माझ्या आठवणी_श्रीवर्धन पोस्टामधली पूजा परंपरा
आज २६ जानेवारी २०१९. श्रीवर्धन पोस्ट ऑफिस स्टाफ तर्फे दरवर्षी या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा केली जाते. माझ्या आठवणी प्रमाणे सन १९८० मध्ये सध्याच्या पोस्ट ऑफिसच्या इमारतित पोस्ट ऑफिसचे स्थलांतर झाले त्या निमित्ते पहिली पूजा केली गेली होती. त्यावेळी कै. भिसे हे सबपोस्टमास्तर म्हणून कार्यरत होते. त्यांच्याच प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यात ज्या इमारतीचा आदर्श घेतला गेला अशी इमारत पोस्ट ऑफिसला मिळाली. त्यावेळी जेव्हा जेव्हा नवीन पोस्ट ऑफिसकरिता इमारत घ्यायची असेल तर श्रीवर्धनच्या पोस्ट ऑफिसची इमारत मॉडेल म्हणून दाखविली जायची.
अशा या इमारतित सन १९८० साली सुरु झालेली सत्यनारायणाच्या पूजेची परंपरा आज चाळीसाव्या वर्षीही तितक्याच उत्साहाने पाळली जाते. पूजेच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे स्टाफच्या सर्व कुटूंबाचे हे एक गेट टू गेदर असते. सर्वजण एकत्र येऊन आयते तयार जेवण न आणता सामुदायिक रितीने तयार केले जाते. ते बनवताना स्टाफ मधिल कुटुंबियांची एकमेकांशी ओळख होते. काम करता करता सुख दु:खाच्या गोष्टी शेअर केल्या जातात. त्यामुळे कोणावरही प्रसंग आला तर आपूलकी निर्माण झालेली असते.
पहिले दोन तिन वर्षे अगदी साधे घरगुती वरणभात, भाजी असा मेनु असायचा. त्यानंतर श्री मेहेंदळे साहेब सब पोस्टमास्तर म्हणून आल्यानंतर त्यांनी पहिला प्रस्ताव ठेवला तुम्हाला जर पूजेची प्रथा बंद करायची असेल तर करु शकतो. त्याकरिता माझे नांव पुढे केले तरी चालेल. परंतु सर्वाच्या सक्रिय सहभागाने पूजा साजरी करायचा उत्साह आणखी वाढला. श्री मेहेंदळे मास्तर आल्या पासुन पूजेच्या कार्यक्रमाला आखिव रेखिव स्वरुप प्राप्त झाले. त्यावर्षीपासुन जेवणात पक्वान्न म्हणून जिलेबी करायची परंपरा सुरु झाली. त्याकरीता तेव्हा सर्वांचे म्हणणे पडले की, बाकी सर्व पदार्थ घरी केले जातात. परंतु जिलेबी काही केली जात नाही. त्यावेळी श्रीवर्धनमध्ये आजच्या सारखे दररोज जिलेबी, श्रीखंड हे पदार्थ मिळत नसत. तेव्हा अनेक वर्षे जिलेबी हेच पक्वान्न चालू आहे. एक वर्ष जिलेबी करायाला काही कारणाने कोणी मिळत नव्हते तेव्हा मी जिलेबी पाडायाचा यशस्वी प्रयत्न केला होता. मध्यंतरी दोन तिन वर्षे आयते जेवण आणले जाऊ लागले होते. परंतु तेही परत बंद होऊन पहिल्यासारखे सर्वांनी मिळुन जेवण बनविण्याची प्रथा सुरु झाली.
कोणतीही परंपरा बारा वर्षे सुरु राहिली की, तिला तप झाले असे म्हणतात. या उक्ती प्रमाणे श्रीवर्धनच्या या सत्यनारायण पूजेच्या परंपरची तिन तपे उलटुन गेली आहेत. या परंपरेची सुरवात करणारे श्री भिसे मास्तर आज हयात नाहीत. पहिल्या पूजेच्यावेळी उपस्थित असणाऱ्या स्टाफ पैकी, श्री आर्. आर्. केमनाईक, श्री सवतिरकर, श्री मापुस्कर हे देखिल सध्या हयात नाहीत. कोणी सेवानिवृत्त झाले तर कोणी बदली होऊन दूर गेले. तरीही प्रत्येकाच्या मनांत श्रीवर्धनच्या या पूजेकरीता एक कोपरा राखिव आहे. मी माझ्या ३५ वर्षाच्या नोकरी पैकी पंधरा वर्षे श्रीवर्धन पोस्टात काम करीत होतो. या पूजेच्या नियोजनता माझाही खारीचा वाटा असायचा. आज श्री अरविंद कोसबे आणि श्री प्रफ्ल्ल दवटे हे दोघेचजण तेव्हाच्या स्टाफपैकी श्रीवर्धन पोस्टांत कार्यरत आहेत. तेव्हाच्या स्टाफची दुसरी पिढी आता या पोस्टांत काम करीत आहे.
आज चाळिस वर्षांच्या आठवणी मनांत दाटुन आल्या आहेत. त्या आठवणिंना फेसबुकच्या या पोस्ट द्वारे व्यक्त केल्या आहेत. श्रीवर्धनच्या स्टाफला या परंपरेला चालू ठेवल्याबद्दल हार्दिक धन्यवाद. कोणताही उपक्रम सुरु करणे सोपे असते परंतु त्यामध्ये सातत्य ठेवणे फार अवघड असते.
अनिल अनंत वाकणकर, माजी उपडाकपाल.