।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस १३ वा
चौघेजण वेळेवर आले. गणपतीला थोडासा उशीर झाला.
त्याला बसायला सांगून आजींनी विचारपूस केली. थोडाच पण का बरं उशीर झाला?
‘सांगतो!’ गणपती म्हणाला, आजी
माझा मामेभाऊ सकाळी आला. तो म्हणाला, आपण दोघे क्रिकेट खेळू. मी म्हटले, आमचा
दासबोध वर्ग असतो. छान गमती जमती कळतात, तू पण चल. आजी तो माझ्यापेक्षा मोठा आहे.
तो म्हणाला मराठीतल्या ग्रंथात कसलं आलंय ज्ञान. ज्ञानाचे ग्रंथ संस्कृतात असतात.
गीता, रामायण, महाभारत सगळे संस्कृतात आहेत. आपण मोठे होऊन संस्कृत कळू लागलं की
पाहू! तो पर्यंत खेळाचा आनंद लूटू.’
‘मी त्याला पटवू शकलो नाही. तू येऊ नको वाटल्यास.
पण मला अडवू नकोस. ही गोष्टीची पुस्तके वाच. तो पर्यंत मी येतो. मग आपण खेळू या.
असे सांगून मी पळालो. मी पायरीवर आलो तेव्हा तुम्ही डोळे मिटून नमस्कार करीत
होतात. म्हणून मी थांबलो. इतका मन लावून नमस्कार कोणाला करीत होतात?’
‘मी नं?’ आजी म्हणाल्या, ‘सांगते... विद्यावंतांचा पूर्वजु | मत्ताननु येकद्विजु| त्रिनयेन चतुर्भुजु | फरशपाणी ||७-१-१||श्रीराम||’
‘सांग बघू कोणाचे ध्यान हे?’
गणपती म्हणाला, ‘विद्यावंत चतुर्भुज फरशपाणी यावरून गणपती असावा.
पण येकव्दिजु नाही कळलं!’
मधुकर
म्हणाला, ‘एकच
दात. दाताला व्दिज म्हणतात. दोनदा जन्म दातांचा पहिले दुधाचे दात. मग ते पडून जरा
भक्कम दात येतात. ते पडल्यानंतर मात्र बोळकं. आतां कळलं एकव्दिजु.’
‘कळलं! पण तुझ्या कसं लक्षांत आलं?’ गणपती म्हणाला, ‘मी व्दिज म्हणजे ब्राह्मण समजत होतो.’
‘तेही बरोबरच.’ सुधा म्हणाली, ‘उपनयन संस्काराचे आधीचा एक जन्म व
उपनयन संस्कारानंतरचा जन्म. तेव्हाच मुलगा ब्राह्मण होतो. पण आजींनी वंदन केले ते
गणपतीला.’
आजी
म्हणाल्या, ‘त्यानंतर
परब्रह्म शक्तीला, शारदेला वंदन करून सद्गुरुंना वंदन केले. कारण सांगशील?’
मधुकर
म्हणाला, ‘मी सांगतो! सद्गुरु शिष्याला अज्ञानातून बाहेर
काढतात. आत्मज्ञानाने परिपूर्ण करतात. ज्ञान सूर्याचा उदय त्यांच्या बोधामुळेच
होतो.’
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या, ‘ही ओवी वाच.....’ ज्ञानसूर्य मावळला | तेणें प्रकाश लोपला | अंधकारें पूर्ण जाला | ब्रह्मगोळ आवघा ||७-१-२१||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘बाळांनो! आकाशातला सूर्य मावळला म्हणजे कसा सगळीकडे अंध:कार होतो. तसा समर्थ म्हणतात, ज्ञानाचा लोप झाला म्हणजे सगळीकडे अज्ञानाचं
साम्राज्य सुरूं होत.’
‘मी एक विचारू?’ विलास म्हणाला. ‘सूर्य तर एकच आहे. पृथ्वी सूर्याभोवती पण तशीच
स्वत:भोवती पण
फिरते. पृथ्वीचा भाग भारत देशाचा भाग सूर्यापासून दूर गेला की सूर्य मावळला
म्हणतो. इथे तर ज्ञान सूर्य म्हटले. हे कसे?’
आजी
म्हणाल्या, ‘ज्ञान
म्हणजे ब्रह्मज्ञान होय नां? सर्वांनी माना हलवल्या. आता पहा पृथ्वी म्हणजे तुम्ही आम्ही मानव
ज्ञानापासून चलित होऊन विरुध्द बाजूला वळतो. म्हणजे ज्ञानाचे विरुध्द अज्ञान.
अज्ञानाने म्हणजेच देहात्मबुध्दीने करू नये ते करतो. फसतो, रडतो, पडतो. ज्ञानोदय
झाला की, अज्ञान नाहिसे होते. दृष्टीच बदलते जगाकडे पहायची! हे बघा समर्थ काय
म्हणतात.’ माया
ब्रह्म वोळखावें | तयास अध्यात्म म्हणावें | तरी तें मायेचें जाणावें | स्वरूप आधीं ||७-१-५४||श्रीराम||
‘परब्रह्मरुपी सूर्याचा प्रकाश
पडण्यासाठी मायेचे स्वरूप समजावे. हे दोन्ही समजण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म.’
सुधाचे
लक्ष दासबोधांत होते. ‘ती म्हणाली, आजी ही बघा ओवी!’ माया बहुरूपी बहुरंग | माया ईश्वराचा संग | माया पाहतां अभंग | अखिळ वाटे ||७-१-५८||श्रीराम||
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या, ‘एका नाण्याच्या दोन बाजू असतात. तशी ही
माया. ब्रह्मावर झाकण घालते.’
मधुकर
म्हणाला, ‘मग
हे झाकण काढल की ब्रह्म दर्शन होईल?’
आजी
म्हणाल्या, ‘खरंय
तुझ म्हणणं. कपाटाचे दार लावलेले आहे. त्याला कुलूप आहे. किल्ली शिवाय कुलूप उघडता
येईल कां?
कुलूप काढले की कपाटातल्या हव्या त्या वस्तू मिळतात. तर तस्संच आहे हे. ही किल्ली
कोणती? ही
ओवी वाच...’ सद्गुरुकृपा
तेचि किली | जेणें बुद्धि प्रकाशली | द्वैतकपाटें उघडलीं | येकसरीं ||७-२-१५||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘जोपर्यंत
आपल्या मनांत मी तू हा भेद आहे तोपर्यंत एकच व्हायचे कठीण असते. सद्गुरुंच्या
बोधाने बुध्दी शुध्द होते. आनंदघन कोण ते एकदा कळले की वेगळेपणा नष्ट होतो. आपण
सहा घरची सहाजण आहोत. पण समर्थकृपा कसे वेळेवर श्रवणाला जमतो. श्रवणाचे वेळी सहाही
जणांचा विचार एकच असतो. हे आपण रोज अनुभवतोच नां?’
विलास
म्हणाला, ‘आजी
इथेच असे नाही. आता आमच्या दोघांच्यातली भांडाभांडीपण बरीच कमी झाली. होय नारें? गणपतीला जोरात धक्का देऊनच त्याने
विचारले. पण आजी, अजून पक्के कळलेच नाही. अज्ञान गेले की ज्ञान होते. ते अज्ञान
म्हणजे काय जायला हवे?’
मधुकर
म्हणाला, ‘पीर
चुकला. पुन्हा मशिदीतच आला. आजी सांगतात तरी...’
‘मधू! विचारू दे. त्याला अडवू नकोस. अशी जिज्ञासा
उत्पन्न होणे हे ज्ञानाचेच लक्षण आहे.’ आजी म्हणाल्या, ‘विलास ही ओवी वाच.’ मी कोण ऐसें नेणिजे | तया नाव अज्ञान बोलिजे | अज्ञान गेलियां
पाविजे | परब्रह्म
तें ||७-२-२२|| श्रीराम||
‘शाबास! वाचलेस नां! मी विलास, मी गणपती, मी
मधुकर असे आज आपण देहाचे नांव सांगतो. म्हणजे खरा मी आपण जाणत नाही.’ आजी म्हणाल्या.
विलास
म्हणाला, ‘देहाचे
नांव म्हणजे मी नाही. म्हणजेच देह मी नाही. मग मी आत्मा. तो देहाला उठवतो, बसवतो.
तोच परब्रह्म कां? आत्ता आलं लक्षांत. आता नाही विसरणार!’
आजी
म्हणाल्या, ‘हे
जे काही विसरायला होत. लक्षांत रहात नाही, किंवा पटत नाही, किंवा करायच काय हे
समजून अस जे वाटतं ते सारे देहात्मबुध्दीने. समर्थ सांगतात.....’ म्हणौनि देहबुद्धि हे झडे | तरीच परमार्थ घडे | देहबुद्धीनें विघडे | ऐक्यता ब्रह्मीची ||७-२-३९||श्रीराम||
‘आजी! सोहं सोहं सारखे म्हणत राहिलो तर
ऐक्यता मोडणार नाही.’ गणपतीने विचारले.
आजी
हसल्या, ‘बाळांनो! नुसत्या घोकंपट्टीने नाही साधणार. हे
बघ समर्थांनी कांहीच सांगायचे बाकी ठेवले नाही.. तुझ्या प्रश्नाचे उत्तर बघ.’ आपुलेन अनुभवें | कल्पनेसि मोडावें | मग सुकाळीं पडावें | अनुभवाचे ||७-३-४८||श्रीराम||
‘मी आत्मा आहे. म्हणजेच मी ब्रह्म आहे
असा स्वस्वरुपाचा अनुभव पक्का व्हावा म्हणून साधना करावी लागते. ती योग्य तऱ्हेने
केली की, मी देह आहे ही कल्पना साफ मोडून पडते. देहबुध्दी नष्ट झाली की, सर्वत्र
ब्रहमच ब्रह्म! या गोड अनुभवात सतत रहाता यावे म्हणून समर्थांनी कल्पनेतून ज्याला
ज्याला ब्रह्म म्हणता येईल ती ती चौदा ब्रह्म संकेत पुढे मांडले व ते
ब्रह्मापेक्षा उणेच मोडून दाखवले. म्हणजे उकल केली. बुध्दीला भरकटू देऊ नये. एक
शुध्द ब्रह्माचा निश्चय पक्का करावा.’
‘म्हणजे आजी!’ विलास म्हणाला, सगळं जेवणं संपल्यावर
मी श्रीखंड खातो. तस्संच समर्थांनी केलं. सगळचे खळखळून हसले.’
‘नाना तऱ्हेच्या तरंगात मनुष्य गुरफटतो.’ आजी म्हणाल्या, शरीर अवघें
व्यापलें | परी तें नाहीं आडळलें | जवळिच दुरावलें | नवल कैसें ||७-४-३३||श्रीराम||
‘सर्व ब्रह्मांडात अणूरेणूत भरलेले
ब्रह्मतत्व आपल्या शरिराला व्यापून आहे तरी दिसत नाही. जवळ असून दूर असल्यासारखे
भासते.’
सुधाने
विचारले, ‘पण
आजी असे कां व्हावे? भगवंताची तर इच्छा आहे की, भक्ताने आपल्याकडे यावे. मग तो सगळ्या
मानवांना आपल्याकडे कां वळवून घेत नाही?’
‘सुधा!’ आजी म्हणाल्या, ‘त्याने मानवाला बुध्दी शक्ती दिली आहे.
पण ती योग्य ठिकाणी न वापरता मानव आपली शक्ती दुसरेच ठिकाणी वापरतो. ती शक्ती वाया
जाते. मग माणूस फसतो.’
मधुकर
म्हणाला, ‘त्यावर
कांही उपाय तोड नाही कां?’
‘आहे तरं!’ आजी म्हणाल्या, ‘प्रत्येकाला मन नावाची शक्ती आहेच की
नाही? ते
मन उन्मन करायचं. सध्या सर्व साधारणपणे आपले मन खाण्यापिण्यांत रमलेलं असतं नां? तेच मन थोडे थोडे विषयापासून काढून
भजन पूजन याकडे वळवावे.’
‘त्याला भक्ती म्हणतात नां?’ विलासने विचारले.
‘होय! आजी म्हणाल्या, ‘तीच भक्ती का करतो? हे समजून उमजून करायची. करता करता
बाह्य उपचारापेक्षा बाह्य अवडंबरापेक्षा मन शांत होऊन पूर्णावस्थेला जाईल असे
करायचे. हे बघ पाण्याचे टाकीत नाणे पडले. पाणी हलतय. तोपर्यंत तळाशी असून नाणे
दिसत नाही. तेच पाणी स्थिर असले तर तळाशी असलेले नाणे दिसते. पटत का तुला?’
‘खरंच आजी!’ गणपती म्हणाला. ‘आईची अंगठी टाकीत पडली होती. ती टाकीतच
आहे ना पण? हे
पहाण्यासाठी बाबांनी नळ बंद केला होता. पाणी स्थिर झाले. अंगठी दिसली. बाबा टाकीत
उतरले. अंगठी काढली.’
‘छान! अंगठी किंवा नाणे हातात घ्यायची वस्तू
म्हणून काढून हातात घेता येते. ब्रह्म हातात न घेता अनुभवायचे असते. मनाच्या पूर्ण
अवस्थेत, मन शांत असताना, कल्पना रहित असतांना ब्रह्माचा छान अनुभव येतो. गणपती
वाच तू.’ जयास
द्वैत भासलें | तें मन उन्मन जालें | द्वैताअद्वैताचें तुटलें
| अनुसंधान ||७-५-१२||श्रीराम||
आजींनी
विचारले, ‘व्दैत
म्हणजे?’
जयाने
उत्तर दिले, ‘वेगळेपण.’
‘आणि अव्दैत म्हणजे?’ आजींनी विचारले.
‘ऐक्य!’ गणपती आणि विलास यांनी एकदमच उत्तर
दिले. आणि टाळी दिली.
‘वा! वा! मन पूर्णावस्थेला गेले की
वेगळेपण तर गेलेच. पण ऐक्य ही भावना पण गेली. ज्याच्याशी ऐक्य करायचे ते आपणच की!’ आजी म्हणाल्या.
‘हो, पण हे कसे जमावे?’ मधुकरने विचारले.
आजींनी
ओवी दाखवली. मधूने वाचली. श्रवण आणी मनन | निजध्यासें समाधान | मिथ्या कल्पनेचें भान | उडोन जाये ||७-५-२७||श्रीराम||
किती
साधा नी सोपा मार्ग सांगितला आहे.
गणपती
म्हणाला, ‘श्रवण
घडतंय. पण मनन?’
‘आपण काय श्रवण केले याची आठवण रहाते की
नाही?’
आजी म्हणाल्या, ‘आईने विचारले तर सांगता येते की नाही? दोघे एकत्र जमलांत तर यावरच बोलता की
नाही?
यालाच मनन म्हणतात.’
‘आणि निजध्यास म्हणजे?’ विलासने विचारले.
‘आपण कोण याचे सतत स्मरण.’ सुधा म्हणाली.
‘मी पाठ केलंय, सोहं! सोहं!!’ विलास म्हणाला.
आजी
म्हणाल्या, ‘आता
त्या सोहंचा अनुभव येईल असे करायला हवे. खोट्या कल्पनेतून मन उडायला हवे. पूर्णपणे
उडायला हवे.’
म्हणजे
आजी मधू म्हणाला, ‘श्रीखंडाच्या ऐवजी नाथांघरचा श्रीखंड्या लक्षांत रहायला हवा.’
‘कळला मला टोला मारलास तो.’ विलास म्हणाला, ‘आजी आजच श्रीखंड खाऊन आलो. म्हणून मला
चटकन आठवलं. तस रोज श्रवण घडलं की चटकन भगवंत आठवेल. नाही कां?’
आजी
म्हणाल्या, ‘मनांतून
निश्चय पक्का राहील तर व्दैताची भावना कधी उत्पन्नच होणार नाही. मी व भगवंत वेगळा
आहे असे वाटले रे वाटले की समजावे ज्ञान मलीन झाले.’
सुधा
म्हणाली, ‘ज्ञान
मलीन होणे,
म्हणजे अज्ञानाने डोके वर काढणे.’
‘अगदी बरोबर!’ आजी म्हणाल्या, ‘वाच ही ओवी.’ तैसें ज्ञान होतां मळिन| अज्ञान प्रबळे जाण | याकारणें श्रवण | अखंड असावें ||७-५-४२||श्रीराम||
गणपती
म्हणाला, ‘आजी
आम्ही काय ठरवलय! .....’
‘तू नको सांगूस. मी सांगतो.’ त्याला अडवून विलास म्हणाला, ‘आम्ही ठरवलंय सुटीनंतर शाळा सुरु झाली
तरी रोज शाळा सुटल्यावर आम्ही येत जाऊ. मधुकर पण येईल. चालेल न? पण त्या दोघी?’
जया
म्हणाली, ‘का
रे बाबा व्दैत आलं तुझ्या मनांत? चांगल्या संकल्पाला कोण नको
म्हणेल? आम्ही पण येऊ!’
आजी
म्हणाल्या, ‘छान
आहे संकल्प. परमार्थाची गोडी वाढतीय. खडी साखरेचा डबा आण. प्रसाद वाटू या.’
विलास
म्हणाला, ‘नको! खडीसाखर नको. मी श्रीखंड आणलंय
सगळ्यांना द्यायला.’
सगळ्यांनी
टाळ्या वाजवल्या. श्रीखंडाचा प्रसाद झाला. आजी म्हणाल्या,
।। जय जय रघूवीर समर्थ ।।