्गशिक्षकांची टेबल खुर्चीची जागाही तिच होती. फक्त बदलले होते ते आज वर्गात आलेले विद्यार्थी. ते देखिल शरिराने बदलले होते परंतु मनाने मात्र ते आज २१ वर्षापूर्वीच्या काळात गेले होते. आजच्या दिवसापुरता तिथे एकच बदल झालेला होता. तो म्हणजे वर्ग पताकांनी सजवलेला होता. वर्गाच्या दाराला फुलांचे तोरण बांधलेले होते. वर्गाच्या बाहेरील पॅसेजमध्ये १९९५ च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणारी रांगोळी काढलेली होती. वर्गाच्या फलकावर देखिल १९९५ च्या जुन्या सर्व वर्गसदस्यांचे वर्गातर्फे स्वागत करत असल्याचा मजकुर लिहिलेला होता.
प्रत्येकाने आपापली त्यावेळची जागा पटकावली होती. सर्वांच्या आपापल्या बाकावरच्या जोडीदारा बरोबर गप्पा सुरु झाल्या होत्या. तेवढ्यांत कोणितरी हळुच बोलले अरे, सर आले! सर आले!! त्या कुजबुजणा-या आवाजाने खरोखरच परत २१ वर्षांनी सर्वजण एकदम गप्प झाले. आणि वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स झाली. इतके सर्वजण मनाने त्या काळात गेले होते. अर्थात खरोखरच त्यांच्या त्यावेळच्या सरांनी श्री विश्वास जोशी सरांनी वर्गात नाट्यमय रीतीने प्रवेश केला. आणि परंपरे प्रमाणे सर्व विद्यार्थी उठुन उभे राहीले.
विश्वास जोशीसर अजुनही त्या हायस्कूलमध्ये कार्यरत होते. अजुन दोन वर्षांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. जोशी सर आपल्या नेहमीच्या जागेवर स्थानापन्न झाल्यावर त्यांनी प्रत्येकाची आस्थेने चौकशी केली. प्रत्येकाच्या कौटुंबिक स्थितीविषयी जाणून घेतले. गेल्या २१ वर्षांत हायस्कूलमध्ये कोणकोणते आणि कसे बदल झाले त्याची माहीती सर्वांना दिली.
त्यानंतर मधल्या सुटीची बेल झाली. सर्वांना शाळेच्या माध्यान्ह भोजन गृहांत जमा होण्याच्या सूचना देण्यांत आल्या. शाळेचे माध्यान्ह भोजनगृह ही संकल्पनाच सर्वांना नविन होती. परंतु परशुराम हायस्कूलची ती एक खासियत होती. भोजनगृहात स्वतंत्र पाकगृह आणि कोठीघर देखिल बांधलेले होते. भोजनगृहामध्ये अन्नाची भांडी ठेवण्यासाठी ओटे बांधले होते. भोजनास बसण्यासाठी रांगा आखलेल्या होत्या.
आज माजी विद्यार्थी संमेलना निमित्ताने भोजनगृहात थोडा बदल केला होता. भोजन गृहामध्ये कॅटरर् मार्फत जेवण मागवले होते. त्याने आणलेली पदार्थांची भांडी ओट्यांवर मांडली होती. त्याने आपला स्वरुची भोजनाचा संच तेथे लावला होता. हॉलमध्ये दहा टेबल खुर्च्यांचे सेट मांडले होते. सर्वजण आपापल्या रुचीप्रमाणे जेवण वाढुन घेत होते आणि फिरत फिरत जेवण करत होते. जेवता जेवता चर्चा करत होते. निरनिराळ्या विषयावर काही ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न करत होते.
      सहभोजनानंतर परत सर्वजण साने गुरुजी सभागृहात एकत्र जमले. परत एकदा मानसीने कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हातात घेतले. परत एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करुन तिने आता आपल्या सहाध्यायांना आपल्या आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या भावना थोडक्यांत व्यक्त कराव्यात असे सूचविले. तिच्या सूचने नुसार त्यांचा वर्गबंधु श्री इस्माईल खेडेकर संमेलना बाबतच्या आपल्या भावना व्यक्त करण्याकरीता स्टेजवर दाखल झाले. त्यांच्या बॅचमधले ते एक स्कॉलर होते. त्यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांना संस्कृत मधले प्रतिष्टेचे जगन्नाथ शंकरशेट पारितोषक मिळाले होते. सध्या ते दुबई येथे आपला स्वत;चा व्यवसाय सांभाळत होते. आजच्या संमेलनाकरीता ते खास दुबईवरुन आले होते.
      त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, आज २१ वर्षांनी परत एकदा शाळेतील ते दिवस आठवताना खूप छान वाटत होते. खरोखरच आज मी परत एकदा १०वीतला विद्यार्थी झालो होतो. माझे असे मत आहे की, असा कार्यक्रम दरवर्षी करावा. मघाशी बोलता बोलता घनश्यामने जे सुचवले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. एवढेच नाहीतर शाळेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काय करता येईल या संबधी आम्ही मित्रांनी सखोल चर्चा केली आहे. त्याचा तपशिल अतुल देईल. माध्यान्ह भोजनगृहात आपण जेवत असताना समोर भिंतीवर लिहिलेले आपण येथेष्ट जेवणें| उरलें तें अन्न वाटणें |परंतु वाया दवडणें| हा धर्म नव्हे ।। तैसें ज्ञानें तृप्त व्हावें| तेंचि ज्ञान जनास सांगावें | तरतेन बुडों नेदावें| बुडतयासी ||”  हे समर्थ रामदास स्वामींचे वचन वाचले. आता मला येथे त्या वचनाचा उल्लेख करावासा वाटतो. माझ्या मते आपण सर्वांनी आता पुरेसे कमावले आहे. आपल्या दैनंदिन गरजा, प्रापंचिक जबाबदा-या सांभाळुन आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढा भाग आपण आपल्या या आपल्या ज्ञानदात्री माऊलीला कृतज्ञता म्हणून अर्पण करुयात. आणि असेच परत परत भेटत राहुया.
      इस्माईल खेडेकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नंतर अनेकांनी आपल्या आजच्या संमेलना बाबतच्या भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये प्रत्येकाचा सर्वसाधारण सूर तसाच होता. प्रत्येकालाच आपण आपल्या या विद्यामंदीराकरीता काहीतरी करुया असे वाटत होते. आता कोणी भावना व्यक्त करायला पुढे येत नाही असे पाहिल्यावर अतुल स्टेजवर दाखल झाला. आणि त्याने सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बोलायला सुरवात केली.
      माझ्या आदरणिय गुरुजनांना, माझ्या ज्ञानमाऊली विद्यामंदिराला आदरपूर्वक वंदन करुन आता मी आम्हा माजी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्हा सर्वांचे विचार मी येथे मांडणार आहे. आम्ही सर्वजण आज खूप आनंदात आहोत. आम्हाला परत आमचे पूर्वीचे दिवस आज अनुभवायला मिळाले. शाळेच्या सर्व स्टाफने आम्हाला खूपच सहकार्य केलेले आहे. आमच्या विनंतीला मान देऊन प्रकृती साथ देत नसताही आमच्या प्रेमापोटी श्री पेंडसेसर व सौ पेंडसे मॅडम आवर्जुन उपस्थित राहीले. त्याचप्रमाणे आपले सर्वांचे लाडके श्रीपती पवारकाका देखिल खास या कार्यक्रमाकरीता हौसेने पठाणकोट येथुन येथे आले त्याबद्दल त्यांचे आभार मानणे हा कृतघ्नपणा होईल. त्यांचे हे प्रेम आमच्यावर असेच कायम राहो हीच त्या परशुरामाकडे प्रार्थना.
      घनश्याम हा आपला वर्गबंधू पण तो येथेच रहात असल्याने आपण या संमेलनाची सगळीचे कामे आपण त्याच्या गळ्यांत टाकली त्यानेही कोणतिही कुरकुर न करता ती आनंदाने पार पाडली. मी हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करीत नाही. परंतु ओघानेच हे उल्लेख आले.
      मगाशी जेवताना आमची अनेक गोष्टींबाबत तपशिलवार चर्चा झाली. त्यात आपले वर्गबंधूतर होतेच. त्याचबरोबर आपल्या हायस्कूलचे सध्याचे मुख्याध्यापक श्री आनंद लिमयेसर आणि हायस्कूलच्या संचालक मंडळाचे सदस्य देखिल होते. आपल्या या विद्यामंदिराच्या प्रगति आणि उन्नती साठी आपल्याला काय करता येईल या बाबत आमचे बोलणे झाले. आपल्या हायस्कूलला प्रामुख्याने इमारतीच्या विस्तारीकरणाची आणि आधुनिकीकरणाची गरज आहे. त्याचबरोबर डिजीटल युगाशी जुळवुन घेण्यासाठी तातडीने काही संगणक संच अथवा लॅपटॉपची गरज आहे. त्याचप्रमाणे आधुनिक दळणवळणाची जोड येथे उपलब्ध करुन घेण्याची गरज आहे. या सर्व बाबींसाठी मोठ्या निधीची गरज आहे.
      या सर्व बाबींचा साकल्याने विचार करुन आम्ही असे ठरविले आहे की एक परशुराम हायस्कूल माजी विद्यार्थी कृतज्ञता निधी असा एक ट्रस्ट स्थापन करायचा आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातुन ही सर्व विकास कामे करायची. या ट्रस्टचे अध्यक्ष आपले घनश्यामदादा असतिल, आपल्या हायस्कूलचे मुख्याद्यापक या ट्रस्टचे सेक्रेटरी असतिल. तसेच इस्माईल खेडेकर, मी, उज्वला, मानसी आणि अजय या ट्रस्टचे सदस्य असतिल. हा ट्रस्ट रजिस्टर करुन घेण्याची जबाबदारी घनश्यामने स्विकारली आहे. त्या ट्रस्टला दिलेली रक्कम आयकर मुक्त रहाण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करण्याची जबाबदारी मी घेत आहे. तेव्हा मी माझ्या सर्व सहाध्यायींना विनंती करतो की आपण स्वत: तर आपले योगदान द्याच, परंतु आपल्या मित्रपरिवारामध्ये जे कोणी या पवित्र कार्याला मदत करु शकतिल त्यांनाही आवाहन करुन आपला हा कृतज्ञता निधी जास्तित जास्त कसा वाढेल हे बघावे.
      आताच माझ्या हातात इस्माईल खेडेकर यांनी पांच लाखाचा, अजय, मानसी, घनश्याम आणि मी प्रत्येकी तिन लाखांचे चेक असे एकुण सतरा लाखांचे चेक आलेले आहेत. त्याच प्रमाणे माझ्या एका क्लायंट कंपनीने आपल्या हायस्कूलला १५ लॅपटॉप देण्याचे मान्य केले आहे. या सर्व घोषणा  ऐकताच संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दणाणुन गेले. 
            आता आपल्या हायस्कूलचे मुख्याद्यापक श्री आनंद लिमयेसर आपले विचार व्यक्त करतिल. त्यानंतर आपले सहाध्यायी रमेश गांगल आभार व्यक्त करतिल, नंतर राष्ट्रगीत होईल आणि आपला आजचा कार्यक्रम संपन्न होईल. परत कधी एकत्र जमायचे ते आपल्या सर्वांना आपल्या व्हॉटस् अँप ग्रुपवरुन कळविण्यांत येईल. कारण आपला हा ग्रुप चालुच रहाणार आहे. तेव्हा आता मी श्री लिमये सरांना विनंती करते की, त्यांनी आपले मार्गदर्शन आम्हाला करावे. असे म्हणून मानसीने माईक श्री लिमये सरांकडे दिला.
            माननिय श्री पेंडसेसर आणि मॅडम, त्याचप्रमाणे मंचावर बसलेल्या माझ्या आजी आणि माजी सहकरी, हायस्कूलचे संचालक मंडळातिल सर्व सदस्य आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना अभिवादन करुन मी आपण सर्वजण येथे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. आपण सर्वजणच या विद्यामंदिराचे भक्त आहोत. या विद्यामंदिराचा जिर्णोद्धार व्हावा म्हणून आपण जो प्रयत्न करता आहात  त्या बद्दल मी या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून आपले आभार व्यक्त करत आहे. आपले या संस्थेवरचे प्रेम असेच वाढत राहो. आपले या विद्यामंदिरासोबतचे ऋणानुबंध असेत वृद्धींगत होवोत हीच त्या सरस्वती चरणी प्रार्थना. आपण सर्वांनी असेच वारंवार येथे येऊन आपल्या संस्थेची प्रगती पहात रहावी अशी मी आपणाला विनंती करुन मी आपली रजा घेतो. शेवटी एवढेच सांगतो पुनरा गमनायच
            लिमयेसरांच्या भाषणानंतर श्री रमेश गांगल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहिर करण्यात आले.
जर ही कथा पुढे पाठवायची असेल तर नावासह पाठवावी.

संपूर्ण

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

नवदुर्गा माहिती भाग ४

।।चतुर्थ कुष्माण्डा।।
मूलमंत्र
सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च।
दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।।
ध्यान मंत्र
वन्दे वांछित कामर्थेचन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहरुढाअष्टभुजा  कुष्माण्डायशस्वनीम्।।
भास्वर भानु निभांअनाहत स्थितांचतुर्थ दुर्गा त्रिनेत्राम्।
कमण्डलु चाप, बाण, पद्मसुधाकलशचक्र गदा जपवटीधराम्।।
पटाम्बरपरिधानांकमनीयाकृदुहगस्यानानालंकारभूषिताम्।
मंजीर हार केयूर किंकिणरत्नकुण्डलमण्डिताम्।
प्रफुल्ल वदनांनारु चिकुकांकांत कपोलांतुंग कूचाम्।
कोलांगीस्मेरमुखींक्षीणकटिनिम्ननाभिनितम्बनीम्।।
स्तोत्र
दुर्गतिनाशिनी त्वंहिदारिद्र्यादिविनाशिनीम्। जयदांधनदांकूश्माण्डेप्रणमाम्यहम्।।
जगन्माता जगतकत्रीजगदाधाररुपिणीम्। चराचरेश्वरीकूष्माण्डेप्रणमाम्यहम्।।
त्रैलोक्यसुंदरीत्वंहिदु:ख शोक निवारिणाम्। परमानंदमयीकूष्माण्डेप्रणम्याम्यहम्।।
कवच
हसरै मेशिर: पातुकूष्माण्डेभवनाशिनीम्।
 हसलकरींनेत्रथ, हसरौश्चललाटकम्।।
कौमाही पातुसर्वगात्रेवाराहीउत्तरेतथा।
 पूर्वेपातुवैष्णवी इन्द्राणी दक्षिणेमम।।
दिग्दिधसर्वत्रैवकूंबीजंसर्वदावतु।
दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा(कोहळा) बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अनाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
आपल्या सिद्धीदात्री रुपानंतर देवी पार्वती सूर्याच्या केंद्रस्थानी निवास करू लागली. तिचे सूर्यासारखे तेज सर्व ब्रह्मांडात पसरू लागले. ती सूर्यास दिशा व उर्जा देऊ लागली. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. तिच्या जपमाळेमधे सर्व सिद्धी व निधी देण्याची शक्ती आहे. तिच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट शोभुन दिसतो.
कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.

या देवी सर्वभू‍तेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।


नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।

गुरु दक्षिणा भाग २

गुरु दक्षिणा

भाग २
आज दिनांक ३१ जुलै २०१६, आज वातावरण पूर्णपणे पावसाळी झाले आहे. कालपासुनच पाऊस अक्षरश: कोसळत होता. चिपळुण शहराच्या सखल भागात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. घनश्यामच्या मालकीचे परशुराम येथिल कोंकण रिसॉर्ट  कालपासुनच गजबजले होते. ठरल्याप्रमाणे १९९५ च्या परशुराम हायस्कूलच्या १०वीच्या वर्गातले ३५ पैकी ३३ विद्यार्थी कालच हजर झाले होते. त्यावेळच्या सहाध्यायांच्या बरोबरीने तेव्हा मुख्याद्यापक असलेले पेंडसे सर देखिल आपल्या नातवाला बरोबर घेऊन आवर्जुन आले होते. ते देखिल कोंकण रिसॉर्टवरच उतरले होते.
मानसी आपले पति डॉ. श्री माधवराव पाटील आणि मुलांसह आली होती. अतुलही पुण्याहून आपल्या पत्नीसह आला होता. अजयने आपली पत्नी मनालीसह दोन दिवस आधीच कोंकण रिसॉर्टवर मुक्काम ठोकला होता. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन त्याने आणि घनश्यामने मिळुन गेल्या दोन दिवसात फायनल केले होते. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सगळेजण हायस्कूलमध्ये त्यांच्या काळात असलेल्या शाळेच्या वेळेत पूर्णवेळ काढणार होते.
कोंकण रिसॉर्टच्या लॉनवर मोठा मांडव घातलेला होता. पावसापासुन संरक्षण व्हावे म्हणून वरती हिरव्या रंगाचे ट्रान्सपरंट पत्रे घातले होते. त्यामुळे मंडप तेथिल निसर्ग सौंदर्याशी अगदी मिसळुन गेला होता. आजुबाजुला गर्द हिरवाई होती जोडीला पावसाची बरसात सुरु होती. वातावरण एकदम कोंकणी होते. या मंडपातच चहा नाश्त्याची टेबल लावली होती. जमलेले सर्व वर्गमित्र आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. सगळ्यांच्याच शारिरीक आणि सांपत्तीक स्थितीत खूपच फरक पडलेला होता.  हसत खेळत गप्पा मारत चहा नाश्ता झाल्यानंतर सर्वजण नियोजित कार्यक्रमासाठी परशुराम हायस्कूल कडे रवाना व्हायला सुरवात झाले.


*************

परशुराम हायस्कूल हे चिपळुण शहराच्या तसे एका बाजुलाच होते. एका छोट्याशा टेकडीवरील विस्तिर्ण आवारात ते पसरले होते. त्या टेकडीच्या माथ्यावरचा सर्व भाग हायस्कूलने व्यापला होता. शाळेत जाण्याकरीता वळणावळणाचा एक खास रस्ता तयार केलेला होता. जांभ्या दगडांच्या पाखाडीचा हा रस्ता आणि टेकडीच्या माथ्यावरची हायस्कूलची दोन मजली जांभ्या दगडांची इमारत लांबुन पाहीली खूप सुरेख दिसत असे. त्यातच कालपासुन तुफान पाऊस पडत असल्याने सर्व परिसर अगदी स्वच्छ दिसत होता. आजुबाजुच्या हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाल चूटुक रस्ता आणि लाल लाल दगडांची हायस्कूलची कावेने आणि चुन्याने रंगवलेली इमारत लोभसवाणी वाटत होती.
शाळेचे गेट नारळाच्या झावळ्यांनी आणि झेंडुच्या माळांनी सजविले होते. स्पीकरवर मंद आवाजात बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईचे सूर ऐकु येत होते. एकुणच सर्व वातावरण मंगलमय झाले होते. त्यातच कालपासुन मुसळधार पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतली होती आणि आकाशात सुर्यनारायणाने आपले दर्शन दिले होते. शाळेच्या आवारात सगळी लगबग सुरु होती. अजय, अतुल, मानसी आणि घनश्याम हे सर्व तयारी योग्य पद्धतीने झाली आहे का नाही याचा आढावा घेत होते. सर्व गोष्टींची खातरजमा करुन घेत होते.
बरोबर अकरा वाजता श्रीपती पवार यांनी शाळा भरण्याची घंटा वाजवली. श्रीपती पवार हे १९९५ मध्ये परशुराम हायस्कूल मध्ये शिपाई होते आणि तेच  त्यावेळी पहीली शाळा भरण्याची बेल वाजवत असत. पाच वर्षापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. सध्या ते आपल्या मुलाबरोबर पठाणकोट येथिल मिलिटरी कॅटोन्मेंट मध्ये रहातात. परंतु आजच्या कार्यक्रमाकरीता खास ते येथे आले होते. त्यांच्या बेल वाजवण्याने आजच्या कार्यक्रमाची सुरवात झाली.
शाळेच्या गेटमध्ये हायस्कूलचे सध्याचे मुख्याध्यापक श्री आनंद लिमयेसर उभे होते. त्यांच्या बाजुलाच शाळेचा शिपाई चिन्मय गुलाबाच्या फुलांची करंडी घेऊन उभा होता. त्यावेळच्या शाळेच्या शिस्तीप्रमाणे सर्व माजी विद्यार्थी लाईनमध्ये शाळेत येण्याकरीता उभे होते. त्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचे लिमयेसर गुलाबाचे फुल देऊन स्वागत करीत होते. विद्यार्थ्यांच्या अगोदरच १९९५ साली दहावीच्या वर्गाला शिकवीणारे शिक्षक शाळेंत हजर झालेले होते. त्यांचेही स्वागत लिमये सरांनी पुष्पगुच्छ देऊन केले होते. सर्व माजी विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यावर त्यांना शाळेच्या साने गुरुजी सभागृहात जमा होण्याच्या सूचना देण्यांत आल्या.
आज साने गुरुजी सभागृह देखिल विशेष सजवले होते. व्यासपीठाच्या पाठीमागे सन १९९५ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे पहिले स्नेह संमेलन असा खास फ्लेक्स बोर्ड लावण्यांत आला होता. सर्व सभागृहाला विद्युत रोषणाई करण्यांत आली होती. सभागृहाच्या उजव्या कोप-यांत असणा-या साने गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला ताज्या सोनचाफ्याच्या फुलांचा हार घालण्यांत आला होता. त्याच प्रमाणे ज्यांच्या नांवाने हे हायस्कूल स्थापन करण्यांत आले होते त्या भगवान परशुरामांच्या हातात परशु धारण केलेल्या डाव्या कोप-यामध्ये स्थापन केलेल्या मूर्तीला देखिल खास  गेदेदार गुलाबाच्या फुलांचा भला मोठ्ठा हार घातला होता. त्या फुलांच्या सुगंधाचा घमघमाट  पूर्ण सभागृहात पसरला होता. सभागृहाच्या भिंतीवर हायस्कूलची स्थापना झाल्यापासुन दरवर्षी माध्यमिक शालांत परिक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांची छायाचित्र लावण्यांत आलेली होती. अर्थात शाळा जरी १९९० साली सुरु झाली असली तरी १० वीची पहिली बॅच १९९५ चीच होती. त्याच बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन आज संपन्न होत होते.
सभागृहाच्या व्यासपीठावर १९९५ सालचे सर्व शिक्षक, त्यावेळचे मुख्याद्यापक श्री पेंडसेसर, सध्याचे मुख्याद्यापक श्री लिमयेसर, श्रीपती पवार, हायस्कूलच्या संचालक मंडळाचे सदस्य, सध्याचा शिक्षकवर्ग स्थानापन्न झाले होते. सर्वजण जागेवचर स्थानापन्न होताच मानसीने स्टेजवर असणारा माईक हातात घेतला आणि प्रथम स्वत:चा परिचय करुन दिला. मी डॉ. सौ. मानसी विजय नाईक, सध्या मी अलिबाग येथे माझे पती श्री विजय गजानन नाईक यांच्या जोडीने नाईक नर्सिंग होम चालवते. आज आपण याच हायस्कूल मधिल १९९५ सालच्या १०वीच्या वर्गातिल सर्व सहाध्यायी एकत्र जमलो आहोत. आपणा सर्वांचे स्वागत श्री लिमये सरांनी केलेच आहे. तरीही आपल्या ग्रुपतर्फे मी आपल्या सर्वांचे आपल्या शाळेंत स्वागत करीत आहे.
आजचा दिवस आपण आपले दैनंदीन आयुष्य विसरुन परत एकदा दहावीचे विद्यार्थी होऊया. म्हणूनच आपण सर्वजण शाळेची बेल होताच शाळेंत प्रवेश केला आहे. आपल्या शाळेच्या परंपरेप्रमाणे आता आपल्यापैकीच एक असणारी आणि सध्या गायक म्हणून टि.व्हीच्या अनेक चॅनेलवर झळकणारी आपली वर्गमैत्रीण उज्वला चिपळुणकर आपली पारंपारीक प्रार्थना सादर करणार आहे. आपण सर्वांनी विद्यार्थि म्हणून शांत चित्ताने उभे राहून ती प्रार्थना तिच्या सोबत मनातल्या मनांत म्हणूया. मी उज्वलाला विनंती करते की तिने स्टेजवर येऊन माईक आपल्या ताब्यांत घ्यावा. असे म्हणून माईक उज्वलाच्या हातात देऊन ती सर्व वर्गमित्रांच्यात जाऊन उभी राहीली.
उज्वलाने स्टेज वरील शिक्षकवर्गांला आदरपूर्वक नमस्कार करुन परशुराम हायस्कूल मध्ये दररोज प्रार्थना म्हणून म्हटले जाणारे वसंत बापट यांचे प्रसिद्ध गीत सादर करायला सुरवात केली. तिथे उपस्थित असणारे सर्वजण तिच्या सुराबरोबर ते गीत गुणगुणायला लागले.
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ।।

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ।।१।।

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ।।२।।

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ।।३।।
प्रार्थना गायनाने सर्वजण एका वेगळ्याच विश्वात गेले. खरोखरच सर्व सहाध्यायी या प्रार्थनेने एकदम दहावीच्या वर्गातली मुले झाली. तेच सूत्र धरुन मानसीने परत कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हातात घेतले. या प्रार्थनेनंतर ख-या अर्थाने संमेलनाला सुरवात झाली. मग मानसीने दुसरा माईक सभागृहातिल आपल्या सहाध्यायांकडे दिला व प्रत्येकाने आपापला सध्याच्या स्टेटस प्रमाणे परिचय करुन द्यावा म्हणून सुचवले.
माजी विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने आपला परिचय करुन दिला. त्यामुळे सर्वांनाच आपल्या वर्गबंधु-भगिनींचा वास्तविक परिचय झाला. आपले सहाध्यायी आज निरनिराळ्या क्षेत्रांत अग्रेसर असलेले ऐकुन प्रत्येकालाच धन्य वाटले. सर्व सहाध्यायांचा परिचय झाल्यानंतर परत मानसीने कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हातात घेतले. तिने अजय, अतुल आणि घनश्याम  मदतीसाठी स्टेजवर बोलावले. ते चौघेही फुलाच्या हारांच्या करंड्या आणि निरनिराळे बॉक्सेस घेऊन स्टेजवर हजर झाले. शाळेतिल शिपायाच्या मदतिने एका ताटात या चौघांनी बरोबर आणलेल्या वस्तु काढायला सुरवात केली.
आता मानसीने बोलायला सुरवात केली. आता आपल्या सर्व सहाध्यायांच्या वतीने आपण आपल्या गुरुजनांचा पुनर्परिचय करुन घेऊ आणि त्यांच्या बद्दलाची कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून त्यांना मानाची शाल आणि श्रीफळ अर्पण करुयात. मी अजयला विनंती करते की त्याने आपले मुख्याध्यापक श्री पेंडसेसर यांना आपली  कृतज्ञता म्हणून पुष्पहार, शाल, श्रीफळ अर्पण करावे तसेच त्यांना आपल्या या स्नेहसंमेलनाची आठवण म्हणून स्मृतिचिन्हही द्यावे. अजय त्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी केल्या व त्याने पेंडसेसरांना वाकुन नमस्कार केला तेव्हा पेंडसेसर आणि अजय या दोघांनाही आपल्या भावना आवरणे कठीण गेले. पेंडसे सरांनी अजयला अर्ध्यावरुनच वर उठवले व आपल्या मिठीत घेतले. दोघांनाही आपल्या डोळ्यांतील अश्रू आवरणे कठीण झाले. आणि मग त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला.
अजय १९९५ च्या बॅचचा टॉपर होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पेडसे सरांनी त्याला जास्तीत जास्त मदत करुन त्याच्या अंगातिल गुणांना प्रकट करण्याची संधी त्याला प्राप्त करुन दिली होती.
आता अतुलने माईक आपल्या हातात घेतला आणि मानसीला पेंडसे सरांच्या पत्नी सौ आकांक्षा पेंडसे यांचा सर्व सहाध्यायांच्या वतीने सत्कार करावा वर्असे सूचविले. सौ आकांक्षा पेंडसे मॅडम ह्या नुसत्या सरांच्या पत्नी म्हणून सर्व विद्यार्थ्यांच्या परिचयाच्या नव्हत्या तर त्यांच्या बरोबर सर्वांचे एक घरोब्याचे अनामिक नाते निर्माण झालेले होते. पेंडसे सर पुलंच्या चितळे मास्तरांप्रमाणेच आपल्या घरी विनामुल्य शिकवणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करायचे. त्या शिकवणीच्या वेळी ब-याचवेळा पेंडसे मॅडम या मुलांना गणित आणि सायन्स शिकवायच्या. कारण त्याही बी एस्सी फर्स्ट क्लास होत्या. एवढेच नाहीतर शिकवणीला येणा-या मुलांना त्या नेहमीच काहीतरी खाऊ द्यायच्याच.
मानसीने प्रथम पेंडसे मॅडमच्या गळ्यांत नाजुक बकुळीच्या फुलांचा हार घातला. त्यानंतर त्यांच्या हातात त्यांच्या गो-या रंगाला शोभेल अशी पैठणी आणि नारळ दिला. शेवटी पेढ्यांचा बॉक्स देऊन त्यांच्या वाकुन पाया पडली. तिलाही खूपच गहीवरुन आले परंतु तिने आणि पेंडसे मॅडम दोघांनीही मनाला आवर घातला.
अशाप्रकारे सर्व आजी आणि माजी गुरुजनांची कृतज्ञता व्यक्त करुन शेवटी घनश्यामच्या द्वारे श्री श्रीपती पवार यांचीही कृतज्ञता व्यक्त करण्यांत आली. परत एकदा मानसीने समारंभाचे सूत्रसंचालन आपल्या हातात घेतले. ती म्हणाली, तर माझ्या मित्र मैत्रिणींनो आता आपला वर्गबंधु घनश्याम आजच्या या आपल्या संमेलनाची संकल्पना कशी सूचली, ती प्रत्यक्षात कशी आणली आणि या संमेलनाच्या माध्यमातुन आपण काय करु शकतो या विषयी सविस्तर विवेचन करतिल.
त्यानंतर घनश्यामने स्टेजवर येऊन माईक आपल्या हातात घेतला. त्यानंतर त्याने अजय, अतुल आणि मानसी यांच्या सोबत आपण कसे भेटलो. बोलता बोलता या संमेलनाची कल्पना कशी पुढे आली. त्यानंतर व्हॉटस् अँप आणि फेसबुकच्या माध्यमातुन सगळ्यांशी संपर्क कसा झाला याचे सविस्तर कथन करुन शेवट आजचा समारंभ कसा आयोजित केला याचेही विवेचन केले. आता मुद्दा असा आहे की आपण सगळे क्लासमेट ब-याच वर्षांनी एकत्र आलो आहोत. त्या आपल्या एकत्र येण्याने आपल्याला काहीतरी भरीव करता येईल का? याचा आपल्याला विचार करायचा आहे. मी या शाळेचा नुसता माजी विद्यार्थीच नाहीतर मी शाळेचा एक संचालक देखिल आहे. आपण आपल्या विद्यार्थिदशेतल्या आठवणी परत अनुभवायच्या दृष्टीने एकत्र आलो आहोत. तो आनंद तर आपण घेत आहोत आणि परत परत घेत राहुया ही माझी मनापासुनची इच्छा आहे. त्या अर्थाने आजचे आपले हे पहिले संमेलन आहे. आपण असेच परत परत भेटत रहाणार आहोत.
आपले हे हायस्कूल सन १९९० मध्ये स्थापन झाले. सुरवातिला फक्त पाचवीचा वर्ग होता. त्यानंतर दरवर्षी एक एक वर्ग वाढत गेला. १९९५ साली दहावीची आपली पहीली बॅच माध्यमिक शालांत परिक्षेसाठी सज्ज झाली. दरम्यानच्या काळात भगवान परशुरामाच्या एका भक्ताने आपली सध्या ज्या टेकडीवर आपले हे हायस्कूल उभे आहे ती सर्व जमिन हायस्कूलला दान दिली. त्याच बरोबर इमारती साठी काही रोख रक्कमही दिली. त्या रक्कमेमध्ये लोकवर्गणीची भर घालुन ही इमारत तयार झाली आहे.
सध्याचे युग हे डिजीटल युग आहे. त्या दृष्टीने नवीन पिढीला त्याचे धडे शाळेंतुनच मिळायला हवेत. त्या करिता आपल्या हायस्कूलकडे सुसज्ज असे संगणकांचे संच अथवा लॅपटॉप हवे आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. आपण त्यात आपण आपला खारीचा वाटा उचलु शकतो काय? याचाही विचार आपण करुया. आपल्या हायस्कूल साठी, आपल्या पुढील पिढीसाठी आपण काहीतरी करायला पाहीजे. त्याकरीता आता आपण जेव्हा थोड्यावेळाने भोजनाकरीता एकत्र जमु तेव्हा यागोष्टीं संबधाने अनौपचारीक चर्चा करुया. आता आपण या सभागृहातिल कार्यक्रम स्थगित करुन आपल्या वर्गात एकत्र जमुया. आपल्या त्या वेळच्या बेंचवर बसुन थोडावेळ परत दहावीतले ते दिवस अनुभवुया. आता परत एकदा प्रार्थनेचा तास संपुन वर्गात जाण्याची बेल होईल. तेव्हा आता परत वर्गात भेटुया. प्रत्येकाने आपापले त्याकाळातले बेंच शोधुन त्यावर बसावे व पुन:प्रत्ययाचा आनंद घेऊया.
क्रमश: .....................
 जर ही कथा पुढे पाठवायची असेल तर नावासह पाठवावी.


**************

नवदुर्गा माहिती भाग ३

।।तृतियं चंद्रघंटा।।
 
मूलमंत्र
पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
ध्यानमंत्र
वन्दे वांछित लाभायचन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारुढादशभुजांचन्द्रघण्टाय़शस्वनीम्।।
कंचनाभांमणिपुर स्थितांतृतियदुर्गा त्रिनेत्राम्।
खङ्ग गदा त्रिशूल चापहरपद्म कमण्डलु माला वराभीतकराम्।।
पटाम्बरपरिधानांमृदुहास्यां नानालंकारभूषिताम्।
मंजीर, हार, केयूर किंकिणिरत्नकुण्डलमण्डिताम्।।
प्रफुल्ल वदनां बिंबाधाराकांतकपोलांतुंग कुचाम्।
कमनीयांलावण्यां क्षीणकटिनितम्बनीम्।।
स्तोत्र
आपदुद्धारिणी स्वंहिआघाशक्ति:शुभापराम्।
मणिमादीसिद्धिदात्री चन्द्रघण्टे प्रणमाम्यहम्।।
चन्द्रमुखी इष्टदात्री इष्ट मंत्र स्वरुपणीम्।
धनदात्री आनंददात्री चन्द्रघण्टे प्रणमाम्यहम्।।
नानारुपधारिणी इच्छामयी ऐश्वर्यदायिनीम्।
सौभाग्यारोग्यदायिनी चन्द्रघण्टे प्रणमाम्यहम्।।
कवच
रहस्यं श्रुणुवक्ष्यामिशैवेशीकमलानने।
श्रीचंद्रघंटास्यकवचं सर्वसिद्धि दायकम्।।
बिनान्यासं बिनायोगं बिनाशापोद्धार बिनाहोमं।
स्नानंशौचादिकंनास्तिश्रद्धामात्रेणसिध्धिदम्।।
कुशिष्यामकुटिलायवंचकायनिन्दाकायच।
दातव्यंन दातव्यमकदाचितम्।।
देवी पार्वतीचा शंकराशी विवाह झाल्यावर तिने आपल्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा चंद्र परिधान करण्यास चालू केले. या कारणास्तव तिला देवी चंद्रघंटा हे नाव पडले. तिचे हे स्वरूप अत्यंत शांत पण तरीसुद्धा आपल्या सर्व शस्त्रांसहित युद्धास तयार असे आहे. तिच्या मस्तकावरील घंटेच्या नादाने सर्व वाईट शक्ती तिच्या भक्तांपासून दूर पळतात.
दुर्गामातेच्या या तिस-या शक्तीचे नांव आहे चंद्रघंटा. तिच्या शरिराचा रंग सोन्याप्रमाणे तेजस्वी असुन तिला दशभुजा आहेत. त्या हातांमधे तिने धनुष्य, बाण, कमळ, त्रिशूळ, तलवार, कमंडलू, जपमाळ, गदा इत्यादी शस्त्रे आहेत. ती सिंहस्कंधावर आरुढ झालेली असुन युद्धोत्सुक अशा स्वरुपात आहे. तिच्या गळ्यामध्ये सफेद फुलांची माळ असुन डोक्यावर रत्नजडीत मुकुट शोभतो आहे. तिच्या घंटेसारख्या भयानक ध्वनीमुळे अत्याचारी दानव दैत्य चळाचळा कापतांत. देवी चंद्रघंटा शुक्र ग्रहावर राज्य करते.
नवरात्रीच्या उपासनेत तिस-या दिवशीची पूजा महत्वाची आहे. या दिवशी चंद्रघंटा या दुर्गेच्या स्वरुपाचे पूजन केले जाते. या दिवशी साधकाचे मन मणिपुर चक्रामध्ये प्रविष्ट होते. या देवीच्या दर्शनाने साधकांना अलौकिक वस्तुंचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो तसेच अनेक प्रकारचे दिव्य ध्वनी ऐकु येतात. अशावेळी साधकाने अत्यंत सजग राहिले पाहिजे. देवी मातेचे हे स्वरुप परम शांतिदायक आणि कल्याणकारी आहे. म्हणूनच देवी मातेच्या या पवित्र स्वरुपाचे निरंतर ध्यान मनामध्ये धरुन तिची साधना केली पाहीजे. तिचे परम ध्यान आपल्याला इहलोकी आणि परलोकी दोन्ही कडे कल्याणकरी आणि सद्गती देणारे आहे.
     मातेच्या या स्वरुपाच्या आराधनेने साधकामध्ये विरता आणि निर्भयते बरोबरच सौम्यता आणि विनम्रतेचा विकास होतो. त्याकरिता आपण काया, वाचा, मनाने पवित्र राहून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अतिशय नम्रतेने आणि तिला अनन्य भावाने शरण जाऊन माता चंद्रघंटादेवीची उपासना आराधना केली पाहिजे. त्यामुळे साधक सर्व कष्टापासुन मुक्त होऊन परम पदाचा अधिकारी बनतो. माता चंद्रघंटा देवीची प्रार्थना पुढील मंत्राने करावी.
या देवी सर्वभू‍तेषु माँ चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।