सोमवार, २२ जून, २०२०

मोहाचा नारळ

मोहाचा नारळ



अनिल अनंत वाकणकर,
श्रीवर्धन-रायगड
     काका! मोठ्या काळजीतुन मुक्त झालो! आत्ताच आपल्या परसातला माड आडवा करुन घेतला! आता आज रात्री पासुन मी निवांत झोपू शकेन! परवा माझ्या पुतण्याचा मला व्हॉटस् अँपवर मेसेज आला.
     दोन जूनला टी.व्ही.वरुन हवामान खात्यातर्फे जाहिर करण्यांत आले की, निसर्ग नांवाचे चक्रीवादळ तयार होत आहे आणि ते रायगड जिल्हयातील हरिहरेश्वर येथे दिनांक ३ जून रोजी दुपारी तीनच्या दरम्याने धडकेल. वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १२० किलोमिटर एवढा असेल. टि.व्ही वरील ही बातमी ऐकल्यापासून आम्हा सर्वांच्याच डोळ्यासमोर आमच्या परसात असलेल्या ३५ ते ४० फूट उंचीच्या माडाचे चित्र डोळ्यासमोर दिसू लागले. सध्या हा माड आमचे रहाते घर, शेजारची चाळ आणि एक संडास यांच्या बरोबर मधोमध उभा आहे. एवढ्या मोठ्या वेगाने येणाऱ्या वाऱ्यांपुढे हा आपला माड निश्चितच शरण जाईल आणि कुठल्यातरी घराचा घात करेल असे सतत वाटत होते.
     दिनांक ३ रोजी दुपारी बारा वाजले तरी वातावरण शांत होते. वाऱ्याचा अजिबात पत्ता नव्हता. परंतु टी. व्ही वर आणि सर्व माध्यमांवर चक्रीवादळाच्या प्रगतीची रनींग कॉमेंट्री चालू होती. जस जशी ती कॉमेंट्री ऐकत होतो तसे काळजात धस्स होत होते. अखेर एक वाजल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढायला सुरवात झाली. सर्वचजण आपापल्या घरांत जीव मुठीत घेऊन बसलेले होते. थोड्याच वेळात वीजेने राम म्हटला. त्यानंतर वाऱ्याने आपले तांडव सुरु केले. बघता बघता आमच्या घराचे कोने उडाले त्यानंतर कौलांच्या वरच्या रांगामधील कौले उडाली. शेजारच्या आंगणात असलेल्या आंब्याच्या झाडाने आपले स्थान सोडले. ते झाड आमच्या शेजाऱ्यांच्या पुढच्या पडवीवर पडले. त्याची एक फांदी आमच्या चिक्कूच्या झाडावर पडली. त्यामुळे चिक्कूच्या झाडाच्या एकामागोमाग एक फांद्या मोडून पडल्या. या प्रकारामध्ये अंगणातल्या मांडवाच्या कोपऱ्यातल्या पत्र्यांनी जमीनीवर उडी मारली. अंगणाच्या उजव्या बाजुला असलेली पोफळ चक्रीवादळात गोल गोल फिरुन पिंजली. अखेर तीही मोडून पडली.
     आजुबाजुच्या प्रत्येक वाडीतुन काही पडल्याचे, काही मोडल्याचे आवाज येत होते. या वाऱ्याचा झंझावाताच्या जोडीला आता पावसाने सुरवात केली. अखेर दुपारी चारच्या सुमाराला वारा शांत झाला पाऊस कमी झाला. या एवढ्या वाऱ्यामध्ये आमचा परसातला माड मात्र एखाद्या योध्याप्रमाणे त्या तुफानाला तोंड देत ठामपणाने उभा होता. मात्र तो महाकाय वाऱ्याच्या झंझावाताने थोडासा दक्षिणेकडे झुकला होता. आता घराघरामधुन लोक बाहेर पडून झालेल्या नुकसानीची पहाणी करीत होते. आमच्या आजुबाजुच्या प्रत्येक घराचे काही ना काही नुकसान झालेले होते. कोणाचे पत्र्याचे पूर्ण छप्पर उडाले होते. तर कोणाची कौले उडाली होती. कित्येक घरांवर जवळची झाडे कोसळली होती. प्रत्येकावरच हा प्रसंग आला होता त्यामुळे कोण कोणाचे सांत्वन करणार हा मोठा प्रश्न होता. वाडीमध्ये जाऊन बघायची त्यादिवशी कोणाची हिम्मतच झाली नाही. परंतु प्रत्येकजण तर्क करत होता. हा सगळा प्रकार मला माझ्या पुतण्याने रात्री अकरावाजता फोनवर सांगितला. सांगताना तो फक्त रडायचा बाकी होता. जीव मुठीत धरुन बसणे म्हणजे काय याचा त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतला होता.
     या महाकाय वादळाच्या पार्श्वभूमीवर या वादळात तग धरुन राहिलेल्या आमच्या परसातल्या माडाची धोक्याची टांगती तलवार मात्र डोक्यावर कायम होती. परत केव्हाही वारा सुरु होईल आणि हा माड आपला घात करील ही भीती सतत कायम होती. वास्तवीक माडाला म्हणजे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो होतो की, नारळाचे झाड कधीही कोणाच्याही जीवाला इजा होऊ देत नाही. परंतु तो काळ वेगळा होता. प्रत्येकजण आपल्या मर्यादा पाळून होता. माणूस नेहमी मोठ्या झाडांपासून सुरक्षीत अंतरावर रहात होता. त्यावेळी माडाचा नारळ पडलाय म्हणून किंवा झाप पडलाय म्हणून कोणी जखमी झाल्याचे कधी ऐकले नव्हते. हल्ली शहरांमध्ये आपण बघतो, सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये नारळाचे झाड लावलेले असते. हळू हळू ते मोठे होते. त्या झाडाखाली कार पार्कींग केली जाते. मग कधीतरी त्या माडाचा झाप अथवा नारळ त्या कारवर पडतो. गाडीचा पत्रा फाटतो, काच फुटते. याचा दोष त्या माडाला देऊन कसा चालेल.  
     वादळाच्या परिस्थितीतून सगळे थोडेफार सावरल्या नंतर आमच्या परसातल्या माडाला तोडायचे ठरले. परंतु आता सगळीकडेच झाडे उन्मळुन पडलेली होती. वीजेच्या खांबावर, तारांवर झाडे आणि झाडाच्या फांद्या पडल्या होत्या. अनेक घरांवर झाडे कोसळली होती. त्यामुळे एवढा मोठा चाळीस फूट उंचीचा घरांना धोकादायक झालेला माड तोडायचा म्हणजे कसबी तोड्याची जरुरी होती. आत्ताच्या परिस्थितीत त्यांचीच वानवा होती. कारण प्रत्येकाचेच काम तातडीचे होते. शेवटी आमच्या पाखाडीतील एकाला माझ्या पुतण्याने तयार केले. त्याची एक अडचण होती. त्याच्याकडे एकच कटर होता तो दुसरीकडे अडकला होता. त्यामुळे त्याला कटरची गरज होती. ती गरज देखील पुतण्याने भागवली. श्रीवर्धनमधील सर्व ए.टी.एम्. बंद होती म्हणून लागणाऱ्या पैशाची व्यवस्था करण्याकरीता पुतण्याने महाड गाठले. अशातऱ्हेने आमचा परसातला माड आज धारातिर्थी पडला. हे काम पूर्ण झाल्यावर त्याने मला व्हॉटस् अँपवर वरील मेसेज पाठवला. तो मेसेज वाचल्यानंतर मला त्या माडाच्या जन्मापासूनचा इतिहास आठवला.

*******
     आक्षीच्या स्तंभावरुन नागांवला जाणाऱ्या रस्त्यावर लगेचच पेठे गल्ली नावाची गल्ली आहे. त्या गल्लीतुन आत गेल्यावर समोरच पेठ्यांचे खाजगी गणपतीचे मंदिर आहे. त्या मंदिराकडे तोंडकरुन पेठ्यांचा भलामोठा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये पेठेकाकू नांवाच्या आजी रहात होत्या. मी त्यांना पहिल्यांदा १९८५ साली पाहिले तेव्हा त्या जवळपास पंचाहत्तर वर्षांच्या असाव्यात. त्यांच्या घरामागे त्यांची नारळा पोफळींची वाडी होती. त्या वाडीच्या पाठिमागे त्यांचे भाट होते. त्या भाटाच्या मागे त्यांचीच शेती होती. वास्तवीक पेठेकांकूंच्या वयाचा विचार करता त्यांना त्यांच्या वाड्याचा पूर्ण केर काढणे देखील शक्य नव्हते. तरीही त्या शेतीवाडी सांभाळायची म्हणून आक्षीत एकट्या रहात होत्या. त्यांची मुलगी नाशिकला तर मुलगा मुंबईला रहात असे.
     माझे सासरे त्याच काळात आपला मुंबईचा संसार मोडून गांवी आक्षीला रहायला आले होते. गावी शेती वाडी करायची जोडीला म्हशी घेऊन त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरु केला, त्याच्या जोडीला एक बैलजोडी घेऊन ते बैलगाडी भाड्याने लावीत असत. दारात असलेल्या गुराढोरांना चारापाण्याची व्यवस्था करणे मोठे जिकीरीचे काम असायचे. त्याकरीता ते सतत शोधात असायचे. त्याकरीता कुठे वाल निवडायला जा कुठे, भाताची मळणी चालू असेल तर तिथे जाऊन पेंढे खरेदी कर असा त्याचा व्याप चालू असायचा.
     याच काळांत एके दिवशी त्यांना पेठेकाकूंचा निरोप आला एकदा येऊन मला भेटून जा. येताना बायकोला देखील आण. पेठेकाकूंचा निरोप समजल्यावर माझे सासरे उभयता पेठेकाकूंना भेटायला गेले. पेठेकाकूंनी त्यांचे आणि माझ्या सासुबाईंचे स्वागत करुन झाल्यानंतर दोघांनाही विचारले, अरे बगाराम! माझे आता वय झाले आहे, त्यामुळे दारातल्या गणपतीची पूजा करणे मला जमत नाही रे! तू हल्लीच मुंबईहून आक्षीत रहायला आला आहेस, माझ्या या गणपतीची पूजा करायची जबाबदारी तू घेशील कां?
            त्यावर माझ्या सासऱ्यांनी गणपतीची पूजा करायचे कबुल केले. फक्त मीच नव्हे तर घरातिल कोणीतरी येऊन पूजा करुन जाईल असे सांगतले. त्यानंतर पेठेकाकूंचा आणि माझ्या सासुरवाडीचा घरोबा वाढला. पुढे माझे सासरे त्यांचे शेत करु लागले.
     काही काळाने आमचे लग्न झाले. आपल्याकडे लग्नामध्ये नवऱ्यामुलीची पाठवणी करताना असोली नारळाने ओटी भरायची पध्दत आहेच. त्याप्रमाणे आमच्या लग्नात पाटवणी करताना ओटी भरण्याकरीता म्हणून पेठेकाकूंनी त्यांच्या भाटातल्या मोहाच्या नारळाची सुकड आवर्जुन पाठवुन दिली होती. या नारळाचे वैशिष्ट म्हणजे हा नारळ सर्वसाधारण नारळाच्या दिडपट ते दुप्पट होईल एवढा मोठा होता. त्या नारळाचे खोबरे खवल्यावर मध्यम आकाराचे एकवीस मोदक सहज होत असत.
     लग्नांत ओटी भरलेली ती सुकडीला नंतर मोड आला त्यानंतर तो माडाचा रोपा आम्ही आमच्या परसात लावला. बघता बघता तो रोपा मोठा होऊ लागला. त्याच्या बरोबरच आम्ही दोन सिंगापुरी आणि एक केरळमधील संकरीत नाराळाचे रोपे लावले होते. त्यातील सिंगापुरी माडाला नारळ येऊन आठ दहा वर्षांत ते माड मरुन देखील गेले. केरळी माडाला देखील सात आठ वर्षांत नारळ यायला लागले होते. परंतु दहा वर्षे झाली, अकरा वर्षे जाली तरी हा मोहाचा माड मात्र नुसताच वाढत होता. त्यानंतर मात्र त्या माडाला नारळ यायला लागले.
     नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. त्याला कारण नारळाच्या झाडाचा कोणताच भाग निरुपयोगी नसतो. नारळाचे झाड लहान असले तरी त्याच्यापासुन झाप मिळतात. त्या झापांपासुन विणलेले झाप तयार होतात. पूर्वी घराचे पावसाच्या झडी पासुन रक्षण करण्याकरीता पागोळी बांधायला हे झाप उपयोगी पडत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी कोळी लोक आपल्या मच्छीमारी नौका बंदरात आणून उभ्या करीत असत. नारळी पोर्णिमा होईपर्यंत त्या नौका शाकारुन ठेवीत असत. त्या नौका म्हणजेच गलबते शाकारायला माडाचे विणलेले झाप लागत असत. त्या सिझनमध्ये झापांचे दुर्भिक्ष निर्माण व्हायचे. याशिवाय त्या काळात आडोसा करायला कुड बांधले जायचे त्या कुडांना देखील विणलेले झाप उपयोगी पडायचे. कोंकणातिल गरीबाची  झोपडी देखील या झापांनी शाकारलेली आणि आडोसा म्हणून झापांच्या कुडांनी झाकलेली असायची. इतकेच नाही तर त्याकाळात घरोघरी फारसे संडास नव्हते. माडाच्या झापांनी कुडलेले गावठी संडास तेव्हा सगळीकडे सर्रास बघायला मिळायचे. त्याकाळात बाथरुम देखील झापांचे छप्पर, झापांच्या कुडाच्या भिंती आणि आंघोळीला बसायला मोठ्ठा जांभ्यादगडाचा चौरंग अशा पध्दतीचे असायचे.  आता प्लॅस्टीकचा जमाना आला त्यामुळे या इको फ्रेंडली वस्तूकडे दुर्लक्ष झालेले आहे. नारळाच्या झापांच्या पात्यामधिल हिर काढले की, त्याची उत्तम केरसुणी होते. तिला मात्र आजही खूप मागणी आहे. हिर काढुन उरलेल्या पात्या पाणी तापवायला जळवण म्हणून उपयोगी पडतात. हा झाला माडाला नारळ येईपर्यंत मिळणाऱ्या उत्पन्नाचा भाग.
     माडाला नारळ यायला लागल्यानंतर त्यापासून नारळ मिळतात. ते नारळ सोलल्यानंतर त्याची चोडे एकतर जळणाकरीता उपयोगी होतात. किंवा कसबी कारागिर असेल तर त्या चोडांपासुन उत्तम दोरी तयार करतो. या शिवाय हल्ली या चोडांपासून मॅट्रेसेस तयार करतात त्याला खूप मागणी आहे. नारळाची करवंटी सुध्दा उपयोगी आहे. तिच्यापासून तेल काढतात, ते तेल पावसात पाय सतत पाण्यामध्ये राहिल्यामुळे कुजतात त्यावर उत्तम एक औषध आहे. अशा तऱ्हेने एक नारळाचे झाड कितीप्रकारे उत्पन्न देते हे लक्षांत येते.
     काही कारणाने नारळाचे झाड पडले, मोडले किंवा अनेक वर्षांच्या सेवेतून निवृत्त होऊन धारातिर्थी पडले तर त्याचे खोड देखिल उपयोगी पडते. त्याच्या खोडापासुन घराकरीता टिकाऊ भाले किंवा वासे होतात. आमच्या जुन्या घरात माझ्या पणजोबांपासुनची माडाची भाले होती. जुन्या काळातील घर म्हणजे चार मेढी उभ्या करायच्या त्या मेढींवर माडाचे अखंड न चिरता भाल ठेवायचे, त्यावर माडाचेच खांब उभे करुन, त्यावर माडाचेच वासे घालायचे. त्या वाशांवर पोफळीच्या रिफा बांधायच्या त्यावर पोफळीच्या झावळ्यांनी घर शाकारायचे सर्व वस्तू मागच्या वाडीतल्या असायच्या. हे सगळे बांधण्याकरीता नारळाच्या चोडांपासुन बनवलेली दोरी आणि केळीचे सोपट यांचा वापर व्हायचा. अशा प्रकारे कोंकणातिल लोक या माडाच्या भरवश्यावर आत्मनिर्भर होते.  
     असा हा आमचा परसातला माड आमच्या लग्नाची जिती जागती आठवण होता. गेली चौतीसस वर्षे तो आम्हाला काही ना काही देत आला आहे. हा नारळ मोहाचा होता. जर उतरला तर त्याचे खोबरे खूप गोड लागायचे. नारळाची साईज देखील बाजरात मिळणाऱ्या केरळी नारळाच्या दुप्पट मोठी होती. त्या माडाच्या नारळाची रोपे अनेक ठिकाणी दिली होती. त्यातिल किती या वादळात तग धरुन आहेत देवजाणे. आता सुध्दा एवढ्या भयानक वादळात त्याने आम्हाला कोणतीही हानी पोचवीली नाही. आता तो आम्हाला धोकादायक वाटायला लागला कारण, आम्ही आमच्या मर्यादा ओलांडल्या. आमच्या घरापासुन तीस फुटावर असणाऱ्या या झाडाखाली आम्ही अतिक्रमण केले. आम्हाला रहायला घर कमी पडू लागले, आम्हाला सुखसोई हव्या म्हणून आम्ही त्याच्या छायेखाली गेलो. त्याची शिक्षा त्याने आम्हाला दिली नाही. त्याने आमच्यावर मोह दाखवुन आम्हाला माफच केले. परंतु आम्ही मात्र आमच्या मोहापायी त्याच्या या उपकाराची फेड त्याचा बळी देऊन केली. या जगात मानवाच्या जीवाला जादा महत्व आहे हेच खरे.
     अशा या गेली पस्तीस वर्षे माझ्या कुटूंबाच्या सहवासात असणाऱ्या आणि सतत काहीतरी देत रहाणाऱ्या आमच्या या मोहाच्या नारळाला माझी भावपूर्ण श्रध्दांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा