।।श्रीराम।।
पडवीवरचा
दासबोध
लेखिका- आशालता
उर्फ आक्का वेलणकर
दिवस ४० वा
सगळी
जमली. पण चेहरे कसे उदास होते. आज सांगता दिवस. उद्या पासून शाळा सुरू होणार.
सकाळची शाळा असली तरी दुपारी इतका वेळ मिळणे कठीण. दुपारची असली तरी सकाळी कसे
जमणार? वेळेचे
गणित कसे जमवायचे?
सुधा
म्हणाली, ‘करणाऱ्याला
हजार वाटा. आपण मारूतीच्या दर्शनाला आरतीला एकत्र यायचे व तासभर थांबून ज्ञानाची
उजळणी करूनच जायचं. पण खंड नाही पाडायचा.’
‘संध्याकाळची
वेळ असेल तर केशव पण श्रवणाला येईन म्हणाला आहे.’ जया म्हणाली.
सुधा
म्हणाली, ‘मंगला
आज रात्रीच गावाहून येईल. ती पण नक्की येत जाईल. आपण आजींना विचारू या.’
‘त्या हो म्हणणारच!’ विलासने
ठामपणाने सांगितले. इतक्यांत आजी बाहेर आल्या.
‘बाळांनो! चांगलीच गोष्ट
आहे. मी नको कशी म्हणेन?
पडवीवर दिव्याची सोय आजच करून घेते,’आजी म्हणाल्या.
मधू
म्हणाला, ‘आजी! आम्ही शालेय
अभ्यास करता करताच अध्यात्मात भक्तीमार्गात पुढे यावे ही तुमची तळमळ पाहूनच आम्ही
भारावुन गेलो आहोत. हुंदडायला वाडा मोकळा आहे. कारंज्याभोवती फिरून शिवाशिवीला मजा
येते. येवढाच आमचा वाड्यात येण्याचा हेतू होता. या वाड्याने आम्हाला वेडच लावलं.
तुमचे आभार......’
आजींनी
नाकावर बोट ठेवून, अहं पुढचे नाही बोलायचं असे सूचवले. ‘बाळांनो! हे जे सगळं
चाललंय ते गुण आत्म्याचे. तो आत्माराम काय करतो म्हणण्यापेक्षा काय करीत नाही? असे जर शोधायला
गेलो, तर आपण शोधतो ते काम पण गुण आत्म्याचेच. म्हणून लक्षांत ठेवायचं.....’ आत्मरामउपासना | तेणें पावले निरंजना | निसंदेहे अनुष्ठना | ठावचि
नाहीं ||२०-६-३०||श्रीराम||
‘जगातला,
विश्वातला, ब्रह्मांडातला, त्या अनंत कोटी ब्रह्मांडातला कण नी कण अंतरात्म्याच्या
सत्तेतच वावरत आहे. त्या अंतरात्म्याला दृष्यांत पहाणे हीच खरी उपासना. अशी उपासना
करता करताच निरंजन परब्रह्माची भेट होते. उपासना फलद्रूप होऊ लागली की नि:संदेह, संशय
रहित, भ्रमरहित
अशी अवस्था साधकाची होते. कल्पना ही मायेच्या कक्षेत येते साधक कल्पनारहित झाला की
ब्रह्मपदाला पोहोचला म्हणून समजावे.’
मधू
म्हणाला, ‘हा
ब्रह्मपदाचा अनुभव एकाएकी येणार नाही. त्या अनुभवाची पहिली खूण कोणती?’
‘सांगते!’ आजी
म्हणाल्या, ‘समर्थांनी
खूप दूर दृष्टीने दासबोध रचलाय. त्यात इतकाही संशय कोणाला कधी राहू नये. ही ओवीच
पहा...’ निश्चळ चंचळ आणी जड | पिंडीं करावा निवाड | प्रत्ययावेगळें जाड |
बोलणें नाहीं
||२०-७-१३||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘आपला देह तीन तत्वांचा. देह पंचभूताचा
म्हणजे जड अंतरात्मा चंचळ व परब्रह्म निश्चळ. या तिन्ही गोष्टी देहात कशा वावरतात.
हा अभ्यास करणे आपल्या हातात आहे. फक्त त्यासाठी एकांत व मननाची संवय हवी. मग
अनुभव दूर नाही. अनुभवाचे बोलणे प्रभावी असते.’
‘मधू! आता दुसरा टप्पा पहा. साधारणपणे जीव या
दृष्यातल्या मोहकतेने आकर्षिला जातो. नानात्वाने भांबावतो व तेथेच रेंगाळतो.
त्यातून मन बाहेर काढणे आवश्यक म्हणून समर्थ सांगतात....’ जें संव्हारामधें सापडले | तें
सहजचि नासिवंत जालें | जाणते लोकीं उगविलें | पाहिजे कोडें ||२०-७-२२||श्रीराम||
‘जाणता म्हणजे ज्ञानी, कार्यकर्ता,
महंत, पुढारी यांनी लक्षांत ठेवावे की ज्याचा ज्याचा नाश होतो, त्या नाशिवंतावरचे
प्रेम पण नाश पावते. निर्माण होते ते नाश पावते. जडाचा नाश होतो, तसा चंचळाचा पण
नाश होतो. फक्त निश्चळ असणारे परब्रह्म तेवढे नाश पावत नाही. म्हणून उपासना करत
त्या दिव्य शक्तीशी एकरूप होण्याचा प्रयत्न व्हायला हवा.’
विलास म्हणाला, ‘जन्मापासून ज्यात मन गुंतलय ते बाहेर
काढणे कठीण. मग काय करावे?’
आजी म्हणाल्या, ‘त्यासाठीच त्यागाची कल्पना पुढे आली.
त्यागाने दोन गोष्टी साधतात. जी वस्तू आपण दान देतो त्यावरचे आपले स्वामित्व
अर्थातच प्रेम कमी होते व ज्याला देतो त्याबद्दलचा ईश्वरभाव वाढीला लागतो.
प्रेमाला प्रवाहीत करता येते. प्रेम जीवंत झऱ्याप्रमाणे ठेवणे आवश्यक आहे.’
‘बाळांनो! आता तिसरा टप्पा नाशिवंत असले तरी शरीराच्या
सहाय्यानेच कर्म करायचे म्हणून ईश्वराचे अलौकिकत्व ध्यानात घ्यावे. किती
गुंतागुंतीचे पण व्यवस्थित काम करील असे शरीर त्याने बनवले. कोणत्या मुशीत माल
मसाला घातला?’
विलास म्हणाला, ‘आजी! शरीर विज्ञान आणि आरोग्य शास्त्रांत हा भाग
विश्लेषणासह आहे. प्रत्येक इंद्रियांची अंतर्चना, त्यांचे कार्य शाळेत शिकवले
त्यावेळी अभ्यास झाला. पण...’
मधू म्हणाला, ‘तो अभ्यास फक्त चांगले गुण मिळवून पास
होऊन पुढच्या वर्गात जाण्याकरिता म्हणून अभ्यासला. त्यात निर्माण करणारा कोण? तो आठवावा साठवावा असे कोठेच नव्हते.
आता आपल्याला दोन्हीचा उपयोग होईल.’
आजी म्हणाल्या, ‘अशी सांगड घालण्यासाठी समर्थ लिहितात...’ अस्ती मांशाचीं शरीरें | निर्माण केली जगदेश्वरें | विवेकें गुणविचारें | करूनियां || २०-८-१३||श्रीराम||
‘या शरीराचा
मानवाने कसा उपयोग करावा हे ठरवूनच अत्यंत खुबीदार रचना केली. विचार शक्ती दिली.
तीच ज्ञान शक्ती. किती गुणांचा साठा दिला?
जया
म्हणाली, ‘तीन
गुणांचा सत्व, रज, तम.’
‘बरोबर!’ आजी
म्हणाल्या, ‘या
गुणांचा योग्य वापर करून तिसरा टप्पा यशस्वी करायचा. अस्थि म्हणजे हाडे, मांस,
रक्त, त्वचा, केस, नखे इ.चा हा देह बनला. याचे सहाय्याने नाना कला शिकता येतात.
ज्ञान मिळवता येते. यंत्रांची आपण काळजी घेतो नां? तशी तेल पाणी योग्य आहार देऊन याचा
योग्य तऱ्हेने वापर केला, तर चौथा टप्पा सहज गाठता येईल.’
‘चौथा टप्पा कोणता?’ विलासने
विचारले. आजींनी त्यालाच ओवी दाखवली.. देहेसामर्थ्यानुसार | सकळ करी जगदेश्वर | थोर
सामर्थ्यें अवतार | बोलिजेती ||२०-८-२१||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘अंतरात्म्याचे सामर्थ्य सर्वही देहात
आहे. लहान
मोठ्या देहाप्रमाणे जाणीव शक्ती लहान मोठी इतकेच. त्यातले त्यांत मानव देहात
विचाराचे सामर्थ्य अधिक आहे. म्हणून पशूसारखा व्यवहार न करता माणसाने माणसा सारखेच
वागावे. ही सर्वच संतांची इच्छा. हाच तो चौथा टप्पा. विवेक नी विचार यांचा पुरेपूर
उपयोग करून घेणाऱ्यांनाच सामर्थ्य अधिक प्राप्त होते. त्यांचे कार्य अधिक मोलाचे
होते. आदर्श असते. ते समाजात उठून दिसतात. त्यांना अवतार म्हणतात. पण कार्य झाले
की कोठे गुंतून न पडता अवतार संपवतात. हे न गुंतणे ज्ञानाने साधता येईल. म्हणून
आता पाचवा टप्पा....’
‘तो कोणता?’ गणपतीने विचारले.
आजींनी त्याला ओवीच दाखवली..... आवाहन विसर्जन | हेंचि भजनाचें लक्षण | सकळ जाणती सज्जन | मी काये सांगों ||२०-८-३०||श्रीराम||
विलास म्हणाला, ‘आवाहन विसर्जन मला कळलं, आपण गणेशोत्सवांत
गणपतीच्या मूर्तीत ईश्वरी शक्ती आली असे समजून आवाहन म्हणजे त्याला बोलावतो.
म्हणजे मंत्राने बोलावतो. उत्सव आटोपला की त्या मूर्तीचे विसर्जन करतो. कोणी
विहीरीत कोणी नदीत, पण पाण्यातच विसर्जन करतात.’
आजी म्हणाल्या, ‘ठिक सांगितलेस! हे व्यावहारीक दृष्ट्या मूर्ती बाबत योग्य.
आता आपण ज्ञानाच्या पातळीतले टप्पे पहात आहोत. मग जर वरचा अर्थ लक्षात घेऊ या. या
दृष्यात जेवढ्या घटना घडतात त्या अंतरात्म्यामुळेच. असे बघण्याची सवय हीच साधना.
अंतरात्म्याचे अस्तित्व सर्वत्र बघणे हे भजनाचे लक्षण.’
‘नामदेवांना कुत्र्यात पांडुरंग दिसला
तसेच नां?’ जया म्हणाली.
‘आणि नाथांनी गाढवात रामेश्वर पाहिला.’ गणपती म्हणाला.
‘बरोबर आहे!’ आजी म्हणाल्या, ‘भजनाने, नामस्मरणाने, अंत:करणातील प्रेम जागृत झाले की, हे
अंतरात्म्याचे अस्तित्व खोलवर जाणवते. त्याला आवाहन म्हणतात. अंतरात्म्याचे मूळ
कोण? निरंजन परब्र्हम. तेच त्याचे माहेर, तेच त्याचे
स्वस्थान. त्याला त्याच्या मूळस्थानावर पोचवणे हे विसर्जन. याचाच अर्थ आपण
विवेकाने अंतरात्म्याच्या शक्ती बरोबर मूळ निरंजन परब्रह्मापर्यंत पोहोचणे.
त्यांतच दडी मारणे. हे पांचव्या टप्याचे मुख्य लक्षण.’
‘आणि गंमत अशी की हे सारे या देहात
असतानाच करायचे. त्यालाच एकांत हवा. ही प्रक्रिया हळूवारपणे पहाणे म्हणजेच पाहता
पहाणे दूर करी.’
‘ज्यांना हे नित्य साधते ते संत. ते
सज्जन. त्यांच्या सान्निध्यात हेच शिकायचे.’
‘आजी! एकदा पांचही टप्पे अभ्यासूया कां?’ गणपती म्हणाला. ‘आम्ही नांवे सांगतो. तुम्ही बरोबर आहे का पहा.’
‘मी पांचवा टप्पा सांगतो. तो आत्ता
माझ्या चांगला लक्षांत आहे.’ विलास म्हणाला.
गणपती म्हणाला, ‘नाही! सगळ्यांनी सगळे टप्पे आठवायचे. आजी पहिला,
दुसरा.... असे म्हणतील.’
विलास म्हणाला, ‘चालेल! नापास तर नापास अभ्यास तर होईल.’
आजी म्हणाल्या, ‘देह तीन तत्वांचा १) जड, २) चंचळ, ३) निश्चळ हे
जाणणे म्हणजे पहिला टप्पा.’
आजी- ‘सुधा दुसरा टप्पा?’
सुधा- ‘दृष्यावरचे प्रेम त्याग भावनेने कमी करून ईश्वर
भावाकडे प्रेम प्रवाहीत करणे.’
आजी- ‘विलास तिसरा टप्पा?’
विलास- (चाचपडत) ‘गुंतागुंतीचे हे शरीर यंत्रासारखे. हे
नाशिवंत असेल तरी त्याची योग्य देखभाल करून विवेकाने साधन म्हणून त्याचा उपयोग
करून घ्यायचा.’
आजींनी शाबासकी दिली. ‘आता मधू चौथा टप्पा?’
मधू- ‘अवतारी पुरूषांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून
अंतरात्म्याचे सामर्थ्य जाणायचे.’
आजी- ‘जया, पांचवा टप्पा?’
जया- ‘आवाहन, विसर्जन. अंतरात्म्याचे विसर्जना बरोबर
मी पणाचे विसर्जन करून परब्रह्म शक्तीत एकरूप होणे.’
‘छान! छान!!’ आजी म्हणाल्या, ‘म्हणून आता पथ्य पाळायचे, कोणते? ...’ खोट्याचे वाटे जाऊं नये | खोट्याची संगती धरूं नये | खोटें संग्रहीं करूं नये|
कांहींयेक
||२०-९-१६||श्रीराम||
आजी म्हणाल्या,
‘खोटे ते खोटेच
ना? आपल्याला
कक्षेत रोजच्या जीवनात जे खोटे डोकावत असेल त्याला बाजूला सारावे.’
मधू म्हणाला, ‘पण आजी! दृष्य जग, जग
मिथ्या म्हणजे खोटे, नाशिवंत. त्यातून अलिप्त कसे रहाता येईल? जगाला बाजूला
सारून आपण कोठे जायचे?’
‘छान विचारलेस!’ आजी
म्हणाल्या, ‘जगांतच
रहायचे, जगांतच वावरायचे. पण जगाचे व्हायचे नाही. असं जगायचे! जगांतच
जन्माला आलो आहोत. हवा अन्न पाणी इथलेच सेवन करणार. कार्यही येथेच करायचे. मग? फक्त कार्यावरचा
अधिकार सोडायचा. हे करतो कोण?’
‘अंतरात्मा!’ विलास
म्हणाला.
‘शाब्बास! आजी म्हणाल्या..’ सूत गुंतलें तें उकलावें | तैसे मन उगवावें | मानत मानत घालावें | मुळाकडे ||२०-९-१९||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘सुताचे उदाहरण देऊन समर्थ पटवत आहेत. मनाला
परब्रह्माकडे वळवावे. मन अंतर्मुख केले की सवय होते! हे सारे कां?’ पिंड पडतां अवघेंचि जातें | परंतु परब्रह्म राहातें | शाश्वत समजोन
मग तें |
दृढ
धरावें ||२०-९-३०||श्रीराम||
‘शाश्वत तत्व दृढ धरिले की, जीवनाची
सार्थकता झाली. देह पडल्यावर सर्व जाणारच. म्हणून देह पडण्यापूर्वी सावध व्हावे.
नापास होण्यापूर्वी अभ्यास करावा...’ धरूं
जातां धरितां नये |
टाकूं जातां टाकितां नये | जेथें तेथें आहेच आहे | परब्रह्म तें ||२०-१०-१||श्रीराम||
‘अशा
परब्रह्माला कसे जाणावे?’
विलास म्हणाला,
‘सूक्ष्म होऊन
जाणावे?’
आजी म्हणाल्या,
‘ठिक! ....’ संतसाधु माहानुभावां | देवदानव
मानवां | ब्रह्म सकळांसी विसांवा | विश्रांतिठाव ||२०-१०-१९||श्रीराम||
‘सगळ्यांचे विश्रांती स्थान एकच
परब्रह्म!’
जयाने भजन सांगितले, ‘इथे कुठे रहायचय । मुक्कामाला जायचंय ।
सुखरूप होण्यासाठी । हरिगुण गायचेय ।।‘
मुलांनी ठेका धरून चार पांच वेळा म्हटले.
‘आनंद! आनंद!’ आजी म्हणाल्या. ‘ही पहा ओवी....’ शुद्ध सार श्रवण | शुद्ध प्रत्ययाचें मनन | विज्ञानी पावतां उन्मन | सहजचि होतें ||२०-१०-२५||श्रीराम||
‘आलं ना लक्षांत! श्रवण, मनन, ज्ञानाचे विज्ञान मग
उन्मन होणारच. शेवटी तृप्तीचा ठेकर येतो...’ जालें साधनाचें फळ | संसार जाला सफळ | निर्गुण ब्रह्म तें निश्चळ | अंतरीं बिंबलें ||२०-१०-२६||श्रीराम||
आजींनी भावपूर्ण नेत्रांनी वंदन केले. पाचही जण
एकाचवेळी आजींना वंदन करण्याकरीता खाली वाकले. पाच मिनिटे नि:शब्दता.
आजी म्हणाल्या, ‘गुरू महाराज, गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू ।।‘
मुलांनी आनंदाने फेर धरला. भजन रंगले. देहभान
गेले. आनंदी आनंद बराच वेळ ओसडला. आनंद सागरात सगळे डुंबले.
।। जय जय
रघुवीर समर्थ ।।