शुक्रवार, १३ मार्च, २०२०

पद्मश्री डॉक्टर विष्णू श्रीधर तथा हरिभाऊ वाकणकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व भाग पहिला


     
पद्मश्री डॉक्टर विष्णू श्रीधर तथा

हरिभाऊ वाकणकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व
भाग पहिला


      दहा वर्षापूर्वी मला श्रीवर्धन तालुक्यांत रहात असणाऱ्या आम्हा वाकणकरांच्या चार घरांपलिकडे कोणी वाकणकर आहेत हेच माहित नव्हते. त्यानंतर अचानक माझ्या मनांत वाकणकर कुठे कुठे रहातात हे शोधावे असे आले. त्याकरीता प्रयत्न सुरु केले तेव्हा अक्षरश: वाकणकरांच्या माहितीचा धबधबाच समोर प्रकट झाला. वाकणकरांमध्ये अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे होऊन गेली आणि सध्या देखिल आहेत. त्यामध्ये विशेष उल्लेख करायचा तर त्यात अग्रणी असलेले नांव आहे, पद्मश्री डॉक्टर विष्णू श्रीधर तथा हरिभाऊ वाकणकर.
     मी जेव्हा वाकणकरांचा शोध सुरु केला तेव्हा गुगल सर्च मध्ये नुसते वाकणकर नांव टाकले की, हरिभाऊंच्या बाबत माहिती असलेली अनेक पाने समोर यायची. या वर्षी हरिभाऊंची जन्म शताब्दी आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारती तर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हरीभाऊंच्या कार्याची आपल्या परिचितांना ओळख व्हावी म्हणून या लेखाचा प्रपंच करीत आहे. हरिभाऊंच्या कार्याची नुसती ओळख करुन द्यायची म्हटली तरी मला अक्षरष: घाम फुटला आहे. ते खरोखरच शापित गंधर्व होते. त्यांनी हातात घेतलेली प्रचंड कामे पाहिली की, आपण किती क्षुद्र आहोत याची जाणिव होते. तेव्हा आता नमनालाच घडाभर तेल वाया न दवडता त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अल्प परिचय करुन द्यायचा प्रयत्न करीत आहे.
     हरिभाऊंचा जन्म मध्यप्रदेशांतिल मंदसौर जिल्र्ह्यातिल निमच या गांवी दिनांक ४ मे १९१९ रोजी झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशांतच झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना कलेविषयी, विशेषतः चित्रकलेबद्दल, ओढ होती. त्यांना निरनिराळ्या ठिकाणी फिरून चित्रे काढायला व प्रवास करायला आवडत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून आदिवासींमधे समाजकार्य व शैक्षणिक कार्य करण्यासाठी ते घनदाट जंगलात जात असत. त्यांनी मुंबई येथे जी. डी. आर्ट केले.
     त्यांनी अखिल भारतिय विद्यार्थी परिषदचे मध्यप्रदेश प्रांत प्रमुख म्हणुन काम केले होते. ते काही वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करीत होते. राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे मध्यप्रदेशातिलच असलेले जेष्ट स्वयंसेवक श्री मोरोपंत पिंगळे यांनी हरिभाऊंना भारतिय संस्कृतीच्या इतिहासाचे दर्शन सर्व जगाला होईल असे संशोधन करण्याची मुख्य प्रेरणा दिली. आता मी त्यांच्या जिवनातिल महत्वाच्या संशोधनाविषयी मला जमेल तशी थोडक्यांत माहिती देणार आहे.
 १)  हरिभाऊंचे ऐतिहासिक संशोधन भिमबैठका येथिल कातळचित्रे(Rock Painting)  आणि गुंफा(Rock Shelters).
    १९५७ साली हरिभाऊ राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकिला हजर रहाण्यासाठी नागपुरला जात होते. उज्जैनहून रेल्वेने नागपुर येथे जाताना त्यांची पॅसेंजर ट्रेन ओबेदुल्ला गंज या रेल्वे स्थानकात थांबली होती तेव्हा विंध्याचल पर्वत रांगांमध्ये त्यांना प्राचिन शिलाखंडांचा एक समुह दृष्टीस पडला. त्यांच्या अनुभवी नजरेने आणि त्यांच्यामध्ये लपुन बसलेल्या संशोधकाला त्यात विशेष काहीतरी आहे हे जाणवले. म्हणून त्यांनी आपला प्रवास अचानक संपवण्याचे ठरवुन ते तेथिल बरखेडा या रेल्वेच्या छोट्याशा स्थानकावर उतरले. नागर वेषातला कोणीतरी प्रवासी या जंगलातल्या छोट्याशा स्थानकावर उतरलेला बघुन तेथिल स्टेशन मास्तर देखिल चकीत झाला. त्याने त्यांची विचारपुस केली आणि त्यांना त्या दुर्गम प्रदेशात रात्रीच्यावेळी न जाता दिवस उजाडल्यावर जाण्याचा सल्ला दिला. तेथे तो स्टेशन मास्तर एकटाच रहात होता. त्याने आपल्याबरोबर हरिभाऊंचे देखिल जेवण बनवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच हरिभाऊंनी त्या डोंगराकडे प्रस्थान केले.

तो दिवस होता २३ मार्च १९५७. हरिभाऊ जेव्हा जेव्हा अशाप्रकारे शोधकार्याला जात असत तेव्हा आपल्या खिशांत तिखटमीठ आणि बटाटे घेऊन जात असत. किंबहूना असे साहित्य त्यांच्याकडे कायमच असे. यावेळी देखिल त्यांच्या सोबत असेच बटाटे होते ते त्यांनी वाटेतल्या जामुनजेरी नावाच्या एका नाल्याच्या कोरड्या पात्रातील वाळूंत पुरले आणि आपल्या पुढीला मार्गाला लागले. तेथे त्यांना एक दुर्गा मंदिर दिसले. त्या दुर्गा मंदिरात शालिग्रामदासमहाराज होते. त्यांच्याशी मुलाखत झाल्यावर ते देखिल हरिभाऊंच्या सोबत सर्व परिसर त्यांना दाखवायला गेले.

     हरिभाऊंनी अनेक वर्षे आदिवासी विभागात आणि मध्यप्रदेशमधिल खेडेगावातून संघाचे काम केलेले होते त्यामुळे त्यांना स्थानिक भाषा चांगल्या बोलता येत असत. डोंगराजवळ गेल्यावर त्यांनी तेथिल स्थानिक आदिवासींकडे या मोठाल्या कातळांविषयी चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांनी अनेक दंतकथा सांगितल्या.
     या शिलाखंडाचा आणि त्यातिल चित्रांचा संबंध पांडवांशी देखिल लावला जात असे. पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते या भागात रहात होते आणि येथे आजुबाजुला असलेली पठारे ही त्यांचे बैठकीचे स्थान होते म्हणून या भागाला भिमबैठका असे संबोधले जाते. या दंतकथेला अनुसरुनच येथे बाणगंगा नावाचे एक स्थान आहे. तशी बाणगंगा नावाची अनेक स्थाने भारतभर पसरलेली आहेत. पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला असा महाभारतात उल्लेख आहे. त्याकथेला अनुसरुन या वनविभागाला लाखाजुवार असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे येथे  पंडापुर आणि भिमपुर या नांवाची गांवे देखिल आहेत. दुसरी दंतकथा म्हणजे ही चित्रे जखणीने म्हणजे स्त्री भूताने काढली आहेत असा येथिल आदिवासींचा समज होता.
     हरिभाऊंनी आपल्या मदतनिसांसह येथिल सर्व शैलचित्रांचा(Rock Painting) अभ्यास केला. त्यांचे विषयवार ग्रुप बनवले. त्यामध्ये शिकारीची, युध्दाची, धार्मिक प्रसंगाची, नृत्याची अशी विविध प्रकारची चित्रे होती. प्रत्येक प्रकारच्या चित्रांच्या समुहाला त्यांनी स्वतंत्र नावे दिली होती. आजही तिच नांवे तेथे प्रचलित आहेत.  ते स्वत: चित्रकार होते, तसेच चित्रकला शिक्षक देखिल होते. त्यामुळे त्यांनी स्वत:  आणि त्यांच्या चित्रकला विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्व शैलचित्रांचे स्केचेस काढले. आधुनिक कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्यांचे चित्रिकरण केले.
     या भागात एकुण सात ठिकाणी अशाप्रकारच्या गुंफा(Rock Shelter) आणि कातळचित्रे आहेत. त्यामध्ये तीस हजार ते दहा हजार वर्षांपूर्वी पासुनची चित्रे त्यांना आढळली. ही सर्व कातळचित्रे(Rock Painting)  आणि गुंफा(Rock Shelter)  नऊ किलोमिटर परिसरांत पसरलेल्या आहेत. विध्यांचलाच्या १) विनायक, २) भोन्रावली, ३) भिमबैठका, ४) लाखाजुआर पूर्व ५)लाखाजुआर पश्चिम ६) झोंड्रा, ७)मुनीबाबकी पहाडी अशा सात टेकड्यावर  ही सर्व कातळ चित्रे(Rock Painting) आणि गुंफा(Rock Shelter)  त्यांना आढळल्या होत्या.
     आज आपण भिमबैठका येथे भेट देतो तेव्हा तिथे डांबरी रस्ता, प्रत्येक गुंफेपर्यंत जायला व्यवस्थित बांधलेली पायवाट अशा सुखासिन वाटेने जातो तरी आपल्याला दम लागतो. हरिभाऊंनी जेव्हा हे ठिकाण शोधुन काढले तेव्हा तेथे माणसाची वर्दळ फार कमी होती. त्यामुळे पायवाटा त्यासुध्दा खाचखळगे, काटेकुटे यांनी भरलेल्या होत्या. त्यातच सर्वत्र हिंस्त्र श्वापदांचा मुक्त वावर होता. अशा परिस्थितीत हरीभाऊ सतत पंधरा वर्षे स्वत:ची शिदोरी बरोबर घेऊन तिथे जात होते संशोधन करीत होते. सर्व परिसराचे डॉक्युमेंटेशन करत होते.
     या ठिकाणी एकुण ७६० गुंफा त्यांनी शोधुन काढल्या. या सर्व गुंफांमध्ये अनेक प्रकारची चित्रे काढलेली होती. या ७६० पैकी जवळपास ५००च्यावर गुंफांमध्ये गुंफेच्या छतांवरही चित्रे काढलेली आढळली आहेत. या सर्व गुफामध्ये पुरातन काळातिल कलेचा नमुना असलेल्या चित्रांचा अक्षरष: खजिनाच हरिभाऊंना सापडला होता. ही चित्रे काढण्याकरीता वापरलेले रंग वनस्पतींपासुन अथवा उपलब्ध असणाऱ्या खजिनांमधुन म्हणजेच गेरु वगैरे नैसर्गिक साधने यांच्यापासुन बनवले होते. त्यामध्ये पांढरा, लाल आणि हिरवा रंग वापरल्याचे आपल्याला आढळते.
     या चित्रांमध्ये ह्त्ती, घोडे, वाघ, शेतकरी, निरनिराळी शेतीची अवजारे, भाला, काठी यासारखी शिकारीची अवजारे यांची चित्रे आपल्याला आढळतात. आपण म्हणतो भारत मागासलेला देश आहे. परंतु तीस हजार वर्षापूर्वी जेथे बाकीचे जगच अस्तित्वात होते का नाही य़ाची खात्री नाही तेथे चिरंतन टिकणारी काळाच्या ओघात निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तींना तोड देऊनही तगुन राहीलेली कलाकृती आज आपण येथे पाहू शकतो. या सर्व चित्रांमधुन एक एक संदेश दिलेला असतो. ती ती चित्रे त्याकाळातल्या घटनांचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यामुळे या चित्रांना ऐतिहासिक महत्व आहे. या चित्रांना एक भाषा आहे, मात्र ती भाषा ओळखणारा तज्ञ तेथे पाहिजे, तोच या सर्व चित्रांतुन दिलेला संदेश उलगडु शकेल.

     त्यानंतर १९७२ साली येथे पुरातत्वीय उत्खनन केले गेले. त्या उत्खननात हरिभाऊंना पाषाणयुगातिल हत्यारे सापडली. त्यामध्ये दगडाचे भाले, कुऱ्हाड अशी अनेक प्रकारची हत्यारे होती. ती आपल्याला उज्जैन येथिल वाकणकर म्युझियम मध्ये पहायला मिळतिल. त्यावरुने येथे लाखो वर्षांपूर्वी देखिल मानवी वस्ती होती हे पुराव्याने सिध्द झाले आहे. या परिसरातील एका उत्खननात त्यांना एका छोट्या मुलाचे दहा हजार वर्षापूर्वीचे शव मिळाले. ते आतापर्यंत जगात मिळालेल्या शवांमध्ये सर्वात पुरातन आहे. त्याचा अभ्यास करण्याकरीता जगभरातुन अनेक संशोधक विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये येतात.
     या सर्व संशोधनाचे सादरीकरण त्यांनी फ्रान्समध्ये भरलेल्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका परिषदेमध्ये सर्वप्रथम सादर केले. युरोप अमेरिकेतही या सर्व चित्रांचे प्रदर्शन आणि सादरीकरण त्यांनी व्याख्यानांसह केले. त्यानंतर रितसर संशोधनानंतर युनेश्कोने त्यांच्या या संशोधनाला मान्यता दिली. भारतिय पुरातत्व खात्याने ऑगस्ट १९९० मध्ये भिमबैठकाला राष्ट्रिय वारसा स्थळ म्हणून घोषित केले. यानंतर २००३ साली या स्थळाला जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने जाहिर केले.
     या पाषाण चित्रांचे पुरातत्व शास्त्रानुसार रितसर संशोधन व्हावे या हेतूने हरिभाऊंनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधिल जेष्ट पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. एच्. डि. सांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या गुंफाचित्रांवर शोधनिबंध सादर केला. या त्यांच्या संशोधनाला पी. एच् डि देण्यांत आली. अशातऱ्हेने हरिभाऊ डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर झाले.

         जगाने देखिल त्यांच्या या संशोधनाची दखल घेतली. त्यांना जगातिल अनेक देशांनी या आणि संशोधनाशी संबधित अनेक विषयांत मार्गदर्शन करण्या करीता त्यांना मानाने बोलावले होते. त्यांनी परदेशांत व्हरकोनियम या रोमन साईटवर इंग्लंड येथे १९६१ साली, फ्रान्स मध्ये इनकेलिव्ह येथे १९६२ मध्ये त्यांनी उत्खनन केले होते.
हरिभाऊंनी चार हजारपेक्षा जास्त कातळ शिल्पे, कातळ चित्रे शोधुन काढली आणि त्यांचा अभ्यास केला. महेश्वर येथे १९५४ मध्ये, नावडा टोली येथे १९५५ मध्ये, इंद्रगड येथे १९५९ मध्ये, मनोटी आणि आवरा येथे १९६० मध्ये, कायथा येथे १९६६ मध्ये, आझादनगर आणि दंगवाडा येथे १९७४ मध्ये, रुनिजा येथे १९८० मध्ये पुरातत्वीय उत्खनन केले.

*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा