शुक्रवार, १९ जुलै, २०१९

हकिमबाबा

।।श्रीराम।।

मला भावलेले व्यक्तिमत्व:हकिमबाबा

          परवा सहज सायकलवर चक्कर मारायला बाहेर पडलो होतो. तेव्हा बुडन पाखाडी, सराई मोहल्ला, चौकर पाखाडी असा फिरत फिरत समुद्रावर गेलो होतो. त्यावेळी सराई मोहल्यातुन जाताना हकिमबाबांचा दवाखाना आणि दुकानाची जागा नजरेस पडली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारची माणसे भेटतात. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. काहीजण आपल्या ह्रदयांत कायमची घर करुन बसतात. हकिमबाबा हे एक त्यातलेच व्यक्तिमत्व आहे. त्यांना विसरावे म्हटले तरी विसरता येणार नाही.
मी पोस्टमन म्हणून काम करताना त्यांना अनेक वेळा भेटलो. सुरवातिल पत्र टाकण्यापुरता संबंध होता. नंतर नंतर ओळख वाढत गेली. सराई मोहल्याच्या नाक्यावर त्यांचे दुकान आणि दवाखाना होता. त्याकाळात पोस्टाने पत्रव्यवहार जास्त होत असत. त्यामुळे त्यांच्या दुकानात पोस्टकार्ड, अंतर्देशिय पत्र, पाकिटे, मनी ऑर्डर फॉर्म विक्रिला ठेवलेले असत. मी जेव्हा पत्र वाटायला त्यांच्याकडे जात असे तेव्हा ते पोस्टातुन पोस्टाची स्टेशनरी(कार्ड, पाकिटे वगैरे) आणायला सांगत असत. कधी कधी अचानक आमची बीट बदलली जायची मग त्यांनी दिलेल्या पैश्यांची स्टेशनरी घेतली तरी लगेचच पोचवली जायची नाही. तरीही त्यांनी कधीही  अविश्वास दाखवला नाही. या व्यवहारातुन त्यांची ओळख वाढत गेली. सुरवातिला ते डॉक्टर आहेत हेच मला माहित नव्हते.
हकिमबाबा ही अतिशय धार्मिक व्यक्ती होती. तिन वेळचा त्यांचा नमाज कधी चुकला नाही. ते नियमितपणाने जशी अजमेर शरिफ येथे मनी ऑर्डर करायचे तशीच तुळजापुरला अथवा गाणगापुरला देखिल करायचे ते म्हणायचे मी कबीर पंथी आहे. त्यांनी नाशिक येथिल आयुर्वेद सेवा संघामध्ये आयुर्वेदाचे शिक्षण घेतले तर युनानी हकीमीचे शिक्षण उत्तर प्रदेशांत घेतले होते. एकुण जवळपास बारा वर्षे त्यांनी आयुर्वेद आणि युनानीचे शिक्षण घेतले होते.
त्यांच्याकडे शारंगधर संहितेची मूळ संस्कृत पोथी होती. त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे काढे, भस्मे, रसायने, प्राश बनवायचे फॉर्म्युले होते. पूर्वी हकिमबाबा अनेक प्रकारची औषधे स्वत: बनवत असत. परंतु बाजारात तयार आयुर्वेदिक औषधे मिळायला लागल्यापासून त्यांनी औषधे बनवणे सोडले होते. नाशिकच्या दाते वैद्यांच्या आठवणी ते नेहमी सांगत असत. माझे एक चुलत चुलत आजोबा कै. धोंडो वाकणकर हे देखिल वैद्य होते. त्यांच्या आठवणी देखिल ते सांगत असत.
त्यांच्याकडे अनेक प्रकारचे काढे, आसवे, च्यवनप्राश सारखे प्राश, निरनिराळ्या मात्रा उपलब्ध असत. त्यांच्याकडे दुपारी खेडेगावातल्या रुग्णांची गर्दी होत असे. त्या रुग्णांवर ते अतिशय अल्पदरात उपचार करित असत. जुन्या दिर्घकाल असणाऱ्या रोगांवर ते खात्रीने उपचार करीत असत. मी देखिल अनेक वेळा किरकोळ किरकोळ रोगांवर त्यांच्याकडून उपचार घेत असे. आपल्या घरांत सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तुंचा औषधी उपयोग ते सांगत असत. मला नेहमी तोड येण्याचा म्हणजेच छाले पडण्याचा त्रास होता. त्यावर त्यांनी त्याकाळी प्रत्येक घरी सहज उपलब्ध असणारे मायफळ उगाळुन लावायला सांगितले होते. त्याने मला ताबडतोब आराम पडत असे. त्यांनी सांगितलेला हा उपचार मी एका एम्. बी. बी. एस्. झालेल्या डॉक्टरांना देखिल सांगितला होता. विशेष म्हणजे त्या डॉक्टरांना त्या उपचाराचा लगेचच प्रत्यय देखिल आला होता.
हकिमबाबा जसे शरिरावरच्या रोगावर उपचार करित असत तसेच ते मानसिक रोगावर देखिल त्यांच्या पध्दतीने उपचार करीत असत. लोकांना हकिमबाबांना जादू टोणा करतात असे वाटायचे परंतु तो त्यांचा मानमिक उपचार असे. याबाबत मी त्यांच्याशी एकदा बोललो होतो. त्यावर त्यांनी सांगितले होते, ज्या रोग्याच्या मनात माझ्यावर करणी केली आहे, मला कुठलीतरी भूतबाधा झाली आहे असे ठाम बसले आहे. तो रोगी शरिरावर केलेल्या कोणत्याही  उपचाराने बरा होणार नाही. त्याला उपचार देखिल मानसिकच हवा. म्हणून ते त्या मानसिक रोगी असलेल्या रोग्याला उतारा वगैरे काढायला सांगत असत. त्यांच्या या उपचाराने आणि जोडीला आयुर्वेदिक औषधाने तो रोगी खडखडीत बरा होत असे.
या बाबतित मला माझ्या आतेभावाची गोष्ट आठवते तो प्राथमिक शिक्षक होता. या शिवाय खेडेगावांत पौराहित्यही करीत असे. त्याच्यावर अनेकांचा विश्वास होता. गुरुजींनी काही तोडगा सांगितला तर नक्की परिणाम होईल असा त्याच्या विषयी लोकांचा समज होता. एकदा मी त्याच्याकडे गेलो होतो. तेव्हा दोघीजणी सासवा सूना आल्या होत्या. त्या सासुचा  प्रश्न होता मुलाचे लग्न होऊन दोन वर्षे झाली तरी मुलबाळ काही नाही काहितरी तोडगा सांगा. त्यावर माझ्या भावाने त्यांना एका विड्याच्या पानावर हळदकुंकू, वगैरे साहित्य ठेवुन ठरावीक दिवशी तिन्हीसांजा ते पान मुलाने आणि सुनेने चव्हाट्यावर ठेवावे असे सांगितले.
त्या दोघीजणी निघुन गेल्यावर मी त्याला हे काय असे विचारले त्यावर त्याने सांगितले, अरे अनिल! या बाईचा मुलगा मुंबईत, आणि सून इथे गांवाला तेव्हा त्यांचे पोटपाणी पिकेलच कसे. परंतु मी जर असे सरळ सांगितले तर त्या बाईला पटणार नाही. परंतु आता मी सांगितलेला तोडगा पुरा करायला ती मुलाला गावाला बोलवेल त्यानंतर सुनेला आणि मुलाला  तो तोडगा पुरा करायसाठी एकत्र यावे लागेल हा असा माझा उपचार आहे. हकिमबाबा तरी काय वेगळे वागत होते. जसा रुग्ण तसा उपचार हे त्यांचे धोरण होते.
असे हे हकिमबाबा माझ्या कायम स्मरणात राहिलेले आहेत. माझ्या मनाचा एक कोपरा त्यांनी व्यापला आहे. पोस्टमन मधुन प्रमोशन झाल्यानंतर माझे श्रीवर्धन सुटले, त्यांचा संपर्कही तुटला. कधीतरी ते पैगंबरवासी झाल्याचे समजले. त्यांच्या दुकानावरुन जाताना हे सर्व आठवले. त्यांचे आता दुकान चालू दिसले परंतु दवाखाना मात्र बंद दिसला. त्यांच्या कडील शारंगधर संहितेतिल अनेक फॉर्म्युले मी लिहून घेतले होते. त्या वह्या कोणालातरी वाचायला दिल्या त्या त्याने परत केल्याच नाहित. त्यामुळे ती देखिल त्यांची आठवण आता शिल्लक नाही. त्यातल्या फॉर्म्युल्यावरुन मी आडुळशाचा काढा केला होता तो जवळपास दोन वर्षे आम्ही वापरत होतो.
अशा या हकिमबाबांना माझी ही आदरांजली.