शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस २३ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस २३ वा

     सगळे जमले. पण विलास लंगडत येत होता म्हणून जरा थांबले. मधूने पायऱ्या चढताना हात दिला.

आजींनी विचारले, कुठल्या लढाईवर गेला होतास?’

            विलास म्हणाला, तेव्हढा पराक्रम गाजवण्याची पात्रता आहेच कोठे?SS करीत गुडघा धरून बसला. बघा आजी! नमस्कार सुध्दा विसरलो. आता बसूनच करतो. आजी मी कमनशिबीच! सकाळपासूनच तीनदा अनुभव आला. काल रात्री टी. व्ही. पहात बसलो. मग आज उठायला उशीर झाला. सगळ्यांचा चहा आटोपला. माझा कप आईने हातात दिला. गरम होता म्हणून बशी आणायला वळलो, तो खुर्चीचा धक्का लागून कपाचे सरळ दोन तुकडे झाले. पुन्हा चहा तर नाहीच. पण आईची शब्दपुष्पांजली ऐकायला लागली.

     मी फुले आणायचे निमित्त केले आणि बागेत पळालो. स्नानानंतर आईने गरम बेसनाचा लाडू खायला दिला. घाम पुसायला टॉवेल घेऊनच बसावे म्हणून लाडवाची वाटी कपाटावर ठेवून न्हाणी घरांत गेलो. टॉवेल घेऊन येईपर्यंत बोक्याने लाडू फस्त केला. आई नी बाबा हसत सुटले. पण पुन्हा लाडू मिळाला नाही. मग सांगा मी कमनशिबीच नां?’

     झालं! बाबांना कार काढायची म्हणून फाटक उघडायला गेलो, तर ठेच लागली आणि पडलो. गुडघ्याला खरचटले. रडलो नी काय? त्याच कारमधून दवाखाना गाठला. ड्रेसिंग करून आलो.

     गणपती म्हणाला, वा! वा! तैमुरलंग! आता दोन दिवस धडाधडा उड्या नाही मारता येणार.

     आजी म्हणाल्या, विलास! तुला अविवेकाचे फळ तत्काळ मिळाले. हातातला कप टेबलावर ठेवून बशी आणली असती तर!

     सुधा म्हणाली, पण कपाच आयुष्यच संपलं ना! म्हणून तस झाल. शिवाय चहा सांडला ती जागा विलासनेच स्वच्छ केली असती, तरी त्याच्या आईने पुन्हा चहा दिला असता.

     आजी म्हणाल्या, अगदी बरोबर! तसंच लाडवाची वाटी....

     विलास म्हणाला, आजी! तो लाडू बोक्याच्याच नशिबात होता. एरव्ही त्याला गरम लाडू कोण देतयं?’

     गणपती म्हणाला, हे सारं आता आपली चूक झाकण्यासाठी हं!

     आजी म्हणाल्या, अगदी खरं! मनुष्य योग्य प्रयत्न करीत नाही. अपयश आले की, दैवाच्या माथ्यावर खापर फोडायचे! म्हणून आधीच विवेकाने विचार करून काम केले की, फसगत होत नाही. समर्थांनी अगदी समर्पक उदाहरण दिले आहे बघ.

पर्णाळि  पाहोन  उचले | जीवसृष्टि  विवेकें  चाले | आणि पुरुष होऊन भ्रमले | यासी काये म्हणावें ||१२-१-११||श्रीराम।।  


     पानावरची आळी, तांदळातली आळी, भगरीतली आळी आधी पुढचा आधार शोधते, मगच मागचे पाय उचलते. तिच्या ठिकाणी इतका विवेक आहे. मग बुध्दीमान असून पुढचा विचार करून काम का करीत नाही?’

            जया म्हणाली, पुन्हा काम फसले तर आपली चूक समजावून न घेता दुसऱ्याला चटदिशी दोष देतो हे पण एक पापच की!

     विलास!’ आजी म्हणाल्या, पायाकडे बघून चालावे असे वडील माणसे सांगतात. पाहून चालले तर ठेच लागत नाही. काचेने पाय कापत नाही.

     मधू म्हणाला, आजी! आम्ही आता स्वयंसेवक होणार नं? मग रस्त्यावरील काट्याची फांदी उचलून दूर फेकायला हवी. काचांचे तुकडे कोणी वापर करीत नाहीत अशा जागेवर टाकायला हवेत. म्हणजे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही.

     आजी म्हणाल्या, मधू! बरोबर आह तुझे म्हणणे. ही ओवी वाच.. म्हणौन असावी दीर्घ सूचना | अखंड करावी चाळणा | पुढील होणार अनुमाना | आणून  सोडावें  ||१२-१-१२||श्रीराम।।

     मी सांगतो अर्थ, कार्य हाती घेतले की पुढचा विचार करून ठेवावा. विवेकाने वागल्यास पुढच्या परिणामांचा तर्क बरोबर करता येतो. पुढची संकटे टळतात. म्हणजेच बरीच संकटे टळतात. संकटे विवेक न करात कार्य केल्याने येतात. असेच होते नाही कां?’

     सुधा म्हणाली, आपल्या अपयशाचे मानकरी आपणच असतो. मग दुसऱ्याला दोष देत बसलो की लोकांत, घरांत काय नी बाहेर काय आपली नाचक्की होते. साहजिकच आपल्यातली सहनशक्ती कमी होते.

     छान! आजी म्हणाल्या, सुधा हाच विचार समर्थांनी सांगितला आहे बघ. वाच तूच.... लोकीं बरें म्हणायाकारणें | भल्यांस लागतें सोसणें | न सोसितां भंडवाणें| सहजचि होये ||१२-२-१३||श्रीराम।।

            आजी म्हणाल्या, जगांत माणसाला वाटते, मला चांगले म्हणावे. लोकांनी मला मानावे. मग चांगले म्हणण्यासारखे आपल्या हातून काम नको का व्हायला? टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. लोकांचे नुसते बोलणेच सोसायचे असे नाही. थोडेफार कष्ट करून देहही झिजवला पाहिजे. परोपकारी वृत्ती वाढविली पाहिजे. कर्तव्य कर्माची जाण ठेवली पाहिजे. कौटुंबीक सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे.

     आत्ताच पहा नं. विलास फाटक उघडताना अडखळला. पडला. गुडघ्याला थोडे खरचटले. फार मोठी जखम नाही. पण सहन करण्याची ताकद नाही. महागाईचा औषध उपचार. २-३ दिवस तरी डॉक्टर ड्रेसिंग करायलाला ये म्हणणार. त्यासाठी बाबांचा खोळंबा. दवाखाना लांबच्या डॉक्टरांचा.

     सुधाच्या आईला कळले असतं तर तुळशीच्या पानांचा रस हळद लावून दोन दिवसांत बरे केले असते. त्या बऱ्याच जणांना फुकट औषध उपचार करतात. त्यांना गावात लोक किती मानतात. पहात आहात ना तुम्ही. आता आजच ठरवू या कां? लहान सहान कामे विचारपूर्वक करून अपयश पदरांत घ्यायचे नाही.

     सर्वांनी हात उंचावले. मधु म्हणाला, स्वावलंबी व्हायचं. मग कांही दिवस लोक हसतीलही.

     नुसते हसतीलच असे नाही बाबा. आजी म्हणाल्या, लावालावी करणे पाय मागे खेटणे, कार्यात अडथळे आणणे असली कामे करणारी माणसे आपल्या भोवती खूप आहेत व असतातही.....

     जया म्हणाली, मग त्यांना तोंड देत कसं जमायचं?’

     आजी म्ह्णाल्या, समर्थांनी दासबोध रचतानाच खरं कळलं की पुढे मागे जया अशी शंका विचारणार. म्हणून त्यांनी लिहूनच ठेवलय बघ. खळ दुर्जन भेटला| क्षमेचा धीर बुडाला | तरी मौनेंचि स्थळत्याग केला | पाहिजे साधकें ||१२-२-२४||श्रीराम।।

     समजलं जया! आजी म्हणाल्या, अशी अडवणूक करणारी कोणी व्यक्ती भेटलीच तर त्यांना मनापासून क्षमाच करावी. समजा आपल्या विचार शक्तीच्या बाहेर त्यांचे कार्य असेल, सहनशिलतेच्या पलिकडले असेल, तर समजूत घालणे, समजावून देणे, क्षमा करणे कुठल्याच भानगडीत न पडता आपण गप्प रहावे. फारच झाले तर तेथून बाजूला सरकावे. त्या जागेचा त्यागच करावा. गणपती ही पुढची ओवी तू वाच...

     गणपतीने दासबोध हाती घेतला. दासबोधाला नमस्कार केला आणि ओवी वाचली. थोर लाहान समान | आपले पारिखे सकळ जन | चढतें  वाढतें  सनेधान  |  करितां  बरें  ||१२-२-२७||श्रीराम।।

            छान!’ आजी म्हणाल्या, कशी छान युक्ती सांगितली नाही कां?’

     जगात कोणी आपल्यापेक्षा मोठे असतील. कोणी लहान असतील कोणी बरोबरीचे असतील. पण कोणीही भेटो. त्यांचेशी प्रेमाने वागायचे. कोणी अगदी जवळच्या नात्याचे असतील, कोणी परकी असतील, तरी सगळ्यांशी साचेबंद प्रेम नको. चढते वाढते प्रेम असावे. प्रेमतंतूनी सर्वांना आपल्याकडे खेचून घ्यावे. ही पण कलाच आहे हं. असे वागणे एकदा का जमले की दोन फायदे होतात.

     ते कोणते?’ विलासने विचारले. आजींनी त्यालाच वाच म्हटले. इहलोक साधायाकारणें | जाणत्याची संगती धरणें | परलोक साधायाकारणें | सद्‍गुरु पाहिजे ||१२-३-२||श्रीराम।। 

     शाब्बास! आजी म्हणाल्या, इहलोकात होरपळून जायला नको असेल तर सत् संगती धरावी. म्हणजेच जाणत्याच्या संगतीत जीवन सार्थकी लावावे. परमार्थात ही व्यावहारीक चतुराई काही उपयोगाची नाही. तेथे स्वस्वरूपाचे ज्ञान देण्याकरीता सद्गुरूच पाहिजेत. ते अनुभवी असल्यामुळे त्यांचे संगतीत परमार्थ सुलभ होतो. परमार्थात मुख्य अडचण कोणती असेल तर, हे जे भोवताली पसरलेले जग दिसतय ते आपण अगदी सत्य मानून चालतो. प्रेमाचा ओघ तेथेच संपुष्टात येतो. म्हणून समर्थ म्हणतात सद्गुरूंचे सान्निद्यात खऱ्या ज्ञानाचा उदय करून घ्यावा... दिसेल तितुकें नासेल | उपजेल तितुकें मरेल | रचेल तितुकें खचेल | रूप मायेचें ||१२-३-१२||श्रीराम।।

            अर्थ तुमच्या लक्षांत आलाच असेल.

     जया म्हणाली, सोपे आहेत शब्द. माया कशी ते सांगितले आहे. जे जे दिसते ते नाश पावते. जे निर्माण होते ते नाहीसे होते. जे जे बनवले जाते ते मोडते. अर्थात याच्या विरूध्द जे नाश पावत नाही ते सत्य. जे जे नाहीसे होत नाही ते शाश्वत. जे मोडणार नाही, आहे तस्सेच रहाते ते अनंत ब्रह्माचे रूप. असेच नां?’

     होय!’ आजी म्हणाल्या, पुढच्याच ओवीत समर्थ काय म्हणतात बघ. सुधा आता तू वाच. विवेकें पाहिला विचार | मनास आलें सारासार | येणेंकरितां  विचार|  सदृढ  जाला  ||१२-३-२१||श्रीराम।।

     आजी म्हणाल्या, जितका जितका विवेकाने आपण विचार करू तितका तितका त्या शाश्वत ब्रह्माचा शोध लागतो. सार असार कळू लागते. बुध्दी सूक्ष्म होते. मग आत्मा अनात्मा ध्यानी येतो. जसजसे विचार सामर्थ्य वाढते तसतसे सूक्ष्मात शिरण्याचे तंत्र साधते. शेवाळ दूर केल्यावर जसे स्वच्छ पाणी दिसते अगदी तसेच असार माईक पसारा दूर केल्यावर ब्रह्म दर्शन घडते.

     विलास म्हणाला, आजी! एक विचारू कां? एवढ्या सगळ्या खटाटोपाने ब्रह्मदर्शनाचा फायदा काय?’

     आजी म्हणाल्या, मानवी देहातच जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असते. मायेच्या जंजाळात सापडून पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा अखंड आनंदात रहाणे योग्य नव्हे कां? तो आनंद ब्रह्म दर्शन होण्यातच असतो. ज्यांना हे साधेल ते खरेच पावन झाले. समर्थ किती आत्मविश्वासाने ठामपणाने सांगतात बघ....नाना किंत निवारले | धोके अवघेचि तुटले | ज्ञानविवेकें पावन जालें | बहुत लोक ||१२-३-३२||श्रीराम।।

     विवेकाने वागणाऱ्या लोकांच्या मनातले संशय सर्व दूर होतात. सर्व संकटे निवारण होतात. समाधान होते. म्हणून सारासार विवेक जागा रहातो. लोक पावन होतात. म्हणून साधकाने योग्य मार्गाने जावे, असे समर्थांना पोटतिडकेने सांगावेसे वाटते. समर्थ पुढे इशारा पण देतात. गणपती तो इशारा कोणता बघ... वैराग्येंविण ज्ञान | तो वेर्थचि साभिमान | लोभदंभें घोळसून | कासाविस केला ||१२-४-९|| श्रीराम।।  

     बाळांनो समजले कां?’ आजी म्हणाल्या, विवेकाचे महत्व सांगून झाले. पण त्याचेच जोडीला काय हवे? तेही सांगत आहेत. ज्ञान झाले, पण अंगी वैराग्य नसेल तर? मनुष्य स्वार्थी, लोभी, मत्सरी बनतो. मात्सर्य भाव वाढत रहातो.

     आजी!’ विलास म्हणाला, वैराग्य म्हणजे काय?’

     सांगते!’ आजी म्हणाल्या, हवे नकोच्या कचाट्यात न सापडणे म्हणजे वैराग्य? देहाने तर नकोच पण मनाने सुध्दा कोठेही कशासाठी अडकून न पडणे म्हणजे वैराग्य. हे पडणे म्हणजे तू आज पडलास तसे नव्हे. मी माझेच्या विचारातून कायमचे सुटणे म्हणजे वैराग्य.

     सुधाने आजींचे बोट पाहून ओवी वाचली. सन्मार्गें जगास मिळाला | म्हणिजे जगदीश वोळला | प्रसंग पाहिजे कळला | कोणीयेक |१२-४-|१७||श्रीराम।।

            आजी म्हणाल्या, बाळांनो, सत् संगती, सद्ग्रंथ श्रवण याने सन्मार्ग सापडतो. लोकांचा तो आवडता होतो. असा साधक लोकप्रिय झाला की समजावे ही ईश्वराची कृपाच. पण जरी ईश्वराची कृपा झाली, तरी विवेक वैराग्य हाती असावेतच. प्रसंगमान पाहून वागता आले पाहिजे. तर तो खरा साधक.

     अशा साधकाने काय करायचे असते माहीत आहे?’ पदार्थ जड आत्मा चंचळ| विमळब्रह्म तें निश्चळ | विवरोन विरे  तत्काळ  |  तद्रूप  होये  ||१२-५-१५|| श्रीराम।।

     पंचभूतात्मक सर्व वस्तू कशा असतात?’

     सर्वांनी एकदम सांगितले, जड आणि नाशिवंत असतात.

     आजी म्हणाल्या, सर्वांचे अंतर्यामी रहाणारा आत्मा कसा असतो?’

     गणपती म्हणाला, साक्षी असतो. चंचल असतो.

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या, त्याही पलीकडे असणारे परब्रह्म विमळ व निश्चळ असते. हा विचार सदैव अंत:करणात बळगला तर कमनशिबी बनू कां?’

     विलास म्हणाला, नक्कीच नाही. सोहं! सोहं!! सोहं!!! त्या परब्रह्माशी तद्रूपच होऊ.

            आजी टाळी वाजवून म्हणाल्या, शाब्बास! आनंद वाटला.

     मारूतीराया बलभीमा हीच बुध्दी वाढीस लागू दे.

     आजींनी नमस्कार केला, त्यानंतर सर्वांनी नमस्कार केला.

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा