शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

रिलायन्स ग्रीन्स एक स्वप्ननगरी


रिलायन्स ग्रीन्स एक स्वप्ननगरी

अनिल अनंत वाकणकर, श्रीवर्धन-रायगड.











     गेले जवळपास एक वर्षभर मी रिलायन्स ग्रीन्स या जामनगर(गुजरात) येथिल टाऊनशिप मध्ये रहात आहे. ही जणू एक स्पप्न नगरीच आहे असे वाटावे असे येथिल वातावरण आहे. जामनगर द्वारका महामार्गावर जामनगर पासुन तिस किलोमिटर अंतरावर असणाऱ्या या स्वप्ननगरीच्या मुख्य प्रवेशद्वारातुन आत प्रवेश केला की आपल्याला लगेचच फरक जाणवतो. गेटच्या बाहेर सर्वत्र हा एक वाळवंटाचाच भाग असल्यामुळे उजाड वाटणारे वातावरण अनुभवल्यानंतर या नगरीतील प्रसन्नता, हिरवळ मनाला भावते.
     स्वच्छ, सुंदर, भरपुर मोठ्ठे असणाऱ्या रस्त्यांवरुन आपण घरंगळतच सर्वत्र फिरत असतो. प्रवेशद्वारामधुन आत आल्यावर समोरच सेंट्रल गार्डनमधिल कारंजी आपले लक्ष वेधुन घेतात. रस्त्याच्या कडेला आणि दुभाजकामध्ये रंगिबेरंगी फुले असणारी झाडे आपले मन प्रसन्न करतात. त्यानंतर आपल्याला एक सुबक आणि प्रशस्त आवार असणारे मंदिर दिसते. मंदिर परिसरात असलेली हिरवळ, फुलांची झाडे तेथिल वातावरण अधिकच भक्तीमय करतात. 
     अनेक सेक्टरमध्ये विभागलेल्या या नगरीतील टापटीप आणि शांतता नेहमीच आपले लक्ष वेधुन घेते. प्रत्येक सेक्टरमध्ये लहान मुलांना आणि आजी आजोबांना विरंगुळा म्हणून गार्डन केली आहेत. तेथे मुलांना खेळण्या साठी आवश्यक असणारे घसरगुंडी, सि सॉ, चक्र उपलब्ध केलेली आहेत. प्रत्येक बागेत हिरवळ आणि फुलांनी बहरलेली झाडे ही कॉमन बाब आहे. आजी आजोबांना गप्पा मारायला आरामदायी आसने ठेवलेल्या शेड केलेल्या आहेत.
     येथे ओव्हल पार्क आणि सेंट्रल पार्क ही मोठी मैदाने तयार केलेली आहेत. या दोन्ही ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी मंद सुरात निरनिराळी जुनी नवी गाणी किंवा भजने लावलेली असतात. त्यांचा आवाज देखिल आपण हेड फोनवरुन संगित ऐकतोय असा भास व्हावा इतकाच असतो. येथे स्पेशल जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक बनवलेला आहे. जवळच मोठ्ठी लायब्ररी, जिम, फुटबॉल, टेनीस, क्रिकेट यांची मैदाने उपलब्ध केलेली आहेत. लायब्ररीमध्ये अनेक भाषांमधिल पुस्तके उपलब्ध असतात. याशिवाय दररोजचे निरनिराळ्या भाषांमधिल वर्तमानपत्रे सुध्दा आपल्याला वाचायला मिळतात.  ओव्हल पार्कमध्ये जणू चौपाटीच उभी केली आहे. या नगरीत भारतातिल सर्व प्रांतातुन आलेले लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रांतामधल्या चवीचे पदार्थ येथे आपल्याला खायला मिळतात. येथे अनेक प्रकारचे उत्सव मोठ्या प्रमाणांत साजरे केले जातात. सार्वजनिक गणपती, नवरात्रीमध्ये गरबा, इंग्रजी नवीन वर्षांचे स्वागत हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या शिवाय वर्षातुन एकदा मोठा कार्निव्हल देखिल आयोजित केला जातो. त्यावेळी येथे जत्रेचे वातावरण असते.
     एक मोठे सुसज्ज हॉस्पिटल, इंग्रजी माध्यमाची मोठी शाळा, दोन मॉल, तिन ते चार क्लब, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक, अँक्सिस बँक, आय्. सी. आय् सी आय् बँक, तिन ए टी एम या सोयी येथे उपलब्ध आहेत. या शिवाय त्रीस्टार हॉटेल, सिनेमा थिएटर, पाच सहा फुड कोर्ट खाद्य शौकिनांकरीता आहेत.
     येथे कुठेही आपल्याला पोलिस दिसत नाही. परंतु प्रत्येक टू व्हीलरस्वार हेल्मेट घातलेला आपल्याला दिसतो. एवढेच नाही तर टू व्हिलरच्या मागे बसलेला व्यक्ती देखिल हेल्मेटधारीच दिसतो. कोठेही चोरीमारी झाल्याचे दिसत नाही. चारचाकी गाडीवाला देखिल सिटबेल्टशिवाय गाडी चालवताना दिसत नाही. कोणीही स्पीड लिमिट ओलांडलेला आढळत नाही. मी एकदा रस्ता क्रॉस करीत होतो तेव्हा मला रस्ता क्रॉस करु देण्याकरीता चक्क चारचाकी गाडीवाला थांबला होता. हा अनुभव मी आजपर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवला. 
     हल्लीच या नगरीत पर्यावरणाला पुरक असणाऱ्या सायकलचे प्रमोशन सुरु केलेले आहे. मायबाईक या अहमदाबाद येथिल संस्थेच्या मार्फत येथ सायकलिंग प्रमोशन उपक्रम राबविला जात आहे. संपूर्ण नगरीच्या परिसरात एकुण आठ सायकल टर्मिनल उभारण्यात आलेली आहेत. येथे शंभर रुपये डिपॉझिट भरुन जवळपास मोफत सायकल उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. पहिल्या तासाला मोफत आणि पुढील प्रत्येक तासाला पांच रुपये इतक्या अल्प दराने सुसज्ज सायकल मिळतात.
एक टर्मिनल वरुन घेतलेली सायकल दुसऱ्या टर्मिनलवर सोडली चालते. यामुळे व्यायाम तर होतोच, शिवाय जवळपासची छोटी मोठी कामे प्रदुषण करणाऱ्या वाहनाशिवाय उरकता येतात. या करीता सायकलची मरम्मत करण्याचा व्याप देखिल नाही. सायकलमधिल हवा चेक करणे, वंगण घालणे, सायकल स्वच्छ करणे ही कामे देखिल करावी लागत नाहित. त्यामुळे येथिल नागरिक या सायकलचा मोठ्या प्रमाणांत फायदा घेताना दिसतात.
     देशामध्ये पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर केंद्र शासनातर्फे कॅशलेस व्यवहार वाढावेत याच्याकरीता खास प्रयत्न करण्यांत आले. त्याकरीता भिम, पे, पे टिम यासारखी अँप उपलब्ध केली गेली. त्याचवेळी जिओ मनी हे देखिल अँप सुरु केले गेले. या शिवाय डेबिट/क्रेडीट कार्ड यावर देखिल भर देण्यांत आला.
त्याकाळात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काही वसाहती कॅशलेस वसाहती म्हणून जाहिर केल्या होत्या. त्यातिलच एक वसाहत रिलायन्स ग्रीन्स ही देखिल होती. कॅशलेस व्यवहार किती सोयीचा असतो हे मला येथे राहून समजले. या नगरीतील प्रत्येक आर्थिक व्यवहार कॅशलेस होतो आहे. चहाची टपरीवाला, इस्त्रीवाला, धान्य दळणाची गिरणवाला, पाणीपुरीचे/फास्टफुडचे स्टॉल, फळवाला, भाजीवाला, सायकल रिपेअरिंग करणारा, केस कापणारा सर्वजण सहजपणाने भीम अथवा जिओ मनी अँपने पैसे स्विकारतात. मॉलमध्ये, हॉटेलमध्ये भीम, जिओ मनी याशिवाय डेबिट/क्रेडीट कार्डने पैसे स्विकारतात. खिशामध्ये पैशाचे पाकिट ठेवायची जरुरच पडत नाही.
     या नगरीतुन जामनगरला जायला अतिशय अल्प दरात दर तासाला बसेस उपलब्ध असतात. या शिवाय नगरीच्या परिसरात हॉस्पिटल, मॉल वगैरे ठिकाणी जाण्याकरीता पांचरुपये इतक्या अल्पदरात व्हॅनची शटल सर्वीस सुरु असते.
          या नगरीचे एक विशेष सांगायचे राहूनच गेले. येथिल दिवस उगवतो तो मोरांच्या केकांनी आणि पक्षांच्या मधुर गुंजारवांनी. आपण रस्त्यानी जाताना आपल्या आजुबाजुला अनेक मोर वावरत असतात. कधी योग आला तर त्या मयुरांचे नर्तनही पहायला मिळते. फक्त त्यावेळी आपल्याकडे स्वस्त उभे रहाण्याचे पेशन्स पाहिजेत. आपण काय करतो मोर नृत्य करु लागला की लगेचच मोबाईलमध्ये व्हीडीओ करायला बघतो. त्या आपल्या हालचालींनी त्या मोराची नर्तन समाधी भंग पावते.
     असो ही अशी स्वप्ननगरी मला अनुभवायली मिळाली. आपण सर्वांना देखिल अशाप्रकारचा अनुभव मिळो ही सदिच्छा.

रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

भाऊबीज भाग ३


भाऊबीज भाग ३



ट्विंकल रेडीमेड आणि साडी सेंटरमध्ये आज विशेष गर्दी नव्हती. अजय, दिप्ती, सुकन्या आणि सुरेश दुकानात शिरले ते थेट शेटजींच्या जवळ गेले. शेटजींनी त्यांचे तोंड भरुन स्वागत केले.
या साहेब! या वहिनी!! काय खरेदी आहे? साडी घेताय? कां ड्रेस?
नाही शेट आज खरेदी नाही. परवा आम्ही तुमच्याकडुन एक साडी नेली होती. ती खराब झालेली साडी आहे. हे पहा हे त्याचे बील आहे. सुकन्याने साडी आणि हातातले बील पुढे केले.
मॅडम आम्ही एकदा विकलेला माल परत घेत नाही किंवा बदलुन देत नाही. हे पहा तसे बीलावर आम्ही छापले देखिल आहे. तुम्ही घेतानाच बघुन घ्यायला पाहिजे होती. असे म्हणून शेठजींनी बीलाच्या पाठिमागे छापलेली सूचना वाचुन दाखविली.
परंतु शेट! जेव्हा तुम्ही आम्हाला बिल देता तेव्हा तर ही तुमची सूचना दिसत नाही. बिलाच्या पाठिमागे छापलेली सूचना आम्ही खरेदीच्या आधी कशी वाचणार. तुम्ही तसा बोर्ड दुकानात लावायला हवा होता. आम्हीतर ही साडी वापरलेली देखिल नाही. फक्त उलगडून बघितली आहे. तरी तुम्ही म्हणता साडी बदलुन देणार नाही हे कसे काय? आता सुरेशने मधे तोंड घातले.
हे पहा साहेब! आम्ही एकदा विकलेला माल परत घेत नाही हा आमचा नियम गेली अनेक वर्षे चालू आहे. त्यामुळे साडी परत बदलुन देण्याचा प्रश्नच नाही. कारण मग ती वहिवाटच होऊन जाईल. कोणीही येईल साडी, ड्रेस बदलुन मागत राहील. आतासुध्दा तुम्ही साडी घेतल्याला तिन चार दिवस झाले आहेत. लगेचच परत आणली असतीत तर कदाचित घेतली असती परंतु आता ते शक्य नाही. तुमची दुसरी काही खरेदी असली तर बोला. शेटजींनी सुरेशचे आणि सुकन्याचे म्हणणे उडवुन लावले आणि ते दुसऱ्या गिऱ्हाईकाकडे वळले.
शेटजी! तुमचे हे उत्तर फायनल आहे. बघा अजुन विचार करा. सुरेशने परत एकदा शेटजींना विचारले.
हो! हो! ! माझे हे फायनल उत्तर आहे! शेटजींनी निक्षुन सांगितले.
ठिक आहे! मग आता आम्ही आमच्या मार्गाने जायला मोकळे आहोत. अशाप्रकारे शेटजींना बजावुन सुरेशने सुकन्या, दिप्ती आणि अजय यांना बाहेर निघण्यास सुचवीले.
या प्रकाराने अजयचा मात्र मुड गेला. मोठ्या हौसेने त्याने आपल्या लाडक्या बहिणीला सुकन्याला आपल्या स्वत:च्या  कमाईमधुन पहिली साडी घेतली होती. त्या खरेदितच घोटाळा झाला होता.  अशा नाराज मुडमध्येच सर्वजण परत घरी गेले.
*******
रात्री जेवण झाल्यावर मदन आणि वृंदा झोपी गेले. त्यानंतर अजय, सुरेश, दिप्ती आणि सुकन्या यांची मिटींग साडी या विषयावर चर्चा करण्याकरीता बसली.
भावोजी! आता यावर काय मार्ग काढायचा मला तर काहीच समजत नाही. अजय म्हणाला.
अजय! एवढा निराश होऊ नकोस! आपण यातुन काहीतरी मार्ग निश्चितपणे काढुच! याची मला खात्री आहे. सुरेशने ठामपणाने सांगितले.
दादा! माझ्या डोक्यात एक आयडिया आल्ये. सांगु काय? दिप्तीने विचारले.
अग विचारतेस काय? सांगुन मोकळी हो! सुकन्याने दिप्तीला पाठिंबा दिला.
अग वहिनी! आपले सर्वांचे व्हॉटस् अँपचे ग्रुप आहेत त्यात ही घटना तपशिला सह टाकायची म्हणजे सर्वजण त्या शेटला विचारायला लागतिल. मग तो आपोआपच आपल्याला साडी बदलुन देईल. कशी वाटतेय आयडिया? दिप्तीने विचारले.
दिप्ती! तुझी कल्पना चांगली आहे. परंतु आपण डायरेक्ट ग्रुपवर पोस्ट न टाकता आधी आपण तसे करणार असल्याची कल्पना त्या शेटजींना द्यायची म्हणजे कदाचित आधीच त्यांना उपरती होऊन आपले काम होऊन जाईल. सुरेशने आपले मत मांडले.
हे मला योग्य वाटते. म्हणजे आपले काम लवकर होईल आणि मी देखिल निश्चिंत मनाने घरी परत जाईन. अजयने आपले मत दिले.
मग त्याकरीता त्या शेटजींना कसे सांगायचे? फोन करायचा कां? कां पत्रच पाठवु यां! सुकन्याने विचारले.
सुकन्या तुझी पत्र पाठविण्याची कल्पना मला योग्य वाटते. आपण पत्र स्पीड पोस्टने पाठवुया! म्हणजे आपल्याला त्याची पोच पण मिळेल. तर मग ठरले आपण आताच पत्र लिहूया आणि उद्या सकाळीच ते स्पीडपोस्टाने पाठवु म्हणजे ते उद्या दुपारपर्यंत त्या शेटजींना मिळेल. मग पहाच काय परिणाम होतोय तो. सुरेशने अनुकुल प्रतिसादाची खात्री दिली. 
ताई! पत्र पाठवशिल ते अंतर्देशिय पत्रावर लिही आणि तेच अंतर्देशिय पत्र स्पीड पोस्टने पाठव. अजयने सूचवले.
अरे! पण अंतर्देशिय पत्रच कां? काही विशेष कारण आहे कां? दिप्तीने विचारले.
हो! कारण अंतर्देशिय पत्र स्पीड पोस्टने पाठविले की आपल्याला त्याच कागदाची पोच मिळते ज्यावर आपण आपल्याला पाहिजे तो मजकूर लिहिला आहे. अजयने स्पष्टिकरण दिले.
अरे! पण अजय! पाकिटातुन पत्र पाठवले तरी त्याची पोच आपल्याला मिळणारच नां? आता सुरेशने आपली शंका विचारली.
भावोजी! आपले म्हणणे बरोबर आहे! परंतु ते पाकीट स्विकारणारा म्हणू शकतो त्या पाकिटात तुम्ही म्हणता तो कागद नव्हता. परंतु अंतर्देशिय पत्र पाठविल्यावर तो चान्सच रहात नाही. कारण पोस्टाचे स्पीडपोस्ट नंबरचे स्टीकर आणि शिक्के त्याच कागदावर येतात. अजयने पटेल असे स्पष्टिकरण दिले.
अजय! तुला असा काही अनुभव आलेला आहे कां? सुरेशने विचारले.
अगदी मलाच नाही. परंतु माझ्या मित्राच्या फॅमिलीमध्ये असा अनुभव आलेला आहे. तेव्हा त्यांच्या विरुध्द पार्टीने हा मुद्दा काढला होता म्हणून मला माहित आहे. अजयने सांगितले.
मग बरोबर आहे. अनुभव हा मोठा गुरु आहे. सुरेशने आपली प्रतिक्रिया दिली.

*******
      आज बाजाराला साप्ताहिक सुटी असल्याने बाजारतली सर्व दुकाने बंद होती. तरीही अनेक दुकानांत त्यांचे मालक आपली हिशेबाची कामे करण्याकरीता दुकानात बसले होते. त्याकरीता दुकानाचा मुख्य दरवाजा बंद असला तरी दुसरा दरवाजा उघडुन आतमध्ये काम चालू होते.
      कसबापेठेतील ट्विंकल रेडीमेड आणि साडी सेंटरमध्ये देखिल अशाच प्रकारे त्या दुकानाचे मालक गोपाळदासशेट आपले हिशेबाचे काम करीत बसले होते. दुकानात एक नोकर तेवढा हजर होता. बाकीचे सगळे नोकर आज सुट्टीवर होते. हजर असलेला नोकर गोविंदा दुकानाच्या पुढच्या भागात साफसफाईचे काम करीत होता. तेवढ्यात बाहेरुन पोस्टमने आवाज दिला म्हणन तो टपाल घेण्याकरीता बाहेर गेला.
      पोस्टमन!  काय पत्र आहेत कां? द्या इकडे आज दुकान बंद आहे. गोविंदाने विचारले.
      ही घ्या! आज पत्र नाहित फक्त वर्तमान पत्र आणि विम्याच्या नोटीसा आहेत. पण शेट कुठे आहेत? एक स्पीड पोस्ट आहे त्यांची सही लागेल. पोस्टमनने सांगितले.
      या! असे आत मध्ये यां!  मालक हिशेबाचे काम करीत आत बसले आहेत. असे म्हणून गोविंदाने पोस्टमनला शेटजी होते तिकडे नेले.
      मालक पोस्टमन आलेत!  आपली सही पाहिजे म्हणतायत! गोविंदाने शेटजींना सांगितले.
      शेटजी ही डिलीव्हरी स्लीप घ्या आणि इथे सह्या करा. पोस्टमनने सांगितले आणि आपल्या हातातली डिलीव्हरी स्लीप आणि पोचपावती शेटजींच्या पुढे सही करण्याकरीता दिली.
      शेटजींनी स्पीड पोस्टने आलेले अंतर्देशिय पत्र उलट सुलट करुन बघितले आणि पोस्टमननी दिलेल्या कागदांवर सही केली.

*******
            पोस्टमन निघुन जाताच शेटजींनी स्पीडपोस्टने आलेले अंतर्देशिय पत्र उघडले. ते वाचता वाचता शेटजींना घाम फुटला. शेटजींनी धापा टाकत गोविंदाला पाणी आणायला सांगितले.
      गोविंदाने पाणी देता देता विचारले, मालक काय झाले? आपला चेहरा असा काय घाबरल्या सारखा कां दिसतोय?
      अरे बाबा! गोविंदा! घात झाला आता पोस्टमनने दिलेल्या पत्रातल्या मजकूराने माझा बी. पी एकदम हाय करुन टाकलाय! शेटजी थकलेल्या आवाजात बोलले.
      पण आहे तरी काय एवढे त्या पत्रांत? गोविंदाने विचारले.
      हे घे! हे पत्र वाच! म्हणजे तुला कळेल माझा बी. पी का हाय झाला ते! शेटजींचा गोविंदा हा अतिशय विश्वासाचा आणि जुना नोकर होता म्हणून त्यांनी त्याला आत्ता आलेले ते पत्रच वाचायला दिले.
      गोविंदाने ते पत्र उघडले आणि वाचायला सुरवात केली, त्यात मजकूर पुढिल प्रमाणे होता.
सुकन्या सुरेश कुळकर्णी,
४०१, रास्ता पेठ, पुणे
दिनांक- २२ नोव्हेंबर २०१७
मोबाईल क्र. xxxxxxx564
माननिय संचालक,
ट्विंकल रेडीमेड आणि साडी सेंटर,
कसबा पेठ, पुणे यांसी.
      मी आपल्या दुकानातुन दिनांक १६ नोव्हेंबर रोजी एक साडी खरेदी केली होती. त्या साडीचे बील माझ्याकडे आहे. त्या साडी मध्ये विणकामात दोष असल्याने मी ती आपणाकडे बदलुन मागण्याकरीता माझ्या पतिसह आले होते. परंतु आपण ती साडी आपण मला आपल्या दुकानाचे नियम सांगुन बदलुन देण्यास नकार दिलात. आपणास समजावुन सांगुन देखिल आपण आपल्या नकारावर ठाम राहिलात. ही घटना माझ्या भावाने आपल्या मोबाईलमध्ये व्हीडीओ स्वरुपात रेकॉर्ड केली आहे.
      तो व्हीडीओ आणि सर्व घटना सांगणारे माझे लिखित निवेदन मी माझ्या सर्व मैत्रिणिंना व्हॉटस् अँप आणि फेसबुकवर पाठविणार आहे. माझ्या सखी या व्हॉटस् अँप आणि फेसबुक ग्रुपवर सुमारे दोनशे मैत्रिणी आहेत. त्याचप्रमाणे माझ्या पतिचे देखिल असेच दोन ग्रुप आहेत त्यावर देखिल हे सर्व मी पोस्ट करणार आहे. त्या सर्वांना मी असे सुचवणार आहे की, असल्या खराब झालेला माल विकणाऱ्या दुकानांत जाताना विचार करा. त्याचप्रमाणे माझ्या पतिच्या मित्राची प्रिंटींग प्रेस आहे तो आम्हाला हा सर्व मजकूर हँडबिलाच्या स्वरुपात छापुन देणार आहे. ती हँडबीले घेऊन मी आणि माझ्या मैत्रिणी आपल्या दुकानाबाहेर उभ्या राहून आपणाकडे येणाऱ्या सर्व ग्राहकांना वाटणार आहोत.
      या पत्राद्वारे आपणाला ही पूर्व सूचना देत आहोत म्हणजे आयत्या वेळी फसवले असे वाटायला नको म्हणून हे पत्र पाठविले आहे.
आपणाकडून फसवली गेलेली आपली ग्राहक
सौ सुकन्या सुरेश कुळकर्णी
      पत्र वाचुन गोविंदा देखिल अवाक झाला आणि उस्फूर्तपणाने बोलला, बापरे! शेट हा तर मोठा बॉंबच लावलाय या सुकन्या ताईंनी!
      हो नां! माझीही नेमकी हीच प्रतिक्रिया होती. माझ्या डोळ्यासमोर आपल्या दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांना परत फिरवणारी ती बाईच दिसत होती. आता काय करायचे हा मोठा प्रश्न आहे. शेटजी चिंतेच्या सुरात बोलले.
      पणं मालक! त्यांनी अजुन काही कारवाई सुरु केलेली नाही! तेव्हा जर घाई केली तर हे आपण टाळु शकतो! त्या पत्रात त्यांचा मोबाईल नंबर आहे त्या फोनवर फोन केला तर आपण काहीतरी मार्ग काढु शकतो. गोविंदाने आपले मत दिले.
      अरे! खरंच की! या पत्रानी माझं डोक बधिर झाले होते. आता लगेच फोन करतो. आपण असे करु! आधी तू त्यांच्याशी बोलुन त्यांचा प्रतिसाद कसा आहे तो बघ. नंतर मी बोलतो. असे म्हणून त्यांनी पुढ्यातला फोन उचलला आणि सुकन्याचा नंबर डायल करायला सुरवात केली.

*******
            अजय आणि दिप्ती आल्याने आज सुरेशने देखिल रजा घेतली होती. त्यामुळे आज सुकन्याने पावभाजीचा बेत केला होता. ती आणि सुकन्या त्याची तयारी करत होती. सुरेश आणि अजय किचन मध्येच बसुन  त्यांच्याशी गप्पा मारीत होते. त्यांच्या गप्पा रंगात आलेल्या असताना सुकन्याचा मोबाईल वाजु लागला. तिने नंबर बघिलतला तो अनोळखी लँडलाईनचा नंबर होता. त्यामुळे ती फोन उचलायचा किंवा नाही याचा विचार करत होती. तेव्हा सुरेशने विचारले, काय झाले? फोन का घेत नाहिसं!
      बघां नां! नंबर ओळखीचा नाही! घेऊ कां नको याचा विचार करतेय! सुकन्या विचारात पडली होती.
      बघु! इकडे दे फोन! अग हा पुण्यातला नंबर आहे. त्या साडीवाल्या शेटचा फोन असेल! मी बेट लावतो! थांब आपण खात्रीच करु! तिथपर्यंत वाजु दे फोन. ते बील कुठे आहे? त्यावर फोन नंबर असेल.
      थांबा! मी बिल आणते! असे म्हणून ती बील आणायला गेली. ती बिल घेऊन येईपर्यंत फोन कट झाला. परंतु परत वाजायला लागला. परत तोच नंबर होता.
      सुरेशने बीलावरचा फोन नंबर आणि मोबाईलवर आलेला फोन नंबर चेक केला. फोन साडीच्याच दुकानातुन आला होता याची आता खात्री झाली होती. त्याने सुकन्याला फोन रिसिव्ह करायला सांगितला. त्याने फोन स्पीकरवर टाकण्याची सूचना केली. त्याप्रमाणे सुकन्याने फोन स्पीकरवर ठेवुन संभाषण सुरु केले.
      हॅलो! कोण बोलतेय?  सुकन्याने विचारले.
      मॅडम मी गोविंदा! ट्विंकल रेडीमेड आणि साडी सेंटरमधुन बोलतो आहे. आपल्याशी आमच्या शेटना बोलायचे आहे. फोनवर गोविंदाने विचारले.
      ठिक आहे! द्या त्यांच्याकडे काय बोलायचे आहे त्यांना? सुकन्या जरा रागातच बोलली.
      हॅलो सुकन्यामॅडम! मी गोपाळदास ट्विंकल रेडीमेड आणि साडी सेंटरचा मालक बोलतोय! आपला लेटर मला मिळाला. त्या संदर्भात मला आपल्याशी बोलायचे आहे. मी आपल्या घरी कधी येऊ शकतो? गोपाळदास शेटनी नम्रपणाने विचारले.
      हॅलो शेट! आपल्याला काय बोलायचे ते आपण त्या दिवशी दुकानात बोललातच की! आता माझ्या घरी येऊन काय बोलणारं! मी काय  करणार आहे ते तुम्हाला लेटर मध्ये कळवले आहेच की. सुकन्याने गुश्यातच उत्तर दिले.
      मॅडम! रागावु नका! आपण म्हणाल तेव्हा मी आपल्या घरी येईन. शेटजींनी परत अजीजी करत विनवले.
      ठिक आहे! आता माझे पती घरी नाहीत कामावर  गेले आहेत ते आले की, त्यांना विचारुन सांगते. सुकन्याने नेमकी वेळ सांगायचे टाळले. किंवा शेटजी किती घाबरलेत याचा अंदाज घेण्यासाठी टाळा टाळ केली.
      ठिक आहे मॅडम! मी आपल्याला परत फोन करतो! किती वाजता करु? शेटजींनी परत एकदा विनवणी केली.
      तुम्ही असे करा, मी माझ्या पतींशी फोनवर बोलते त्यानंतर म्हणजे तासाभराने तुम्ही परत फोन करा. मग मी त्यांचे काय म्हणणे आहे ते कळवते.  
      काय गं ताई! भावोजी तर इथेच बसलेले आहेत, मग ते कामावर गेले आहेत असे खोटे का सांगितलेस?  अजयने उत्सुकतेने विचारले.
      त्याचे काय आहे अजय! ते शेट कीती काकुळतीला आलेत याची मी परिक्षा पाहत्येय. शिवाय आपल्याला गेल्या दोन दिवसात जो मनस्ताप झाला आहे तेवढा त्यांना देखिल व्हायला हवाच नां? शिवाय आपल्यालाही पुढचे धोरण ठरविता येईल.
      बरोबर आहे वहिनींचे. दिप्तीने सुकन्याला दुजोरा दिला.
      हे पहा सुकन्या आपण देखिल तुटेपर्यंत ताणायचे नाही. नाहीतर तेलही गेले आणि तुपही गेले असे व्हायला नको. सुरेशने आपले मत नोंदविले.
तर मगं आता थोड्याच वेळांत परत त्या गोपाळदास शेटचा फोन येईल त्यांना किती वाजता बोलवायचे ते आता ठरवा. ते शेट येऊन एकदा हे प्रकरण मिटले की मी देखिल जायला मोकळा होईन. अजयने  आपल्याला जायची घाई आहे हे देखिल त्यातल्या त्यात सूचवले.
मला वाटते सुकन्याने मी कामाला गेलोय असे सांगितले आहे म्हणून संध्याकाळी पांच वाजता त्यांना बोलावुया आणि दुसरे म्हणजे आपण जास्ती ताणूया नको. आपल्याला साडी बदलुन मिळाली की, आपले काम झाले. सुरेशने आपले मत मांडले.
दादा! नुसती साडी बदलुन दिली म्हणजे झाले नाही बरं का! त्या शेटना ही बिलाच्या पाठीमागे छापलेली जाचक अट काढुन टाकाय़ला लावायची. त्याशिवाय दुकानात देखिल मोठ्या अक्षरांत तशा अर्थाचा बोर्ड लावायला लावायचा. दिप्तीने मौलिक सूचना केली.
ठिक आहे तर मगं! आता त्या गोपाळदास शेटजींचा फोन आला की, त्यांना संध्याकाळी पाच वाजता यायला सांगते. सुकन्याने वेळ फिक्स केली.

*******
            संध्याकाळचे पांच वाजले होते. अजय, सुरेश, दिप्ती आणि सुकन्या हॉलमध्ये शेटजींची वाट बघत बसले होते. सुरेश हातात एक कागद घेऊन तपासण्याचे नाटक करीत होता. तेवढ्यांत दारावरची बेल वाजली. ती ऐकुन सुकन्या उठली आणि बहूदा शेटजीच आले असतिल मीच दार उघडते असे म्हणून दार उघडायला गेली.
      दारात खरोखरच गोपाळदास शेटजी आणि त्यांचा नोकर गोविंदा साड्यांचा गठ्ठा घेऊन उभा होता. त्यांचे स्वागत करीत सुकन्या म्हणाली, या शेटजी! आज आमच्या गरिबाच्या घराची कशी काय वाट चुकलात? त्यानंतर तिने बाजुला होऊन शेटजींना आत मध्ये यायला वाट दिली. ते आत मध्ये येऊन स्थानापन्न झाल्यावर पाणी वगैरे देऊन झाल्यावर सुरेशने विचारले, काय शेट! कसे काय येणे केलेत? 
      अरे साहेब! आपल्या या सुकन्याताईंनी पाठविलेला लेटर संबधात आपल्याला भेटायला आलो आहे. मी काही तुम्हाला साडी बदलुन देणार नाही असे कुठे म्हटले होते? शेटनी आल्या आल्याच शरण आल्याचे निशाण दाखवले. आपण कसे काय आहात?
      हे काय माझ्या मित्राने हा हँडबीलाचे प्रुफ तपासायला पाठविले आहे ते तपासतो आहे. असे म्हणून तो कागद सुरेशनी शेटजींच्या हातात दिला.
      गोपाळदास शेटजींनी तो कागद वाचताच परत त्यांचे पालपिटेशने वाढले. तो कागद आपल्या हातातच ठेवत शेठनी बरोबर आलेल्या गोविंदाला जवळ बोलावले आणि साड्यांचा गठ्ठा समोर आणायला सांगितले.
      हे पहा सुकन्या ताई! आपण आपल्याला पसंत पडेल ती साडी यातुन पसंत करा आपल्याला साडी बदलुन देण्याकरीताच मी येथे आलो आहे. मात्र आपण करणार असलेली ती व्हॉटस् अँप आणि फेसबुकवर करणार असलेली पोस्ट टाकू नका ही विनंती करायला मी आलो आहे.
      ठिक आहे! मी नाही करणार तशी पोस्ट! परंतु माझी एक अट आहे. आपण जी बिलाच्या पाठिमागे छुपी अट छापली आहे ती सुधारली पाहिजे आणि नुसती बिलावर न छापता ती मोठ्या अक्षरांत दुकानात देखिल लावायला पाहिजे. आहो मी आणलेल्या साडीची मी फक्त घडी मोडून फॉल बिडींग करता उघडली होती. परंतु तुम्ही काही ऐकुन घ्यायलाच तयार नाही. म्हणून मला नाईलाजाने हा मार्ग पत्करावा लागला.
      ताई! मी देखिल ती अट उगाचच टाकली नाही. आहो! अनेक गिऱ्हाईके साडी वापरुन आठ पंधरा दिवसांनी ती परत करायला येतात तेव्हा ती वापरलेली साडी कशी बदलुन देणार? शेटजींनी आपली अडचण सांगितली.
      परंतु शेट! तुमच्या दुकानातुन साडी घेतली आणि ती धुतल्यानंतर आटली, विरली किंवा रंग गेला तर तुम्हाला बदलुन द्यायला नको पूर्ण किंमंत देऊन ग्राहकाने का भुर्दंड सोसायचा हा देखिल अन्यायच नाही काय? सुप्रिया देखिल मागे हटायला तयार नव्हती.
      हे बघ ताई! आधी तू तुझी साडी बदलुन घे. उगाच जास्त ताणण्यांत मजा नाही. आणि ते शेटजी तु म्हणतेस ती अट मान्य करतिल याची मला खात्री आहे. कारण त्यात चुकीचे काहीच नाही. होय नां शेट? अजयने तडजोडीचा मार्ग सूचवला.
      ठिक आहे! आधी साडी पसंत करु यां! दिप्ती! ये साडी पसंत करायला! असे म्हणून सुकन्याने दिप्तीच्या मदतीने एक साडी पसंत केली. दोघींनीही पूर्ण साडी उघडून तपासली आणि त्यानंतरच फायनल केली.
      साडी पसंत केल्यावर सुरेशने ती साडी बघितली त्यावरचे किमतीचे लेबल पाहिले तर साडीची किंमत जास्त म्हणजे पंधराशे रुपये होती. सुकन्या तू ही साडी पसंत केलीस परंतु ही साडी पंधराशेची आहे अजयने घेतलेल्या त्या डिफेक्टीव्ह साडीची किंमत तर ११५० रुपये होती. तेव्हा आता आपल्याला साडे तिनशे रुपये द्यावे लागतिल.
      नाही! नाही साहेब! आपल्याला जास्त पैसे द्यायची जरुरी नाही. ताईंनी माझे म्हणणे ऐकले यातच सगळे आले. शेटजींनी घाई घाईने आपले मत मांडले.
      नाही! नाही शेटजी! तसे नाही! आपले नुकसान करुन मला ही साडी नकोय! सुकन्याने आपली नाराजी स्पष्ट केली.
      ताई! या साडीची किंमत जरी १५०० असली तरी त्यावर २० टक्के डिस्काउंट चालू आहे तेव्हा त्या साडीवर ३०० रुपये तर सूट मिळेलच तेव्हा ५० रुपयांकरीता ती साडी परत बदलु नका. गोपाळदास शेटजींनी आपली भूमिका मांडली.
      ताई! तुझ्या समाधानाकरीता मी हे पन्नास रुपये शेटजींना आत्ताच्या आत्ता देतो! मग तर झाले नां! असे म्हणून त्याने आपल्या पाकीटातुन पन्नास रुपये काढुन शेटजींच्या हातात ठेवले.
      शेटजी आता या साडीचे सुधारीत बिल घ्यायला उद्या मी आपल्या दुकानांत येईन तेव्हा मला मी सांगितलेली सुधारणा झालेली दिसली की, लगेचच मी माझी व्हॉटस् अँप आणि फेसबुकवर पोस्ट करायची कल्पना सोडून देईन.
      नक्कीच! मी आजच नवीन बीलबुके छापायला देतो. त्यात पुढच्या बाजुलाच योग्य कारण असल्याशिवाय विकलेली वस्तू परत बदलुन मिळणार नाही असे छापुन घेतो. मग तर काही हरकत नाही. शेटजींनी नम्रतेने विचारले.
      हो आणि दुकानातही फ्लेक्स बोर्ड लावा! त्यावर दुकान सोडण्यापूर्वी आपण खरेदी केलेली वस्तू तपासुन मगच दुकान सोडावे असे स्पष्ट शब्दात लिहा म्हणजे लोक बेसावध रहाणार नाहीत. दिप्तीनेही बोलायचा चान्स घेतला.
      नक्कीच! या दोनही गोष्टी पूर्ण केल्याशिवाय मी उद्या दुकान उघडणार नाही ही खात्री बाळगां! शेटजींनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले.
      ठिक आहे तर! मी आपल्या शब्दावर परत एकदा विश्वास ठेवुन माझा व्हॉटस् अँप आणि फेसबुक वर आपल्या विरुध्द पोस्ट करण्याचा विचार मी रद्द करीत आहे. परंतु लक्षांत ठेवा  मी अजुन बील आणि व्हीडीओ जपुन ठेवणार आहे. तुम्ही जर आज ठरवल्याप्रमाणे वागलात नाही तर मात्र मी माझा विचार बदलेन. सुकन्याने आपल्या मात्रचा शेवटचा वळसा दिला.
***समाप्त***