रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

भूपाळ्या

भूपाळ्या

उत्थापन
प्रभात काळी उठुनी सकाळी वनमाळी गावा
सद्भावे पदकमली सतत आश्रय मागावा ।।धृ।।
रामकृष्ण हरि विठ्ठल केशव घेऊनिया नामा
ब्रह्मानंदी मग्न होऊनी प्रत्यय जाणावा ।।१।।
नश्वर हा संसार असा निज आत्मा बोधावा
परमार्थी मन वळवुनी शाश्वत मोक्षचि साधावा।।२।।
सगुणी निर्गुण जाणुनी आत्मा स्वरुपी मिळवावा
प्रेमळ छंदे गाऊनिया प्रभु हळु हळु आळवावा।।३।।

*******
गरुडाचे पायी ठेवीन वेळोवेळी डोई
वेगे आणावा तो हरी मग दिनाते उध्दरी।।
पाय लक्ष्मीचे हाती तिचे आम्ही काकुळती
तुका म्हणे शेषा  जागे करा ह्रषीकेषा।।
उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज
उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु।।
    
भूपाळी गणपतीची
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥
अंगी शेंदुराची उटी । माथां शोभतसे किरीटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी शोभा। स्मरतां उभा जवळी तो ॥२॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकाची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥

भूपाळी रामाची
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णियली। गणिका केली ते मुक्त॥२॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिलें भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैल्यबाळीसमवेत ॥ धृ ॥
भूपाळी आत्मारामाची
उठा प्रातःकाळ झाला। आत्माराम पाहूं चला ।
हा समयो जरी टळला। तरी अंतरला श्रीराम ॥धृ०॥
जीव-शिव दोघेजण।  भरत आणि शत्रुघ्न ।
आला बंधु लक्ष्मण।  मन उन्मन होऊनी ॥१॥
विवेक वसिष्ठ सदगुरु।  संत सज्जन मुनीश्वरु ।
करिती नामाचा गजरु।  हर्षनिर्भर होउनिंया ॥२॥
सात्त्विक सुमंत प्रधान।  नगरवासी अवघे जन ।
आला वायूचा नंदन।  श्रीचरण पहावया ॥३॥
माता जानकी बिघडली।  होती प्रारब्धे लिहिली ।
तिची देहबुद्धी जाळिली।  आलिंगिली श्रीरामे ॥४॥
आजची दिवाळी दसरा।  पर्वकाळ आला घरा ।
रामानंदाच्या दातारा। भेटी माहेरा मज द्यावी ॥५॥
उठा प्रातःकाळ झाला। आत्माराम पाहूं चला ।
हा समयो जरी टळला। तरी अंतरला श्रीराम ॥धृ०॥
       
भूपाळी पंढरीरायाची
(१)
उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊ पंढरीसी ।
भेटो विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविधताप हरतील॥धृ॥
चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्णा भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपती दर्शना ॥ २ ॥
तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बोहरी । महादोष हरतील ॥ ३ ॥
रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्वंभर । पैलपार तरतील ॥ ४ ॥
उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊ पंढरीसी ।
भेटो विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविधताप हरतील॥धृ॥
                 (२)
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळां ||
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा || धृ ||
संत साधु मुनी अवघे झालेती गोळा |
सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख कमळा ||||
रंग मंडपी महाद्वारी झाली असे दाटी |
मन उतावीळ रूप पहावया दृष्टी  ||||
राई रुखमाबाई तुम्हा येऊ दया |
शेजे हालवुनी जागे करा देवराया ||||
गरुड  हनुमंत उभे पाहती वाट|
स्वर्गीचे सुरवर घेऊनी आलें बोभाट ||||
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा |
विष्णुदास नामा उभा घेउनी काकडा ||||
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळां ||
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा || धृ||

भूपाळी गोपाळाची
उठी रे गोपाळा उघडी स्वरुप लोचना ।
सरली अविद्या राती उदयो झाला रविकिरणा ।।
इंद्रिये गोधने नेई निर्गुण कानना ।
सुटली मानस वत्से तुजविण नाकळती कोणा ।।धृ।।
प्रबोध पहाट झाली सरले तिमिर तम-रज ।
गुरुकृपेचा अरुण दावी सुरंगम तेज ।।
आत्मा-दिनकर पाठी प्रकटे तात्काळिक सहज।
जिवचंद्राचे मंडळ तेणे झाले निस्तेज ।।१।।
दृष्यभास चांदणिया असते ठायिच लोपलिया ।
लिंगदेह कमळीणीचे मधुकर सुटले आपसया ।।
बुध्दीबोध चक्रवाके मिनली आपणिया ।
देहबुध्दि कुमुदिनी सुकोनी गेलीसे विलया ।।२।।
योग विद्येच्या पंथे साधक वृंदे चालियली ।
उपनिषद् भावार्थ शब्द केला कोकिळी ।।
वाग्वादाचे उलूक रिघती मौनाचे ढोली ।
विकल्प अटवी साही चारी चारी सांडियली ।।३।।
विराग रश्मी जवळी धरिता चित्त रविकांत ।
आत्मवन्हि प्रगटे विषय वन हे जाळीत ।।
तृष्णेच्या श्वापदांवरी प्रळय अद्भूत ।
विश्व हे लटिके मूढा मृगजळवत ।।४।।
जारव्यसनी जीव हा झाला उदमी सुविचार ।
वासना कुंटिणिचा सहजे खुंटला व्यापार ।।
लीला-विश्वंभर स्वामी उठिला सत्वर ।
चाले मुक्तेश्वर संगे धरुनिया कर ।।५।।
उठी रे गोपाळा उघडी स्वरुप लोचना ।
सरली अविद्या राती उदयो झाला रविकिरणा ।।
इंद्रिये गोधने नेई निर्गुण कानना ।
सुटली मानस वत्से तुजविण नाकळती कोणा ।।धृ।।


भूपाळी संतांची

उठि उठिबा पुरुषोत्तमा । भक्तकाम कल्पद्रुमा ।।
आत्मारामा निजसुखधामा।
              मेघ:श्यामा श्रीकृष्णा ।।धृ।।
संत मंडळी महाद्वारी । उभी तिष्टत श्रीहरी ।।
जोडोनिया दोन्ही करी । तुज मुरारी पाहावया ।।१।।
संत सनकादिक नारद ।
              व्यास वाल्मीकी ध्रुव प्रल्हाद ।।
पार्थ पराशर रुक्मांगद ।
              हनुमान अंगद बळिराजा ।।२।।
झाला प्रात:काळ पूर्ण । करी पंचांग श्रवण ।।
आला मुद्गल भट ब्राह्मण ।
               आशिर्वचन घे त्यांचे ।।३।।
तुझा नामदेव शिंपी । घेऊनी आला आंगी टोपी ।
आता जाऊ नको बां झोपी ।
              दर्शन देई निज भक्ता ।।४।।
नाना परिचे अलंकार ।
              घेऊनी आला नरहरि सोनार ।।
आला रोहिदास चांभार ।
              जोडा घेऊनी तुजलांगी ।।५।।
सुगंध सुमने पुष्पांजुळी ।
              घेऊनी आला सावतामाळी ।।
म्हणे श्रीहरि पदकमळी । अनन्यभावे समर्पू ।।६।।
कान्होपात्रा नृत्य करी । टाळछंदे साक्षात्कारी ।।
सेना न्हावी दर्पण करी । घेऊनी उभा राहिला ।।७।।
लिंबुर हुरडा घेऊनी आला ।
              तो हा माणकोजी बोधला ।।
दर्शन द्यावे बा! त्याजला ।
              भक्त भोळा म्हणऊनी ।।८।।
मिराबाई तुझेसाठी । दूध-तुपे भरुनी वाटी ।।
तुज लावावया ओठी । लक्ष लावुनी बैसली ।।९।।
नामदेवाची जनी दासी ।
              घेऊन आली तेल-दीपासी ।।
तुज न्हाऊ घालावयासी ।
              उभी ठेली महाद्वारी ।।१०।।
गूळ-खोबरे भरुनी गोणी ।
              घेऊनी आला तुकया वाणी ।।
वह्या राखिल्या कोरड्या पाणी ।
              भिजो दिल्या नाही त्वां ।।११।।
आला चोखामेळा महार । स्वामी करीतसे जोहार ।
त्याचा करोनिया उध्दार ।
                 संतमेळी स्थापिला ।।१२।।
हरिभजनाविण वाया गेले ।
                   ते नरदेही बैल झाले ।।
गोऱ्याकुंभारे आणिले । खेळावया तुजलागी ।।१३।।
गरुडपारी हरिरंगणी ।  टाळ-मृदंगाची ध्वनी ।।
महाद्वारी हरिकिर्तनी ।
              तल्लिन कान्हा हरिदास ।।१४।।
निजानंदे रंगे पूर्ण ।  सर्वही कर्मे कृष्णार्पण ।।
श्रीरंगानुज तनुज शरण ।
              चरणसेवा करितसे ।।१५।।
*******

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

श्रीवर्धन पोस्टामधली पूजा परंपरा

माझ्या आठवणी_श्रीवर्धन पोस्टामधली पूजा परंपरा

              आज २६ जानेवारी २०१९. श्रीवर्धन पोस्ट ऑफिस स्टाफ तर्फे दरवर्षी या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा केली जाते. माझ्या आठवणी प्रमाणे सन १९८० मध्ये सध्याच्या पोस्ट ऑफिसच्या इमारतित पोस्ट ऑफिसचे स्थलांतर झाले त्या निमित्ते पहिली पूजा केली गेली होती. त्यावेळी कै. भिसे हे सबपोस्टमास्तर म्हणून कार्यरत होते. त्यांच्याच प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यात ज्या इमारतीचा आदर्श घेतला गेला अशी इमारत पोस्ट ऑफिसला मिळाली. त्यावेळी जेव्हा जेव्हा नवीन पोस्ट ऑफिसकरिता इमारत घ्यायची असेल तर श्रीवर्धनच्या पोस्ट ऑफिसची इमारत मॉडेल म्हणून दाखविली जायची. 

              अशा या इमारतित सन १९८० साली सुरु झालेली सत्यनारायणाच्या पूजेची परंपरा आज चाळीसाव्या वर्षीही तितक्याच उत्साहाने पाळली जाते. पूजेच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे स्टाफच्या सर्व कुटूंबाचे हे एक गेट टू गेदर असते. सर्वजण एकत्र येऊन आयते तयार जेवण न आणता सामुदायिक रितीने तयार केले जाते. ते बनवताना स्टाफ मधिल कुटुंबियांची एकमेकांशी ओळख होते. काम करता करता सुख दु:खाच्या गोष्टी शेअर केल्या जातात. त्यामुळे कोणावरही प्रसंग आला तर आपूलकी निर्माण झालेली असते. 
              पहिले दोन तिन वर्षे अगदी साधे घरगुती वरणभात, भाजी असा मेनु असायचा. त्यानंतर श्री मेहेंदळे साहेब सब पोस्टमास्तर म्हणून आल्यानंतर त्यांनी पहिला प्रस्ताव ठेवला तुम्हाला जर पूजेची प्रथा बंद करायची असेल तर करु शकतो. त्याकरिता माझे नांव पुढे केले तरी चालेल. परंतु सर्वाच्या सक्रिय सहभागाने पूजा साजरी करायचा उत्साह आणखी वाढला. श्री मेहेंदळे मास्तर आल्या पासुन पूजेच्या कार्यक्रमाला आखिव रेखिव स्वरुप प्राप्त झाले. त्यावर्षीपासुन जेवणात पक्वान्न म्हणून जिलेबी करायची परंपरा सुरु झाली. त्याकरीता तेव्हा सर्वांचे म्हणणे पडले की, बाकी सर्व पदार्थ घरी केले जातात. परंतु जिलेबी काही केली जात नाही. त्यावेळी श्रीवर्धनमध्ये आजच्या सारखे दररोज जिलेबी, श्रीखंड हे पदार्थ मिळत नसत. तेव्हा अनेक वर्षे जिलेबी हेच पक्वान्न चालू आहे. एक वर्ष जिलेबी करायाला काही कारणाने कोणी मिळत नव्हते तेव्हा मी जिलेबी पाडायाचा यशस्वी प्रयत्न केला होता. मध्यंतरी दोन तिन वर्षे आयते जेवण आणले जाऊ लागले होते. परंतु तेही परत बंद होऊन पहिल्यासारखे सर्वांनी मिळुन जेवण बनविण्याची प्रथा सुरु झाली. 
              कोणतीही परंपरा बारा वर्षे सुरु राहिली की, तिला तप झाले असे म्हणतात. या उक्ती प्रमाणे श्रीवर्धनच्या या सत्यनारायण पूजेच्या परंपरची तिन तपे उलटुन गेली आहेत. या परंपरेची सुरवात करणारे श्री भिसे मास्तर आज हयात नाहीत. पहिल्या पूजेच्यावेळी उपस्थित असणाऱ्या स्टाफ पैकी, श्री आर्. आर्. केमनाईक, श्री सवतिरकर, श्री मापुस्कर हे देखिल सध्या हयात नाहीत. कोणी सेवानिवृत्त झाले तर कोणी बदली होऊन दूर गेले. तरीही प्रत्येकाच्या मनांत श्रीवर्धनच्या या पूजेकरीता एक कोपरा राखिव आहे. मी माझ्या ३५ वर्षाच्या नोकरी पैकी पंधरा वर्षे श्रीवर्धन पोस्टात काम करीत होतो. या पूजेच्या नियोजनता माझाही खारीचा वाटा असायचा. आज श्री अरविंद कोसबे आणि श्री प्रफ्ल्ल दवटे हे दोघेचजण तेव्हाच्या स्टाफपैकी श्रीवर्धन पोस्टांत कार्यरत आहेत. तेव्हाच्या स्टाफची दुसरी पिढी आता या पोस्टांत काम करीत आहे. 
              आज चाळिस वर्षांच्या आठवणी मनांत दाटुन आल्या आहेत. त्या आठवणिंना फेसबुकच्या या पोस्ट द्वारे व्यक्त केल्या आहेत. श्रीवर्धनच्या स्टाफला या परंपरेला चालू ठेवल्याबद्दल हार्दिक धन्यवाद. कोणताही उपक्रम सुरु करणे सोपे असते परंतु त्यामध्ये सातत्य ठेवणे फार अवघड असते. 
अनिल अनंत वाकणकर, माजी उपडाकपाल.