।। श्रीराम ।।
शिवथर घळ सुंदरमठ एक अनुभव
|
श्रीमंत पेशवे
मार्ग,
श्रीवर्धन, जिल्हा
रायगड
महाडाहून भोरकडे
जाणाऱ्या रस्त्यावर बारसगांव फाट्यावरुन आतमध्ये गेले की, सर्वत्र सृष्टीचा
चमत्कार पहायला मिळतो. सगळीकडे हिरवे हिरवे डोंगर पसरलेले दिसतात. पावसाळ्यात गेल्यास
त्या डोंगरावरुन अनेक धबधबे खाली पडताना दिसतात. आजुबाजुला भाताची, नाचणीची, वरीची
हिरवीगार शेते या सौंदर्यात आणखिनच भर घालतात. बाकी कुठेही पाऊस नसला तरी
शिवथरच्या परिसरात पावसाची हजेरी असतेच. या अशा निसर्गरम्य परिसरातच शिवथरची
प्रसिध्द घळ आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या या
परिसराचे वैभव अवर्णनिय आहे. या अशा निसर्गरम्य परिसरात निवांत रहावे असे
प्रत्येकाला वाटत असते. परंतु प्रापंचीक माणसांना हे स्वप्नवत असते. दोन चार दिवस
राहिले की, आपले घर संसार डोळ्यापुढे यायला लागतो.
स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर मलाही हे स्वप्न खूणावत होते.
त्यामुळे मी जेव्हा
कोजागिरी पोर्णिमेच्या सुमारास शिवथर घळीत गेलो होतो तेव्हा मला तेथिल व्यवस्थापना
करीता स्वयंसेवकांची जरुरी असल्याचे समजले. मला ती संधी वाटली म्हणून मी लगेचच आम्हा
उभयतांच्या संमतीचा फॉर्म भरुन दिला. त्यानंतर लगेचच मे महिन्यात आम्हाला मासिक
व्यवस्थापक म्हणून काम करण्याविषयी विचारले गेले. तेव्हा मी देखिल हो म्हटले.
परंतु संकल्प आणि सिध्दी या मध्ये नियती असते हे माझ्या लक्षांतच आले नाही. काहीतरी
प्रापंचिक अडचण आली आणि मी या संधीचा लाभ घेऊ शकलो नाही. त्यानंतर सुमारे पांच
वर्षे अशीच शिवथर येथे रहाण्याचे स्वप्न बघण्यात गेली.
परंतु यंदाच्या ऑगस्ट महिन्यात हा योग जुळून आला. दिनांक ३१ जुलै
रोजीच शिवथरला जाण्याचे प्रस्थान ठेवले. महाड पर्यंत राज्य परिवहन बस, महाड पासुन
बिरवाडी आणि त्यानंतर बिरवाडी बाग ते शिवथर घळ सहा आसनी रिक्षाने प्रवास करीत
शिवथर घळीत दाखल झालो. सुंदरमठाच्या सुंदर प्रवेश द्वाराने आमचे स्वागत केले
साक्षीला प्रपात होताच.
घळीत दाखल झाल्यानंतर
आम्हाला रहाण्यासाठी खोली देण्यांत आली. त्यावेळी घळीत प्रापंचिकांचा दासबोध
अभ्यास वर्ग चालू होता. त्यामुळे तेथे जवळपास शंभर लोक मुक्कामाला होती. मी घळीत होतो
त्या मुदतीत अतीवृष्टीने थैमान घातले होते. माझ्या वास्तव्याच्या काळात धबधब्याचा
वेग आणि प्रवाह प्रचंड वाढला होता. गेली अनेक वर्षे मी या पवित्र ठिकाणी येत आहे.
परंतु अशा प्रकारचे दृष्य पहाण्याचा योग कधी आला नव्हता.
माझ्या दृष्टीने शिवथर घळ
हे नुसते समर्थ स्थान म्हणून पवित्र नाही तर आणखी बरेच काही आहे. कारण मला प. पू.
आक्का वेलणकर यांचेकडून याच घळीत अनुग्रह मिळाला होता. या
पवित्र स्थानाला फार मोठा इतिहास आहे. समर्थकालिन इतिहास तर आहेच, त्याचबरोबर अनेक
वर्षे दुर्लक्षित असणाऱ्या या स्थानाचा शोध घेऊन त्याचे परत सुंदरमठात रुपांतर
करणे या संपूर्ण घटनांचा इतिहास पाहणे फार रोचक आहे.
अतिशय दुर्गम असणारे हे
स्थान शिवकालात चंद्रराव मोऱ्यांची जहागिर होती. त्या चंद्रराव मोऱ्यांना शिवाजी
महाराजांनी पुनर्स्थापित केले होते. तेच मोरे परत शिरजोर होऊन शिवाजी महाराजां
विरुध्द विजापुरच्या बादशहाकडे कागाळ्या करत होते. ते जावळी खोरे स्वराज्यात सामिल
व्हावे या द़ृष्टीने पार्श्वभूमी तयार करावी म्हणून समर्थ शिवथर घळीत जवळपास दहा
वर्षे वास्तव्यास होते.
बारा वर्षे टाकळी येथे
तपश्चर्या, बारा वर्षे देशाटन केल्यानंतर समर्थांनी कृष्णाकाठ ही आपली कर्मभूमी
ठरवली होती. त्या कृष्णेच्या परिसरात चाफळ येथे प्रभु श्रीरामांचे मंदीर स्थापन
करुन त्यांनी स्वराज्याला परमेश्वराचे अधिष्ठान प्राप्त करुन दिले होते. या साऱ्या
अनुभवाचा फायदा आपल्या शिष्यांना आणि समाजाला व्हावा म्हणून समर्थांनी दासबोधा सारख्या बहू
आयामी ग्रंथाची निर्मिती करण्याचे ठरविले होते. त्याकरीता त्यांना निवांतपणा आणि
एकांत पाहीजे होता. म्हणूनच कोणाचाही उपद्रव न होता निवांत लेखन करता यावे या उद्देशाने
समर्थांनी शिवथर घळी सारख्या दुर्गम स्थानाची निवड केली होती.
घनदाट आणि निबिड अशा झाडांनी वेढलेल्या या
नैसर्गिक घळीच्या परिसरात अनेक हिंस्त्र श्वापदांचा वावर असे. घळीच्या तोंडावरच
प्रचंड प्रपात पडत होता. असे विलक्षण स्थान असणाऱ्या या शिवथर घळीचे वर्णन
समर्थांनी असे केले होते.
हल्लीच्या
काळातिल श्री राम वेळापुरे (संस्कृत दासबोधकार) यांनीही शिवथर घळीवर “शिवकन्दराष्टकम्” लिहिले आहे ते मला एका जुन्या सज्जनगड
मासिकात वाचायला मिळाले ते येथे देत आहे. त्यांनी केलेल्या घळीच्या वर्णनामध्ये
त्यांनी या स्थानाला महाराष्ट्र संजीवनी म्हटले आहे आणि ते खरेच आहे. शिवथर मध्ये
राहून गेल्यानंतर माणूस रिचार्ज होतो. त्याला परत प्रापंचिक जिवन जगण्यासाठीची
शिदोरी येथे प्राप्त होते.
महाभारता
सारखे मोठे काव्य लिहिताना महर्षी व्यासांना प्रश्न पडला होता की, याचे लेखन कोण
करेल, तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष विद्येची देवता गणपतीला लेखक होण्याची विनंती
केली. तेव्हा त्याने लेखन करताना मी थांबणार नाही अशी अट घातली होती. दासबोधाचे लेखन करणारा लेखक देखिल तसाच महान
होता. त्याची बुध्दी देखिल तितकीच तेजस्वी होती. समर्थांचा पट्टशिष्य कल्याण
स्वामी समर्थांच्या बरोबर लेखक म्हणून आले होते. मात्र ते समर्थांच्या बरोबर न
रहाता तेथुन जवळच असणाऱ्या नलावडे पठार येथे रहात असत त्या पठाराला सद्या रामदास
पठार म्हणून ओळखले जाते. कल्याणस्वामी हे एकपाठी होते. तल्लख होते. याची प्रचिती
आपल्याला पळणीटकर गुरुजी यांच्या समर्थ चरित्रातील डाळगप्पू या गोष्टीवरुन येते.
ते दररोज सूर्योदयापूर्वी आपले आन्हीक उरकुन लेखनाकरीता घळीत हजर असत.
या स्थानाला प्रत्यक्ष
शिवाजी महाराजांनी भेट दिलेली आहे. रायगड, प्रतापगडाच्या निर्मितीचे स्वप्न
महाराजांनी येथेच पाहिले आहे. समर्थांच्या वास्तव्याच्या काळात शिवथर घळीत
गणेशउत्सव साजरा होत असे. त्याबद्दल गिरिधर स्वामींच्या पुढील रचनेत आपल्याला
उल्लेख सापडतो.
समर्थे सुंदरमठी
गणपती केला । दोनी पुरुषे सिंदूरवर्ण अर्चिला ।।
सकळ प्रांतासी
महोच्छाव दाविला । भाद्रपद मासा पर्यंत ।।
समर्थांच्या
जिवनाची मुख्य
हरिकथा निरूपण| दुसरें तें राजकरण | तिसरें तें सावधपण| सर्वविषईं ||१|| चौथा अत्यंत साक्षप| फेडावे नाना आक्षप | अन्याये थोर अथवा अल्प| क्ष्मा करीत जावे ||२|| ही चतु:सूत्री होती. त्यामुळे नुसते दासबोधाचे
लेखन हा समर्थांचा घळीत रहाण्याचा उद्देश नक्कीच नव्हता. समर्थांच्या शिवथर घळीतील
वास्तव्याच्या काळांत शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. त्याकरीता
परमेश्वराचे अधिष्ठान समर्थांनी पुरवीले होते. केवळ एवढेच नाही, समर्थांच्या
शिष्यवर्गाने या काळात गुप्तहेराची कामे केली होती. जावळी खोऱ्यात ज्या प्रतापगडावरती अफजल खानाला मारलं
त्या प्रतापगडावर समर्थांचा मठ होता. तिथूनच पाच मैलावरती पारगाव खंडाळा येथे
समर्थ रामदासांचा मठ होता. पसरणीला आणि महाबळेश्वरला समर्थ रामदासांचा मठ होता.
महाबळेश्वरहून साताऱ्याला जाताना मेढा मधे लागतं, त्या मेढ्याला समर्थ रामदासांचा मठ होता. पाचगणीच्याखाली कण्हेरी
नावाच गाव आहे तिथे समर्थ रामदासांचा मठ होता. कण्हेरीपासून दहा मैलावर शिरवळ आहे
तिथे समर्थ रामदासांचा मठ होता. याचा
पुरावा विजापुरचा सरदार निघाला आहे अशी ओव्यांची आद्याक्षरे असणारे समर्थांचे
शिवाजीमहाराजांना लिहिलेले पत्र आहे.
राजकारण संवादा| मिळोंचि नेणें ||२|| ऐसें लौंद बेइमानी| कदापि सत्य नाहीं वचनीं |पापी अपस्मार जनीं| राक्षेस जाणावें ||३|| असे केले आहे. अशा बेईमानी राक्षसाशी
समजुतदारपणा असणारच नाही. तेव्हा सावध राहून योग्यप्रकारे त्याचा मुकाबला करावा असे
म्लेच दुर्जन उदंड| बहुतां दिसाचें माजलें बंड | याकार्णें अखंड| सावधान असावें || या ओवीत म्हटले आहे. त्याच समासात धर्मस्थापनेचे
नर| ते
ईश्वराचे अवतार | जाले आहेत पुढें होणार| देणें ईश्वराचें || असे शिवाजीमहाराजांचे वर्णन केलेले आपल्याला
पहायला मिळते.
असो हा झाला शिव-समर्थ
कालीन शिवथरघळ सुंदरमठाचा इतिहास. आता आपण हल्लीचा इतिहास बघुया. शिव-समर्थांच्या
निर्याणानंतर या स्थानाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. परंतु समर्थांचा इतिहास
आणि त्यांचे वाङ्मय यांच्या शोधाचा ध्यास घेतलेल्या समर्थ ह्रदय नानासाहेब देव
यांनी अनेक कागदपत्रांच्या सहाय्याने सध्याच्या शिवथर घळीचा शोध घेतला. त्याकाळात
या स्थानाला गोसाव्याची घळई असे संबोधले जायचे.
शिवथर घळीचा शोध
संपल्यानंतर या स्थानाची सर्वसामान्य जनतेला, शिव-समर्थ भक्तांना ओळख करुन
देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. सन १९६० मध्ये भगवान श्रीधरस्वामींच्या
हस्ते येथे समर्थांच्या आणि कल्याणस्वामींच्या मूर्तींची स्थापना करण्यांत आली.
मूर्ती स्थापना झाल्यावर त्यांची दैनंदीन पूजा अर्चा करण्यांत मोठ्या अडचणी
होत्या. कारण येथे येण्याकरीता पायवाटेशिवाय मार्ग नव्हता. आजुबाजुला किर्र जंगल,
त्यामध्ये श्वापदे वावरत होती. वाटेत नदी होती. यातुन मार्ग काढुन समर्थभक्त
नारायणबुवा पोतनिस आणि समर्थभक्त महादेव नारायण बेंद्रे यांनी दैनंदिन पूजेकरीता
आणि नैवेद्याकरीता येथे रहायचे ठरविले. परंतु येथे रहाणे म्हणजे जिवावर उदार
होण्यासारखेच होते. कारण येथे वाघोबा सारखे प्राणी खुलेआम फिरत होते. त्यावर उपाय
म्हणून ते बांबुच्या सहाय्याने केलेल्या पिंजरावजा घरांत ते रहायचे आणि जंगली
प्राणी खुले वावरायचे.
अशा प्रकारे काही वर्षे
गेल्यानंतर कै. मामा गांगल यांनी या स्थानाच्या कारभाराची जबाबदारी स्विकारली.
त्यांनी अनेक समर्थ भक्तांशी संपर्क साधुन निरनिराळ्या व्रतांच्या उद्यापनाद्वारे
खूप मोठा निधी जमा केला. सुरवातिला साध्या शेडमध्ये भक्तांची सोय करण्यांत येत असे.
मामांच्या आणि त्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने सध्या दिसत
असलेले सुंदरमठाचे स्वरुप दिसत आहे. सध्या घळीत कल्याण मंडप, गजानन मंडप यासारखे
मोठ्ठे हॉल, सुसज्ज स्वंयपाकघर, समर्थभक्तांना रहाण्यासाठी अनेक खोल्या उपलब्ध
असतात.
घळीत अनेक मोठे कार्यक्रम
होतात. त्यात मुलांकरीता संस्कार वर्ग, प्रापंचिकांकरीता दासबोध अभ्यास वर्ग, प.
पू. आक्का वेलणकर यांनी चालू केलेला दासबोधाचा सखोल अभ्यास या उपक्रमाचा सप्ताह
असे मोठी उपस्थिती असलेले कार्यक्रम होतात. याशिवाय अनेक ग्रुप दासबोध
पारायणाकरीता येत असतात. कधी कधी चारशे पाचशे माणसे देखिल वस्तीला असतात. याशिवाय
दासबोध जन्मोत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
दररोज पहाटे साडे
पांचवाजता पक्षांच्या किलबिलाटात, मोरांच्या केकांच्या पार्श्वसंगिताच्या साथिने
भूपाळ्या आणि काकड आरतीने येथिल दिवस सुरु होतो. त्यानंतर दिवसभरात पारायण, पूजन
अर्चन इत्यादि अनेक कार्यक्रम चालू असतात. संध्याकाळी साडे सहावाजता सांप्रदायिक
उपासना केली जा ते. यामध्ये समर्थांची करुणाष्टके, सवाया, निरनिराळी अष्टके,
दासबोध-मनोबोध वाचन, आरती, रामनाम जप यांचा समावेश असतो. संध्याकाळच्या उपासनेची
सांगता कल्याणकारी रामराया या प्रार्थनेने होते. या सर्व कार्यक्रमांत सहभागी
झाल्याने मनाला समाधान मिळते. प्रपंच विसरायला होतो. त्यातच जर घळीमध्ये
धबधब्याच्या रुद्रगंभिर आवाजाच्या साथीने ध्यानाला बसल्यास शरिराची आणि मनाची
बॅटरी चांगली चार्ज होते.
हल्लीच घळीत समर्थ
चरित्राचे चित्ररुप
प्रदर्शन लावलेले आहे. या प्रदर्शनात मोठी मोठी
पुस्तके वाचुन जे समजणार नाही ते १५-२० मिनिटांत ही चित्रे आणि त्यांचे वर्णन
करणारा थोडक्यांत मजकूर यांच्या सहाय्याने समजते. हे एक वेगळेच माध्यम आहे. हल्ली
लोकांना पुस्तके वाचणे नको असते त्या ऐवजी हे माध्यम सोपे आहे. पूर्वी हे प्रदर्शन
फिरते होते. जबलपुर येथील श्री सुरेश तोफखानेवाले यांनी या चित्रप्रदर्शनाची
निर्मिती केली आहे. आपण हल्ली पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे थोडक्यांत एखाद्या
प्रकल्पाची माहिती सादर करतो तसेच हे थोडेसे आहे. येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाने
हे प्रदर्शन आवर्जुन पहायलाच हवे.
शिवथर घळ येथील धबधबा हे
आणखीन एक आकर्षणाचे केंद्र आहे. तरुणाईला येथील धबधबा भुरळ घालतो. सेल्फी घेणे,
धबधब्याच्या पार्श्वभूमिवर फोटो घेणे याचे आकर्षण तर सर्वांनाच असते. त्यामुळे
पावसाळ्यांत येथे भेट देणाऱ्या भक्तांची रिघ लागलेली असते. अशा या पवित्रस्थानी
सेवा करण्याच्या निमित्ताने आम्हा उभयतांना तेथे रहायची आणि तेथिल दिव्य अनुभव
घेण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य होते.
शिवथर घळीतील बहुसंख्येने
असलेली माकडे हे येथिल खास वैशिष्ट आहे. येथे भेट देणारे पर्यटक त्यांना काहिना
काही खायला घालतात. परंतु त्यांचे तेवढ्या अल्प खाण्याने समाधान होत नाही.
त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती माकडे पर्यटकांचे सामान पळवत असतात.
परंतु त्यांनी माणसांना इजा केली आहे असे क्वचितच घडले असेल. मोठ्या संख्येने असुन
देखिल ती माणसांना घाबरतात. असे जरी असले तरी ते शेवटी माणसाचे पूर्वज आहेत.
त्यांच्याकडे बुध्दीचे देणे परमेश्वराने दिलेले आहे. याचा प्रत्यय मला एकदा आला.
मी श्रीधर स्वामी सभागृहातिल चित्रप्रदर्शन उघडून बसलो होतो. तेव्हा चार पाच माकडे
दारा पर्यंत आली म्हणून मी जिन्याला असलेली कोल्याप्सेबल ग्रील बंद केले. तर ती
माकडे माझ्या नाकावर टिच्चून त्या ग्रील्समधुनच आपले अंग चोरुन जिन्यामध्ये दाखल
झाली.
आमच्या वास्तव्याच्या काळांत म्हणजे, श्रावण प्रदिपदे पासुन ते अगदी नारळी पोर्णिमे पर्यंत पावसाने नुसते थैमान घातले होते. दिवसभरात काही तासच पाऊस कमी व्हायचा. त्याकाळांत धबधब्याची निरनिराळी रुपे पहायला मिळाली. शिवथर घळीत येण्याचा मार्ग चालू असला तरी वरंधाघाट, महाबळेश्वर घाट, कशेडी घाट हे सर्व घाट बंद होते. महाड, रोहा, नागोठणे, चिपळुण, खेड, राजापुर या सर्व शहरांत पाण्याने थैमान घातले होते. त्यामुळे घळीत कोणतेही वाहन येत नव्हते.
आमच्या वास्तव्याच्या काळांत म्हणजे, श्रावण प्रदिपदे पासुन ते अगदी नारळी पोर्णिमे पर्यंत पावसाने नुसते थैमान घातले होते. दिवसभरात काही तासच पाऊस कमी व्हायचा. त्याकाळांत धबधब्याची निरनिराळी रुपे पहायला मिळाली. शिवथर घळीत येण्याचा मार्ग चालू असला तरी वरंधाघाट, महाबळेश्वर घाट, कशेडी घाट हे सर्व घाट बंद होते. महाड, रोहा, नागोठणे, चिपळुण, खेड, राजापुर या सर्व शहरांत पाण्याने थैमान घातले होते. त्यामुळे घळीत कोणतेही वाहन येत नव्हते.
मला गणपती, समर्थांच्या
आणि कल्याणस्वामी यांच्या मूर्तीची आणि मारुतिरायाच्या पूजेची जबाबदारी दिली होती.
तर सौ. वर्षा काऊंटर मदत करत होती. आमच्या तेथिल वास्तव्याच्या काळांत वीज गायब
होणे हे नित्याचे झाले होते. त्यामुळे उपासना करायला अथवा पूजा करायला बॅटरी किंवा
मोबाईलच्या बॅटरीचे सहाय्य घ्यावे लागत असे. महाड बंद असल्याने पूजेकरीता फुले
येणे बंद झाले होते. त्यामुळे घळीत उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीवर पूजा करावी
लागत असे. भगवद्गीते भगवंतांनी म्हटले आहे, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । त्या प्रमाणे दुर्वा तुळशी तगरीची दोन
चार फुले यांच्या सहाय्याने भागवावे लागत होते. तरीही त्या पूजेने समाधान मिळत
होते. रोज पुरुषसूक्त, श्रीसूक्त आणि रुद्र यांचे पठण घळीतिल मंदिरात होत होते.
पंच सूक्त पवमानाची संथा घेतल्यापासून ज्या ठिकाणी अनुग्रह घेतला तेथे त्याचे पठण
करावे ही इच्छा होती, ती पुरी झाली. श्रावण शुध्द एकादशीच्या दिवशी पंचसूक्त
पवमानाचे पठण समर्थांच्या समोर आणि जेथे अनुग्रह प्राप्त केला त्या स्थानी करता
आले याचा खूपच आनंद झाला.
रामदासी
संप्रदायामध्ये मारुति उपासनेला फार महत्व आहे. समर्थ जिथे जिथे गेले तिथे त्यांनी
शक्ती आणि बुध्दीच्या या देवतेची स्थापना केलेली आढळते. आमच्या या वास्तव्या
दरम्यान श्रावणातिल तिसरा शनिवार आला होता. या दिवसाचे वैशिष्ट म्हणजे या दिवशी
मारुती उपासना करण्याचा प्रघात गेली अनेक वर्षे चालू आहे. समर्थ स्थापित अकरा
मारुती ज्या चाफळच्या परिसरात आहेत तेथे या उपासनेची सुरवात झाली आहे. एकावेळी
एकाच दिवशी ही सामुहिक उपासना केली जाते. या उपासने मध्ये सर्वप्रथम गणेश वंदना,
जय जय रघुवीर समर्थ हा गजर, तेरा वेळा समर्थ रामदासस्वामी विरचित मारुति
स्तोत्राचे तेरा वेळा पठण, रामरक्षा, श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी
मंत्राच्या अकरा माळा जप, आरती, प्रसाद आणि कल्याणकरी रामराया या प्रार्थनेने
सांगता असा क्रम असतो. योगायोगाने समर्थ वास्तव्याने पुनित असलेल्या स्थळी ही
उपासना आम्हाला करता आली.
शिवथर
घळीत रहाण्याचा फायदा असा आहे, की येथे कोणत्याही मोबाईलला नेटवर्क उपलब्ध नसते.
त्यामुळे जगाच्या संपर्कापासुन दूर होतो. नो फेसबुक, नो व्हॉटस् अँप, नो ईमेल
त्यामुळे कोणताही डिस्टर्ब नव्हता. एकंदरीत सुंदरमठातिल हे वास्तव्य आनंदाचे,
उत्साहाचे आणि आत्मिक शक्ती वाढवणारे होते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।